Thursday, 23 May 2019

लेख ( शांतिसागर महाराज )

आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनादि अनंत काळापासून  तीर्थंकरांची  परंपरा चालू आहे या सर्वांनी अध्यात्माची विचारधारा पोहोचविली. संसारात राहून हे शक्य नसते.  कारण समाजात कषाय रुपी, दुर्वव्यवहारी माणसेच जास्त असतात. ज्यावेळी समाजात अन्याय, अत्याचार आपली सीमा ओलांडत त्या त्या वेळी एका युगपुरुषाने जन्म घेतला आहे आपणास माहीतच आहे. मध्यंतरीच्या काळात जुनी परंपरा  खंडित झाली होती. पण शांतीसागर मुनी महाराजांनी ही परंपरा पुन्हा चालू केली. विसाव्या शतकातील ते एक  प्रेरणा स्त्रोतच होते.

महाराजांचे पूर्वज  विजापूर भागाकडील होते. ते 33 गावचे इनाम होते. कालांतराने ते या गावी स्थायिक झाले. इथे स्वकर्तृत्वावर धनसंपत्ती मिळवली. मानमरातब मिळवला. पाटीलकी ही मिळवली.  दूधगंगा व वेदगंगेच्या काठची सुपीक जमीन, तेथील लोकांचे परिश्रम, धार्मिक वृत्ती, समतेच्या वागणुकीमुळे भोजगाव लवकरच नावारूपाला आले. महाराजांच्या वडिलांचे नाव  भीमगोंडा पाटील आईचे नाव सत्यवती होते.   या धार्मिक  माता- पित्यांचे अहोभाग्य की त्यांच्या पोटी असा पुत्ररत्न जन्मला. बाळ पोटात असतानाच तो पुढे कोणीतरी मोठा होणार याचे लक्षण दिसत होते. कारण सत्यवती मातेला जे डोहाळे लागले होते ते विलक्षण होते. त्यांना वाटायचे की आपण आगजराजा डोक्यावर मंगल कलश घेऊन, एका हातात सहस्त्रदल कमल घेऊन गजराजवर बसून जिन मंदिराकडे जावे, जाताना सर्वांना जिन मंदिरात पूजेसाठी निमंत्रित करावे व नंतर सर्वांच्या समोर ते सहस्त्रदलयुक्त कमल भगवंतांना अर्पण करावे. मातेला पडलेल्या ह्या  स्वप्नाचे प्रत्यंतर नंतर महाराजांच्या  जीवनावरून आपल्याला पाहायला मिळते.

दिवस भरतात माता सत्यवती यळगुड ला आपल्या माहेरी आल्या. आषाढ कृष्ण 6 ला 1872 मध्ये बुधवारी रात्री तिने तेज:पुंज पुत्राला जन्म दिला.  जन्मकुंडली प्रमाणे हा मुलगा अत्यंत धार्मिक वृत्तीचा कणखर वृत्तीचा,  निरोगी प्रकृत्तीचा होईल असे  सर्व भविष्य जाणकारांनी सांगितले होते. त्यांचे नाव सात गोंडा असे ठेवण्यात आले. बाळ कलेकलेने वाढू लागला. सर्वांच्या कौतुकाचा विषय बनला, पण शाळेत काही त्याचे मन रमले नाही. त्यांनी तिसरीतच शाळा सोडून दिली. त्यांची वृत्ती धार्मिकतेकडे झुकत होती. वयाच्या नवव्या वर्षी त्यांचे लग्न एका सहा वर्षाच्या मुली बरोबर झाले. पण सहा महिन्यातच ती आजाराने मरण पावली. नंतर त्यांनी पुन्हा आपल्या लग्नाचा विषय काढू दिला नाही. मनाने ते कोमल असले तरीही  शरीराने कणखर होते. ते रानात पिकांची राखण करायला जायचे. पण कधीही पक्षांना हाकलून लावत नसत. उलट छोटी-छोटी लोटकी आणून त्यात पाणी भरुन ती झाडाला बांधत की जेणेकरून त्यांना पाणी पिण्यासाठी दूर जावे लागू नये. यावरून त्यांच्या मनाचा कोमलपणा व संवेदनशीलता दिसून येते. पक्षांना म्हणत की,"  हे शेतही तुमचे व मीही तुमचाच आहे.   तुम्ही निर्भयपणे वावरा." पण आश्चर्य असे की,  त्यांच्याच शेतात धान्य खूप पिकायचे.

त्यांचा मित्रपरिवार पण मोठा होता. एकदा त्यांचा एक मित्र आत्महत्या करत होता, महाराज  त्याच वेळी त्याला शोधत तिथे गेले व त्याला आत्महत्येपासून परावृत्त केले. आलेल्या संकटावर धीराने मात कशी करायची असते हे त्याला पटवून दिले. अशाप्रकारे जीवन जगत असतानाच  त्यांच्या मातापित्यांनी सल्लेखना घेतली.  त्यानंतर महाराजांचे मनही  धार्मिकतेकडे वळू लागले.  स्वतः एक मुनी बनावे अशी जबरदस्त इच्छा त्यांच्या मनात घर करू लागली. ते आपला जास्त वेळ मुलींच्या सानिध्यात घालवू लागले. देवेंद्रकीर्ती महाराजांनी त्यांना सुरुवातीला क्षुल्लक दीक्षा दिली. तो दिवस होता 6 जून 1914. घरच्या लोकांनी सातगोंडांना खूप समजावून सांगितले, पण ते त्याच्या पलीकडे गेले होते.

आता धर्मप्रभावना, धर्मप्रसाराचे काम ते गावोगावी जाऊन करू लागले. आपल्या प्रवचनांनी ते लोकांना ते मंत्रमुग्ध करीत असत. ते लोकांना सांगत की,"  भौतिक सुखासाठी नैतिक मूल्यांना पायदळी तुडवू नका, अविनाशी आत्म्यांना जाणून घ्या, ध्यानधारणा आत्मचिंतन करा, तरच हा भवसागर पार करून जाल."  प्रसारमाध्यमांद्वारे त्यांची कीर्ती दूरवर पसरली. व त्यांच्या प्रवचनांना गर्दी होऊ लागली.  त्यांच्याप्रवचनात कधीही पुनरावृत्ती नसे. समुदाय कशा प्रकारचा आहे तशा प्रकारचे त्यांचे बोल असायचे.

गिरनार पर्वत हे प्रथम जैन आगम षटखंडगमाचे जन्मस्थळ आहे जैन धर्मियांचे अत्यंत पवित्र असे तीर्थक्षेत्र आहे. अशा पर्वतावर जेंव्हा महाराज गेले तेंव्हा तिथे त्यांना विशेष वैराग्य प्राप्त झाले. त्यांच्यात विरक्ती भाव इतका उफाळून आला की त्यांनी अंगावरील वस्त्र कायमचे सोडून दिले व ते ऐल्लक बनले. वाहनात बसायचे नाही असा निर्धार केला. लोकांना मार्गदर्शन करताना त्यांना  रुचेल ,पचेल अशा पद्धतीने ते करत. संगीत नाही वातावरणात गाणी गाऊन सुद्धा त्यांनी लोकांना उपदेश केला. षडरिपुंचा त्याग  करायला शिकवले. स्वाध्यायाचा ध्यास लावला. सोहळ्याचे स्तोम माजवणे, अस्पृश्यांना कमी लेखणे त्यांना अजिबात आवडत नसे. धर्माच्या, दिखाऊपणा च्या ते विरोधात होते. सर्वांशी प्रेमाने वागावे व संयमाने राहावे असे ते सांगत. अनेक वेळा त्यांनी सम्मेद शिखरजी ची यात्रा पूर्ण केली. या कठीण यात्रेतही त्यांनी अनेक वेळा अनेकांना विविध प्रकारे मदत केली व त्यांचे दुःख दूर केले.

1929 साली  द्रोणागिरी पर्वतावर ध्यानाला बसल्यानंतर एक वाघ त्यांच्यासमोर बसला जराही घाबरले नाहीत. महाराजांच्या दर्शनाने त्या वाघातील क्रूरता नष्ट झाली व शांत भावनेने त्यांच्या सानिध्यात थोडावेळ थांबून निघून गेला. त्यांचे हे धैर्य वाखानण्याजोगी आहे. त्यांना चातुर्मासाला नेण्यासाठी चढाओढी लागत असत. समाजातील मिथ्यत्व व घालविण्यासाठी महाराजांनी आजन्म परिश्रम घेतले. त्यांचा ज्ञानघटातून नेहमी सदाचाराचा पाझर होत असे.अनेक उपसर्ग झेलूनही त्यांनी आपली तपसाधना कधीही भंग होऊ दिले नाही. यामुळे सर्वदूर त्यांची इतकी ख्याती झाली की हा अध्यात्मिक हिरा पाहण्यासाठी लांबून लोक हजेरी लावत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू लोकांच्या समोर उलगडत होते. त्यांच्या विचारांनी प्रबोधनाचा झंजावात सगळीकडे ज्ञानप्रकाश पसरवत होता. त्यामुळे 7 एप्रिल 1924 ला सर्वांनी एकत्र येऊन मुनिश्री 108  शांतीसागर महाराजांना " आचार्य "  पद बहाल केले. विसाव्या शतकातील ते पहिलेच म्हणे होत. आचार्य पद दिल्या दिवशीच  आचार्यश्रींनी श्री.  वीरसागर मुनींना व नेमीसागर मुनींना  निग्रंथ दिगंबर दीक्षा दिली. 31 वर्षे ते आचार्य पदावर राहिले.

सर्व जाती-धर्माच्या लोकांबद्दल त्यांच्या मनात आत्मीयता होती. त्यांची ख्याती इतकी वाढली होती की बागणी व  परिसरातील करबल खेळणारे व रिवायतु गाणाऱ्यांनी शांतिसागर महाराज यांच्यावर गीत गात हा खेळ खेळत असत. अशाप्रकारे त्यांच्याबद्दल प्रेम भावना आदरभावना वाढीस लागली. ते शांतीचे सागर होते. अहंकाराचा लवलेश ही त्यांच्यात नव्हता. 1925 साली श्रवणबेळगोळ येथे महामस्तकाभिषेक सोहळ्यासाठी शांतिसागर महाराज देवेंद्रकीर्ती महाराज एकमेकांस भेटले. तेव्हा शांतीसागर महाराजांच्या दर्शनाने ते इतके प्रभावित झाले की त्यांनी त्यांना वाकून नमस्कार केला व पुन्हा त्यांच्याकडून पुनर्दिक्षा घेतली. अशाप्रकारे गुरुजींनु शिष्याकडून मुनी दिक्षा घेतल्याची घटना जैन इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली गेली.

बागेवाडी ते गुराळ चालू करण्या अगोदर बकरा बळी दिला जायचा. तेव्हा तेथेही त्यांनी सर्व जैन व अजैनांना एकत्र बोलावून संदेश दिला व ती प्रथा बंद पडण्यास सांगितले.काही बरेवाईट झाले तर स्वतः बळी जाण्याचा विचार मांडला. नमोकार मंत्राने गुऱ्हाळाची सुरुवात केली व नेहमीपेक्षा जास्त फायदा करून दाखवला.अशाप्रकारे तिथली बळी प्रथा बंद पाडली ती आजतागायत बंद आहे. उत्तर भारतात विहार करताना भयंकर अशा नागसर्पाला ते धीराने सामोरे गेले व त्याला शांत केले असे ते शांतीसागर होते. प्रवचन ऐकायला त्यांनी बांधवांनाही त्यांनी जवळ बोलावून घेतले. जैन धर्माच्या या अस्मितेने पूर्ण जगाला अध्यात्म तेजाने उजळून काढले व अनेकांचे कल्याण केले. धनगर लोक सुद्धा शांतीसागर यांची गीते गात असत.

25 मे 1945 रोजी त्यांनी जैन साहित्याच्या संवर्धनासाठी श्री चारित्र चक्रवर्ती शांतीसागर दिगंबर जैन जिनवानी जिर्णोध्दार संस्था, फलटण येथे स्थापन केली. व त्या ठिकाणी मौलिक ग्रंथांचे संरक्षण केले. त्यांच्या सुजाण, निर्मळ चारित्र व आचरणामुळे सन 1950 ला त्यांना " चारित्र चक्रवर्ती " या उपाधीने गौरवले गेले. काळाच्या कसोटीवर पारखून तावून-सुलाखून ते आणखीनच उजळून निघाले होते. जैनांचे अस्तित्व टिकविण्यासाठी व त्याला स्वतंत्र धर्म म्हणून जोपर्यंत मान्यता मिळत नाही तोपर्यंत मी अन्नग्रहण करणार नाहीत अशी त्यांनी भगवंतासमोर मनोनिग्रह केला. शेवटी 16 ऑगस्ट 1951 ला शासनाने अनुकूल निर्णय दिल्यानंतर त्यांनी अन्नग्रहण केले. धर्मरक्षणार्थ प्राणार्पणाची तयारीही त्यांनी दाखवली होती.

प्रकारे अनेकांचे जीवन कृतार्थ केल्यानंतर या महामानवाला दुसरेच वेध लागले. त्यांच्या मनात विरक्ती भाव जागृत झाला दुसऱ्या जगाकडे जाण्याचा प्रवास सुरू झाला. सर्वप्रथम त्यांनी मोठ्या मनाने सर्वांची माफी मागितली. सर्वांच्या हृदयाचा ठोका चुकला... सर्वांना कळून चुकले की आता काय होणार आहे. हा पावन आत्मा परमात्म्यात विलीन होऊ इच्छित होता. मोक्ष स्थानाला जवळ करू इच्छित होता. सर्व शक्ती आत्म चिंतनात, धर्म ज्ञानात लावली. कुंथलगिरी वर त्यांचे सल्लेखना व्रत सुरू झाले. त्यांनी इंगिनी मरण साधले. म्हणजे शेवटपर्यंत कोणाकडूनही सेवा करुन घ्यायची नाही. सल्लेखनाच्या 36 व्या दिवशी रविवार दिनांक 18 सप्टेंबर 1955 ला सूर्योदयानंतर सहा वाजून पन्नास मिनिटांनी अमृतसिद्धीयोग असताना निर्वाण झाले. एक क्षण सर्व जग स्तब्ध झाले.. या निश्चयाचा महामेरू ला वंदन करण्यास झुकले. त्यांच्या त्या तेजोवलयाने व संस्काराने आपण आपला उद्धार करून घेऊया.व म्हणूया,

  "  संस्काराचे अमृतसिंचन आचार्यांनी केले,
    भक्तगणांचे रोमरोमही उल्हसित झाले.
      शांतीसागर प्रखर ज्योतीने सर्वांना
         दिपविले,
      " स्वयंप्रकाशी "  आम्ही व्हायचे वेध नवे
         लागले.

  लेखिका 
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

No comments:

Post a Comment