स्पर्धेसाठी
कविता स्पर्धा
अष्टाक्षरी
विषय- देव नाही देवालयी
शोधताना मंदिरात
देव नाही सापडला
देव नाही देवालयी
कुठे गेला दडायला
सगळेच आळवती
धावा तुझाच करती
येत नाहीस म्हणून
रोज बिचारे मरती
दारे तुझी बंद झाली
भक्त शोधे धास्तावून
असा कसा बसलास
देवा माझ्या सुस्तावून
रोज तुला आळवून
गीत तुझे गाती सारे
संकटाच्या या घडीला
लपलास असा कारे
पाहतोय आता आम्ही
देव दुसऱ्या लोकात
मदतीला धावतात
रोज नवीन चौकात
डॉक्टरांचा उपचार
हाच मानतो आधार
ठरलयं सर्वांचेच
नाही घ्यायची माघार
कधी तुलाच पाहतो
रस्त्यावर पोलिसांत
नमस्कार मनोभावे
तूच दिसे अंतरात
दिसतोस रोज मला
करताना तू सफाई
समजली रुपे तुझी
होऊ कशी उतराई
कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
No comments:
Post a Comment