जन्म आणि मृत्यू
जन्माला आलेली प्रत्येक व्यक्ती कधीही अजरामर नसते. मृत्यू अटळ आहे. त्यामुळे जन्म आणि मृत्यू ची साखळी अखंड चालत असते. मानव जन्म मिळणे म्हणजे भाग्य होय. पृथ्वीवर मानव हा एकमेव असा प्राणी आहे की ज्याच्या कडे बुद्धी आहे. बुद्धीचा वापर करून तो या जगावर राज्य करत आहे.
जन्म म्हणजे आपण या भुतलावर शरीर रूपाने येत असतो. जन्म झाला की घरातील व्यक्ति आनंद व्यक्त करतात. सर्वसाधारणपणे व्यक्तीच्या जन्माच्या वेळेला आनंदोत्सव साजरा केला जातो.काही समाजामध्ये व्यक्तीच्या जन्माच्या वेळेला रडण्याचा कार्यक्रम सुद्धा होतो. व्यक्ती जन्माला आल्यानंतर हळूहळू मोठा होतो, आईवडिलांचा हात सोडून समाजामध्ये वावरायला सुरू करतो. शिक्षण घेऊन नोकरी करतो. व पैसा मिळवून स्वतःला सिद्ध करतो. ज्याच्या-त्याच्या कर्तृत्वा प्रमाणे समाजामध्ये व्यक्तीला महत्त्व, श्रेष्ठत्व प्राप्त होत असते. श्रीमंताच्या घरी जन्माला आलेली व्यक्ती व गरिबांच्या घरात जन्माला आलेली व्यक्ती या दोघांच्या जीवनामध्ये भरपूर फरक असतो.जन्माने श्रीमंत व्यक्ती यशस्वी होतेच असे नाही किंवा गरीब घराण्यात जन्माला आलेली व्यक्ती ही आयुष्यभर गरिबीत खितपत पडते असेही नाही. कारण पैशाबरोबर काम करण्याची वृत्ती, सहनशीलता, श्रमाला महत्व देण्याची मानसिकता हे ही महत्त्वाचे आहे. अशा अनेक व्यक्ती आहेत की त्या जन्मल्या जरूर पण आयुष्यभर कोणतेच भरीव कार्य न करता निष्क्रिय पणे जीवन जगून स्वतःचे स्थान निर्माण न करताच मृत्यूने त्यांना कवटाळलेले असते.
जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला मृत्यू यायच्या आधी व मृत्युनंतरही आपले नांव निघावे असे वाटत असेल तर त्या पद्धतीचे काम आपण जिवंत असताना केले पाहिजे. ज्या पद्धतीने जन्माला येणे आपल्या हातात नाही तसे मृत्यूला नाकारणे हे ही आपल्या हातात नाही. जन्ममृत्यूच्या फेर्यात अडकलेला हा मानव सतत पैशाच्या, सुखाच्या मागे लागलेला असतो. बराच वेळा पैसा मिळवत असताना तो अनेक मानसांना जोडतो तर काही माणसे तोडतोही. पैशाबरोबर माणसांचा संग्रह करणारी माणसे सतत लोकांच्या लक्षामध्ये राहतात. त्याचबरोबर मरणोत्तर देहदान करणाऱ्या,अवयव दान करणाऱ्या व्यक्ती मृत्युनंतरही या जगामध्ये विविध रूपाने जिवंत असतात." मरावे परी कीर्तिरूपे उरावे." या उक्तीप्रमाणे मानव आपल्या कर्तव्याने ,कर्तृत्वाने समाजामध्ये अमर राहतो. ज्या व्यक्ती मरणोत्तरही प्रशंसनीय असतात, या व्यक्तींचे जीवन हे सतत प्रेरणादायी असते. जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंतच आपण कोणतेही चांगले कार्य करू शकतो. मरणानंतर कुणीही काहीही करू शकत नाही कारण हे शरीर आपल्याजवळ नसते ते केव्हाच नष्ट झालेली असते. मृत्यूनंतर या देहाची विल्हेवाट प्रत्येकजण आपापल्या धर्मानुसार करत असतात. कोण दहन करतात, तर कुणी दफन करतात. शरीर हे नश्वर आहे. मृत्यूनंतर शरीराचे कार्य थांबते. जन्मावेळी मिळालेले सुंदर, गुटगुटीत शरीर मरताना कृश,जरारर्जर झालेले असते. अपघातात मरण पावलेल्या व्यक्तीच्या शरीराची चिरफाड केली जाते. दुर्धर आजाराला सामोरे जाणाऱ्या व्यक्ती सतत मृत्यूची आळवणी करत असतात. जीवाला इतके वैतागलेले असतात की त्यांना त्यांच्या आजारापासून मिळणारा क्लेश, वेदना असहनीय असतात. जर आपल्याला मृत्यू चांगला , वेदनारहित यायचा असेल तर जीवनामध्ये आहार, व्यायाम यांची साथ कायम धरली पाहिजे. काही ध्येयाने प्रेरित झालेल्या व्यक्ती इतक्या निडर असतात की त्यांना मरणाची अजिबात भीती वाटत नाही. जसे की स्वातंत्र्यवीर,स्वातंत्र्यसैनिक, आपल्या देशाचे जवान ते आपल्या देशासाठी नेहमी मरणाला कवटाळायला तयार असतात. देशासाठी लढता लढता त्यांचा मृत्यू होतो. त्यांना आदयानज "शहीद" झाले असे म्हणतात. देशासाठी लढता लढता शहीद झालेल्या लोकांना त्यांच्या मृत्यूनंतर मानवंदना दिली जाते. त्यांच्या मृत्यूचा उत्सव केला जातो.
जोपर्यंत व्यक्ती जिवंत आहे तोपर्यंत त्या व्यक्तीची जेवढी आपल्याला सेवा करता येईल तेवढे आपण सेवा केली पाहिजे. मरणानंतर मी अशा प्रकारे सेवा केली असती मी असं केलं असतं मी तसं केलं असतं या म्हणण्याला काडीचाही अर्थ उरत नाही. त्यामुळे जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत चांगल्या पद्धतीने वागून सर्वांशी प्रेमाने व्यवहार करत राहिलो तर मरणानंतरही आपण जिवंतच राहणार आहोत. तेव्हा विचार करा मरणानंतरही जिवंत राहायचे आहे की जिवंत असतानाच मेल्यासारखे जगायचे आहे...
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
No comments:
Post a Comment