07
लेख
प्रोत्साहन
" अरे वा!!! सुरज, किती छान चित्र काढलेस तू, मस्तच हं " " नमिता, तुझी वही दाखव पाहू? छान!!! तू पण छानच काढलेस हं " शाब्बास दोघांनाही." अशा प्रतिक्रिया ऐकल्या की समोरच्या व्यक्तीला खूप बरे वाटते. व आपल्या केलेल्या कामाचे चीज झाले असे वाटते. व तो दुप्पट उत्साहाने कामाला लागतो. यालाच त्या व्यक्तीला प्रोत्साहन देणे असे म्हणतात. प्रोस्ताहन म्हणजे, एखादे काम चांगले करण्यासाठी त्या व्यक्तीला दिलेला शाब्दिक, भावनिक आधार होय. प्रोत्साहनाने सर्वजण काम करण्यास उद्युक्त होत असतात.
लहान बाळ जेव्हा हळूहळू चालायला लागते, बोलायला लागते, तेंव्हा त्याच्या पहिल्या शब्दावर ,त्याच्या पहिल्या पावलावर सर्वांचे लक्ष असते. व जेंव्हा ते पहिला शब्द बोलते, पहिले पाऊल टाकते सर्वजण त्याच्याकडे कौतुकाने पाहत असतात, टाळ्या वाजवत असतात, त्याला प्रोत्साहन देत असतात.त्यावेळी त्या बाळाला असे वाटते की आपण काहीतरी चांगले करत आहोत. आपल्या कृतीमुळे समोरच्या लोकांना खूप आनंद झालेला आहे म्हणून मग ते आणखीन बडबडायला लागते ,आणखीन पाऊल पुढे टाकायला प्रयत्न करते. त्याच्या मनामध्ये हे बिंबते की आपण काहीतरी चांगले काम केले की समोरच्याला आवडते व तो आपल्याला प्रोत्साहन देतो, आणखीन चांगलं करण्यास ते मुल प्रवृत्त होते. जेव्हा त्याच्या हातून नको ती गोष्ट घडत असते तेव्हा त्याला लोक रागावून सांगतात ,प्रसंगी मारतात त्यामुळे त्या मुलाच्या मनात हे बसते की हे काम केल्यानंतर आपल्याला मार बसतो ,रागावून घ्यावे लागते त्यामुळे ची गोष्ट न करण्याकडे त्याचा कल असतो. मूल पुढे मोठे झाले की ते शाळेत जाते हे समाजात वावरते. त्यावेळीही त्याच्या चांगल्या गुणांचे कौतुक हे सगळीकडे होते. विविध स्पर्धांच्या मध्ये भाग घेत असतो. जर त्याचा नंबर आला तर त्याला पुढच्या स्पर्धेमध्ये भाग घेण्यास बरे वाटते. अशाप्रकारे प्रोत्साहनाने व्यक्ती क्रियाशील होतो कार्यरत होतो. प्राण्यांच्या मध्ये सुद्धा पीले चांगली वागली की जनावरे आपल्या पिलांना चाटतात, व त्यांच्या मनाविरुद्ध केले की त्यांना ढकलून देतात. म्हणजेच प्रोत्साहन देण्याची प्रवृत्ती माणसाबरोबर जनावरात सुद्धा असते. परीक्षेत चांगले गुण पडले, तर अभ्यास करणाऱ्याला सुद्धा प्रोत्साहन मिळते. सर्व वर्गापुढे सर्व शिक्षकांनी त्याला चांगले म्हटले तर तो आणखीनच प्रोत्साहित होतो. परंतु ज्यापद्धतीने आपण चांगल्या गुणांना प्रोत्साहन देत़ो ते सर्वांच्या समोर करावे पण जर चुका दाखवायच्या असतील तर त्या आपण सर्वांच्या समोर न दाखवता वैयक्तिक एकट्याला बाजूला बोलवून आपण त्याच्या चुका सांगितल्या तर त्याला अपमानित वाटणार नाही व तो पुढच्या वेळेला चांगला करण्याचा प्रयत्न करेल. कंपनीमध्ये काम करताना सुद्धा जेव्हा एखादा अधिकारी आपल्या कर्मचाऱ्याला एखादे चांगले काम केल्यानंतर त्याला वाढीव रक्कम देऊन त्याची प्रशंसा केली, तर ते बाकीच्या लोकांच्या साठी सुद्धा एक चांगले उदाहरण बनते व तेही चांगले काम करण्याचा प्रयत्न करतात. परिणामी कंपनीचे कार्य सुद्धा चांगले होते. बोनस देणे हा जो प्रकार आहे तो म्हणजे प्रोत्साहनाचाच एक भाग आहे. एखाद्या साहित्यिकांच्या साहित्याचे जर आपण कौतुक केले तर त्याला लिहिण्यास उभारी येते. आपण फक्त चुका काढत बसलो तर समोरच्या व्यक्तीला अजिबात उभारी येणार नाही आपल्याबद्दल ही त्याचे मत चांगले होणार नाही.तेव्हा आपण नेहमी चांगल्या गोष्टीला प्रोत्साहन द्यावे.
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
No comments:
Post a Comment