Saturday, 23 May 2020

लेख (बालविवाह )

07 लेख

बालविवाह

 विवाह म्हंटलं की एक आनंदाचा क्षण सर्वांनाच जाणवतो.विवाह म्हणजे दोन जीवांचे मिलन असते. दोघांच्याही जीवनात एका नवीन जोडीदाराने प्रवेश केलेला असतो. त्यामुळे दोघेही एकमेकांना समजावून घेणे हे क्रमप्राप्त असते. लग्नाच्या वेळी वधू वर दोघेही शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम असतील, त्यांची वैचारिक पातळी उच्च असेल, एकमेकाला समजावून घेण्याच्या प्रवृत्ती चा विकास झाला असेल. तर अशा जोडीदारांचा विवाह हा त्यांच्या अंतापर्यंत व्यवस्थित टिकून राहतो.

 पूर्वीच्या काळी बालविवाहाची प्रथा होती. मुलीच्या वयाचा विचार लग्नाच्या वेळी अजिबात केला जात नव्हता. बालविवाह म्हणजे मुलगा किंवा मुलगी वयात  येण्यापूर्वी त्यांचा केलेला विवाह होय. ज्या वेळेला मुलगी गर्भधारणेस योग्य होते व मुलगा पुनरुत्पादनक्षम होतो, म्हणजे त्या दोघांना शारीरिक व मानसिक परिपक्वता येते. पण त्या आधीच या दोघांचा विवाह जर लावला गेला तर त्याला बाल विवाह असे म्हणतात.पूर्वी बालविवाहाचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणात होते. वयाने कितीही मोठ्या असलेल्या पुरुषाबरोबर त्या लहान बालिकेचे लग्न लावून दिले जात असे.मग तिथून सुरु व्हायची स्त्री जन्माच्या परवडीची कथा.

  धर्मसूत्रात तर असे सांगितले आहे की, ज्यावेळी मुलीचे लग्न करण्यात येईल त्यावेळी ती नग्निका असावी. या शब्दावरून प्रत्येकाने याचा  वेगवेगळा अर्थ काढला. एकंदरीत याचा अर्थ असा होतो की मुलीचे लग्न हे रजोदर्शन  व्हायच्या पूर्वीच झालेले असावे. मुलीचे लवकरात लवकर लग्न केले जात असे. नवरामुलगा हा मुलीपेक्षा वीस ते पंचवीस वर्षांनी मोठा असे. त्या वेळी आठ वर्षाच्या मुलीला गौरी असे संबोधले जायचे, नऊ वर्षाच्या मुलीला रोहिणी, तर दहा वर्षाच्या मुलीला कन्या असे संबोधले जायचे. व त्या नंतर च्या मुलीला रजस्वला असे समजले जात असे. मुलगी गौरी असतानाच तिचे लग्न लावले जात असे. कारण रजस्वला झाली तर ती कुणाच्या मोहाला बळी पडू नये, किंवा ती स्वतः कुणाच्या आहारी जाऊ नये, त्याच बरोबर घराचा कुलीन पणा टिकवण्यासाठी मुली कुठल्या मोहाला बळी पडण्याच्या आधी त्यांचे लग्न लावणे हे इष्ट समजले जायचे. या अशा कारणांनी व मनुवाद मानणाऱ्या लोकांनी बालविवाह चालूच ठेवले.

 दोन हजार वर्षापासून चालत आलेली ही परंपरा खंडित करण्याचे काम राजा राम मोहन राय, ईश्वरचंद विद्यासागर, केशवचंद्र बेन या बंगाली तर ज्योतिराव फुले, म. गो.रानडे, ग. गो. अगरकर, धोंडो केशव कर्वे या मराठी समाजसुधारकांनी बालविवाह विरोधी मोहीम उघडली.स्त्री-शिक्षणावर भर देण्यात आला. कारण बालविवाहाचे तोटे सर्वांना माहिती होते. बाल विवाह केल्यामुळे मुलीवर अकाली मातृत्व लागले जायचे, त्यामुळे बऱ्याच वेळेला तिचा मृत्यू व्हायचा किंवा नवरा-बायको यांच्या वयामध्ये भरपूर  फरक असल्यामुळे दोघांच्यात मतभेद व्हायचे. त्यावेळी पितृसत्ताक पद्धती असल्यामुळे घटस्फोट व्हायचा. घटस्फोटानंतर पुरुष दुसरा विवाह करायचा पण दुसरा विवाह करण्यास परवानगी स्त्रीला नव्हती. त्यामुळे त्या स्त्रीला परित्यक्त्यांचे किंवा विधवेचे अतिशय वाईट जीवन जगावे लागे. हे सर्व पाहता या थोर समाजसुधारकांनी बालविवाह  रोखण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

  या सगळ्या प्रयत्नांचा परिणाम म्हणून 1860  साली दहा वर्षाखालील मुलीशी विवाह करणे, तिच्याशी समागम करणे हा गुन्हा मानला गेला. पुढे जाऊन 1904 ला बडोदा सरकारने लग्नाच्या वेळेला मुलीचे वय 12 व मुलाचे वय सोळा असावे असा नियम केला. 1927 ला इंदूर सरकारने लग्नाच्या वेळी मुलीचे वय 12 व मुली मुलाचे वय 14 असा नियम केला. 1929 ला बालविवाह प्रतिबंधक कायदा अस्तित्वात आला. या कायद्यानुसार लग्नाचे वेळी मुलीचे वय 14 व मुलाचे वय 18 मानण्यात आले. त्यानंतर 1955 च्या हिंदू विवाह कायद्यानुसार मुलीचे वय 15 व मुलाचे वय 18 ठरविण्यात आले. 1978 ला याच कायद्यानुसार मुलीचे वय 18 व मुलाचे वय 21 करण्यात आले.

 कायदे केल्यामुळे बालविवाहाची प्रथा थोडीफार कमी झाली. पण समाजातील परिस्थिती पाहता  बरेचजण त्यातून पळवाटा शोधून काढताना दिसतात.आजही ग्रामीण भागामध्ये बालविवाह होत असताना दिसतात.

 बालविवाह प्रतिबंधक कायद्याचा वापर जर योग्य प्रमाणात कुठल्याही आमिषाला बळी न पडता केले तर बऱ्याच अंशी आपण हे बालविवाह रोखू शकतो. त्याचबरोबर समाजातील व्यक्तींनी ही याचे महत्त्व लक्षात घेऊन जर बालविवाह होत असेल तर त्यावेळी त्यांनी प्रशासनाला कळवणे गरजेचे आहे. बालविवाहाचे प्रमाण बरेच कमी झालेले आहे. ते पूर्णपणे नष्ट होणे गरजेचे आहे.

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

No comments:

Post a Comment