07 पत्र
सासरी गेलेल्या मुलीचे आई बाबास पत्र
माणिक,
कुरुंदवाड,
जिल्हा.कोल्हापूर
तीर्थरूप आई बाबास,
माणिक चा साष्टांग नमस्कार,
विनंती विशेष.
पत्रास कारण की, आजच्या मोबाईलच्या, संगणकाच्या, विज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगात पत्र लिहिणे ही संकल्पना फारच मागे पडली आहे. जवळ जवळ नष्टच झालेली आहे. मला अजूनही आठवते आमच्या लहानपणी जेव्हा पोस्टमन काका एखादे पत्र घेऊन यायचे त्या वेळेला ते वाचण्यासाठी आम्हा भावंडांच्या स्पर्धा लागायची.ती आठवण ताजी झाली म्हणून मी हे पत्र आपल्याला लिहायला घेत आहे.
लिहायला सुरुवात करताना मनामध्ये खूप विचार जे खूप दिवस साठून राहिलेले होते, ते शब्दात कसे व्यक्त करायचे? लवकर कळेना. तुमच्या बद्दलच्या भावना माझ्या मनामध्ये ओथंबून आलेल्या होत्या त्यामुळे नेमक्या कोणत्या शब्दाने सुरुवात करावी हे कळत नाही
तुम्ही सगळेजण खुशाल ,आनंदी, समाधानी, आरोग्यपूर्ण असाल याची मला खात्री आहे. आई बाबा तुम्ही दोघेही या सध्याच्या काळामध्ये स्वतःला फार जपून राहायला हवे. कारण कोरोना या महामारी मुळे संपूर्ण जग हवालदिल झालेले आहे. अशा या कालावधीमध्ये तुम्ही दोघे कुठेही बाहेर जायचे नाही. स्वतःला जपायचे आहे. तुम्हाला दोघांनाही बरं नसतं हे मला चांगलं माहिती आहे. व तुम्ही जपून राहता हे ही माहिती आहे. तरीही काळजी घेणे महत्त्वाचे आहे. तुम्ही दोघेही हार्ट पेशंट आहात. बाबा तुम्ही दररोज थोडावेळ का होईना बाहेर फिरून येता, पण आईला हे होत नाही. कारण तिला लगेच धाप भरते, दम लागतो. तरीही आई तू तुला जमेल त्या पद्धतीने हालचाल करत जा. जेव्हा मोकळा वेळ मिळेल तेव्हा पुस्तके वाच, विविध कागदी फुले करण्यामध्ये आपला वेळ घालव. वेळही जाईल व एक नवीन वस्तू तयार केलेला आनंद पण मिळेल.
परवा तू माझा एक मोठं काम हलकं केलंस. वर्तमानपत्रांमध्ये आलेले माझे लेख, कविता, बातम्या इत्यादी आलेले पेपर मी माझ्या जवळ गेले चार वर्षे जपून ठेवले होते. ते कटिंग करून वेगळ्या कागदावर चिटकवायचे माझ्याकडून होत नव्हते. पण महिन्याभरात तू ते सगळं व्यवस्थित वेगवेगळ करून चिटकवून तयार करून दिलंस. मला खूप बरे वाटले. कारण ते मला खूप मोठे काम वाटत होते. तू ते काम हलके केले केलेस. मला खूप आनंद झाला की माझे सगळे आज पर्यंतचे कामकाज मी एकत्र करू शकले, ते फक्त तुझ्यामुळे. तसेच आई जेंव्हा जेंव्हा मला कोणत्याही गोष्टींमध्ये संभ्रमावस्था निर्माण होते तेंव्हा कोणाच्यातरी मार्गदर्शनाची गरज असते तेंव्हा तेंव्हा मला तुझा चेहरा डोळ्यासमोर येतो व मी माझ्यावर आलेले संकट तुझ्यासमोर बोलून दाखवते आणि तू क्षणार्धात ते संकट मला योग्य सल्ला देऊन घालवतेस. मला तुझा खूप मोठा आधार आहे.तो असाच अखंड राहू दे.
बाबा तुम्हीही माझ्या शिक्षणाकडे पहिल्यापासूनच लक्ष दिला होतात, त्यामुळेच आज आम्ही शैक्षणिक क्षेत्रात एवढी प्रगती करू शकलो. त्याचबरोबर समाज कार्याची सुद्धा आवड मला तुमच्यामुळेच लागली. तुम्ही कविता करायचा, लेख लिहायचा ते पाहून पाहून मला ही कविता करण्याची,लेख लिहिण्याची ,भाषण करण्याची, निबंध लिहिण्याची आवड निर्माण झाली. आज माझे साहित्य क्षेत्रामध्ये जे नाव झालेले आहे ते तुमच्यामुळे. याचे सगळे श्रेय मी तुम्हाला देते.
घरातील सर्वजण व्यवस्थित आहेत ना? संकल्प ,भक्ती चा अभ्यास कसा चालू आहे? दादा वहिनींचे काय चालू आहे? तिकडे सर्व व्यवस्थित असणार. कारण तुम्ही तिथे आहात ना? सगळे व्यवस्थित असणार याची मला खात्री आहे. इकडे मी व प्रियांका अतिशय आनंदात आहोत. आमची काळजी नसावी.
नाही म्हणता म्हणता मनातील भावना कशा मोकळ्या झाल्या पहा!! छान, मन खूपच हलके झाले. बरं झालं मी पत्र लिहायला घेतलं. प्रत्यक्ष न बोलता येणाऱ्या काही गोष्टी पत्राद्वारे मी आता निसंकोचपणे बोलू शकले. आता मी पत्र लिहायचे थांबवते. तुमचा आशीर्वाद नेहमीच माझ्या कार्याला प्रोत्साहन देत राहील.
कळावे, असाच लोभ असावा.
तुमचीच लाडकी लेक
माणिक
पत्र
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
No comments:
Post a Comment