क्षण आला भाग्याचा
जीवन हे अनेक चढउतारांनी भरलेले असते.जीवनात सुख आणि दुःख दोन्हीही येत असतात. सुखाला दुःखाशिवाय किंमत नाही. अंधारा शिवाय दिवसाला सुद्धा महत्त्व नाही. जीवनामध्ये अशा घटना घडत असतात की त्या आयुष्यभर आपल्या लक्षात राहतात. प्रत्येकाचे एक स्वप्न असते. व जेव्हा ते स्वप्न सत्यात उतरते तेंव्हा खरच त्या व्यक्तीला खूप आनंद होत असतो. व तो क्षण भाग्याचा होऊन जातो. असाच एक भाग्याचा क्षण माझ्या आयुष्यामध्ये आला होता. राष्ट्र सेवा दलाचे ज्येष्ठ कार्यकर्ते व माजी गृहमंत्री माननीय श्री. भाई वैद्य कुरुंदवाड गावी आले होते. माननीय एस. एम. जोशी जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्याचे ठरले होते. कुरुंदवाड शाखेतील कार्यकर्त्यांनी पूजनीय एस.एम.जोशी यांच्या जीवनावर लिहावे असे मा.श्री.भाई वैद्य यांनी आवाहन केले. त्यावेळी माझ्या मनामध्ये असा विचार आला की आपण हा प्रयत्न का करू नये? व मी त्यासाठी प्रयत्नशील राहिले. मा.श्री. एस. एम. जोशी यांच्या जीवनावरील पुस्तके मी वाचून काढली. व हळूहळू एस. एम. जोशी यांच्या बद्दल माझ्या मनामध्ये एक विचार शृंखला तयार झाली. मी लिहायला सुरुवात केली. बघता बघता एक छोटी पुस्तिका तयार झाली.त्याला मी नांव दिले समतेचे पुजारी एस.एम.जोशी. त्यावेळी मला खूप आनंद झाला. साथी एस. एम. जोशी यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्याकरता कोल्हापूर येथे एक मेळावा घेण्यात आला होता. आणि या मेळाव्यामध्ये माझ्या पुस्तकाचे प्रकाशन होते. भाई वैद्य यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन होणार होते. मी खूप उत्साहात होते. कारण ते एक माझे स्वप्न होते की जे आता सत्यात उतरणार होते. कार्यक्रम सुरू झाला. उत्कंठा वाढत होती.
सूत्रसंचालकांनी माझ्या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे असे जेंव्हा सांगितले तेंव्हा एक अनामिक लहर माझ्या शरीरातून पसरली. मी व माझे वडील स्टेजवर गेलो. आणि माननीय भाई वैद्य यांच्या हस्ते माझ्या पुस्तकाचे प्रकाशन झाले. तो क्षण मला खूपच भाग्याचा वाटला. हजारो लोकांच्या साक्षीने माझ्या पुस्तकाचे प्रकाशन झाले व तेही अशा महान व्यक्तीच्या हस्ते. त्यावेळी माझ्या असे लक्षात आले की मीही लीहू शकते, आपणही काहीतरी करू शकतो आणि तेव्हापासून माझ्या लेखणीला प्रोत्साहन मिळाले व मी लिहीत राहिले व आजपर्यंत लिहितेच आहे आणि साहित्य क्षेत्रामध्ये यशस्वी होत आहे.
लेखिका
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
No comments:
Post a Comment