Wednesday, 22 May 2019

पुस्तक परीक्षण ( राष्टमाता रमाई )

पुस्तक परीक्षण

राष्ट्रमाता रमाई

कमळ जसे चिखलात उमलते पण आपल्या सौंदर्याने सर्वांची वाहवा मिळवते.तसेच गरिबीच्या सागरात जन्मूनसुद्धा आपल्या अपार सौंदर्याने,समंजस वृत्तीने रामीने सर्वांना आपलेसे केले.परीस्थिती मानवाला घडवते असे म्हणतात. लहानपणापासूनच गरिबीचे चटके सहन करताना ,आपल्या आईकडून स्वाभिमानाचे ,कामसूपणाचे धडे त्यांनी घेतले.व ते त्यांना त्यांच्या पुढच्या आयुष्यात कसे उपयोगी पडले हे लेखकाने अत्यंत सुंदर शब्दात " राष्ट्रमाता रमाई " या पुस्तकात माता रमाईंचे शब्दचित्र रेखाटले आहे. पात्रांच्या तोंडी असलेली ग्रामीण भाषा समंजसतेने व्यक्त केल्यामुळे कथेशी वाचक एकरूप होतो.प्रसंगांचे, स्थळांचे, व्यक्तींचे वर्णन करताना लेखकाने सर्वांचे शब्दरूप तंतोतंत नजरेसमोर उभे केले आहे.वाचताना वाचकाला स्वतः प्रसंग अनुभवतो आहे असे वाटते हेच या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे.कोणत्याही गोष्टीमध्ये यश हे मिळतच असते.पण ते सहजासहजी मिळत नाही.त्यासाठी अपार कष्ट व कमालीची सहनशीलता लागते व त्याचबरोबर जिद्द व चिकाटीही लागते. सामान्य माणसाला ते शक्य  नसते.त्यासाठी असामान्यत्व व्यक्तीमत्वच  असावे लागते. व हेच असामान्यत्व, सोशिकता, स्वावलंबन असलेली एक महान स्त्री म्हणजे  "माता रमाई " होय .लेखक दिनकर काकडे यांनी  या कादंबरीमध्ये माता रमाई चे वर्णन वरील सर्व गुण तिच्यामध्ये कसे शिगोशीग भरले आहेत हे आपल्या लेखणीच्या सामर्थ्याने दाखवून दिले आहे. बाबासाहेब आंबेडकर महान झाले त्यामध्ये त्यांची पत्नी रमाबाई यांचा सिंहाचा वाटा आहे. बाबासाहेब जेंव्हा शिक्षणासाठी बाहेर होते तेंव्हा कुटुंबाची जबाबदारी त्यांनी पेलली.अतिशय बिकट,हलाखीच्या स्थितीत, नशिबाला दोष न देता ,ब्र शब्द न काढता अत्यंत कसोशीने रमाबाईंनी संसार चालवला.त्यामुळे तर  बाबासाहेब प्रज्ञासूर्य होऊ शकले. आईने व सासर्‍याने दिलेला उपदेश त्यांनी जन्मभर पाळला व सर्वांच्या आदर्श ठरल्या.भिमासारख्या वादळाच्या कलेने वाहिल्या, त्यांची सावली बनून राहिल्या व जीवात जीव असेपर्यंत त्यांनी भीमरावांना साथ दिली.बाबासाहेब ज्ञानसूर्य झाले व आपल्या समाजबांधवांसाठी एक प्रकाशवाट झाले याचे अतिशय सुरेख वर्णन लेखकाने या पुस्तकात केले आहे

जातीव्यवस्थेची तत्कालीन परिस्थिती मांडताना उच्चविद्याविभूषित डॉक्टर बाबासाहेबांना बडोदा संस्थांनमध्ये नोकरी करताना किती हीन प्रकारची वागणूक मिळायची,मानहानी सहन करावी लागायची.ते सर्व अपमानास्पद प्रसंग आपल्या लेखणीतून लेखकाने उतरवले आहे.अशा परीस्थितीत कुणाचेही मन बंड करुन उठणार नाही तर काय होईल ? बाबासाहेबांचेही तसेच झाले.रमाबाईंना लहानपणापासूनच कामाची आवड व कोणतेही काम हलके म्हणायचे नाही की त्यांच्या आईची शिकवण यामुळे लग्नानंतर सुभेदारांच्या घरी त्या आल्या पण रामजी संपकाळ यांच्या निधनानंतर घरची हलाखीची परिस्थिती पाहून शेण गोळा करुन त्याच्या गोवऱ्या थापून घर संसाराला मदत केली या व अशा अनेक दुःखद प्रसंगांचे लेखकाने अत्यंत कौशल्याने वर्णन केले आहे. वाचकाचे मन रमाबाईबद्दल करूण रसाने ओथंबून जाते.हे सगळं कसं शक्य आहे....?  हे सर्व कसं सहन केलं असेल..... असे अनेक अनुत्तरित प्रश्न मनाला पडल्याशिवाय राहत नाहीत. आजच्या पिढीतील युवा वर्गाला बाबासाहेबांचे शिक्षण प्रेम व समाजातील अन्याय सहन करत अमर्यादित हाल-अपेष्टा सहन केल्या याचे. तर युवतींना किती हालअपेष्टा सहन करून पतीला साथ देऊन गरिबीतही स्वाभिमानाने संसार कसा करायचा याचे ज्वलंत उदाहरण या पुस्तकाच्या रूपाने देण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. माता रमाईंंना अवघे 38 वर्षे आयुष्य मिळाले. याएवढ्या वयातही त्यांनी अपार कर्तृत्व केले. घरामध्ये काहीही खायला नसताना मुंबईतील लोकांनी त्यांना दोनशे रुपयांची थैली बहाल केली पण तरीही त्यांनी ती नम्रपणे नाकारली यातच त्यांचा स्वाभिमानी बाणा दिसून येतो. दागिन्यांच्या पेक्षा कपाळावरील कुंकू हाच खरा महत्वाचा दागिना आहे हे या पुस्तकातील एका प्रसंगावरून अतिशय सुंदर  रित्या समजावून सांगितलेले आहे .यामध्ये बाबासाहेब आपल्या खिशामध्ये कुंकवाचा करंडा  झाकून ठेवतात व आपल्या पत्नीला  दागिने घालण्यास  देतात मग ती दागिने घालून येते व कुंकवाचा करंडा शोधू लागते. त्यावेळी बाबासाहेब तिला म्हणतात. " अगं दागिने आहेत ना?  कुंकवाचा करंडा कशाला पाहिजे ?"  त्यांनी न सांगताच रमाई समजून गेल्या की आपल्याला दागिन्यांच्या पेक्षा आपलं सौभाग्य कुंकू हे  महत्त्वाचा आहे.

ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टर चे शिक्षण घेण्याकरता लंडनला जात होते त्याच वेळेला त्यांना निरोप देण्यासाठी कोल्हापूरचे राजे राजर्षी शाहू महाराज त्यांना भेटायला आले यातूनच  महाराजांचे त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकरांचे ही थोरपण दिसून येते.संपूर्ण कादंबरीत माता रमाईंच्याबद्दलचे लेखकाचे विचार एक जिव्हाळा, हाल अपेष्टा सहन करणारी माता,पतीशी एकनिष्ठ राहून फक्त आणि फक्त दु:खच साहिले त्यामुळे तर त्या अमर झाल्या हे खूपच सुंदर पद्धतीने रेखाटले आहे.

पान नंबर 17 ते 551 एवढ्या पानात माता रमाबाईंचे चरित्र सामावले आहे 552  व 553 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनाचा घटनाक्रम थोडक्यात नोंदविला गेलेला आहे. 554 पानावर त्यांची पूर्ण वंशावळ आपल्याला पाहायला मिळते. ते 555 ते 556   पानांमध्ये पुस्तकाने ज्या संदर्भग्रंथांचा वापर केलेला आहे त्या संदर्भग्रंथांची सूची आहे.  557 पानांपासून  553 पानांच्या पर्यंत विविध अभ्यासू मान्यवरांची या पुस्तकाबद्दल च्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. यावरून या पुस्तकाबद्दल विविध लोकांच्या मनामध्ये असलेल्या प्रतिक्रियाही आपल्याला पाहायला मिळतात.  मुखपृष्ठावर माता रमाई चे अतिशय सोज्वळ फोटो मनाला भावतो. त्याच प्रमाणे पाठीमागच्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आकाशाएवढे व्यक्तिमत्व  सूर्य बिंबाच्या साक्षीने  प्रकाशमान होताना दिसते. मलपृष्ठावरील लेखकाचा अल्पपरिचय वाचताना त्यांच्या यशाचा आलेख चढताना दिसतो लेखकाची महानता कळते. लेखक बँकेतून शाखाधिकारी म्हणून निवृत्त झाले, तरीही त्यांची आवड प्रशंसनीय आहे. लेखक श्री दिनकर विष्णू काकडे यांची भाषा अतिशय प्रवाही वाचकांना खिळवून ठेवणारे व राष्ट्र माता रमाई यांचे चरित्र अतिशय सुंदर भाषेमध्ये त्यांनी रेखाटलेले आहे. कादंबरी वाचनीय झाली आहे.कवितासागर  प्रकाशन चे प्रकाशक  डॉक्टर सुनील पाटील यांनी या पुस्तकाची बांधणी सुंदर रीतीने केलेली आहे. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. लेखकांच्या हातून अशाच प्रकारे भविष्यातही बहारदार लेखन व्हावे हीच सदिच्छा.

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

No comments:

Post a Comment