आता उरली फक्त सकारात्मकता.....
सुंदरगांव नावाप्रमाणेच सुंदर होते. गावाभोवती उंचच ऊंच डोंगररांगा खुणावत होत्या. डोंगरावरील हिरवीगार झाडी मनाला मोहवत होती.झाडांवर पक्षांनी घरटी बांधली होती,पक्षांचा कीलबिलाट निसर्गाच्या सानिध्यात असल्याची जाणीव करुन देत होता.शांतारामलाही हे सर्व जाणवत होतं.आज त्याचे मन उद्विग्न झाले होते. अ़धाराने आपली शाल पांघरायला सुरवात केली होती. तो सावकाश जमिनीवर हात टेकून उठला.आपल्या दुर्बलतेची जाणीव त्याला पदोपदी होत होती.आपली काय अवस्था झाली आहे हे पाहून त्याला आपले तरुणपण आठवू लागले...
शांताराम आपली बायको बायजा बरोबर सुखात संसार करत होता. त्यांच्या संसारवेलीवर अजय व संगीता अशी दोन फुले उमलली.आपल्या मुलांच्या कडे पाहून दोघेही खूप आनंदी होत.शांताराम बायजाला म्हणाला, " व्हय गं बायजा, म्या काय म्हणतो , हे बघ, आपल्याला आपल्या परिस्थितीमुळे शिकता न्हाई आलं.आपण आपल्या पोरास्नी लई शिकवायचं बघ." बायजाला हे ऐकून खूप बरं वाटायचं.ती म्हणायची, " व्हय जी , व्हय ,लय शिकवायचं आपण आपल्या पोरास्नी."शांताराम म्हणायचा , " त्यासाठी आपल्याला कष्ट करावं लागल बघ ." मुलांच्या भविष्यासाठी काबाडकष्ट करत होते.अजय व संगीता दोघेही शाळेत जात होते.पूर्ण लक्ष देऊन अभ्यास करत असत.गुरुजींच्या लक्षात हे आले होते. ते अजय व संगीताला म्हणाले, " हे पहा, अजय संगीता,मला तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत. तुमची बुद्धिमत्ता खूप चांगली आहे. खूप अभ्यास करून तुम्ही मोठे व्हा."
अजय व संगीताला आपल्या घरची परिस्थिती माहीत होती.दोघांनी खूप अभ्यास केला.शाळेत, अभ्यासात प्रगती करु लागले.गावात सातवीपर्यंतच शाळा होती. पुढील शिक्षणासाठी शहरात जावे लागणार होते.गुरुजी घरी आले.शांताराम व बायजाला आनंद झाला. ते म्हणाले, " या या गुरुजी. गरीबांच्या झोपडीला पाय लागलं आपलं.आनंद झाला आमास्नी " गुरुजींनी सभोवार दृष्टी फीरवली.कौलारू घर,पत्र्याचा आडोसा केलेल्या भिंती,पण जमीन सारवलेली.घरात वीजेचा पत्ताच नव्हता. हे सर्व पाहून गुरुजींना वाईट वाटले.पण या अशा परीस्थितीला सामोरे जात अजय व संगीता अभ्यासात कसे पुढं आहेत हे पाहून त्यांच्या पुढच्या शिक्षणासाठी शहरात पाठवले पाहिजे असं वाटू लागले.ते म्हणाले, " हे बघ शांताराम, तुझी दोन्ही मुले हुशार आहेत. त्यांना पुढे शिकव.शहरात पाठवं त्यांना." शांताराम म्हणाला, " अवं गुरुजी, तुमी म्हणता तेबी गरं हाय,पर आमची परीस्थिती तुमाला माहीतच हाय नव्हं.दोघांच्या शिक्षणाचा खरच आमाला नाय परवडणार." गुरुजींना काय बोलावं काय कळेना.कारण अभ्यासात अजय व संगीता दोघेही हुशार होते.दोघांनीही पुढे शिकावं असं त्यांना वाटत होते.ते शांताराम ला म्हणाले, " अरे , तुझी दोन्ही मुलं हुशार आहेत.दोघांनाही शिकवायला हवं.तेंव्हा आपण असं करु,तू अजयच्या शिक्षणाचा खर्च कर , मी संगीताच्या शिक्षणाचा खर्च करतो.पाठवू दोघांना आपण शहरात शिकायला." शांताराम व बायजाला दोघांना बरे वाटलं,अखेरीस दोघांनाही शहरात शिक्षणासाठी पाठवायचं ठरलं.
जूनचा महीना आला.अजय व संगीता दोघांना शहरात पाठवायचं होतं.गुरुजी दोघांना घेऊन निघाले. शांताराम व बायजा दोघांना काय बोलावे कळत नव्हते.दोघेही भावनाविवश होऊन आपल्या पोरांच्याकडे पहात होती. आपल्याला सोडून आपली मुले कशी राहतील त्या मोठ्या शहरात ? हाच एक विचार त्यांच्या मनात येत होता.गुरुजींनी त्यांना समजावून सांगितले.मनावर दगड ठेवून त्यांनी आपल्या पोटच्या लेकरांना शहरात पाठवले.गुरुजींनी आधीच अजयची मुलांच्या वसतिगृहात व संगीताची मुलींच्या वसतीगृहाचा सोय केली होती.दोघांनाही जवळ पडेल अशा मध्यवर्ती ठीकाणी असणाऱ्या एका चांगल्या शाळेत प्रवेश मिळवला होता.दोघांना घेऊन गुरुजी शहरात आले.ते शहरी वातावरण पाहून अजय व संगीता बावरुन गेले.दोघांनी एकमेकांना घट्ट पकडले.शहरातील माणसांची,वाहणांची तोबा गर्दी पाहून ते भेदरून गेले.अजय गुरुजींना म्हणाला, " गुरुजी, ही एवढी माणसं कुठुन येऊन कुठे चाललेत एवढ्या गडबडीत ? " गुरुजी हसले व म्हणाले ," हे बघ अजय, हे सर्व लोक आपल्याला कामासाठी जात आहेत.शहरात लोकांची संख्या जास्त म्हणून तूला गर्दी दिसते.पण घाबरु नका दोघेही.मी तुम्हाला सर्वकाही व्यवस्थित दाखवतो.ते लक्षात ठेवा." सांगितल्याप्रमाणे गुरुजींनी दोघांची शाळा,वसतिगृह दाखवली,महत्वाची ठीकाणेही दाखवली.गुरुजी म्हणाले,
" भरपूर अभ्यास करुन चांगले मार्क मिळवा,शाळेचं व गावाचं,तुमच्या आईबाबांचे नांव करा." असे सांगून ते दोघांनाही आशिर्वाद देऊन निघाले. अजय,संगीता रडू लागले,पण गुरुजींनी त्यांना समजावून सांगितले व ते परत गावी आले.
गावी आल्यावर ते शांताराम व बायजाला भेटले.सर्व हकीकत सांगीतली.दोघांचे हृदय मुलांच्या आठवणीने भरून आले. बायजाने डोळ्याला पदर लावला व हुंदके देऊन रडू लागली. शांताराम तिला समजवत स्वता:ही रडत होता.गुरुजींनी दोघांची समजूत काढली व घरी निघून गेले.आपल्या मोडकळीस आलेल्या पत्र्याच्या घरात दोघेही उदास होउन बसले होते.पावसाळ्यात घर गळायला नको म्हणून ते शेकरुन घ्यायचे म्हटले तरी नवीन कौलं आणायला पैसा नव्हता.म्हणून तो विचार बाजूला ठेवला.थोड्याच दिवसांत वादळवाऱ्याला सुरुवात झाली. पत्रे थडथड वाजू लागली. वारा फुटलेल्या कौलांतून आत येत होता.आभाळ भरुन आले.लवकरच वातावरण अंधारुन आले.शांताराम काळजी करु लागला.," आता कसं हुयाचं गं बायजा ? "बायजाने उत्तर दिले, " आता कसलं काय घिऊन बसला धनी ? आता आपल्या हातात काय बी नाय,बघू परमेश्वराच्या मनात काय हाय कुणाला दकल." दोघांचे संभाषण असे चालू असतानाच आकाशात वीज चमकली.ढगांचा गडगडाट झाला. दोघांच्या काळजाचा ठोका चुकला.आपल्या घराचं काय खरं नाही असं दोघांना वाटू लागलं.लवकरच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. वारा आडवातिडवा वहात त्यामुळे पाऊसही वेड्यासारखा सगळीकडे नाचत होता.गळक्या छपरातून पाणी खाली टपकू लागले.शांताराम व बायजाची धांदल उडाली. घरातली भांडी,पातेली,बादल्या टपकणाऱ्या थेंबाखाली ठेऊ लागले.पण पावसाचा जोर काय आवरत नव्हता.घरासमोरील झाड करकर आवाज करत झोके घेऊ लागले.कामट्यांनी पत्र्यांना बांधले होते.वाऱ्याच्या झोतापुढे त्यांच काय चालेना.पत्रे सगळे खिळखिळे झाले. कौलंही उडून खाली पडून फुटली.छपराला भगदाड पडल्यासारखे झाले होते.शांताराम व बायजाला काय करावे सुचेना.ते दोघे आगतिकपणे एकमेकांकडे पाहण्याशिवाय दुसरे काहीच करु शकत नव्हते.जमीनीवर पाणी साचलं होतं.झोपायचाही प्रश्न निर्माण झाला होता. दोघांना वाटलं बरं झालं दोन्ही पोरं हे सोसायला इथं नाहीत. त्यांनी बसूनच रात्र काढली. सकाळपर्यंत पावसाने उसंत घेतली होती.शांताराम ने बाहेर येऊन आपल्या घराची..घर कसले ते ? मोडकळीस आलेले पत्र्याचे शेड ते !!! त्याच्या डोळ्यासमोर ते एकमेकांपासून बाजूला गेलेले पत्रे ,बिनाकौलाचे ते छप्पर दिसू लागले.. त्याने बायजाला हाक मारली, " अगं ये बायजा.. ये वाईच भाईर.बघं काय परिस्थी झाल्या गं आपल्या घराची." बायजा बाहेर आली व पाहू लागली.तिने डोक्यालाच हात लावला.म्हणाली, " अरं देवा, माझ्या कर्मा,काय झालं ह्ये सारं ? आता एवढं साहित्य कुठुन आणायचा दुरुस्तीसाठी ? "
झोपडीवजा घराची पार दैना झाली होती.दारात उभा असलेला वृक्ष निष्पर्ण झाला होता.अतिशय उदास वातावरण निर्माण झाले होते.
शांताराम कंबरड मोडल्यासारखं बसून राहिला.बायजाच त्याला म्हणाली, " धनी,असं कुठंवर बसणार मग तुमी ? उठा कायतर केलचं पायजे नव्ह ? " " व्हय,व्हय,बायजा,उठतो आता,कुठं काय काम मिळतं का बघून येतो." असं म्हणून शांताराम सावकाश उठला.अंगात त्राण नसल्यासारखे त्याला वाटत होते.पण आता हे घर दुरुस्ती करायची होती,मुलांना शहरात शिकायला पाठवलं आहे.त्यासाठी पैसा तर मिळवायलाच पाहिजे.हा विचार करून तो गावाकडे चालू लागला.आता मिळतील ती कामे करायची असं ठरवत तो कामाच्या शोधात निघाला. एक सकारात्मक विचार घेऊनच....
लेखिका
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर