Friday, 11 May 2018

लेख ( संवाद मुका झाला )

स्पर्धेसाठी लेख

संवाद  मुका झाला

   मानव हा समाजप्रिय प्राणी आहे. समाज म्हटलं की त्यात विविध प्रकारच्या व्यक्ती येतात. त्यांच्यामध्ये सुसंवाद घडतो व एकमेकांची सुखदःखे सांगीतली जातात.मन हलके होते व नविन विचारांना प्रवेश करण्यास जागा माळते.पण यासाठी गरज आहे एकमेकांशी बोलण्याची व संवाद करण्याची .

पूर्वीची जीवनपद्धती ही शांत होती ,विज्ञानाचा प्रसार ईतका नसल्यामुळे , भौतिक सुखाची साधने कमी प्रमाणात होती .त्यामुळे मानवाला भरपूर मोकळा वेळ मिळायचा .मग हा मोकळा वेळ तो पारावर बसून गप्पा मारणे , एकमेकांची चौकशी करणे यात जायचा .गावात कुठे काय चाललयं याची बित्तंबातमी त्याला असायची .सगळ गांव म्हणजे एक कुटुंब असायचे .याचं एकमेव कारण म्हणजे एकमेकांतला सुसंवाद होय .

आज आपण पाहतो विज्ञानाचा विस्फोट झाला आहे. नवनवीन शोध लागले आहेत. भौतिक सुखाच्या लालसेपोटी मानवाने अनेक सुविधा ऊपलब्ध करून घेतल्या . यामुळे जग जवळ आले पण सुसंवाद हरवला .संवाद होतोय , नाही असे नाही पण तो एकही अक्षर न बोलता मुक्याने .आश्चर्य वाटले ना ? हो मुक्याने ,कारण तो होतोय आता प्रसार माध्यमांद्वारे . कारण मानवाच्या हातात आज अनेक साधने आलीत ज्याद्वारे तो जगाशी सहज संपर्क करु शकतो. हवी असलेली माहीती देऊ व घेऊ शकत आहे . पण प्रत्यक्ष बोलणं कमी झालय .आपल्याला आता पूर्वीसारखं प्रत्येकाच्या घरी जाण्याची गरजच नाही.कारण आहे आपल्या हातात नेहमी असलेला मोबाईल . या मोबाईल च्या जमान्यात आपण न चुकता एकमेकांना शुभेच्छा , शुभ सकाळ , शुभ रात्री , अभिनंदन ई. न चुकता देतोय . मी तर म्हणेन की पूर्वीपेक्षा आताच जास्त निरोप एकमेकांना जात असतील कारण हा आपला प्राणप्रिय सखा मोबाईल .हो तो प्राणप्रिय झालाय कारण त्याच्याशिवाय जीवनाची कल्पनाच कुणी करु शकणार नाही. आपल्या जीवनाचा तो एक अविभाज्य घटक बनला आहे.

जरी आपण जवळ आलो असलो तरी प्रत्यक्ष भेट ही नाहीच .प्रत्यक्ष जेव्हा आपण भेटतो तेव्हा एकमेकांच्या डोळ्यातील भाव , स्पर्श, देहबोली बरेच काही सांगून जाते व आत्मीयता वाढते .ते अप्रत्यक्ष बोलण्यात जाणवत नाही. म्हणून हा संवाद मुका होतो.संवाद तर होत असतो पण मुक्याने .आज कुणाच्याही घरी गेलो की शांतता जाणवते , घरी सगळे असतात पण कुणी मोबाईल मध्ये मग्न तर कुणी दूरदर्शनवर कार्यक्रम पाहण्यात मग्न असतात.शरीराने सर्व जवळजवळ , एकत्रित असतात पण मनाने ? मनाने कुठे एकत्रित असतात जे सध्या गरजेचे आहे. भरलेलं परीपूर्ण कुटुंब संवादाशिवाय मुके झालेले जाणवते .

यातून जग जवळ आलयं , ओळखी बऱ्याच झाल्यात हे सर्व जरी खरे असले तरी यावर मर्यादा घालायला हवी.या आभासी दुनियेतून बाहेर येऊन जरा मानवाबरोबर माणुसकीने वागले पाहिजे. लग्नसमारंभात , ईतर कार्यक्रमात आपण आवर्जून भाग घेऊन नातेवाईकांशी बोलले पाहिजे. आजोळी सुट्टीसाठी मजा म्हणून, बदल म्हणून जातो ,पण तिथेही सर्वजण मोबाईल मध्ये मग्न व बिचारे आजी आजोबा या यंत्रवत नातलगांकडे पाहत असतात. कीती विचीत्र दिसतं हे सगळं ? पण ही वस्तुस्थिती आहे. बदलायला हवं सर्व. अप्रत्यक्ष बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष बोलले पाहिजे. हा मुका झालेला संवाद बोलका केला पाहिजे.

चला तर मग प्रत्यक्ष बोलूया , सुसंवाद साधुया , जाणून घेऊया एकमेकांना ,संवाद मुका नको बोलका असायला हवा ना ?

लेखिका
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता . शिरोळ ,
जिल्हा. कोल्हापूर.
9881862530

No comments:

Post a Comment