लेख स्पर्धा
शिक्षक - समाजाचा खरा शिल्पकार
गुरु म्हणजे जो "लघू " नाही.जो आपल्यातील लघुत्व घालवतो व महान बनवतो , विचारप्रवण बनवतो तो गुरु होय.गुरु यशाचा मार्ग दाखवतो व अज्ञानातून ज्ञानाकडे नेतो.
पूर्वी गुरुला आचार्य असेही म्हटलं जात असे.पूर्वीची शिक्षणपध्दती ही गुरुगृही राहून सर्व कलेमध्ये परीपूर्ण होत असत.या आश्रमशैलीत उच्च - निचतेचा , आपपर भाव कुठेही पहायला मिळत नव्हता. राजघराण्यातील व सामान्य एका छताखाली शिकत , ज्ञान ग्रहण करत. आचार्यांच्या शब्दाला किंमत होती.समाज त्यामध्ये समाज हस्तक्षेप करत नसे.त्यामुळे सर्व विद्यार्थी नम्र , ज्ञानी , श्रमाला महत्व देणारे होते.गुरु , शिक्षक जे काय सांगतील ते प्रामाण्य मानत असत.कारण राजदरबारीही गुरुला मान होता.
कालांतराने आश्रमशैली बंद झाली.गावागावात शाळा निर्माण झाल्या.सरकारने पगारी शिक्षकांची नेमणूक केली.विद्यादानाबरोबर शिक्षक सामाजीक क्षेत्रात कार्यरत राहू लागला.गावातील महत्वाच्या निर्णयामध्ये शिक्षकाचे मत विचारात घेतले जाऊ लागले. शिक्षकाला एक मानाचे व आदराचे स्थान होते.
शिक्षक हे ज्ञानाची ज्योत पेटवणारे असतात.ते एक दिपस्तंभाप्रमाणे असतात.येणाऱ्या जीवनात यशाची वाट दाखवतात. भविष्याच्या साच्यात बसवण्याचा प्रयत्न करतात. आपल्या शिक्षकांकडून शिकलेले आपल्याला आयुष्यभर स्मरणात राहते. शिक्षक आपल्याला चूक , बरोबर , चांगले , वाईट काय आहे हे सांगत असतात. सारासार विचार करायला लावत असतात.ते सतत ज्ञानदान करायला तयार असतात.पण त्यासाठी ज्ञानार्जनासाठी कपटरहीत मनाने गेले पाहीजे , तरच अपेक्षित फलप्राप्ती होते.
गुरुंमुळेच आपल्याला देवाची ओळख होते , म्हणूनच कबीर गुरुलाच श्रेष्ठ मानतात व म्हणतात ,
" गुरु गोविंद दोऊ खडे "
काके लागौ पाय,
बलिहारी गुरु आपने ,
जिन्ह गोविंद दियो बताय "
गुरुप्रमाणे शिष्यानेही आपल्या गुरुची शिक्षा वाया जाऊ देऊ नये.आपल्या जीवनातील चुका शोधून बाजूला काढल्या पाहीजेत.शिक्षक आपल्या आई-वडीलांच्यासारखेच असतात.चुकले की शिक्षा करतात व चांगल्या गुणांचे कौतुक करतात.त्यांना सर्व विद्यार्थी सारखेच असतात.
भारतात १९६२ पासून ५ सप्टेंबर हा दिवस " " "शिक्षकदिन" साजरा करण्यात येऊ लागला. शिक्षकाने केलेल्या कामाचा गौरव म्हणून आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरवण्यात येऊ लागले.त्यामुळे शिक्षकाकडे मानवतेचा पाया भक्कम करणारा , मानवी मूल्यांनीयुक्त भावी पिढी घडवणारा एक निर्माता म्हणून पाहीले जाऊ लागले. शिक्षकसुद्धा स्वतःला झोकून देऊन कार्य करु लागला.शिक्षणक्षेत्राबद्दल डॉ. राधाकृष्णन म्हणतात,
" शिक्षण म्हणजे व्यक्तीची खरी चमक व सौंदर्य असते, ही आपल्या मनातील सुप्त भावना,गरजा भागवण्याचे साधन आहे."
शिक्षकाच्या हृदयात सतत शिक्षणाचा दिवा तेवत असला पाहिजे.तो सतत कामात व विशाल मनोवृत्तीचा असावा.कारण पालकांच्यापेक्षा शिक्षकांच्याबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात आदर व प्रभाव असतो.शिक्षकाने नम्र राहून नम्रतेचे तर सत्यनिष्ठ राहून सत्याचे धडे दिले पाहिजेत.
वाढते शहरीकरण व भरमसाठ शाळांचे वाढते प्रमाण तसेच पूर्वीच्या शिक्षणपध्दतीत अमूलाग्र बदल झाल्यामुळे आजचे शिक्षणव्यवस्थेचे चित्र एकदम वेगळे आहे.विद्यार्थ्याला केंद्रबिंदू मानला गेला आहे.आनंददायी शिक्षणाचा विचार पुढे येत आहे. विद्यार्थ्यी हा तणावरहीत कसा राहील याकडे जास्त लक्ष पुरविले जात आहे.हे सर्व जरी खरेअसले तरी आज शिक्षकांचे अवमूल्यन होत आहे, ही एक धोक्याची घंटा आहे.
आजच्या शिक्षकासमोर अध्यापनाव्यतिरिक्त आशैक्षणिक कामांचा ईतका डोंगर वाढला आहे की शिक्षक आता 'दीन वाणा ' झाला आहे.आजच्या विभक्त कुटुंबपद्धतीमुळे विद्यार्थी नकार पचवू शकत नाही.शिक्षक त्याला काही बोलूही शकत नाही.
तसेच काही शिक्षकांच्या गैरवर्तणूकीमुळे , गैरकारभारामुळे सर्वच शिक्षकांना वेठीस धरले जात आहे. हे अत्यंत चुकीचे आहे.हे कुठेतरी थांबले पाहिजे.
दिवा स्वतः जळतो व दुस-याला प्रकाश देतो,तसा गुरु सुद्धा आपल्या शिष्याला ज्ञानाचा प्रकाश देण्यासाठी स्वतः जळतो .ज्या महान व्यक्ती आपण पाहतो तेव्हा त्यांच्या जीवनात गुरुंचे स्थान वरच्या क्रमांकावर आहे.
आजच्या विज्ञानयुगात , संगणकयुगात जरी ज्ञानाचा विस्फोट झाला असला तरी शिक्षकांशिवाय पर्याय नाही.कारण नीर - क्षिर बुद्धी ही फक्त शिक्षकच देऊ शकतो.तेंव्हा शिक्षकाचे स्थान हे अनादीकालापासून ते अंतापर्यंत असणारच आहे.हे कुणीही नाकारु शकत नाही.तेंव्हा गुरुबद्दलचा स्नेहभाव व प्रेमभाव वृद्धींगत होवो.
धन्यवाद
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर.