Monday, 29 April 2019

कथा ( रस्त्यावरचा संसार )

रस्त्यावरचा संसार

दुपारचे दोन वाजले होते...  उन रणरणत होतं. सूर्याच्या किरणांनी अंग भाजून निघत होते. रस्त्यावरील वाहतुक ही  तुरळक झालेली होती. जो तो आपल्या घराच्या  सावलीला जाण्याच्या घाईगडबडीत आपली वाहने जोरात नेत होता. उन्हाची धग सहन होत नव्हती. अशातच मी माझी चार चाकी गाडी घेऊन, रस्त्याने जात होते.  कुरुंदवाड ते जयसिंगपूर पंधरा-सोळा किलोमीटर अंतर.. रोज मी याच रस्त्याने जात असताना मला एक स्त्री दररोज दिसायची. तिच्याजवळ एक पांढऱ्या रंगाची ,मोठ्या आकाराची एक बादली, डोक्यावर गाठोडं  कधी ती रस्त्याच्या कडेला  कपडे धूत असताना दिसायची ,  तर कधी स्वयंपाक करत असताना.. सुरुवातीला मला वाटले की ती वेडी असावी. तिच्या संदर्भामध्ये पेपर मध्ये बातम्या सुद्धा आल्या होत्या.. त्यामुळे तीच्या बद्दल माझ्या मनात उत्सुकता निर्माण झाली. एक दिवस ती मला दिसली तोपर्यंत माझी गाडी पुढे गेलेली होती म्हणून नाईलाजाने मी तशीच पुढे गेले. पण तिला भेटायचं असा मी मनाशी निर्धार केला. दुसऱ्या दिवशी मी तिला शोधतचं  सावकाश निघाले. कारखाना  परिसर सोडल्यानंतर काही अंतरावर मला ती दिसली. रस्त्याच्या कडेला बसलेली होती. मी थोडं जवळ जाऊन गाडी थांबवली. गाडीतून उतरले व थोडी घाबरतच तिच्या जवळ गेले. प्रथम मी तिला मराठीतून विचारलं.."  अहो, इथं रस्त्यामध्ये काय करताय? " कडेला बसा ना !!! अंगावरून गाडी जाईल की ? "  तिने माझ्याकडे पाहिले. तिच्या नजरेमध्ये गोंधळ होता पण राग नव्हता. त्यामुळे माझे धाडस थोडे वाढले. मी तिला पुन्हा विचारलं ,"तुम्ही इथं काय करता ? आणि ती स्त्री बोलू लागली, "  यान ईल्ला "  मग माझ्या लक्षात आलं की ही स्त्री मराठी न  बोलता कन्नड बोलते आहे. आता आली का पंचाईत!!!  आता तिच्याशी बोलायचं म्हटलं की कन्नड आले पाहिजे ,त्याशिवाय काय माहिती मिळणार नाही... मग मी तिच्याशी मोडक्या-तोडक्या कन्नड भाषेमध्ये बोलायला सुरुवात केली. मी तिला म्हणलं , "रस्त्यावर कशाला बसला ? जरा पुढे सरकून बसा "  मला कन्नड मध्ये म्हणाली, " असू दे ऊन लागतं "  मग मी तिला म्हणाले,"अहो तुम्ही रस्त्यावर बसलाय ,थोडं पुढे सरकून बसा कुनी ठोकरल तर काय करणार ?  पण तिने चित्र विचित्र हालचाली करून  तोंडातल्या तोंडात  काहीतरी पुटपुटली पण ते काय मला समजलं नाही. मी पाहिलं , रस्त्यावरील लहान विटांचे तीन तुकडे घेऊन तिने चूल तयार केलेली होती. रस्त्यावरीलच  काटक्या गोळा केलेल्या होत्या. व त्याला जाळ लावलेला होता. त्या तीन विटांच्या चुलीवर एक छोटसं पातेलं ठेवलेलं होतं. त्या पातेल्यात तुरीची डाळ होती, पाणी घातलेलं आणि त्यामध्ये एका छोट्याशा प्लेटमध्ये हिरव्या मिरच्या धुऊन तोडून टाकत होती. मी तिला म्हटलं,"  भात भाकरी करत नाही का ?"  तेव्हा ती म्हणाली, "  करते ,आत्ता भात शिजवणार, पण मला भाकरी इथं करता येत नाही. मी खूप छान पातळ भाकरी करते. पण इथं कुठे रस्त्यावर साहित्य नसल्यामुळे मी कसं करणार?"  मी तिला विचारलं,"  तुमचं गाव कोणतं ?  तेव्हा ती म्हणाली , "रायचूर , रायचूर माझ गांव.. कर्नाटकातील, खूप लांब आहे.माझे नांव दुर्गम्मा नालारेड्डी "  मग मी विचारलं ,"  तुम्हाला मुलं नाहीत का ? "  ती म्हणाली ," आहेत, तीन मुलं आहेत " "  मग तुम्ही त्यांच्या जवळ का राहत नाही ?  असे रस्त्यावर का  राहता ?  यावेळी तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत गेले. तिचा चेहरा एकदम गंभीर झाला. तिला थोडा त्रास झाला आहे तिच्या हावभावावरून लक्षात आले. आणि तिने थोड्या  रागातच काही शब्द उच्चारले. पण त्याचाही अर्थबोध मला झाला नाही. मी तिला म्हणाले, "   तुम्ही तुमच्या गावाकडे जाणार का ?  ती म्हणाली," हो जाते माझ्याकडे पैसे नाहीत."  मी म्हणाले, " तुमचा पूर्ण पत्ता सांगा "  पण ते काय तिला सांगता आलं नाही. गेले चार वर्षे मी अशी बाहेर आहे. कुणीतरी जेवायला देतं ,कुणी तरी पैसे देतो त्यातूनच मी चहा  पिते व खायला घेऊन खाते. मी म्हटलं , "  एक वृद्धाश्रम आहे तिथे तुला सोडू का " राहणार का तू तिथे ?  तर ते अतिशय गडबडीत मला म्हणाली,"  नाही मी कुठेही जाणार नाही.. तिच्या शब्दात ठामपणा होता.   मी म्हणाले का ?  का नाही जाणार ?  तिथे तुम्हाला जेवायला मिळेल अंगावर कपडे घालायला मिळतील."  मी तुम्हाला तिथे नेऊन सोडते."  तेव्हा तिने उत्तर दिले, "  नाही मला जायचे नाही कारण  मला कुणावर विश्वास नाही "  मी म्हणलं "  माझ्या ओळखीचे आहेत.  बरेच लोक राहतात .त्यांना जेवायला दिलं जातं. आता इथे तुम्ही  रस्त्यावरच राहता. तिच्या अंगावर चे  कपडे फाटलेले होते म्हणून मी विचारलं तिला ," माझ्या जवळचे कपडे तुला आणून देऊ का? " तर लगेच तिने आपल्या जवळ एक पिशवी होती त्या पिशवीतील नवीन दोन परकर ,ब्लाऊज , साडी काढून दाखवलं आणि मला एका बाईने दिलेले आहे. परकर माझ्याकडे आहेत असं सांगितलं, व दोन नवीन परकर दाखवले मी विचारलं, " कुठून आणलं? " बहुतेक तिला माझ्या प्रश्नाचा राग आला असावा." कुठून आणलं म्हणजे ? विकत आणले मी, कोणीतरी मला पैसे देते त्या पैशातून आणले." मी तिला खूप समजावून सांगितलं की वृद्धाश्रमात नाहीतरी घरी राहत जा ,तुला तुझ्या गावी सोडते तर ती कशाला तयार नव्हती. काही कागदपत्रे खहेत का हे विचारल्यावर पिशवीतील काही कागदं बाहेर काढली पण माझ्या हातात नाही दिली.कदाचित तिला माझा कींवा या जगातील कुणावरच विश्वास नसावा. तिला यासंदर्भात वाईट अनुभव आले असतील. " चहापाण्याला काय पैसे देणार असला तर द्या." तिच्या या बोलण्यावर मी तरी काय करणार?. शेवटी मी तिला थोडे पैसे दिले आणि तिथून निघाले. परत मी माझ्या गाडीत जाऊन बसले गाडी सुरु केली आणि गाडी तिच्या जवळून जाताना तिने आवर्जून मला दोन्ही हात जोडून हात वर करून नमस्कार केला खरोखरच ते माझ्या काळजाला भिडले. असे कितीतरी आईबाप असतील की जे मुलं असुनसुद्धा आपलं म्हातारपणीचे जीवन हे रस्त्यावर व्यतीत करत असतात. पाहताना वाईट वाटतं ,चुकीचं वाटतं. कोण कोण कोणाला विचारणार? सर्व चूक मुलांचीच असते असे माझं म्हणणं नाही.  म्हातारपण म्हणजे दुसरं लहानपणच असतं. ज्या पद्धतीने आपण लहान असताना आपण असंख्य चुका करत असतो आई-वडिलांना त्रास देत असतो म्हणून काय आई-वडील आपल्याला सोडून देतात? नाही ना? मग आपण का बरे  त्यांचा म्हातारपणीचा त्रास सहन  करत नाही ? का आपल्याला त्रास होतो ? .बारकाईने विचार केला तर ही एक परतफेडच असते. ज्या पद्धतीने आपणाला गरज असते लहानपणी त्यावेळेला आपले आई-वडील आपणाला सांभाळतात, आपल्या प्रत्येक चुका पोटामध्ये घालतात. आपण कितीही त्यांना त्रास दिला तरी ते सहन करतात. आपल्याला टाकून देत नाहीत. किंवा कुठल्या आश्रमात सोडून येत नाहीत. पण आपण मात्र मोठे झाल्यानंतर किती कृतघ्न होतो !!!!!! आपल्याला आपल्याच आई-वडिलांचा त्रास वाटू लागतो.  आयुष्यभर  ज्या आईवडिलांनी आपल्याला सांभाळलं, त्या आई-वडिलांचा आपल्याला आपल्या लग्नानंतर त्रास होऊ लागतो ते आपल्याला नकोसे वाटतात.  हे अत्यंत चुकीचे आहे. आपण म्हणतो की वृद्धांनी थोडं पाठीमागे येऊन विचार केला पाहिजे किंवा आपल्या नवीन पिढीचा विचार केला पाहिजे, या पद्धतीने एका लहान मुलाला सांगून त्याला समजत नाही त्याच पद्धतीने हे म्हातारपणी होत असत. हे आपण समजून घेतलं पाहिजे. जोपर्यंत मुलाचं लग्न होत नाही तोपर्यंत मुलांना आई हवी असते आईचं कोणतेही काम त्यांना वाईट वाटत नसतं आणि जेव्हा त्यांचं लग्न होतं ,घरात सून येते आणि त्या वेळेला मात्र या सुनेच्या सांगण्यावरुन  आपण आपल्या आईला घराबाहेर काढतो. मग अशावेळी मुलांनी सुद्धा दोघींनाही व्यवस्थित रित्या समजावून सांगून सांभाळलं पाहिजे. आई-वडिलांना घराबाहेर काढणे हा काही उपाय नव्हे. अशा कितीतरी स्त्रिया ह्या रस्त्यावर आपली उपजीविका करत असतात. माझ्या पाहण्यात आलेली ही स्त्री...तिला पाहताना मनामध्ये कणव निर्माण होते.  पण भाषेची अडचण असल्यामुळे तिला कोणीही समजावून घेऊ शकत नाही. पेपर मधून बातम्या आल्या. पण काही उपयोग नाही. तिचा संसार उघड्यावरच, रस्त्यावरच तसाच चालू आहे.काय भविष्य असेल तिचे .....? प्रश्न प्रश्न आणि फक्त प्रश्नच...कधी मिळेल का उत्तर...?

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

No comments:

Post a Comment