Friday, 15 May 2020

मराठी लेख (वृद्धाश्रम-एक अनोखी कुटुंबव्यवस्था )

कोड नंबर 07
वृद्धाश्रम -- एक वेगळी कुटुंब संस्था

  आज 15 मे जागतिक कुटुंब दिन म्हणून सर्वत्र उत्साहाने,आनंदाने साजरा केला जात आहे. प्रत्येकालाच आपल्या आई-वडिलांच्या बरोबर, आपल्या भावा-बहिणीच्या बरोबर, घरातील सर्व लोकांच्या बरोबर एकत्र दिवस घालवणे आवडते.आजच्या धकाधकीच्या जीवनात नोकरीसाठी शिक्षणासाठी, इतर कामासाठी परगावी गेलेल्या मुलांच्या बरोबर एकत्र राहणे मुश्किल झालेले आहे. कधीतरी सण समारंभाच्या निमित्ताने ते सर्वजण एकत्र येतात. पण वेळ नसल्यामुळे जास्त काळ एकत्र राहू शकत नाहीत. सध्याचा काळ हा लॉकडाऊन चा काळ असल्यामुळे,बऱ्याच कुटुंबांमध्ये सर्व कुटुंबीय एकत्र राहण्याचा योग आलेला आहे.ते सर्वजण खूप दिवसांनी इतक्या निवांतपणे आपल्या कुटुंबातील लोकांच्याबरोबर रहात आहेत.हे जरी खरे असले तरीपण असेही काही दुर्दैवी लोक आहेत.त्यांना स्वतःच्या कुटुंबातील सर्व लोक असूनसुद्धा परक्या ठिकाणी म्हणजेच वृद्धाश्रमांमध्ये आपल्या स्वकीयांची वाट पाहात असहाय्यपणे जीवन जगणे त्यांच्या नशिबी आलेले आहे.
 कोणत्याही वृद्धाश्रमांमध्ये आपण गेलो तर तिथे असलेल्या असहाय्य वृद्धांच्या चेहऱ्यावरचा केविलवाणा भाव पाहिल्यानंतर खरोखरच  गलबलून यायला होते. डोळे आपसूकच पाणावतात. कारण तिथला प्रत्येक वृद्ध  मग ती स्त्री असो की पुरुष ,येणाऱ्या व्यक्तीमध्ये आपल्या मुलाला किंवा आपल्या मुलीला, आपल्या नातवंडांना शोधत असतात.माझा मुलगा असाच दिसत असेल, माझी मुलगी अशीच असेल किंवा माझी नातवंडं आता एवढी मोठी झाले असतील असे अनेक विचार त्यांच्या मनामध्ये येत असतात.व तशाच नजरेने ते  मदत द्यायला आलेल्या व्यक्तींच्या कडे पहात असतात.
 कोल्हापूर जिल्ह्यामध्ये घोसरवाड येथे जानकी वृद्धाश्रम आहे. आश्रमात स्त्री-पुरुष मिळून जवळ जवळ 34 जण एकत्र रहात आहेत. सर्वप्रथम आमच्या काकूच्या वर्ष श्राद्धा च्या कार्यक्रमावेळी  आम्ही तिथे भेट द्यायला गेलो. तिथले संचालक बाबासाहेब पुजारी यांच्याकडून सर्व माहिती घेतली. त्यावेळी त्यांनी सांगितलेल्या वृद्धांच्या कथा ऐकून अंगावर शहारे आले. कुटुंबामध्ये मुले, मुली असूनसुद्धा त्यांनी आपल्या आई-बाबांना, कोणी फक्त आईला ,कोणी आपल्या बाबांना  विविध कारणे सांगून वृद्धाश्रमात आणून सोडले होते.ते आजपर्यंत आपली मुले आपल्याला न्यायला येतील या वेड्या आशेवर जगत आहेत.
 हे सर्व पाहिल्यानंतर आजची कुटुंब व्यवस्था किती खालच्या थराला गेलेली आहे हे लक्षात येते. ज्या आई-बाबांनी आपल्या हाडाची काडे करून मुलांना वाढवले, खस्ता खाल्ल्या, अनेक हालअपेष्टा सहन केल्या. तेच आई बाबा त्यांच्या उतारवयात मुलांना नकोसे होतात. यामध्ये एक गोष्ट अधोरेखित होते ती म्हणजे जोपर्यंत मुलाचे लग्न होत नाही तोपर्यंत तो आपल्या आईवडिलांच्या बरोबरच असतो. त्यांचे सर्व ऐकतो.कींबहुना त्यांच्याशिवाय त्याला कुणीच नसते. पण जेव्हा लग्न होते, घरामध्ये त्याची बायको येते, तेव्हापासून मात्र घरांमध्ये हळूहळू कुरबुरी सुरू होतात. यामध्ये  त्या मुलीचा दोष असू शकतो किंवा म्हाताऱ्या आई-बाबांचाही दोष असू शकेल.पण या सर्वांमध्ये मुलाचे हे कर्तव्य आहे की त्याने दोंन्हीच्यामध्ये सुवर्णमध्य हा काढलाच पाहिजे. नवरी म्हणून आलेली मुलगी ही आपले घर सोडून आलेली असते तिलाही आधार दिला पाहिजे व आपल्या आई-वडीलांना दोघांनी मिळून समजून घेतलं पाहिजे.
   कुटुंब म्हटलं की कुटुंबामध्ये अनेक नाती आली. आई-वडील,भाऊ बहीण, आजी आजोबा,नातवंडं, नातेवाईक इत्यादी. हे सर्व जण एकाच छताखाली गुण्यागोविंदाने राहात असतील तर ते कुटुंब सुखी-समाधानी आहे असे समजले जाते. आज " हम दो हमारे दो,"  "छोटे कुटुंब सुखी कुटुंब " ही संकल्पना वाढीस लागली आहे. त्यामुळे उतारवयात गेलेले आपले आई-वडील नकोसे झालेले आहेत. त्यामुळे काही मुले निर्लज्जपणे आपल्या आई-वडिलांना वृद्धाश्रमांमध्ये आणून सोडतात. आपल्या आई वडिलांच्या भावनांचा ते थोडाही विचार करत नाहीत.पण या कुटुंबाला काहीही अर्थ राहत नाही. यावेळेला त्यांची लहान मुले  हे सर्व पहात असतात व त्यांच्या मनावर ही तसेच संस्कार होतात. व आईवडील मोठे झाल्यावर ते ही आपल्या आई-वडिलांना वृद्धाश्रमाची वाट दाखवतात. हे चक्र मग चालूच राहते.
 त्यामुळे मोडत चाललेली ही कुटुंब व्यवस्था वृद्धाश्रमासारख्या संस्थेमध्ये रुजू पाहत आहे. त्या ठिकाणी त्यांचा यथायोग्य सांभाळ जरी होत असला तरी त्यांची मनं आपल्या कुटुंबातील व्यक्तींच्या कडेच ओढत असतात. त्यामुळे वृद्धाश्रम ही संकल्पना बंदच पडायला हवी. हे मला एकटीला वाटून चालणार नाही तर समाजातील प्रत्येक मुलाला असे वाटले पाहिजे. सून म्हणून येणारी मुलगी कोणाची तरी मुलगी असते.त्यामुळे तिलाही याचा विचार करणे गरजेचे आहे.जर तिला आपल्या आई-बाबांना आपल्या भावाने बघावे असे वाटत असेल तर तिनेही तिच्या सासु-सासर्‍यांना आईवडिलांच्या प्रमाणेच प्रेम देऊन सांभाळले पाहिजे. त्यांना वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवू नये.

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

No comments:

Post a Comment