Sunday, 13 May 2018

लेख ( रमजान ईद व भाईचारा )

रमजान ईद व भाईचारा

मानव हा समाजप्रिय प्राणी आहे. तो समुहात , समाजात राहणे पसंद करतो.समाजात अनेक सणसमारंभ तो एकत्रितपणे मोठ्या ऊत्साहात साजरा करतो.भारतात विविध धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. प्रत्येकाच्या धर्माचे व सणांचे महत्त्व आहे.यापैकीच एक सण म्हणजे मुस्लिम धर्मीयांचा अतिशय पवित्र समजला जाणारा रमजान सण.

मुस्लिम धर्मीय वर्षातून दोनदा ईद साजरी करतात.एक ईद- ऊल - फीतर व ईद-ऊल-जुहा.रमजान ईदला ईद-ऊल-फीतर असे संबोधले जाते. अरबीमध्ये ईदचा अर्थ आनंद असा होतो व फीतर म्हणजे दान करणे होय.आनंदाचे दान म्हणजेच ईद-ऊल-फीतर होय.या सणांमध्ये चंद्राला फार महत्त्व आहे. चंद्रदर्शन झाले की ईद साजरी केली जाते.यापाठीमागे ऊद्देश हा असतो की , जगभरातील सर्वच मुस्लीम एकाच वेळी ईद साजरी करावेत. ३० व्या रोज्यानंतर चंद्रदर्शन होते .मग रमजान ईद हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

आनंद साजरा करणे , एकमेकांबद्दल प्रेम व्यक्त करणे हा या महान पर्वाचा ऊद्देश आहे. आपापसातील बंधुभावाची भावना वाढीस लागते. सणाच्या सुरवातीला घराची , परीसराची स्वच्छता केली जाते. त्यामुळे आरोग्य चांगले राहते.तसेच  उपवासामुळेही शरीरास फायदा होतो.या उपवासालाच अरबी भाषेत रोजा असे म्हणतात.

रमजानचा चंद्र अस्ताला गेल्यावर ईदचा चंद्र दिसू लागतो व त्याच्या दुसऱ्या दिवशी रमजान ईद साजरी केली जाते. या उपवासांमुळे शरीराची मनाची शुद्धी, आत्मशुद्धी होते.शरीरास त्यागाची सवय लागते.व मोहांपासून कठोरपणे कसे बाजूला रहायचे याचा पाठ मिळतो. गरीब - श्रीमंत , लहान- थोर ज्यांना जसे जमेल तसे रोजे केले जातात.रमजान ईदच्या दिवशी वातावरणात एक नवीन जोम , जोश व ऊत्साह भरलेला असतो.महिनाभर उपवासासाठी शक्ती दिल्याबद्दल देवाचे आभार मानले जातात. त्यासाठी प्रार्थना केली जाते. महीनाभर देवाच्या सान्निध्यात काढले जातात. देवाचे नामस्मरण , कुराणपठन , नमाज ,प्रार्थना करण्यात वेळ घालवून जास्तीत जास्त वेळ हा देवाच्या सहवासात घालवला जातो.

सकाळच्या नमाज व प्रार्थनेनंतर सर्वप्रथम गरजूंना , गरीबांना दानधर्म केला जातो , व त्यांच्या चेहऱ्यावर आनंद व समाधान आनले जाते.मग तो कोणत्याही जातीधर्माचा असो.यादिवशी नविन वस्र परीधान केले जाते. घरांमधील महिला मोठ्या उत्साहात शिरखुर्मा बनवतात व तो सगळ्यांना खायला देतात , वाटतात व आपल्या आनंदात सर्वांना सामावून घेतात.यावेळी शेवयाला महत्त्व असते. प्रार्थनेनंतर एकमेकांना प्रेमाने गळाभेट देतात.यादिवशी गळाभेट घेऊन भाईचारा वाढवला जातो. तो शत्रू आहे का मित्र हे पाहिले जात नाही. शत्रूला सुद्धा या दिवशी भाईचाराचा संदेश देत वैरत्व मिटवण्यासाठी गळाभेट घेतली जाते. बाकीच्या धर्मांतील लोक सुद्धा मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी येतात.

अशाप्रकारे भाईचारा वाढवणारा हा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

   लेखिका
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड.
9881862530

No comments:

Post a Comment