Thursday, 7 May 2020

लेख (आनंद )

लेख

आनंद

आनंदी आनंद गडे,
ईकडे तिकडे चोहीकडे.

ही कविता आजही आठवते व मन हलके होऊन बालपणात जाऊन रमते.आनंदाने नाचायला, बागडायला लागते. बालमैत्रीणींचा हसरा घोळका सभोवार असल्याचा भास होतो.आनंद शब्दातूनच आनंदाची बरसात होते.जीवनात हा आनंद मिळवण्यासाठी प्रत्येकजण आटापिटा करत असतो.पण निखळ आनंद सर्वांनाच मिळतो असंही नाही.

आनंद म्हणजे मनाला मिळालेले समाधान होय.आनंद मनाला प्रफुल्लित करतो.मन ताजेतवाने होते.पण हा आनंद कुणाला कशात मिळेल हे सांगता येत नाही. कुणाला घरात,, शाळेत,समाजात, कामात, दुसऱ्याला मदत करण्यात, दुसऱ्याला सुखी करण्यात मिळतो. समाधान म्हणजेच आनंद मिळणे होय.त्यातल्या त्यात सकारात्मक आनंद कायमस्वरूपी टिकतो. काहीजणांना दुसऱ्यांना दुःख देण्यामध्ये आनंद वाटत असतो. दुसऱ्याला त्रास देणे, चिडवणे ,त्यांचे वाईट चिंतने व त्यांचे नुकसान झाले की या लोकांना आनंद होणे. ही सर्व नकारात्मक आनंदाची उदाहरणे आहेत. पण अशा व्यक्ती कधीही आयुष्यामध्ये आनंदी असल्याचं दिसत नाहीत  कारण त्यांचा नकारात्मक आनंद नेहमीच त्यांना सतावत असतो. त्यातून मिळणारा आनंद हा अल्प काळ टिकतो. जो आनंद दुसऱ्याला सुख देऊन आपल्याला मिळतो, ज्याला आपण सकारात्मक आनंद म्हणू.त्या आनंदातून आपल्याला सुख समाधान आनंद तर मिळतेच. पण दुसरेही आनंदी होतात. व हा आनंद चिरकाल टिकतो. अशा वेळी मनाला झालेल्या आनंदाची तुलना आपण कशाशीही करू शकत नाही.
 
मानवाने नेहमी आनंदी असावे. जी व्यक्ती आनंदाने आपले जीवन व्यतीत करते ती व्यक्ती स्वतःला आनंदी करते व समाजालाही आनंदी करत असते. आनंद मिळवण्याकरता प्रथम आपले मन हे निस्वार्थी भावनेने भरलेले असावे लागते. ज्या वेळेला आपण एखाद्या लहान मुलाकडे पाहतो,ते अत्यंत निरागस असते. त्यावेळी त्या मुलांच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची स्वार्थी भावना नसते. त्यामुळे जेव्हा आपण लहान मुलांच्या हसण्याकडे पाहतो त्यावेळेला आपलं मन आनंदानं भरून येतं. पटकन त्या मुलाला उचलून घेऊन त्याचे पाप घ्यावे वाटतात.  हे सर्व आनंदाच्या अनुभूतीतून घडत असतं. त्याच बरोबर ज्या वेळेला आपण एखादे कार्य हाती घेतो व ते कार्य  प्रामाणिकपणे पार  पाडतो , त्या कार्यामध्ये यश मिळवतो. त्यावेळेला आपल्याला झालेला आनंद अवर्णनीय असतो. तसेच बागेतील फुलांच्या कडे पाहिल्यानंतर सुद्धा आपल्या मनाला समाधान मिळते म्हणजे आपण आनंदी होतो. अशा या आनंदामुळे आपण ताजेतवाने होतो व आपला उत्साह दुणावतो. गौतम बुद्धांच्या, महावीर भगवान च्या जीवनामध्ये सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचे दुःख येऊ नये यासाठी त्यांना राजमहालातच ठेवले.त्यांना सर्वप्रकारचा आनंदच नेहमी देण्याचा प्रयत्न केला जात होता. पण  कालांतराने का होईना ,समाजातील दुःख त्यांना दिसले, आणि त्यांनी राज वैभवाचा त्याग करून ते गौतम बुद्ध ,भगवान महावीर बनले. व त्यांनी आपले सारे आयुष्य लोकांना आनंद ,सुख देण्याकरता व्यतीत केले. संत महात्म्यांनी सुद्धा लोकांना आनंद देण्याकरिता प्रयत्न केले.
 आपण आनंद कशात मानायचा हे आपल्या स्वभावावर अवलंबून असते. कारण एकाच गोष्टीचा आनंद एका व्यक्तीला मिळेल तर त्याच गोष्टीचा आनंद  दुसऱ्या व्यक्तीला मिळणार नाही. त्यामुळे आनंदाची व्याख्या प्रत्येक व्यक्तिगणिक बदलत असते. पण जीवनामध्ये सकारात्मक आनंदच चिरकाल टिकत असतो. आपण आनंदी असतो त्यावेळेला आपल्या सभोवती असणारे लोक सुद्धा आनंदी असतात. व कोणत्याही प्रकारचा ताण-तणाव आपल्यावर असत नाही. तणावरहित जीवन जगण्याकरता आपण नेहमी आनंदी असले पाहिजे. त्यासाठी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण आनंद मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

No comments:

Post a Comment