Monday, 4 May 2020

लेख ( क्रोध )

लेख

राग

क्रोधाने अविवेकी होतो मानव
सारासार विचार पडतात गहाण
सोडून टाकू संहारक शत्रूला
आपसूकच बनणार जगी या महान.


 मानवी जीवन सफल असफल होण्या पाठीमागे त्याचा स्वतः चाच स्वभाव कारणीभूत ठरतो.समाधानी व शांत व्यक्ती आपल्या जीवनाचा प्रवास सातत्याने व समाधानाने करून यश मिळवू शकतो. पण अशांत व्यक्ती कोणतेही काम करत असताना आतताईपणा दाखवतो. त्यामुळे तो कामामध्ये अयशस्वी होतो किंवा काम लवकर होत नाही,लवकर यश मिळत नाही. यशस्वी व्यक्ती  नेहमी आपल्या षड्रीपूंवर विजय मिळवून असतो.काम,क्रोध,लोभ,मोह, मद,मत्सर  हे मानवाचे षड्रीपूं आहेत. म्हणूनच क्रोध हा मानवाचा शत्रू आहे. क्रोधाने आपली विवेकबुद्धी काम करेनाशी होते. आपल्या हातून चुका होतात. एखाद्या गोष्टी विरुद्ध मनात आलेल्या अनिर्बंध व आवेशयुक्त भावना उत्पन्न होणे म्हणजेच क्रोध होय. एकदा का माणसाला राग आला की त्याला कोणतीही गोष्ट सहन होत नाही. त्याच्या मनात बदल्याची भावना निर्माण होते. व हे अतिशय वाईट आहे.  नेहमीच क्रोध विवेकावर भारी पडतो. त्यामुळे राग आलेली व्यक्ती आपली विवेकबुद्धी गहाण ठेवते व वाईट कृत्य तिच्या हातून घडून येते.
 क्रोध सर्वप्रथम त्या व्यक्तीला स्वतःला जाळत असतो. काही लोकांना असं वाटत असतं की आपल्याला राग आला तर रागाच्या भरात आपण एखादे कृत्य केले तर ते धाडसी कृत्य होते असा गैरसमज त्यांच्या मनामध्ये निर्माण होतो. क्रोधामुळे नेहमी अहितच होत असते.
ज्या महान व मोठ्या व्यक्ती होऊन गेल्या त्यांनी नेहमी आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवले होते. त्यांच्या मते.....
 क्रोध हा मानवाचा मोठा शत्रू आहे. क्रोधाने फक्त वैरत्वाचीच भावनाच निर्माण होते.क्रोधाने कधीही सुख व शांती मिळत नाही.होरेसने तर ,"क्रोध म्हणजे शुद्ध वेडेपणा आहे".तर महात्मा गांधींनी  असे म्हटले आहे की," रागामुळे मानवाची सहिष्णूता संपते.त्यामुळे ते मानवाचे मोठे शत्रू आहेत."अल्बर्ट आईन्स्टाईन ने असे म्हटले आहे की ", राग ज्या व्यक्तींच्या हृदयात असतो ते लोक मूर्ख असतात." मार्क ट्वेन असे म्हणतात की," क्रोध हे असे विष आहे की ते ज्याच्यावर टाकले जाते त्यालाही जाळते व ज्या पात्रातून टाकले आहे त्या पात्रालाही जाळते." भगवान बुद्ध असे म्हणतात की," क्रोधाला बाळगणे म्हणजे दुसऱ्यावर टाकण्याकरता गरम कोळसा स्वतःच्या हातात घेण्यासारखे आहे, कारण तो कोळसा दुसऱ्याला तर जाळतोच पण स्वतःच्या हाताला प्रथम जाळतो." बायबल मध्ये असे म्हटले आहे की,"  मूर्ख मनुष्य राग आला कि तो आपला राग जोरजोराने आरडाओरडा करून व्यक्त करतो पण एखाद्या बुद्धिमान व्यक्ती ला आला तर तो आपला राग अतिशय शांततेने आणि संयमाने प्रकट करतो."  हिंदी साहित्यिक प्रेमचंद असे म्हणतात," राग येतो त्यावेळेला तो दुसऱ्याला दुःख देतोच,शिवाय त्याच्याबद्दलची वाईट भावना सर्वांच्या समोर प्रकट करतो."
म्हणून जेव्हा जेव्हा आपल्याला राग येतो त्यावेळेला प्रथम त्याचा परिणाम काय होणार आहे याचा आपण विचार केला पाहिजे."  ज्यावेळी पाणी उकळत असते त्यावेळी त्या पाण्यामध्ये आपला चेहरा दिसत नाही. त्याचप्रमाणे जेव्हा आपल्याला राग येतो त्या वेळेला आपल्याला बाकीचे काहीही समजत नाही.ज्याच्या मनात नेहमी क्रोध असतो तो कधीही सुख व समाधानाने राहू शकत नाही. त्याला स्वतःलाही कधीही आत्मसंतुष्टपणा मिळत नाही. त्याच्याशी बाकीचे लोकही फटकून वागतात,प्रेमाने, स्नेहाने कोणीही वागत नाही. बाकीचे लोक त्याच्यापासून लांब लांब जायला लागतात. व असा माणूस एकाकी बनतो. एकाकीपणा मुळे वैफल्यग्रस्त होतो. वारंवार राग यायला लागतो. ते सतत दुसऱ्यावर चिडत असतात. अशा लोकांना शीघ्रकोपी म्हटले जाते.
यावर काही उपाय आहे का?  हो आहे.जरूर आहे. ज्या वेळेला आपल्याला एखाद्या गोष्टीचा राग येतो, त्यावेळेला आपला राग लगेच प्रकट न करता आपण दोन सेकंद शांत रहावे. किंवा आकडे मोजावेत. म्हणजे आपला राग शांत होतो, व आपल्या हातून होणारे वाईट कृत्य टळते. त्याचबरोबर दुसरा उपाय म्हणजे शांती व क्षमा करणे होय. कारण क्षमा केल्यामुळे  क्रोधाचा पेटलेला अग्नि आपोआप शांत होतो. व आपणाकडून दुसऱ्या कुणालाही दुखावले जात नाही. त्यामुळे दुसऱ्यांचे आपल्याबद्दल मत चांगले होते. ज्या वेळेला आपल्याला राग येतो आपण रागाने एखादी गोष्ट बोलून जातो व नंतर वाटते की आपण असे बोलायला नको होते.पण वेळ निघून गेलेली असते. व आपल्याला आपण बोललेला शब्द परत घेता येत नाही. त्यामुळे बोलून शब्दांचे गुलाम होण्यापेक्षा न  बोलता आपण शब्दांचे मालक होणे केव्हाही चांगले असते.
जीवनात आपल्याला यशस्वी व्हायचे असेल तर जो क्रोध आपला शत्रू आहे त्याला टाळून आपण सर्वांशी प्रेमाने वागले पाहिजे. जिथे क्रोध असतो तिथे प्रेम, समाधान कायम टिकलेले पहायला मिळत नाही. जीवनात जर यशस्वी व्हायचे असेल तर आपल्यामधील षड्रीपूंवर ,खासकरून क्रोधावर आपणाला ताबा मिळवता आला पाहिजे.संयमी बना,क्षमा करा,क्रोधाला जिंका.

जीवन आहे सुंदर गाणे गायचे
नको थारा क्रोधाला मनात 
प्रेम,स्नेह,विवेकाने वागून 
यशस्वी पाऊल टाकू जीवनात.

लेखिका
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

No comments:

Post a Comment