Tuesday, 14 May 2019

लेख ( राष्ट्राच्या विकासात शिक्षकाचे महत्त्व )

स्पर्धेसाठी

लेख

राष्ट्राच्या विकासात शिक्षकाचे महत्त्व

  गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः

गुरु,हा ब्रह्मा आहे  विष्णू आहे,महेश्वर सुद्धा आहे. गुरुः साक्षात परब्रम्ह चे स्वरूप आहे. गुरु एकाद्या विद्यार्थ्यांचेच जीवन घडवत नाही ,तर हजारो विद्यार्थ्यांच्या बरोबर आपल्या देशाचे  भविष्यसुद्धा सक्षम पणे बनवण्यामध्ये त्याचा हातभार असतो. गुरु म्हणजे फक्त शालेय जीवनामध्ये शिक्षण देणारे ज्ञान देणारे नव्हेत. आपल्याला ज्ञान संस्कार शिकवणारे आपले आई वडील सुद्धा गुरु इतकेच महत्त्वाचे असतात. एखादं मूल जन्माला येतं त्या वेळेला असणारे त्याचे घरातील आई-बाबा ,घरातील व्यक्ती कशा वागतात, कशा बोलतात ,कशा चालतात याचं अनुकरण ते करतो आणि त्या पद्धतीने  वागण्याचा ,राहण्याचा, बोलण्याचा प्रयत्न करतात. घरातील संस्कारांनी युक्त असा हा विद्यार्थी जेव्हा शाळेमध्ये येतो तेव्हा त्याच्याच वयाची त्याच्याच सारखे असणारे अनेक विद्यार्थी त्याला त्याच्या सभोवती दिसत असतात त्या वेळेला ही मुले जशी वागतात तसेच आपण सुद्धा वागले पाहिजे असे त्याला वाटत असते. आणि या वेळेला सगळ्यात महत्त्वाचे कार्य हे शिक्षकाचे असते. म्हणजे शिक्षक  सर्व विद्यार्थ्यांच्या समोर एक आदर्श व्यक्ती म्हणून उभा असतो. शालेय जीवनामध्ये सर्व विद्यार्थ्यांचा आदर्श त्यांचे गुरुजन त्यांचे शिक्षक असतात. शिक्षकांच्या वर विद्यार्थ्यांची फार मोठी श्रद्धा असते. घरातील संस्काराची शिदोरी घेऊन जरी हे शाळेत आले असले तरी एक आदर्श नागरिक बनवण्यासाठी जे संस्कार आवश्यक असतात ज्या प्रकारचे व्यक्तिमत्त्व घडायचे असते ते व्यक्तिमत्व ते संस्कार घडवण्याचे काम जबाबदारी ही शिक्षकांच्या वर असते. कारण आजचा विद्यार्थी हा भावी नागरिक बनणार असतो. जर आत्ताच्या विद्यार्थ्याला आपण आदर्शाचे संस्काराचे व्यक्तिमत्व विकासाचे योग्य ते धडे दिले तर पुढे जाऊन हा एक उत्तम सुसंस्कारित असा नागरिक बनेल. परिणामी राष्ट्राला सुदृढ विचारांचा नागरिक सहज मिळेल. जीवनामध्ये सहशालेय उपक्रमातून ,विविध स्पर्धा , उपक्रमांच्या मध्ये विद्यार्थ्यांना भाग घेण्यास प्रेरित  करण्यास शिक्षक कारणीभूत ठरतो. या सर्व स्पर्धा, उपक्रमांमधून विविध गुणदर्शन असू दे ,शाळेतील क्रीडा स्पर्धा असू देत. या सर्वांमध्ये भाग घेत असताना एक प्रकारचे सहकार्याची खिलाडू वृत्ती विद्यार्थ्यांच्या मध्ये अंगी बाणते. हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून अशा प्रकारच्या स्पर्धा घेतल्या जातात. जर काही कारणास्तव यामध्ये दूषित वातावरण निर्माण झाले तर ते सुरक्षित करण्यासाठी ,आनंददायी करण्यासाठी शिक्षकाची भूमिका अतिशय महत्त्वाची असते. शालेय जीवन असू दे किंवा कॉलेज जीवन असूदे भावी नागरिक तयार करण्याचं ते अत्यंत महत्त्वाचं असं वय असतं आयुष्यातील महत्त्वाची पायरी असते आणि या पायरीवर त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याचं काम आई-वडिलांच्या बरोबर शिक्षकच करतो .इतर कोणीही करू शकणार नाही. बऱ्याच वेळेला असेही पाहायला मिळते की विद्यार्थी आपल्या आई-वडिलांच्यापेक्षा गुरुवर त्याची श्रद्धा ,भक्ती, विश्वास असतो. विद्यार्थी जीवनामध्ये शिक्षक हा विद्यार्थ्यांचा एक आदर्श मॉडेल असतो. म्हणूनच विद्यार्थी ही राष्ट्राची संपत्ती आहे आणि ही संपत्ती  सुरक्षित ठेवण्याचेच काम शिक्षकांना करावे लागते. कर्मवीर भाऊराव पाटील बहुजन समाजातील मुले दीनदलितांची मुले यांच्यासाठी वेगळ्या शाळा काढल्या आणि त्यांना कमवा व शिका योजनेअंतर्गत त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यामध्ये यशस्वी झाले आणि त्यांच्यामध्ये स्वावलंबीत्व, श्रमप्रतिष्ठा हे गुण त्यांनी विकसित केले आहेत जेणेकरून ही मुले पुढे कुठेही जगाच्या पाठीवर जरी गेली तरी सुद्धा यशस्वी होतीलच. सावित्रीबाई फुले ,महात्मा फुले यांनी शिक्षणाची गंगा स्त्री शिक्षणाचे महान कार्य घेतले. सावित्रीबाई फुलेंनी स्त्री ही  लोकसंख्येचा महत्त्वाचा भाग आहे त्या स्त्री शिक्षणाला त्यांनी महत्व दिले व त्याचा पाया रोवला.  याचा परिणाम म्हणून स्त्री सुशिक्षित झाली व आज ती सर्व क्षेत्रांमध्ये आघाडीवर आहे .प्रत्येक क्षेत्रामध्ये आपले पाय रोवून उभी आहे. याचा अर्थ असा राष्ट्र सुधारण्यात राष्ट्र घडवण्यात शिक्षकाचा सिंहाचा वाटा असतो.

लेखिका
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

No comments:

Post a Comment