समजदार नागरिक
भारत हा लोकशाही देश आहे. या देशातील प्रत्येक व्यक्तीला त्याच्या मताप्रमाणे वागण्याचा हक्क आहे. पण त्यासाठी संविधानाने काही मर्यादा, कायदे घालून दिलेली आहे. जेणेकरून हे राष्ट्र एकसंघ रहावे. प्रत्येक नागरिकाने आपले कर्तव्य जर पार पाडले तर देश विकासाकडे नक्कीच वाटचाल करतो. समजदार नागरिक म्हणजे जो स्वतःच्या हिता बरोबर देशाच्या हिताचा विचार करतो.व त्याप्रमाणे वागतो.
भारताला स्वातंत्र्य मिळून सुद्धा आज अनेक जण वैचारिक पारतंत्र्यात रममाणआहेत. विचारांची खोली व विस्तृतता जेवढी जास्त तेवढा मानव जास्त समजदार होत असतो. पण अनेक जण कूपमंडूक वृत्तीने जगत असतात. अशा व्यक्ती फक्त स्वतःचा, स्वतःच्या कुटुंबाचा, कुटुंबातील माणसांचा एवढाच स्वार्थी विचार करत असतात. त्यांना बाकी कुणाचंही कशाचंच देणंघेणं नसतं.अशा व्यक्तींच्यामुळे देश पुढे जात नाही. या व्यक्तींचे वागणे पाहून कुटुंबातील बाकीच्या सगळ्या व्यक्तींच्या मनावर तसाच परिणाम होतो. व तेही पुढे तसेच वागू लागतात.
ज्या व्यक्ती समजदार असतात, त्या नेहमी आपल्याबरोबर आपल्या देशाच्या हिताचे कार्य कसे होईल याचाच विचार करत असतात. त्यामुळे नेहमी वादादित गोष्टीमध्ये सुवर्णमध्य काढण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. त्यामुळे त्यांच्या सानिध्यात असलेल्या व्यक्तीसुद्धा समजूतदारपणे वागतात. आज समाजामध्ये अशा समजूतदारपणे वागणाऱ्या लोकांची वानवा आहे. समजूतदार व्यक्ती स्वतःच्या मालमत्तेचे रक्षण तर करतातच पण सार्वजनिक मालमत्ता जसे की, सार्वजनिक बस मधील सीट कव्हर न फाडणे, सार्वजनिक बल्ब न फोडणे, सार्वजनिक इमारतींना नुकसान न पोहोचणे, पर्यावरण संवर्धन करणे, पर्यावरण रक्षण करणे या गोष्टी सतत करतात. त्याचप्रमाणे समाज हिताच्या कामामध्येही सहभाग घेणे, गरजूंना सहकार्य करणे, देणगी देणे अशी कार्येही ते करतात.
समजदार नागरिक नेहमी आपल्या जीवनाचा विकास करत असतो,त्याच्या जीवनात नेहमी सुख-समाधान नांदत असते. त्याच्या घरातील लोकसुद्धा नेहमी आनंदी व समाधानी असतात. अशा व्यक्तींची मुले हुशार व समंजस असतात. तीसुद्धा सर्वांना समजून घेतात. सर्वांना मदत करतात. चांगल्या गुणांमुळे त्यांच्या आजूबाजूच्या लोकांत सुद्धा ते चांगल्या गुणांची पेरणी करतात. समजदार नागरिक आपली बुद्धी वापरून मतदान प्रक्रियेच्या वेळी कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता योग्य त्या उमेदवारालाच ते मत देतात,व निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतात.पण अशा समजदार नागरिकांची संख्या सध्या रोडावत चाललेली आहे. व त्याचा परिणाम देश हितावर व देश विकासावर होत आहे.
आज कोरोणा सारखी महामारी, महा महाभयंकर हा रोग देशाला, नव्हे संपूर्ण जगाला भंडावून सोडत आहे त्यांमध्ये काही बेजबाबदार नागरिक पोलीस प्रशासनाला , शासनाला कोणत्याही प्रकारचे सहकार्य करत नाहीत. त्यामुळे ह्या महामारी पासून बचाव करण्यास आपण काहीअंशी असमर्थ ठरत आहोत.
त्यामुळे समजदार नागरिकांचे जीवन सुद्धा बेहाल झालेले आहे. तरीही काही समजूतदार नागरिक जसे की पोलीस प्रशासन, वैद्यकीय सेवा पुरवणारे कर्मचारी ,सफाई कामगार, शासनाचे कर्मचारी हे सर्व जीव तोडून ह्या रोगाला समोर नष्ट करण्यासाठी प्रयत्नशील आहेत म्हणून काही अंशी आपण या रोगावर अंकुश ठेवू शकत आहे. देशाला समजदार नागरिकाची नितांत गरज आहे.
चला तर मग समजदार बनूया आणि देशाला विकासाकडे नेऊ या.
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
No comments:
Post a Comment