शेतकरी- आनंदी जीवनाचा शिल्पकार
शेतकरी आनंदी जीवनाचा शिल्पकार... आश्चर्य वाटले ना ? पण हे खरे आहे. आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे हे सर्वांनाच माहिती आहे. शेती हा आपल्या अर्थव्यवस्थेचा मूलभूत घटक आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात सरदार ,जमीनदार तर स्वातंत्र्यानंतरच्या काळात सुद्धा शेतीमालाला, दुधाला भाव कमी असल्यामुळे शेतकरी नाडला जात होता. या सर्वांपासून शेतकऱ्याचे संरक्षण करण्यासाठी त्याला आधार देण्यासाठी शेतकरी संघटना निर्माण झाल्या, शेतकऱ्यासाठी लढा दिला गेला व शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा कणा असल्याची जाणीव शेतकऱ्याला व समाजाला झाली. पूर्वी शिवाजी महाराज सारख्या रयतेच्या राजांनी, शाहू महाराज सारख्या संस्थानिकांनी शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केला व धरणे, कालवे बांधले. बियाण्यांचा पुरवठा केला व शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केला. पूर्वी वस्तुविनिमय पद्धतीमुळे शेतकरी व इतर समाज यांच्यामध्ये देवानघेवान. पद्धती मुळे सामान्य लोकांचे व शेतकऱ्यांच्यामध्ये मध्ये सामंजस्याचे नाते निर्माण झाले होते. सर्व एकमेकावर अवलंबून होते. पण जसजसे शहरीकरण,औद्योगीकरण, दळणवळण सुविधा झाल्या तसतसा पैसा ही संकल्पना अस्तित्वात आली. व शेतीमालाची किंमत होऊ लागली. शेतकरी शहरात जाऊ लागला. सांगोला नवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळवून तो विचारी बनू लागला. शेतीची आधुनिक साधने यांच्या साह्याने शेतीत सुधारणा करू लागला. नवीन पद्धतीचा वापर नवीन उपक्रमांच्या आधारे नवनवीन प्रयोग करून शेतीमालाचे उत्पादन वाढवू लागला.बाजा पेठांची दालन खुले झाले. बागायती बरोबर जिरायती पिकांचे उत्पादन होऊ लागले.नगदी पिकामुळे पैसा लागलीच हाती पडत असला तरी त्यासाठी कष्टही तेवढेच करावे लागत असे. कष्ट करायला शेतकरी कधीही मागे पडत नाही किंवा कंटाळत नाही. त्याला माहिती आहे त्याची शिवार शेती म्हणजे त्याच्यासाठी शंभर नंबरी सोनं आहे.काळी आई म्हणजे त्याचा जीव की प्राण आहे. तो कधीही तिच्याशी प्रतारणा करत नाही. उलट तिच्यासाठी रात्रं-दिवस उन्हा पावसात मरमर राबतो.आपल्या मुलाबाळांच्या, कुटुंबसाठी हाल-अपेष्टा सहन करतो, पण कधी कुणाकडे तक्रार करीत नाही. प्रसंगी कर्ज काढतो व शेती करतो कधी सावकाराच्या फासाने तर कधी निसर्गाच्या अवकृपेमुळे पीक हाती येत नाही. पैसा मिळत नाही व कर्जाच्या खाईत तो ढकलला जातो. काही आत्महत्या करतात पण आपल्या जमिनीशी प्रतारणा करत नाहीत.
शेतकऱ्यांच्या ही काही अआशा अपेक्षा असतात, मुलं-बाळं संसार असतो. आपल्या मुलांनी चांगले शिकावे, संसार चांगला व्हावा यासाठी तो आनंदाने शेती करतो. उसाचे बिल असो किंवा कोणत्याही पिकाचे बिल असो. ते येईपर्यंत कर्ज काढून आपल्या कुटुंबाच्या गरजा भागवतो व स्वतः आनंदी राहतो व आपल्या कुटुंबाला आनंदित ठेवतो व स्वतः ही आनंदी होतो.समाधानी मन हे शेतकऱ्याला मिळालेले वरदान आहे. महागाई, रासायनिक खते,बी-बियाणे यांच्यावर खूप पैसा खर्च होतो. पण त्यामानाने शेतीमालाला हमीभाव मिळत नाही. दुधाला योग्य दर मिळत नाही .यासाठी तो प्रसंगी आंदोलन करतो. कोणताही सण समारंभ असो,यात्रा असो तो सर्व आवडीने करतो व उत्साहाने पार पाडतो.स्वतः उपाशी राहतो पण जगाचे पोट भरतो. स्वतःच्या शेतातील पिक पाहून तो आंनंदी होतो.शेतात कष्ट करुन आल्यानंतर ही तो नशिबाला दोष देत बसत नाही. तर आहे त्यात समाधान मानतो.शेतकरी संघटनांच्यामुळे उसाला पुर्वीपेक्षा चांगला दर मिळाला आहे. त्यामुळे आज शेतकरी आपल्या मुलांना चांगले शिक्षण व रहाणीमान देऊ शकत आहे.बऱ्याच ठिकाणी सेंद्रिय शेतीचा अवलंब केला जात आहे. पण त्याची कींमत बाजाराभावापेक्षा जास्त असल्यामुळे सर्वसामान्य जनता तो माल खरेदी करण्यासाठी उत्सुकता दाखवत नसला तरी काही ठराविक वर्ग आता रासायनिक उत्पादनाला पर्याय म्हणून सेंद्रिय भाजीपाला व फळभाज्या विकत घेताना दिसत आहे. हळूहळू सर्वांना याचे महत्त्व कळेल व शेतकरी जो सेंद्रिय उत्पादन घेतो त्यालाही याचा फायदा होईल. अल्पभूधारक शेतकरी व शेतमजूर यांना जरी हे शक्य नसले तरी ते आहे त्यात दररोजच्या जीवनातील एक भाग आहे असे समजून कोणत्याही प्रकारची तक्रार करत नाहीत.आपल्या मुलांना शिक्षण देण्यात ते कुचराई करत नाहीत.शेतकऱ्याची परिस्थिती थोडी सुधारली आहे. लहान घरांच्या जागी मोठी घरे सर्वसोयींनीयुक्त बांधण्यात त्याला यश आले आहे. घरात टीव्ही आल्यामुळे त्याला सर्व प्रकारची माहिती घरबसल्या मिळत आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर बाकीच्या देशातील शेतकरी कसा करतात याची प्रत्यक्ष माहिती प्रात्यक्षिकासह पहायला मिळाल्यामुळे स्वतःच्या शेतात ते तंत्रज्ञान वापरले तर कसा फायदा होईल हे तो अनुभवावरून शिकू लागला आहे.संगणकीय युगात तर नवीन क्रांतीच झाली आहे. मनुष्यबळ कमघ प्रमाणात वापरून संगणकाच्या सहय्याने शेती केली जात आहे. शिक्षणक्षेत्रात सुद्धा शेतकी क्षेत्रातील अभ्यासक्रमाला महत्त्व प्राप्त झाले आहे. बी.एस.सी.अग्रीकल्चर मधे पदवी संपादन करुन शासकीय नोकरीत आपले भविष्य शेतकऱ्यांची मुले आजमावत आहेत. बागकाम क्षेत्रातील नोकरीच्या संधीही उपलब्ध आहेत.याचा फायदा आजचा युवक घेत आहे. हाच युवक पुढे आधुनिक शेतकरी होतो.आपल्या शेतात नवीन प्रयोग करून शेतकरी सतत प्रयत्नशील राहतो. कोळंबीसारखे उत्पादन ही काही शेतकरी करत आहेत. एकरी ऊसाचे व इतर उत्पादन वाढवण्यासाठी नेहमी कार्यरत असतो.उसाच्या पिकामध्ये शेंगा, गवारी, भेंडी, वरणा,पालाभाजी,मक्का,बीट,कांदा.बटाटा,रताळीई.सारखी आंतरपिके घेतो.यामुळे घरातील गरज तर भागतेच शिवाय बाजारात जाऊन विक्री केल्यास बाकी लोकांची गरजही भागते.पावसावर मात करण्यासाठी शेततळी तयार करतो व पाण्याची गरज थोड्याफार प्रमाणात भागवण्यात यशस्वी होतो.म्हणजे कोणत्याही परीस्थितीत नाराज व निराश न होता आशावादी राहून जीवन जगत असतो. शासनही आता शेतकऱ्यांना प्रेरणा देण्यासाठी, त्यांचा ऊत्साह वाढविण्यासाठी विविध पुरस्कार देत असतो.शेतकऱ्यांना अद्ययावत माहिती मिळावी यासाठी विविध योजनांची माहिती शेतकरी मासिकात, पेपरात, आकाशवाणीवर, दुरद्शनवर अनेक कार्यक्रम आयोजित करुन त्याची माहिती प्रसारित करत असते.हा सकारात्मक बदल शेतकरी स्विकारायला लागला आहे. आपल्या जीवनात आनंद शोधण्याचा व आनंदाचे बीज पेरण्याचा प्रयत्न करत आहे. शेतकरी सुखी, आनंदी तरच आपण सुखी राहणार आहोत.याचा आपण गांभिर्याने विचार केला पाहिजे. भारताचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी सर्वांचे प्रयत्न आवश्यक आहेत.म्हणून आपण नेहमी शेतकऱ्यांबद्दल कृतज्ञ राहिले पाहिजे. सेंद्रिय खतांचा पुरवठा ,सकस बियाणे, शेतीमालाला योग्य हमीभाव मिळवून देण्याचे मौल्यवान कार्य जरी आपण केले तर शेतकऱ्याचे जीवन आनंदी व सुखदायी बनवण्यात आपला हातभार नक्कीच लागेल. भूतान हा देश आनंदी शेतकर्यांचा देश म्हणून गणला जातो.कारण या देशातील जंगल संपत्ती भरपूर आहे.शासन शेतकऱ्यांना सेंद्रिय खतांचा, बियाणांचा पुरवठा करते.व शेतकऱ्यांच्या शेतीमालाला बाजारपेठा उपलब्ध करून देते व शेतमालाला योग्य भावही देते.यामुळे तिथला शेतकरी हा पूर्ण समाधानी व आनंदी आहे.परिणामी सगळेच आनंदाने राहतात.शेतकऱ्यांना महत्त्वाचे स्थान दिले आहे.त्याप्रमाणे भारतातील शेतकरीही कायमचा आनंद होऊ शकेल व आपला देशही आनंदी शेतकर्यांचा देश म्हणून गणला जाईल.त्यासाठी आपण सर्वांनी सर्वप्रथम शेतकरी हा आपला बांधव आहे.अशी मनाची समजूत केली पाहिजे. बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या मालाची कींमत आपण कमी न करता विकत घेतले पाहिजे. आपण मोठमोठ्या मॉलमधे जाऊन मागेल त्या कींमतीला वस्तू खरेदी करतो,मोलभाव करत नाही. मग शेतकऱ्यांचा माल विकत घेताना मात्र आपण एवढी घासाघीस करुन कींमत पाडून का मागतो बरं ? मग शेतकऱ्यांचे खच्चीकरण कोण बरं करत आहे ? विचार करा.शेतकरी आनंदी तर आपण आनंदी त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील व कटिबद्ध राहुयात.दुसऱ्यांनी पुढे यावं असे न म्हणता स्वतः एक पाऊल पुढे उचलूया . शेतकऱ्यांना ,आपल्या पोशिंद्याना मानाचे स्थान देऊया.भारत हा कृषिप्रधान देश असल्यामुळे याशिवाय आपल्याला दुसरा पर्याय नाही. नोकरदार मुलांपेक्षा शेतकरी मुलगा हा स्वत:चाच मालक व मिळवता असतो.त्याच्या जमिनीचा तो राजा असतो.त्यामुळे तो नेहमीच आनंदी राहण्याचा प्रयत्न करतो.त्याचा हा आनंद चिरकाल टिकवण्यासाठी आपण कारणीभूत होऊ शकतो.आपला देश आनंदी बनवू शकतो.मग विचार कसला करताय?
लेखिका
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
9881862530
No comments:
Post a Comment