Friday, 19 April 2019

पुस्तक रसग्रहण ( संस्कृत सुधा )

पुस्तक रसग्रहण  स्पर्धा

फेरी क्रमांक 4

संस्कृत भाषा ही सर्व भारतीय भाषांची जननी आहे. संस्कृत प्राचीन भाषा आहे. तिला देवांची भाषा असेही म्हटले जाते. सुभाषित हे या भाषेचे वैशिष्ट्य आहे. सुभाषिता मधून श्लोकाच्या माध्यमातून चांगले विचार सांगितले जातात. प्रत्येक सुभाषितांमध्ये अनेक चांगले विचार दडलेले असतात.  पण ते समजून घ्यायला हवेत.त्यासाठी संस्कृत भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. यासाठी ठराविक सुभाषितांचा मराठी मध्ये अर्थ सांगून ,त्याला गोष्टीची जोड देऊन , कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथील डॉक्टर बी.ए. शिखरे यांनी बालकुमारांसाठी गोष्टीच्या रूपात "  संस्कृत सुधा " नावाचे पुस्तक लिहून ही गोष्ट सहज साध्य केली आहे. एकुण  30 सुभाषित असलेले हे पुस्तक म्हणजे सुभाषित व त्याच्या अर्थाची एक मेजवानीच म्हटली पाहिजे.मुखपृष्ठा सह एकूण 88 पानांचे हे पुस्तक आहे. सांगली येथील डॉक्टर व्यंकटेश जंबगी यांनी या पुस्तकाला प्रस्तावना लिहिलेली आहे. लेखक डॉक्टर बी.ए.शिखरे यांनी ही पुस्तिका त्यांच्या नातवंडांना अर्पण केलेले आहे व  सुभाषित रुपी शुभाशीर्वाद दिले आहेत. सोप्या भाषेमध्ये त्यांनी प्रत्येक सुभाषिताचा  अर्थ सांगून त्या संदर्भात एक छोटीशी गोष्ट सांगितलेली आहे,  जेणेकरून लहान मुलांच्या ते सहज पचनी पडेल. पुस्तकाच्या सुरुवातीलाच "आत्मविश्वास" या कथेने सुरुवात झालेली आहे यातून आत्मविश्वास जर आपल्या अंगी असेल तर आपण कोणतीही गोष्ट सहज साध्य करू शकतो हे या गोष्टीतून त्यांनी या  सुभाषितांच्याद्वारे समजावून सांगितलेले आहे. "ओंजळीतील फुले' या प्रकरणांमध्ये त्यांनी आपले मन नेहमी चांगलेच ठेवावे असे सांगितलेले आहे. ते सांगताना ते म्हणतात, 
अंजलीस्थानि अंजली पुष्पानि  वासयंन्ति करद्वयंम् ।
अहो!  सुमनसां प्रीति: वामदक्षिणयो:समा: ।।
यातून लेखकाने संकुचित विचार सोडून सर्वांशी प्रेमाने वागण्याचा सल्ला दिला आहे. 'दुर्जनाशी संग- सुखाचा भंग" या कथेत आपण नेहमी सज्जनांच्या सहवासात राहिले पाहिजे हे सुभाषितांच्या माध्यमातून  समजावून सांगितले आहे. यामध्ये त्यांनी अग्नी आणि लोखंड यांचे अतिशय समर्पक असे उदाहरण दिले आहे. "नेहमी खरे बोलावे" कथेतून त्यांनी प्रिय सत्य व अप्रिय सत्य यात फरक आहे हे उदाहरणावरून समजावून सांगितले आहे. "संत परोपकारासाठी जगतात" या कथेतून त्यांनी ज्या पद्धतीने परोपकाराने वागून परतफेडीची अपेक्षा न करता   वागलं पाहिजे व स्वतःबरोबर दुसर्‍याचेही कल्याण केले पाहिजे हे खूप छान पद्धतीने समजावून सांगितले आहे.  "जीवनात शिक्षणाचे महत्त्व" या कथेमध्ये त्यांनी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवना बद्दल काही उदाहरणे दिलेले आहेत त्यांनी आपल्या जीवनातील प्रत्येक क्षणाचा उपयोग करून घेतला आहे. पण एक चूक झालेली आहे ती म्हणजे लेखकाने असे लिहिलेले आहे की सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी गीतांजली हा काव्यसंग्रह लीहला व या काव्यसंग्रहाला 1952 साली नोबेल पारितोषक मिळाले हे मला चुकीचे वाटते.  "शिक्षक कसा असावा" "विद्यार्थी कसा असावा" या पाठातून त्यांनी आपण नेहमी आपले आचरण चांगल्या पद्धतीने ठेवले पाहिजे अध्ययन-अध्यापन पद्धती सर्वांना समजेल व आफले ज्ञान आणखी वाढले पाहिजे हे साने गुरुजींच्या उदाहरणावरून समजून सांगितलं आहे. विद्यार्थी कसा असावा हे सांगत असताना त्यांनी " काकदृष्टी बकध्यानं श्वाननिद्रा तथैव च  अल्पाहारी गृहत्यागी विद्यार्थी पंचलक्षणम् ।। असा विद्यार्थी आयुष्याच्या जीवनामध्ये यशस्वी होतो. "उद्योगाला पर्याय नाही " या पाठातून त्यांनी कोणतेही कार्य हाती घेतले की ते आपण प्रामाणिकपणे केले तर यशस्वी होतोच ,फक्त मनामध्ये कल्पना आणून शांत बसणे हे चुकीचं आहे. कोणत्याही यशासाठी स्वतःचे प्रयत्न किती महत्त्वाचे आहेत हे समजावून सांगितले आहे. 'साधू हा हिरा आहे 'ही कथा सांगताना ते असे म्हणतात की,
" शैले शैले न  माणिक्यं भौक्तिकं न गजेगजे । 
  साधवो न हि सर्वत्र चंदनं न वने वने ।।
यातून त्यांना असे सांगायचे आहे की साधू बनणे इतके सोपे नाही .साधू बनणे म्हणजे विकारांच्या वर मिळवलेला विजय. साधू हे माणकांच्या प्रमाणे महत्त्वपूर्ण असतात व दुर्मिळ असतात. "सत्य, कंठाचे भूषण"  या कथेत ते असे म्हणतात, ज्याप्रमाणे हातांचे भूषण दान देणे आहे तसं सत्य बोलणे हे आपल्या कंठाचे भूषण आहे. या गोष्टीतून त्यांनी मुलांना दान द्यावे व खरे बोलावे याबद्दल मार्गदर्शन केले आहे. "अयोग्य कोणीही नाही" या कथेतून त्यांनी जेव्हा आपल्याला मिळतो तेंव्हा त्या संधीचा योग्य वापर केला तर जीवनामध्ये यशस्वी होतो हे बाबा आमटे यांच्या उदाहरणावरून अतिशय व्यवस्थित रित्या समजावून सांगितले आहे. "राजापेक्षा विद्वान श्रेष्ठ"  या कथेतून विद्वान किती श्रेष्ठ आहे हे सांगताना ते म्हणतात  ,       विद्वत्वंच नृपत्वं च नैव तुल्यं कदाचन ।
स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पुज्यते।।  ज्ञानाची सर्वत्र पूजा होते त्यामुळे आपण ज्ञानी बनले पाहिजे हा संदेश यातून मिळतो.  "मंत्र स्तुती स्त्रोत्रांची शक्ती" यातून त्यांनी हेच सांगितले आहे.  त्याचप्रमाणे "वक्ता जन्मावा लागतो "या कथेद्वारे त्यांनी सुभाषितांचा आधार घेऊन की वक्ता हा जन्मावा लागतो. दहा हजारांमध्ये एखादाच व्यक्ता होऊ शकतो. अज्ञानरूपी अंधकारमय जगामध्ये वावरत असताना ज्ञानाचा दिवा दाखवणारा गुरु जर आपल्याबरोबर असेल तर आपण सन्मार्गाला लागतो तेच त्यांनी समाजात "गुरु चे महत्व 'या कथेतून पटवून दिले आहे. कोणतेही काम आपण हाती घेतले की ते काम करण्याची इच्छा आपल्या अंगी असली पाहिजे ,आपल्या मनात असले पाहिजे तरच ते काम सहज साध्य होते ."इच्छा तेथे मार्ग" या कथेतून व्यक्त केला आहे. व्यक्तींचे व प्राण्यांचे  लक्षणं वेगवेगळी असतात. त्यामध्ये चातुर्य हे स्त्री चे लक्षण आहे. त्याच्या जोरावर ती आपलं घर यशस्वी करण्यामध्ये सफल होते हे सांगितले आहे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा  धोकादायक असतो. कोणतीही गोष्ट करताना त्याचा अतिरेक होऊ देता कामा नये हाच आशय  "अतिपरिचयात अवज्ञा" या कथेतून सांगितले आहे.  ज्यावेळी एखादी गोष्ट आपल्याला सहज मिळते त्या वेळेला त्या गोष्टीची किंमत आपल्याला कळत नाही. दातृत्व दान परंपरेचे द्योतकच आहे "दानाचे फळ "या कथेतून लेखकाने सांगितले आहे. आपण नेहमी दान करावे . दान करत असतानाही ते सत्पात्री दान असावे याचाही उल्लेख आहे. ज्या वेळेला आपण एखाद्या वस्तूचे दान देतो त्यावेळी त्या पाठीमागचा आपला भाव हा भक्तीचा असला पाहिजे. भक्ती युक्त दान महत्त्वाचे हे पटवून दिले आहे. प्रसिद्धी कोणाला नको असते. प्रसिद्धी सर्वांनाच हवी असते. समाजामध्ये अशी काही माणसे आहेत की जी प्रसिद्धीपासून दूर राहणेच पसंत करतात. "प्रसिद्धीपरान्मुखता, दुर्मिळ" या कथेतून  हे  थोर विचारवंत दादा धर्माधिकारी यांच्या उदाहरणावरून त्यांनी सांगितलेला आहे .  मानवाने सतत क्रियाशील राहिले पाहिजे. कार्य करत राहिले पाहिजे. आळस करता उपयोगाचे नाही. आळस माणसाचा शत्रू आहे. त्यांनी एका गरीब शेतकऱ्याच्या मुलाची कथा सांगितलेली आहे. तो मुलगा स्वतः पैसे कमवत नाही तोपर्यंत त्याला त्या पैशाची किंमत कळत नाही हे दाखवून देण्यासाठी त्याच्या वडिलांनी त्याला पैसा कमवण्यासाठी कसे उद्युक्त केले हे या कथेतून सांगितले आहे. अन्नदान रक्तदान विज्ञान याबरोबर महा नशीबवान आहे असे "ज्ञानदान अति महान" या कथेतून सांगितले आहे व शाहू महाराजांचा संदर्भ घेऊन ज्ञानाचा कुंभ पिढ्यानपिढ्या अज्ञानाच्या अंध:कारात भरडल्या गेलेल्या होत्या. त्यामध्ये कशाप्रकारे विश्वास निर्माण केला व त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात मध्ये आणलं व त्यांना सुख समाधान प्राप्त करुन दिले हे सांगितले आहे. सत्याला कधीही मरण नसते न्यायाने ,प्रामाणिकपणे कोणतेही काम मिळवले किंवा कष्ट केले तर ते चिरकालीन ठरते व त्याचे समाधान आपल्याला मिळते अन्यायाने मिळवलेला पैसा सुखाचा वाटत असला तर तो अनंत काळ टिकत नाही अन्यायाने मिळवलेला पैसा टिकत नाही या कृतीतून त्यांनी सांगितलेले आहे व आपण कोणावरही कधीही अन्याय न करता सर्वांना सहकार्य केले पाहिजे हे सारखे सांगितले आहे. जो विद्याविभूषित असतो शिक्षित असतो व सर्वांशी सज्जनपणे वागतो अशा माणसाला सर्वजण पुजतात त्याला मान देतात याउलट जो मनुष्य दुर्जन आहे अहंकारी आहे घमेंडखोर आहे तो कितीही शिकला कितीही विद्याविभूषित असला तरी सुद्धा लोक त्याच्यापासून दूर राहतात आणि म्हणून आपण कोणतेही मित्र करत असताना सुशिक्षित , सज्जन आहेत की  नाही हे पाहिले पाहिजे "विद्याविभूषित दुर्जन टाळावा"  या कथेतून सांगितले आहे. "आभाळमाया" या कथेतून त्यांनी आपला व परका भाव मानवाच्या मनामध्ये असतो तो किती चुकीचा आहे हे दाखवून दिले आहे त्यासाठी त्यांनी अण्णा हजारे यांचे उदाहरण दिलेले आहे .त्यांनी असे सांगितले आहे की कधी आपण कुणालाही भेदभाव न करता आपलं मन नेहमी आभाळाप्रमाणे मोठं ठेवले पाहिजे व हे विश्व माझे कुटुंब आहे हा विचार आपल्या मनात बिंबवला पाहिजे. दुर्जनांच्या बरोबर कधीही मैत्री करू नये कारण जेव्हा आपण या लोकांशी मैत्री करतो त्यावेळेला जरी आपण त्यांच्यावर उपकार केले तरी ते आपल्याशी अपकारानेच वागत असतात हे त्यांनी "दुर्जना बरोबर मैत्री करू नये' हे मगर आणि माकड या कथेतून अतिशय सुंदर रित्या मांडलेले आहे. जीवन जगत असताना आपल्यावर असे अनेक प्रसंग येतात की त्या वेळेला आपल्याला क्रोध म्हणजे राग येत असतो आणि रागाच्या भरांमध्ये जेव्हा आपण एखादी गोष्ट करतो त्यावेळेला अविवेकी गोष्ट होत असते ,म्हणून आपण कधीही  राग आला की थोडा वेळ आपण शांत राहिले पाहिजे, त्याच्यावर विचार केला पाहिजे . क्रोध सगळ्या दुःखाचे मूळ या कथेतून त्यांनी सांगितलेले आहे. "मौन सगळ्या सिद्धीचे कारण आहे"  या कथेतून त्यांनी किती महत्त्वाचे आहे हे सांगितलेले आहे ज्या वेळेला आपण मौन बाळगतो त्या वेळेला आपली बौद्धिक क्षमता वाढते व दुसऱ्यांच्या मनामध्ये आपण आपले स्थान निर्माण करू शकतो हेही तितकेच महत्त्वाचे आहे. अशाप्रकारे एकूण 30 कथातून सुभाषितांचा अतिशय सुंदर रित्या मेळ लेखकाने या ठिकाणी घातलेला आहे 31व्या प्रकरणातमध्ये काही संस्कृत म्हणी व वाक्यप्रचार दिलेले आहेत की ज्यांचा वापर आपण रोजच्या जीवनामध्ये करू शकतो व आपले संस्कृतचे ज्ञान वाढवू शकतो  खरोखरच हे पुस्तक  बालकुमारांच्यासाठी गोष्टीरूप पद्धतीने डॉक्टर शिखरे यांनी अतिशय सुंदर आणि त्याची मांडणी केलेली आहे पुस्तकाच्या मुखपृष्ठावर असलेले निसर्गचित्र तिच्यामध्ये मगर आहे आणि या मगरीला एक माकड झाडावरून खायला देत आहे आणि खाली अतिशय सुंदर हिरवळ आहे, पाणी आहे हे सर्व पाहत असताना  कोणताही बालक याकडे सहज आकर्षित होईल असे आहे. कविता सागर प्रकाशन जयसिंगपूर यांनी या पुस्तकाची बांधणी अतिशय सुंदर रीतीने केलेले आहे.त्यांनाही धन्यवाद.लेखकाच्या हातून असेच लेखण बहरु दे हीच सदिच्छा

रसग्रहण
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
9881862630

No comments:

Post a Comment