लेख
मित्र
सोन्यासारखी मैत्री आपली ,
अशीच नेहमी राहूदे .
मैत्रीच्या या नात्यात ,
गोडवा असाच टिकु दे.
आधार आपण एकमेकांना ,
संघर्षाच्या या दुनियेत .
संवेदना आपल्या जागृत ठेऊ ,
बोथट झालेल्या माणुसकीत.
प्रत्येकाच्या जीवनात मित्र-मैत्रिणी असतातच. कारण मैत्री शिवाय आपलं जीवन हे भकास निराशमय होऊन जातं. अगदी सुरुवातीचे बालमित्र,वर्गमित्र, समाज मित्र, कामाच्या ठिकाणी असलेले मित्र. व आयुष्याच्या संध्याकाळी भेटलेले निवांत गप्पा मारण्यास मिळालेले मित्र. या सगळ्या मित्रांमध्ये महत्त्वाची म्हणजे नवरा बायकोची मैत्री होय. कारण बाकीचे मित्र तरी आपणाला कधी ना कधीतरी सोडून जाऊ शकतात. पण नवरा-बायकोचं नातं,त्यांच्यातली मैत्री ही शेवटपर्यंत त्यांच्याबरोबर राहते.
बालपणीची मैत्री अत्यंत निरागस असते. प्रकारचा स्वार्थ, द्वेष,वैरत्वाची भावना नसते. या मैत्रीला जात,धर्म,पंथ याचे कशाचेच बंधन नसते. याला निखळ मैत्री असे म्हणतात. हायस्कूल व कॉलेजमध्ये असणारी मैत्री आयुष्याच्या एका वळणावर आपल्या जीवनाला एक कलाटणी देणारी ठरते. यावेळचे मित्र-मैत्रीण आपल्याला आपल्या शिक्षकांच्या पेक्षा आई-वडिलांच्या पेक्षा जवळचे वाटत असतात. आपले मित्र आणि मैत्रिणी हेच आपले सर्वस्व आहे, असे या वयात वाटत असते. आपल्याला गटातून बाहेर काढतील या एका भितीने सर्व मित्र मैत्रिणी आपल्या ग्रुप मध्ये जे काही नियम ठरतील ते आटोकाट पाळण्याचा प्रयत्न करत असतात. अशावेळी जर काही गोष्टी त्यांना पटत नसतील, किंवा घरच्या लोकांना पटत नसतील तरीही त्यांना त्यांच्या मनाविरुद्ध करणे भाग पडते व मग अशावेळी त्यांना ताण तणावाला सामोरे जावे लागते. हा आयुष्याचा विषय महत्त्वाचा टप्पा असतो की यावेळेला जे मित्र भेटतील, त्यांची पक्की दोस्ती होईल त्या व्यक्तीचे पुढचे जीवन सुद्धा या मैत्री वरच अवलंबून असते. जीवन चरितार्थ चालवण्यासाठी आपण ज्या ठिकाणी नोकरी करत असतो त्या ठिकाणी काम करत असणारे सहकारी यांच्यामध्येही सहकार्याचे नाते हे मित्रत्वाच्या नात्यांमध्ये हळूहळू परिवर्तित होत जाते व आपल्याला मित्रत्वाचा हात देऊन जाते. ही मैत्री आपली नोकरी संपेपर्यंत आपल्याबरोबर राहते. आपल्या सुखात दु:खात सहभागी होते.आयुष्याची संध्याकाळ म्हणजे वृद्धावस्था होय. यावेळची मैत्री हे समवयस्क समदु:खी अशा लोकांच्या बरोबर होते. मुलं-मुली हे त्यांच्या नोकरी संसारात रमलेले असतात. अशावेळी सहाजिकच या वृद्ध व्यक्तींच्या कडे दुर्लक्ष होत जाते.अशावेळी सहाजिकच प्रथम आपल्या जीवनाचा जोडीदार मग तो पती किंवा पत्नी असू देत ते एकमेकाचे चांगले सहकारी मित्र बनतात. एकमेकांची काळजी घेतात.
आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येकाला आपले जीवन सुसह्य करण्या करता मैत्रीची आवश्यकता भासतेच भासते. कृष्ण व सुदामा, अकबर ,बिरबल, तेनालीरामन व राजा कृष्णदेवराय यांचे मित्र प्रेम सर्वांना माहीतच आहे. खऱ्या मित्रांमध्ये असे निस्वार्थी प्रेम असते. प्रियकर व प्रेयसी यांच्यामधील मैत्री ही प्रेमाची मैत्री असते. या मैत्रीला जबाबदारीची, कर्तव्याची जाण नसते. म्हणून तर अशा ह्या प्रेमवीरांच्या कडून आततायीपणाचा निर्णय घेतला जातो. व बऱ्याच वेळा त्यांना आयुष्यभर पस्तावत बसावे लागते. मग अशा वेळेला सुरवातीची मैत्री हळूहळू कमी होत जाते. प्राण्यांच्या बरोबर ही आपली मैत्री होऊ शकते. प्राण्यांच्या बरोबर केलेली मैत्री कदाचित आपण विसरू शकू पण ते प्राणी कधीही विसरत नाहीत. आयुष्याच्या वळणावर जेव्हा तुम्ही त्यांना भेटतात तेव्हा ते आपली मैत्री दाखवतात, प्रकट करतात व आपल्याला प्रेमाने बिलगतात.
मैत्री ही विश्वासाच्या पायावर टिकते.दोन मित्रांच्यामधे असलेला एकमेंकांबद्दलचा विश्वास हा मैत्री चा भक्कम पाया आहे.मैत्री म्हणजे असा परीस आहे की ज्याच्या जीवनात या मैत्रीरुपी परीसाने स्पर्श केला आहे त्याचे जीवन सोन्यासारखे मौल्यवान होते.
स्त्री व पुरुषाची निखळ मैत्री असू शकते . समाजात एक मानसिकता झाली आहे की स्त्री व पुरुष कोणत्याही नात्याशिवाय मैत्री करु शकत नाही.पण हे खरे नाही.माझ्या मते स्त्री व पुरुष हे एकमेकांचे चांगले मित्र बनू शकतात. मैत्रीला लिंगभेदाचे बंधन नसते.मैत्रीत एकमेकांना समजून घेणं महत्त्वाचं असतं.
एक स्त्री व पुरुष जर विचारांच्या पातळीवर एकत्र आले तर त्यांच्यात वैचारिक नाते निर्माण होते .विचारांची देवाणघेवाण एकमेकांना समजून घेणे , भावनांची कदर करणे , संकटसमयी मदत करणे हे सर्व ओघाने येतेच .
पण समाजातील मानसिकता हे मान्य करत नाही.जे या वैचारिक पातळीवर पोहोचले आहेत त्यांना यावर आक्षेप मुळीच नसतो .समाजाने बदलत्या काळानुसार बदलले पाहिजे .सर्व नात्यांना एकाच मापात तोलून चालणार नाही .महत्त्वाचे म्हणजे स्त्री व पुरुष या दोघांनीही एकमेकांना पूर्ण ओळखले पाहिजे.मैत्रीत अंधविश्वास कामी येत नसतो . सुज्ञास सांगणे न लगे .
बदलत्या समाजव्यवस्थेत बदलत्या काळानुसार आपणही सामाजिक व वैचारिक पातळीवर बदलले पाहिजे.स्त्री व पुरुष यांची निखळ मैत्री असू शकते हे आपल्या वागण्यातून व व्यक्तिमत्वातून दाखवून दिले पाहिजे.
हाक हवीय विवेकाची ,
बुद्धी जागृत करायला .
मैत्रीचा परीसच ऊजळेल ,
तावून सुलाखून विश्वासाला.
विश्वासच मैत्रीचा परीस,
नाही तुटायची कधीही .
जपूया नाते अखंड ,
संकटे आली तरीही .
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड ,ता.शिरोळ
जि. कोल्हापूर
No comments:
Post a Comment