रक्षाबंधन , पवित्र सण
भारतीय संस्कृती संपूर्ण जगात वेगळी आहे, कारण भारतात अनेक धर्माचे लोक राहतात. जे ईतर देशांमध्ये दिसत नाही. प्रत्येक धर्माचे लोक आपापले सण मोठ्या ऊत्साहात साजरा करतात.भारतात अनेक सणांची रेलचेल आहे. विविधतेत ही एकता ही भारताची विशेषता आहे.
रक्षाबंधन ह्या सणाचे एक वेगळेच महत्त्व आहे. भावाबहिणींच्या प्रेमाच्या नात्याने हा बांधला गेला आहे. यामध्ये प्रेम,स्नेह व संवेदना भरलेली आहे. हिंदू व जैन धर्मामध्ये हा सण मोठ्या ऊल्हसित वातावरणात साजरा करण्यात येतो.या दिवशी बहिण सकाळी लवकर उठून आंघोळ करून नवीन कपडे परिधान करून आरतीची थाळी सजवते.पाटाभोवती रांगोळी काढून पाट मांडते व भावाला त्या पाटावर बसवून त्याला कुंकुमतिलक लावते,अक्षता लावते,डोक्यावर अक्षता टाकते.भावाच्या ऊजव्या हातात राखी बांधते.त्याचे औक्षण करुन त्याला मिठाई खायला देते व त्याच्या चांगल्या आरोग्यासाठी व सुखी जीवनासाठी प्रार्थना करते,व आपले रक्षण कर अशी कामना करते.भाऊ मोठा असेल त्याला नमस्कार करते व त्याचा आशिर्वाद घेते.भाऊ मोठा असेल तर तो आपल्या बहीणीला नमस्कार करून तिचा आशिर्वाद घेतो.भाऊ आपल्या बहीणीला भेटवस्तू देतो व तिला खूष करतो.प्रत्येक भावाचे हे कर्तव्य आहे की आपल्या बहीणीला खूष ठेवणे व तिचे रक्षण करणे व तिच्या आयुष्यात कधीही दु:ख येऊ न देणे.यादिवशी बहीण कींवा भाऊ एकमेकांकडे जातात व हा सण साजरा करतात.
रक्षाबंधन सण साजरा करण्यापाठीमागे अनेक कारणे आहेत. यामध्ये पौराणिक, धार्मिक, ऐतिहासिक कारणें आहेत. पौराणिक कारणांचे प्रमाण नसले तरी असे मानले जाते की माता लक्ष्मीने आपल्या पतीला श्री.भगवान विष्णूंना परत मिळवण्यासाठी राजा बलीला रक्षासूत्र बांधून परत मिळवले होते. तेंव्हापासून हा सण रक्षाबंधन म्हणून साजरा केला जातो असे सांगितले जाते. धार्मिक कारणांमध्ये असे सांगितले जाते की भगवान श्रीकृष्ण यांच्या बोटाला जेंव्हा दुखापत झाली तेंव्हा द्रौपदी ने आपली भरजरी साडी फाडून श्रीकृष्णाची जखम बांधली. ही घटना श्रावण महीन्यातील पौर्णिमेला घडली होती.पुढे जेंव्हा द्रौपदीचे चीरहरण होत होते तेंव्हा श्रीकृष्णाने साडी वाढवून तिचे रक्षण केले व भावाचे कर्तव्य पूर्ण केले. तेव्हापासून हा सण साजरा करण्याची परंपरा सुरु झाली असही मानलं जातं.
रक्षाबंधन सण साजरा करण्यापाठीमागे ऐतिहासिक कारणही आहे. ईतिहासकार असं सांगतात की जेंव्हा बहादुरशहाने मेवाडवर आक्रमण केले तेंव्हा रानी कर्मावती ने मुघल बादशहा हुमायु ला रक्षासूत्र पाठवून देऊन बहीणीचे रक्षण करण्याची विनंती केली.तेंव्हा हुमायु ने राखीचा मान राखून आपले बलाढ्य सैनिक पाठवून दिले व रानी कर्मावती चे व तीच्या राज्याचे रक्षण केले व भावाचे कर्तव्य पार पाडले.पुढे भावाबहिणींच्या प्रेमाचे प्रतिक म्हणून हा सण रक्षाबंधन म्हणून साजरा केला जाऊ लागला.जेव्हा जगज्जेता सिकंदर विश्वविजयाची ईच्छा घेऊन भारताजवळ आला तेंव्हा सर्वप्रथम राजा पुरुने त्याला प्रतिबंध केला.हे पाहून सिकंदराच्या पत्नीने घाबरून जाऊन आपल्या पतीच्या रक्षणासाठी राजा पुरुला राखी/ रक्षासूत्र पाठवून दिले व आपल्या पतीच्या सुरक्षिततेची कामना केली.राजा पुरुनेही बहीणीचे म्हणने मानले व राखीचा मान राखला.
साहित्य क्षेत्रात व फील्मक्षेत्रात तर राखी हा कायम चर्चेचा व कथेचा विषय ठरला आहे.राखीवरील व रक्षाबंधन या विषयावर अनेक कथा लिहल्या गेल्या,चित्रपट निघाले. आजही रक्षाबंधन व राखी यावरील नवीजुनी श्रवणीय गाणी आपल्या ओठावर तरळतात.भारत सरकारने ही रक्षाबंधन या सणासाठी योजना राबवली आहे. पाच रुपयाच्या पाकीटात पन्नास ग्रँम वजनापर्यंतची राखी निशुल्क पाठवू शकतो,यामुळे बहीण जास्तीत जास्त राख्या पाठवू शकेल.पावसाळ्यात पाकीट खराब होऊ नये म्हणून खास लिफाफाही तयार केला आहे. पोस्ट ऑफिस वर या दिवसात कामाचा जादा ताण पडतो पण तरीही हे काम ते आनंदाने करतात.आजच्या संगणक युगात दूददेशी राहणाऱ्या आफल्या भावाला बहीण आता ऑनलाइन राखी खरेदी करून पाठवते. रक्षाबंधन हा सण राष्ट्रीय एकात्मता वाढवतो व मानवतेला महत्त्व देणारा आहे. कारण यादिवशी आपल्या स्वतःच्या भावाबरोबर दुसऱ्या धर्मातील मुलांना भाऊ मानून त्यांनाही राखी बांधली जाते.
भावा बहीणींच्या प्रेमाचे प्रतिक असलेला हा सण आपापसातील प्रेम वाढवतो व मनातील कटुता दूर करतो.जग बदलत चाललयं पण भावाबहीणींचे प्रेम हे तसेच आहे. हे प्रेम व हा पवित्र सण कायमच राहील व राहीला पाहिजे.
आज आपण पाहतो समाजात स्त्री-भ्रूणहत्या, स्त्रियांवरील अन्याय, अत्याचार, हुंड्यासाठी सुनांना जाळणे,मारणे,अपमान करणे,आत्महत्येस प्रवृत्त करणे,स्त्रियांवरील बलात्कार हे सर्व पाहिले की मन खूप दु:खी व ऊदास होते.मला येवढेच म्हणायचे आहे की प्रत्येक भावाने आपल्या बहीणीबरोबर ईतर सर्व मुलींनाही बहीण मानून तीचे रक्षण करण्याचा संस्कार जर आपण त्यांना देण्यात यशस्वी झालो तर आज जगात कोणतीही बहीण ही दु:खी राहणार नाही. व हा सण समाजात एक सामाजिक एकता निर्माण करेल.
रक्षाबंधनाच्या बंधनात
बांधले बहीनीने भावाला
अन्याय, अत्याचार होता
भाऊ धावला रक्षणाला.
लेखिका
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड.9881862530
No comments:
Post a Comment