Sunday, 31 May 2020

चारोळी ( साथ तुझी मला असता )

चारोळी

साथ तुझी मला असता

साथ तुझी मला असता सखे
उणे काय मज या दुनियेमध्ये 
आली संकटे कैक जरी वाटेत 
पार सहजी तव धुंदीमध्ये

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

लेख ( प्रोत्साहन )

07
लेख

 प्रोत्साहन

"  अरे वा!!! सुरज, किती छान चित्र काढलेस तू, मस्तच हं " "  नमिता, तुझी वही दाखव पाहू? छान!!!  तू पण छानच काढलेस हं " शाब्बास दोघांनाही." अशा प्रतिक्रिया ऐकल्या की समोरच्या व्यक्तीला खूप बरे वाटते. व आपल्या केलेल्या कामाचे चीज झाले असे वाटते. व तो दुप्पट उत्साहाने कामाला लागतो. यालाच त्या व्यक्तीला प्रोत्साहन देणे असे म्हणतात. प्रोस्ताहन म्हणजे, एखादे काम चांगले करण्यासाठी त्या व्यक्तीला दिलेला  शाब्दिक, भावनिक आधार होय. प्रोत्साहनाने सर्वजण काम करण्यास उद्युक्त होत असतात.

 लहान बाळ जेव्हा हळूहळू चालायला लागते, बोलायला लागते, तेंव्हा त्याच्या पहिल्या शब्दावर ,त्याच्या पहिल्या पावलावर सर्वांचे लक्ष असते. व जेंव्हा ते पहिला शब्द बोलते, पहिले पाऊल टाकते सर्वजण त्याच्याकडे कौतुकाने पाहत असतात, टाळ्या वाजवत असतात, त्याला प्रोत्साहन देत असतात.त्यावेळी त्या बाळाला असे वाटते की आपण काहीतरी चांगले करत आहोत. आपल्या कृतीमुळे समोरच्या लोकांना खूप आनंद झालेला आहे म्हणून मग ते आणखीन बडबडायला लागते ,आणखीन पाऊल पुढे टाकायला प्रयत्न करते. त्याच्या मनामध्ये हे बिंबते की आपण काहीतरी चांगले काम केले की समोरच्याला आवडते  व तो आपल्याला प्रोत्साहन देतो, आणखीन चांगलं करण्यास ते मुल प्रवृत्त होते. जेव्हा त्याच्या हातून नको ती गोष्ट घडत असते तेव्हा त्याला लोक रागावून सांगतात ,प्रसंगी मारतात त्यामुळे त्या मुलाच्या मनात हे बसते की हे काम केल्यानंतर आपल्याला मार बसतो ,रागावून घ्यावे लागते त्यामुळे ची गोष्ट न करण्याकडे त्याचा कल असतो. मूल पुढे मोठे झाले की ते शाळेत जाते हे समाजात वावरते. त्यावेळीही त्याच्या चांगल्या गुणांचे कौतुक हे सगळीकडे होते. विविध स्पर्धांच्या मध्ये भाग घेत असतो. जर त्याचा नंबर आला तर त्याला पुढच्या स्पर्धेमध्ये भाग घेण्यास बरे वाटते. अशाप्रकारे प्रोत्साहनाने व्यक्ती क्रियाशील होतो कार्यरत होतो. प्राण्यांच्या मध्ये सुद्धा पीले चांगली वागली की जनावरे आपल्या पिलांना चाटतात, व त्यांच्या मनाविरुद्ध केले की त्यांना ढकलून देतात. म्हणजेच प्रोत्साहन देण्याची प्रवृत्ती माणसाबरोबर जनावरात सुद्धा असते. परीक्षेत चांगले गुण पडले, तर अभ्यास करणाऱ्याला सुद्धा प्रोत्साहन मिळते. सर्व वर्गापुढे सर्व शिक्षकांनी त्याला चांगले म्हटले तर तो आणखीनच प्रोत्साहित होतो. परंतु ज्यापद्धतीने आपण चांगल्या गुणांना प्रोत्साहन देत़ो ते सर्वांच्या समोर करावे पण जर चुका दाखवायच्या असतील तर त्या आपण सर्वांच्या समोर न दाखवता वैयक्तिक एकट्याला बाजूला बोलवून आपण त्याच्या चुका सांगितल्या तर त्याला अपमानित वाटणार नाही व तो पुढच्या वेळेला चांगला करण्याचा प्रयत्न करेल. कंपनीमध्ये काम करताना सुद्धा जेव्हा एखादा अधिकारी आपल्या कर्मचाऱ्याला एखादे चांगले काम केल्यानंतर त्याला वाढीव रक्कम  देऊन त्याची प्रशंसा केली, तर ते बाकीच्या लोकांच्या साठी सुद्धा एक चांगले उदाहरण बनते व तेही चांगले काम करण्याचा प्रयत्न करतात. परिणामी कंपनीचे कार्य सुद्धा चांगले होते. बोनस देणे हा जो प्रकार आहे तो म्हणजे प्रोत्साहनाचाच एक भाग आहे. एखाद्या साहित्यिकांच्या साहित्याचे जर आपण कौतुक केले तर त्याला लिहिण्यास उभारी येते. आपण फक्त चुका काढत बसलो तर समोरच्या व्यक्तीला अजिबात उभारी येणार नाही आपल्याबद्दल ही त्याचे मत चांगले होणार नाही.तेव्हा आपण नेहमी चांगल्या गोष्टीला प्रोत्साहन द्यावे.

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चारोळी (व्यसन तंबाखूचे )

चारोळी
व्यसन तंबाखूचे

सिगारेट, बिडी, जर्दा,मावा 
प्रकार अनेक तंबाखू एकच
व्यसन तंबाखूचे घातक फार 
अंतिम स्थान कर्करोगाच

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Saturday, 30 May 2020

चारोळी (गरीबी )

चारोळी

गरीबी

अर्धनग्न गरीबी वाट्याला आमच्या
अश्रूच आता साथी आमचे 
भावाच्या मुखी घास घालते 
मला उपाशीच आहे रहायचे

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड

चारोळी (रोपटे )

चारोळी

रोपटे

इवलेसे रोपटे देतो संदेश मोठा
जपा मला सुखी भविष्यासाठी 
रुजतो मी मातीत ,बहरु द्या मला
सान हाताचांच आधार जगण्यासाठी

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चारोळी ( मी एक रानफुल )

उपक्रम
चारोळी

मी एक रानफूल

मी एक रानफूल गोजिरे 
रानमाळावर हसत डुलतो 
नयनी सुखावतो फुलप्रेमींच्या 
समाधानाने सदा मी हलतो

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Friday, 29 May 2020

हायकू (चिमणी पिले )

चित्रहायकू

चिमणी पिले

चिमणी पिले
चिवचिव करती 
भूक लागती 

माय चिमणी 
भरवते प्रेमाने
खाती स्नेहाने

तोंड वासले
दोन्हीही सानुल्यांनी 
सान चोचींनी 

जबाबदारी
वात्सल्याची पेलते 
घास घालते 

लाकडी घर
इवलेसे दिसते 
छान भासते

खाया घालते
दांडीवर बसून 
समरसून 

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चारोळी (मन हे उधाण वाऱ्याचे )

चारोळी

मन हे उधाण वाऱ्याचे

क्षणात इथे तर क्षणात तिथे 
मन हे उधाण वाऱ्याचे जगणे 
लागे ना थांग कुणा,ना कळे अर्थ
स्वतःच्या तरी वशी राहो हेच मागणे

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Thursday, 28 May 2020

हायकू (बीज )

चित्र हायकू

बीज

तळहातात
अंकुर विसावले
उंच दिसले

जपावे असे
बिजांकुराला खास
अशीच आस

चार पानांचे
पर्णदल सुंदर
नाही अंतर

निळे आकाश
निरभ्र मोहवते 
छान दिसते

हिरवी झाडे
सांभाळती स्वतःला
सुख छायेला

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चित्रचारोळी (माय )

चित्रचारोळी

माय

डोईवर बुट्टी पाठीशी सानुला 
पुढेमागे लेकरं दोन,मोळी घेऊन
सायकलवरून निघाली माय 
संसारासाठी अपार कष्ट झेलून

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

आठोळी ( साथ तुझी )

स्पर्धेसाठी

आठोळी

साथ तुझी

साथ तुझी अशीच राहू दे 
संसार बागेत जीवनाच्या
वेलीवरच्या दोन फुलांसह 
लुटू लहरी आनंदाच्या 

सहजीवनाचा प्रवास यशस्वी 
एकमेकांच्या समर्थ साथीने 
फुलत राहील असाच या जन्मी 
पार करु आयुष्य निगुतीने

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Tuesday, 26 May 2020

कविता (निशिगंध )

     निशिगंध
टपोरा टपोरा पांढरा शुभ्र,
 देण्या आनंद बहरला निशिगंध.
सौंदर्याने त्याच्या मनमुराद ,
नाचे माझा मनमयुर बेधुंद.

अर्धोन्मलीत कलिका सांगती,
दिवस उद्याचा आहे बघायचा.
आजचे फुलाचे फुलणे सुंदर,
आम्हालाही आनंद आहे द्यायचा.

ताठ मानेने उभा मावळा,
स्वाभिमानी बाणा दिसतो.
दु:खातसुद्धा असते हसायचे,
गुज हेच फुलारुन सांगतो.

असते फुलायचे जोडीने,
एकमेकांचा हात धरुन.
दाखवायचे आहे जगाला,
एकसंघपणाचे प्रेम पेरुन.

असले जरी आयुष्य कमी,
सुगंधाने अमर व्हायचे असते.
नावं जरी काढले कुणी आपले,
वासावरून लक्षात येतच राहते.

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड

Monday, 25 May 2020

चारोळी ( ईद )

उपक्रम

चारोळी

ईद 

चंद्रमा ईदचा उगवला 
हर्षोल्हासित मने झाली
रमजान ईदच्या शुभेच्छा
एकमेकां देऊ लागली

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा, कोल्हापूर

Sunday, 24 May 2020

चारोळी (पाऊस )

स्पर्धेसाठी

चारोळी

विषय- पाऊस

पोशिंद्याच्या जिव्हाळ्याचा 
पाऊस सर्वांचीच असतो आस 
तापल्या उन्हात ,तहानलेल्या 
जीवाला याचीच येते सय खास 

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चारोळी ( गाठ रेशमी बांधली )

अष्टाक्षरी चारोळी

गाठ रेशमी बांधली

मित्रत्वाच्या नात्यातून 
गाठ रेशमी बांधली 
तुझ्या माझ्या मैत्रीचीच 
चर्चा गावात रंगली 

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

पत्र(सासरी गेलेल्या मुलीचे आईबाबांस पत्र )

07   पत्र

सासरी गेलेल्या मुलीचे आई बाबास पत्र

        माणिक,
        कुरुंदवाड,
       जिल्हा.कोल्हापूर


 तीर्थरूप आई बाबास,
 माणिक चा साष्टांग नमस्कार,
 विनंती विशेष.

 पत्रास कारण की, आजच्या मोबाईलच्या,  संगणकाच्या, विज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगात  पत्र लिहिणे ही संकल्पना फारच मागे पडली आहे.  जवळ जवळ नष्टच झालेली आहे. मला अजूनही आठवते आमच्या लहानपणी  जेव्हा पोस्टमन काका एखादे पत्र घेऊन यायचे त्या वेळेला ते वाचण्यासाठी आम्हा भावंडांच्या स्पर्धा लागायची.ती आठवण ताजी झाली म्हणून मी हे पत्र आपल्याला  लिहायला घेत आहे.

 लिहायला सुरुवात करताना मनामध्ये खूप विचार जे खूप दिवस साठून राहिलेले होते, ते शब्दात कसे व्यक्त करायचे? लवकर कळेना. तुमच्या बद्दलच्या भावना माझ्या मनामध्ये  ओथंबून आलेल्या होत्या त्यामुळे नेमक्या कोणत्या शब्दाने सुरुवात करावी हे कळत नाही

 तुम्ही सगळेजण खुशाल ,आनंदी, समाधानी, आरोग्यपूर्ण असाल याची मला खात्री आहे. आई बाबा तुम्ही दोघेही या सध्याच्या काळामध्ये स्वतःला फार जपून राहायला हवे. कारण कोरोना या महामारी मुळे संपूर्ण जग हवालदिल झालेले आहे. अशा या कालावधीमध्ये तुम्ही दोघे कुठेही बाहेर जायचे नाही. स्वतःला जपायचे आहे. तुम्हाला दोघांनाही बरं नसतं हे मला चांगलं माहिती आहे. व तुम्ही जपून राहता हे ही माहिती आहे. तरीही काळजी घेणे महत्त्वाचे आहे. तुम्ही दोघेही हार्ट पेशंट आहात. बाबा तुम्ही दररोज थोडावेळ का होईना बाहेर फिरून येता,  पण आईला हे होत नाही. कारण तिला लगेच धाप भरते, दम लागतो. तरीही आई तू तुला जमेल त्या पद्धतीने हालचाल करत जा. जेव्हा मोकळा वेळ मिळेल तेव्हा पुस्तके वाच, विविध कागदी फुले करण्यामध्ये आपला वेळ घालव. वेळही जाईल व एक नवीन  वस्तू तयार केलेला आनंद पण मिळेल.

 परवा तू माझा एक मोठं काम हलकं केलंस. वर्तमानपत्रांमध्ये आलेले माझे लेख, कविता, बातम्या इत्यादी आलेले पेपर मी माझ्या जवळ गेले चार वर्षे जपून ठेवले होते. ते कटिंग करून वेगळ्या कागदावर चिटकवायचे माझ्याकडून होत नव्हते. पण महिन्याभरात तू ते सगळं व्यवस्थित वेगवेगळ करून चिटकवून तयार करून दिलंस. मला खूप बरे वाटले. कारण ते मला खूप मोठे काम वाटत होते. तू ते काम हलके केले केलेस. मला खूप आनंद झाला की माझे सगळे आज पर्यंतचे कामकाज मी एकत्र करू शकले, ते फक्त तुझ्यामुळे. तसेच आई जेंव्हा जेंव्हा मला कोणत्याही गोष्टींमध्ये संभ्रमावस्था निर्माण होते तेंव्हा कोणाच्यातरी मार्गदर्शनाची गरज असते तेंव्हा तेंव्हा मला तुझा चेहरा डोळ्यासमोर येतो व मी माझ्यावर  आलेले संकट तुझ्यासमोर बोलून दाखवते आणि तू क्षणार्धात ते संकट मला योग्य सल्ला देऊन घालवतेस. मला तुझा खूप मोठा आधार आहे.तो असाच अखंड राहू दे.

बाबा तुम्हीही माझ्या शिक्षणाकडे पहिल्यापासूनच लक्ष दिला होतात, त्यामुळेच आज आम्ही शैक्षणिक क्षेत्रात एवढी प्रगती करू शकलो. त्याचबरोबर समाज कार्याची सुद्धा आवड मला तुमच्यामुळेच लागली. तुम्ही कविता करायचा, लेख लिहायचा ते पाहून पाहून मला ही कविता करण्याची,लेख लिहिण्याची ,भाषण करण्याची, निबंध लिहिण्याची आवड निर्माण झाली. आज माझे साहित्य क्षेत्रामध्ये जे नाव झालेले आहे ते तुमच्यामुळे. याचे सगळे श्रेय मी तुम्हाला देते. 

  घरातील सर्वजण व्यवस्थित आहेत ना? संकल्प ,भक्ती चा अभ्यास कसा चालू आहे?  दादा वहिनींचे काय चालू आहे? तिकडे सर्व व्यवस्थित असणार. कारण तुम्ही तिथे आहात ना? सगळे व्यवस्थित असणार याची मला खात्री आहे. इकडे मी व प्रियांका अतिशय आनंदात आहोत. आमची काळजी नसावी.

 नाही म्हणता म्हणता मनातील भावना कशा मोकळ्या झाल्या पहा!!  छान, मन खूपच हलके झाले. बरं झालं मी पत्र लिहायला घेतलं. प्रत्यक्ष न बोलता येणाऱ्या काही गोष्टी पत्राद्वारे मी आता निसंकोचपणे बोलू शकले. आता मी पत्र लिहायचे थांबवते. तुमचा आशीर्वाद नेहमीच माझ्या कार्याला प्रोत्साहन देत राहील.

 कळावे, असाच लोभ असावा.

 तुमचीच लाडकी लेक
        माणिक

पत्र
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Saturday, 23 May 2020

चित्रचारोळी ( दळण )

चित्रचारोळी

दळण

घास घालते जात्यामध्ये नार
नेसून केसरी ईरकल लुगडे
शांत भाव चेहऱ्यावर शोभे 
 हाती कंकण,मंगळसूत्र तगडे 

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चारोळी (तव नयनांचे दल )

अष्टाक्षरी चारोळी

तव नयनांचे दल

असतील प्रतिक्षेत 
सजनाच्या दर्शनास 
तव नयनांचे दल 
स्मरुनच आठवास

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

हायकू (पर्यावरण )

हायकू

पर्यावरण

पर्यावरण
रक्षण्यास मानव
नको दानव

संवर्धनास 
झाडे,पशू,पक्षांच्या 
चराचराच्या

नको करुस 
प्रदूषण जगती
मागे धरती

वातावरण
स्वच्छ सतत ठेवू 
आनंदी गाऊ

रक्षू ओझोन
ग्रीन हाऊस बंद
निसर्ग धुंद

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

लेख (बालविवाह )

07 लेख

बालविवाह

 विवाह म्हंटलं की एक आनंदाचा क्षण सर्वांनाच जाणवतो.विवाह म्हणजे दोन जीवांचे मिलन असते. दोघांच्याही जीवनात एका नवीन जोडीदाराने प्रवेश केलेला असतो. त्यामुळे दोघेही एकमेकांना समजावून घेणे हे क्रमप्राप्त असते. लग्नाच्या वेळी वधू वर दोघेही शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम असतील, त्यांची वैचारिक पातळी उच्च असेल, एकमेकाला समजावून घेण्याच्या प्रवृत्ती चा विकास झाला असेल. तर अशा जोडीदारांचा विवाह हा त्यांच्या अंतापर्यंत व्यवस्थित टिकून राहतो.

 पूर्वीच्या काळी बालविवाहाची प्रथा होती. मुलीच्या वयाचा विचार लग्नाच्या वेळी अजिबात केला जात नव्हता. बालविवाह म्हणजे मुलगा किंवा मुलगी वयात  येण्यापूर्वी त्यांचा केलेला विवाह होय. ज्या वेळेला मुलगी गर्भधारणेस योग्य होते व मुलगा पुनरुत्पादनक्षम होतो, म्हणजे त्या दोघांना शारीरिक व मानसिक परिपक्वता येते. पण त्या आधीच या दोघांचा विवाह जर लावला गेला तर त्याला बाल विवाह असे म्हणतात.पूर्वी बालविवाहाचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणात होते. वयाने कितीही मोठ्या असलेल्या पुरुषाबरोबर त्या लहान बालिकेचे लग्न लावून दिले जात असे.मग तिथून सुरु व्हायची स्त्री जन्माच्या परवडीची कथा.

  धर्मसूत्रात तर असे सांगितले आहे की, ज्यावेळी मुलीचे लग्न करण्यात येईल त्यावेळी ती नग्निका असावी. या शब्दावरून प्रत्येकाने याचा  वेगवेगळा अर्थ काढला. एकंदरीत याचा अर्थ असा होतो की मुलीचे लग्न हे रजोदर्शन  व्हायच्या पूर्वीच झालेले असावे. मुलीचे लवकरात लवकर लग्न केले जात असे. नवरामुलगा हा मुलीपेक्षा वीस ते पंचवीस वर्षांनी मोठा असे. त्या वेळी आठ वर्षाच्या मुलीला गौरी असे संबोधले जायचे, नऊ वर्षाच्या मुलीला रोहिणी, तर दहा वर्षाच्या मुलीला कन्या असे संबोधले जायचे. व त्या नंतर च्या मुलीला रजस्वला असे समजले जात असे. मुलगी गौरी असतानाच तिचे लग्न लावले जात असे. कारण रजस्वला झाली तर ती कुणाच्या मोहाला बळी पडू नये, किंवा ती स्वतः कुणाच्या आहारी जाऊ नये, त्याच बरोबर घराचा कुलीन पणा टिकवण्यासाठी मुली कुठल्या मोहाला बळी पडण्याच्या आधी त्यांचे लग्न लावणे हे इष्ट समजले जायचे. या अशा कारणांनी व मनुवाद मानणाऱ्या लोकांनी बालविवाह चालूच ठेवले.

 दोन हजार वर्षापासून चालत आलेली ही परंपरा खंडित करण्याचे काम राजा राम मोहन राय, ईश्वरचंद विद्यासागर, केशवचंद्र बेन या बंगाली तर ज्योतिराव फुले, म. गो.रानडे, ग. गो. अगरकर, धोंडो केशव कर्वे या मराठी समाजसुधारकांनी बालविवाह विरोधी मोहीम उघडली.स्त्री-शिक्षणावर भर देण्यात आला. कारण बालविवाहाचे तोटे सर्वांना माहिती होते. बाल विवाह केल्यामुळे मुलीवर अकाली मातृत्व लागले जायचे, त्यामुळे बऱ्याच वेळेला तिचा मृत्यू व्हायचा किंवा नवरा-बायको यांच्या वयामध्ये भरपूर  फरक असल्यामुळे दोघांच्यात मतभेद व्हायचे. त्यावेळी पितृसत्ताक पद्धती असल्यामुळे घटस्फोट व्हायचा. घटस्फोटानंतर पुरुष दुसरा विवाह करायचा पण दुसरा विवाह करण्यास परवानगी स्त्रीला नव्हती. त्यामुळे त्या स्त्रीला परित्यक्त्यांचे किंवा विधवेचे अतिशय वाईट जीवन जगावे लागे. हे सर्व पाहता या थोर समाजसुधारकांनी बालविवाह  रोखण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

  या सगळ्या प्रयत्नांचा परिणाम म्हणून 1860  साली दहा वर्षाखालील मुलीशी विवाह करणे, तिच्याशी समागम करणे हा गुन्हा मानला गेला. पुढे जाऊन 1904 ला बडोदा सरकारने लग्नाच्या वेळेला मुलीचे वय 12 व मुलाचे वय सोळा असावे असा नियम केला. 1927 ला इंदूर सरकारने लग्नाच्या वेळी मुलीचे वय 12 व मुली मुलाचे वय 14 असा नियम केला. 1929 ला बालविवाह प्रतिबंधक कायदा अस्तित्वात आला. या कायद्यानुसार लग्नाचे वेळी मुलीचे वय 14 व मुलाचे वय 18 मानण्यात आले. त्यानंतर 1955 च्या हिंदू विवाह कायद्यानुसार मुलीचे वय 15 व मुलाचे वय 18 ठरविण्यात आले. 1978 ला याच कायद्यानुसार मुलीचे वय 18 व मुलाचे वय 21 करण्यात आले.

 कायदे केल्यामुळे बालविवाहाची प्रथा थोडीफार कमी झाली. पण समाजातील परिस्थिती पाहता  बरेचजण त्यातून पळवाटा शोधून काढताना दिसतात.आजही ग्रामीण भागामध्ये बालविवाह होत असताना दिसतात.

 बालविवाह प्रतिबंधक कायद्याचा वापर जर योग्य प्रमाणात कुठल्याही आमिषाला बळी न पडता केले तर बऱ्याच अंशी आपण हे बालविवाह रोखू शकतो. त्याचबरोबर समाजातील व्यक्तींनी ही याचे महत्त्व लक्षात घेऊन जर बालविवाह होत असेल तर त्यावेळी त्यांनी प्रशासनाला कळवणे गरजेचे आहे. बालविवाहाचे प्रमाण बरेच कमी झालेले आहे. ते पूर्णपणे नष्ट होणे गरजेचे आहे.

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चित्रचारोळी (पिंजरा )

उपक्रम

चित्रचारोळी

पिंजरा

झाडाला टांगलेल्या पिंजऱ्यात 
अनभिज्ञ जगाशी,गुंग मोबाईल मध्ये
नवलाईने पक्षी पाहतो तंत्रज्ञान 
एवढा कसा हा गुंतला यामध्ये 

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Friday, 22 May 2020

चित्रचारोळी (निरागस हास्य )

चारोळी

निरागस हास्य

आनंद स्वर्गाचाही पडे फीका 
क्षुधाशांतिच्या या आनंदापुढे
निरागस हास्य सांगे सर्व काही 
नाती सगळी व्यर्थ भुकेपुढे 

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चित्रचारोळी ( भाकरी )

उपक्रम

चित्रचारोळी

भाकरी

कंदिलाच्या प्रकाशात माय
भाजते भाकरी चुलीवर शांतीने
चिमणीच्या मिणमिणत्या तेजात
लाल साडीत करी संसार निगुतीने

रचना 
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड. जिल्हा. कोल्हापूर

चारोळी (भार )

भार 

आईबापाला कधीच होत नसतो भार आपल्या मुलांचा 
बळ पंखात आल्यावर दूर जाती 
भार वाटतो मग जन्मदात्यांचा 

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चारोळी (काटकसर )

चारोळी

काटकसर

जरी असले सर्वच अलबेल 
काटकसर जीवनात करावीच
कधी पलटेल बाजी कुणाची 
पण लागतात ती तरावीच 
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चित्र हायकू (निसर्ग राजा )

चित्र हायकू

निसर्ग राजा

निसर्ग राजा
खुणावतो मनाला
तृप्ती डोळ्याला 

शोभून दिसे 
कमळ तलावात
उभे पाण्यात

माता बदक
पिलांसह पोहते 
सुखी वाटते 

छोटेसे घर 
प्रकृती सानिध्यात 
शोभे मध्यात 

भुलवी जीवा 
हिरवी वनराई 
हर्षून जाई 

निळे आकाश
छाया डोंगरावर 
काव्य यावर 

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Thursday, 21 May 2020

अष्टाक्षरी चारोळी ( ऐकू येती तुझे शब्द )

अष्टाक्षरी चारोळी

ऐकू येती तुझे शब्द

वात्सल्याने ओथंबून 
लेकराला पाजताना 
ऐकू येती तुझे शब्द 
तुझ्यासाठी ओला पान्हा 

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

अष्टाक्षरी चारोळी ( तुला पाहण्याची आस )

अष्टाक्षरी चारोळी

तुला पाहण्याची आस

तुला पाहण्याची आस 
आहे लागली मनात 
कसे येत नाही तुझ्या 
प्रश्न माझा घे ध्यानात

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Tuesday, 19 May 2020

हायकू ( नभ )

हायकू

नभ

नभी दिसली
प्रेमवीरांची जोडी
लाजली थोडी 

शुभ्र पांढऱ्या
ढगातली आकृती
तिची स्विकृती

मिठीत दोघे 
विसावले प्रेमाने
पाही स्नेहाने

निस्सीम भाव
दोघांच्या नजरेत
वीज तारेत

निळे आकाश
जीवात सामावले 
गीत स्फुरले 

समीप प्रेमी
आकाराने दिसती 
क्षणी वीरती

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड. जिल्हा. कोल्हापूर

मराठी लेख (सहल- भिलार- पुस्तकाचे गांव)

सहल

भिलार - पहिले पुस्तक गाव

  एकमेकांना मानवी मनाची भावना समजावून सांगण्याचा एकमेव चांगला मार्ग म्हणजे पुस्तक.  पुस्तके आमचे चांगले मित्र आहेत.  ज्यामुळे आपण स्वतःचे मनोरंजन करू शकतो.  ज्ञान वाढवून आपण विकास करू शकतो पुस्तके जीवनाला चांगले वळण देण्याचे काम करतात पुस्तकांच्या माध्यमातून आपल्याला कोणत्याही विषयाची माहिती सहज मिळते.  वेल्स शहरात हे-ऑन-वेपासून प्रेरित होऊन, महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील भिलार गाव हे देशातील "पहिले पुस्तक गाव" म्हणून घोषित करण्यात आले.सरकारच्या वतीने त्याच खेड्यातील लोकांशी चर्चेनंतर त्यांच्या घरातले 45 लोक  जागा देण्याचे मान्य केले.  त्यापैकी 25 घरांची निवड करण्यात आली. 4 मे 2017 रोजी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्षणमंत्री माननीय विनोद तावडेजी यांच्या नेतृत्वात मराठी भाषा विभागाच्या सहकार्याने भिलार गावाला "पुस्तक गाव" घोषित केले.गावात साहित्याची सुमारे 15000 पुस्तके आहेत.कल्पनारम्य, कविता, धार्मिक, महिला, बाल साहित्य, पर्यावरण, लोकसाहित्य, जीवन आणि आत्मकथन अशा अनेक प्रकारच्या साहित्यांची स्थापना वेगवेगळ्या ठिकाणी झाली. भिलार गांव  महाबळेश्वरजवळ पाचगणीपासून km किमी अंतरावर आहे.  ज्या 25 घरांमध्ये ती पुस्तकांमध्ये ठेवली गेली आहेत तेथील घरमालकांनी वाचकांना त्यांच्या घरात बसण्यासाठी आणि वाचण्यास जागा दिली आहे.ज्या वाचकाला जे पुस्तक हवे आहे ते त्या त्या विभागाप्रमाणे तिथे असलेल्या घरात जाऊन पुस्तके वाचतात.वर्तमानपत्र, मासिकांचा एक वेगळा विभाग आहे.जे भाषा प्रेमी, साहित्यप्रेमी आहेत. त्यांच्यासाठी ही जागा चांगली आहे. मीही माझ्या काही मैत्रिणीसह तिथे गेले. प्रथम आम्ही ऑफिसला गेलो.  तिथे भिलारवर  प्रोजेक्टवर बनलेली एक डॉक्युमेंटरी फिल्म दाखवली.खूप छान माहिती मिळाली.मग आम्ही आमची  लीहलेली पुस्तके ऑफिसमध्ये भेट म्हणून दिली.त्यामुळे त्यांनी आम्हाला आभाराचे पत्र दिले. आम्हाला ते खूप आवडले.तिथे जाऊन आलेली आठवण म्हणून भिलारचे चित्र असेले मुद्रित कीचेन ,चहाचा कप विकत घेतले.मग भुकेची जाणीव झाली. जवळच आम्हाला  स्वादिष्ट जेवण मिळाले. भोजना नंतर आम्ही एक एक विभाग बघू लागलो.प्रत्येक घराच्या बाहेरील खोलीत, वेगवेगळे विभाग आकर्षक चित्रांनी रंगविले ​​आहेत.वाचकांना वाचण्यासाठी छान सोय केली आहे. असे विविध विभागात भेटी दिल्या. माहिती घेतली.जवळच एका ठिकाणी थांबून कोकम सरबत पिले.मनाला, तनाला शांतता देऊन तिथून निघालो. हे सर्व पाहिल्यानंतर आम्ही आठवणी मनात ठेवून परत आलो.वाटेत येताना पाचगणीत थांबून विविध सरबते,चॉकलेटस् खरेदी करुन आनंदाने, समाधानाने घरी परत आलो.सर्व मैत्रिणी साहित्यिक असल्यामुळे सहलीला एक वेगळा अर्थ प्राप्त झाला होता.

 श्रीमती माणिक नागावे 
 कुरुंदवाड, जिल्हा.  कोल्हापूर
 9881962530

भावगीत ( प्रेमरंग )

महास्पर्धेसाठी

फेरी क्रमांक- ८

भावगीत

विषय - प्रेमप्रीती

शिर्षक- प्रेमरंग

वर्ण १२, यती ६ व्या अक्षरानंतर

प्रेमरंग तुझा,मला छळतोय 
आठवून तुला,अश्रू ढाळतोय ।। धृ ।।

होते भेट रानी,रोजच चोरुन
येत होती सखी,शृंगार करुन
केसात गजरा,आज माळतोय ।। १ ।।

मादक नजर, भुलवते मना 
मर्यादा पडती, घाबरतो जना 
आठवात तुझ्या,मना जाळतोय ।। २ ।।

तुझे ते बहाणे,रागाने पहाणे
लटकाच राग,लांबूनच जाणे 
उगाचच तुझ्या, मागे पळतोय ।।३ ।।

दोघांच्या मनाच्या,जुळतील तारा
देशील मजला,आता तरी थारा? 
कावा प्रिये तुझा,मला कळतोय ।।४ ।।

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा, कोल्हापूर

कविता ( देव नाही देवालयी )

स्पर्धेसाठी
कविता स्पर्धा

अष्टाक्षरी

विषय- देव नाही देवालयी

शोधताना मंदिरात
देव नाही सापडला 
देव नाही देवालयी 
कुठे गेला दडायला

सगळेच आळवती 
धावा तुझाच करती 
येत नाहीस म्हणून 
रोज बिचारे मरती 

दारे तुझी बंद झाली 
भक्त शोधे धास्तावून 
असा कसा बसलास 
देवा माझ्या सुस्तावून 

रोज तुला आळवून 
गीत तुझे गाती सारे 
संकटाच्या या घडीला 
लपलास असा कारे 

पाहतोय आता आम्ही
देव दुसऱ्या लोकात 
मदतीला धावतात 
रोज नवीन चौकात

डॉक्टरांचा उपचार 
हाच मानतो आधार 
ठरलयं सर्वांचेच 
नाही घ्यायची माघार

कधी तुलाच पाहतो 
रस्त्यावर पोलिसांत 
नमस्कार मनोभावे 
तूच दिसे अंतरात

दिसतोस रोज मला 
करताना तू सफाई 
समजली रुपे तुझी 
होऊ कशी उतराई 

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चारोळी ( व्यसन .)

चित्रचारोळी

व्यसन

व्यसनापायी दारुच्या विसरली
नाती अन् जबाबदारी मानवाची
अन्नासाठी मोताद बायकापोरे 
ना येते ऐकू हाक भुकेल्या पोराची 

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चारोळी ( विलंब )

चारोळी

विलंब

विलंब क्षणाचाही करु नका 
क्षणक्षण आहे महत्त्वाचा 
करा विचार भविष्याचाही 
नको माझ्यापुरता आत्ताचा 

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Monday, 18 May 2020

चारोळी (गारव्याची लाट आली )

चारोळी

काव्यपुर्ती

गारव्याची लाट आली
आनंदाला येई ऊधाण
आली अंगावर शिरशिरी
तन मन होऊन गेले बेभाण 

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चारोळी ( जेंव्हा तू भेटायचीस चोरून )

चारोळी

जेंव्हा तू भेटायचीस

रोज ठरलेल्या निवांत ठीकाणी 
जेंव्हा तू भेटायचीस चोरुन 
आज जाताना पाहून तुला सासरी
समजावतो मनाला मन मारुन 

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चारोळी ( निवांत )

चारोळी

निवांत

निवांत मिळाला वेळ म्हणून
लिहायला बसले निवांत चारोळी
ऐकू आली तेवढ्यात कानी 
कोविड 19 संदर्भात आरोळी 

रचना
श्रीमती माणिक नागावे

चारोळी ( मन )

चारोळी

मन

मनाची व्याख्या करायला बसले
धुंडाळून विश्वकोश झाले जरी 
मते प्रत्येकाची विविध आली 
समाधान नाही भेटले उरी 

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चित्रचारोळी (गुलाबी )


चित्रचारोळी
गुलाबी

गुलाबी अंगडं टोपड्यातील 
गुबगुबीत बाळ निळाईत रंगते 
गाल गोबरे,कोमल हाती माती 
कशी लागली विचारात दंगते 

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चारोळी ( एक भेट )

चारोळी
एक भेट

एक भेट तुझी लक्षात राहिली
काळजात घर करुन गेली
आयुष्यभर सांभाळून ठेवली 
आठवता काया रोमांचित झाली

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चारोळी (रेशिमधागे )

रेशिमधागे

रेशिमधागे प्रेमाचे सुंदर
 मऊशार मलमल जशी
सहजच मिळते स्नेहाची 
बालकाला मायेची कुशी

श्रीमती माणिक नागावे

चारोळी ( साधेपणा )

चारोळी
साधेपणा

साधेपणातच लपलयं सारं 
उत्कर्षामागील साधेच गुपित 
नको भपकेपणा न अंधानुकरण 
संस्कृती अबाधित संस्काराच्या कुपित 

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

भावगीत (माय माझी माय )

उपक्रम

भावगीत

विषय - माया ममता

शिर्षक - माय माझी माय

वर्ण 12 ' यती 6 वर

माय माझी माय,दुजा तशी नाय
सदा मला वाटे,दुधाची गं साय  ।। धृ ।।

घरातली प्रभा,कुटुंबाची शोभा
जीवनात माझ्या, तिचीच गं आभा
मन माझे वेडे,तिच्याकडे जाय
सदा मला वाटे,दुधाची गं साय ।। १ ।।

मायेचा पदर,आहे डोईवर
लक्ष माझे सारे,त्याच्या नक्षीवर 
आनंदाने मग,नाचतोच हाय 
सदा मला वाटे,दुधाची गं साय ।। २ ।।

संस्काराची खाण,संस्कृती जपते 
पोरांबाळांसाठी,कायम खपते 
अशी माझी माय,ठावं आहे काय
सदा मला वाटे,दुधाची गं साय ।। ४ ।।

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चारोळी ( दृष्टांत )

चारोळी
दृष्टांत

पटवून देण्या सक्षमपणे 
दृष्टांत देती संतमहात्म्ये
तेंव्हाच पटते जनमानसाला 
शांत,समाधानी होती आत्मे 

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Sunday, 17 May 2020

चारोळी ( भेटीच्या त्या क्षणांचे )

उपक्रम 16 
चारोळी

भेटीच्या त्या क्षणांचे

भेटीच्या त्या क्षणांचे गोडवे 
गाताना मनमयुर नाचतो 
आठवांच्या हिंदोळ्यावर झोके 
घेता आनंदाने पिसारा फुलवतो

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

भावगीत ( माया ममता )

भावगीत 
विषय - माया ममता

वर्ण 12
यती 6 व्या वर्णावर

शिर्षक - माय माझी

माय माझी बाई,जशी जाई फुले ।
पाहून तिजला, खुश आम्ही मुले ।। धृ ।।

आले घरपण,घराला आमच्या
वाटे सदा हेवा,मनाला तुमच्या
राहून प्रेमाने,आनंदी नाचले 
स्नेहाने हळूच, नाजूक हासले
पाहून तिजला, खुश आम्ही मुले ।। १ ।।

सदैव कामात,गुंतून राहते 
पिलांना आपल्या, प्रेमाने पाहते 
मुखी सदैव तिच्या,गुलाब फुलले 
सुगंधी अत्तर,जणू पसरले
पाहून तिजला,खुश आम्ही मुले ।। २ ।।

मायेचा पदर,सतत आधार 
नेहमी असते,निस्वार्थी दातार 
मातृत्व आईचे,आहे बहरले
पाहून वदन,अंग शहारले
पाहून तिजला,खुश आम्ही मुले ।। ३ ।।

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चारोळी (मनोकामना )

उपक्रम
चारोळी

मनोकामना

मनोकामना पूर्ण करण्यास 
करावी प्रयत्नांची पराकाष्ठा 
गरज त्यास निस्वार्थीपणे 
ठेवावी कर्तव्यावर प्रगाढ निष्ठा

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा, कोल्हापूर

मराठी लेख (समजदार नागरिक )

समजदार नागरिक

 भारत हा लोकशाही देश आहे. या देशातील प्रत्येक व्यक्तीला त्याच्या मताप्रमाणे वागण्याचा हक्क आहे. पण त्यासाठी संविधानाने काही मर्यादा, कायदे घालून दिलेली आहे. जेणेकरून हे राष्ट्र एकसंघ रहावे. प्रत्येक नागरिकाने आपले कर्तव्य जर पार पाडले तर देश विकासाकडे नक्कीच वाटचाल करतो. समजदार नागरिक म्हणजे जो स्वतःच्या हिता बरोबर देशाच्या हिताचा विचार करतो.व त्याप्रमाणे वागतो.

 भारताला स्वातंत्र्य मिळून सुद्धा आज अनेक जण वैचारिक पारतंत्र्यात रममाणआहेत. विचारांची खोली व विस्तृतता जेवढी जास्त तेवढा मानव जास्त समजदार होत असतो. पण अनेक जण कूपमंडूक वृत्तीने जगत असतात. अशा व्यक्ती फक्त स्वतःचा, स्वतःच्या कुटुंबाचा,  कुटुंबातील माणसांचा एवढाच स्वार्थी विचार करत असतात. त्यांना बाकी कुणाचंही कशाचंच देणंघेणं नसतं.अशा व्यक्तींच्यामुळे देश पुढे जात नाही. या व्यक्तींचे वागणे पाहून कुटुंबातील बाकीच्या सगळ्या व्यक्तींच्या मनावर तसाच परिणाम होतो. व तेही पुढे तसेच वागू लागतात.

 ज्या व्यक्ती समजदार असतात, त्या नेहमी आपल्याबरोबर आपल्या देशाच्या हिताचे कार्य कसे होईल याचाच विचार करत असतात. त्यामुळे नेहमी वादादित गोष्टीमध्ये सुवर्णमध्य काढण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. त्यामुळे त्यांच्या सानिध्यात असलेल्या व्यक्तीसुद्धा समजूतदारपणे वागतात. आज समाजामध्ये अशा समजूतदारपणे वागणाऱ्या लोकांची वानवा आहे. समजूतदार व्यक्ती स्वतःच्या मालमत्तेचे रक्षण तर करतातच पण सार्वजनिक मालमत्ता जसे की, सार्वजनिक बस मधील सीट कव्हर न फाडणे, सार्वजनिक बल्ब न फोडणे, सार्वजनिक इमारतींना नुकसान न पोहोचणे, पर्यावरण संवर्धन करणे, पर्यावरण रक्षण करणे या गोष्टी सतत करतात. त्याचप्रमाणे समाज हिताच्या कामामध्येही सहभाग घेणे, गरजूंना सहकार्य करणे, देणगी देणे अशी कार्येही ते करतात.

समजदार  नागरिक नेहमी आपल्या जीवनाचा विकास करत असतो,त्याच्या जीवनात नेहमी सुख-समाधान नांदत असते. त्याच्या घरातील लोकसुद्धा नेहमी आनंदी व समाधानी असतात. अशा व्यक्तींची मुले हुशार व समंजस असतात. तीसुद्धा सर्वांना समजून घेतात. सर्वांना मदत करतात. चांगल्या गुणांमुळे त्यांच्या आजूबाजूच्या लोकांत सुद्धा ते चांगल्या गुणांची पेरणी करतात. समजदार नागरिक आपली बुद्धी वापरून मतदान प्रक्रियेच्या वेळी कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता  योग्य त्या उमेदवारालाच ते मत देतात,व निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतात.पण अशा समजदार नागरिकांची संख्या सध्या रोडावत चाललेली आहे. व त्याचा परिणाम देश हितावर व देश विकासावर होत आहे.

 आज कोरोणा सारखी महामारी, महा महाभयंकर हा रोग देशाला, नव्हे संपूर्ण जगाला भंडावून सोडत आहे त्यांमध्ये काही बेजबाबदार नागरिक पोलीस प्रशासनाला , शासनाला कोणत्याही प्रकारचे सहकार्य करत नाहीत. त्यामुळे ह्या महामारी पासून बचाव करण्यास आपण काहीअंशी असमर्थ ठरत आहोत.

 त्यामुळे समजदार नागरिकांचे जीवन सुद्धा बेहाल झालेले आहे. तरीही काही समजूतदार नागरिक जसे की पोलीस प्रशासन, वैद्यकीय सेवा पुरवणारे कर्मचारी ,सफाई कामगार, शासनाचे कर्मचारी हे सर्व जीव तोडून ह्या रोगाला समोर नष्ट करण्यासाठी प्रयत्नशील आहेत म्हणून काही अंशी आपण या रोगावर अंकुश ठेवू शकत आहे. देशाला समजदार नागरिकाची नितांत गरज आहे.

 चला तर मग समजदार बनूया आणि देशाला विकासाकडे नेऊ या.

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Saturday, 16 May 2020

चारोळी (ती कातरवेळ होताना )

उपक्रम
चारोळी

ती कातरवेळ होताना

प्रितफुले हळुवार उमलली
ती कातरवेळ होताना मनाची
रोमांचित झाले तनमन वेडे 
न पर्वा राहिली कुणा जनाची

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Friday, 15 May 2020

चारोळी (घरपण )

उपक्रम

चारोळी

घरपण

आई तुझ्याचमुळे घरपण आहे
परीवार सारा नांदे एकत्र
तुझीच किमया दिसते कायम 
जवळ तू शोधतो मी सर्वत्र

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चारोळी (घुसमट )

उपक्रम
चारोळी

घुसमट

घुसमट भावनांची वृद्धाश्रमात
वाट पाहती असहाय्यपणे
कशी राहती आनंदाने
त्यागून मायबापाला निर्लज्जपणे

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

मराठी लेख (वृद्धाश्रम-एक अनोखी कुटुंबव्यवस्था )

कोड नंबर 07
वृद्धाश्रम -- एक वेगळी कुटुंब संस्था

  आज 15 मे जागतिक कुटुंब दिन म्हणून सर्वत्र उत्साहाने,आनंदाने साजरा केला जात आहे. प्रत्येकालाच आपल्या आई-वडिलांच्या बरोबर, आपल्या भावा-बहिणीच्या बरोबर, घरातील सर्व लोकांच्या बरोबर एकत्र दिवस घालवणे आवडते.आजच्या धकाधकीच्या जीवनात नोकरीसाठी शिक्षणासाठी, इतर कामासाठी परगावी गेलेल्या मुलांच्या बरोबर एकत्र राहणे मुश्किल झालेले आहे. कधीतरी सण समारंभाच्या निमित्ताने ते सर्वजण एकत्र येतात. पण वेळ नसल्यामुळे जास्त काळ एकत्र राहू शकत नाहीत. सध्याचा काळ हा लॉकडाऊन चा काळ असल्यामुळे,बऱ्याच कुटुंबांमध्ये सर्व कुटुंबीय एकत्र राहण्याचा योग आलेला आहे.ते सर्वजण खूप दिवसांनी इतक्या निवांतपणे आपल्या कुटुंबातील लोकांच्याबरोबर रहात आहेत.हे जरी खरे असले तरीपण असेही काही दुर्दैवी लोक आहेत.त्यांना स्वतःच्या कुटुंबातील सर्व लोक असूनसुद्धा परक्या ठिकाणी म्हणजेच वृद्धाश्रमांमध्ये आपल्या स्वकीयांची वाट पाहात असहाय्यपणे जीवन जगणे त्यांच्या नशिबी आलेले आहे.
 कोणत्याही वृद्धाश्रमांमध्ये आपण गेलो तर तिथे असलेल्या असहाय्य वृद्धांच्या चेहऱ्यावरचा केविलवाणा भाव पाहिल्यानंतर खरोखरच  गलबलून यायला होते. डोळे आपसूकच पाणावतात. कारण तिथला प्रत्येक वृद्ध  मग ती स्त्री असो की पुरुष ,येणाऱ्या व्यक्तीमध्ये आपल्या मुलाला किंवा आपल्या मुलीला, आपल्या नातवंडांना शोधत असतात.माझा मुलगा असाच दिसत असेल, माझी मुलगी अशीच असेल किंवा माझी नातवंडं आता एवढी मोठी झाले असतील असे अनेक विचार त्यांच्या मनामध्ये येत असतात.व तशाच नजरेने ते  मदत द्यायला आलेल्या व्यक्तींच्या कडे पहात असतात.
 कोल्हापूर जिल्ह्यामध्ये घोसरवाड येथे जानकी वृद्धाश्रम आहे. आश्रमात स्त्री-पुरुष मिळून जवळ जवळ 34 जण एकत्र रहात आहेत. सर्वप्रथम आमच्या काकूच्या वर्ष श्राद्धा च्या कार्यक्रमावेळी  आम्ही तिथे भेट द्यायला गेलो. तिथले संचालक बाबासाहेब पुजारी यांच्याकडून सर्व माहिती घेतली. त्यावेळी त्यांनी सांगितलेल्या वृद्धांच्या कथा ऐकून अंगावर शहारे आले. कुटुंबामध्ये मुले, मुली असूनसुद्धा त्यांनी आपल्या आई-बाबांना, कोणी फक्त आईला ,कोणी आपल्या बाबांना  विविध कारणे सांगून वृद्धाश्रमात आणून सोडले होते.ते आजपर्यंत आपली मुले आपल्याला न्यायला येतील या वेड्या आशेवर जगत आहेत.
 हे सर्व पाहिल्यानंतर आजची कुटुंब व्यवस्था किती खालच्या थराला गेलेली आहे हे लक्षात येते. ज्या आई-बाबांनी आपल्या हाडाची काडे करून मुलांना वाढवले, खस्ता खाल्ल्या, अनेक हालअपेष्टा सहन केल्या. तेच आई बाबा त्यांच्या उतारवयात मुलांना नकोसे होतात. यामध्ये एक गोष्ट अधोरेखित होते ती म्हणजे जोपर्यंत मुलाचे लग्न होत नाही तोपर्यंत तो आपल्या आईवडिलांच्या बरोबरच असतो. त्यांचे सर्व ऐकतो.कींबहुना त्यांच्याशिवाय त्याला कुणीच नसते. पण जेव्हा लग्न होते, घरामध्ये त्याची बायको येते, तेव्हापासून मात्र घरांमध्ये हळूहळू कुरबुरी सुरू होतात. यामध्ये  त्या मुलीचा दोष असू शकतो किंवा म्हाताऱ्या आई-बाबांचाही दोष असू शकेल.पण या सर्वांमध्ये मुलाचे हे कर्तव्य आहे की त्याने दोंन्हीच्यामध्ये सुवर्णमध्य हा काढलाच पाहिजे. नवरी म्हणून आलेली मुलगी ही आपले घर सोडून आलेली असते तिलाही आधार दिला पाहिजे व आपल्या आई-वडीलांना दोघांनी मिळून समजून घेतलं पाहिजे.
   कुटुंब म्हटलं की कुटुंबामध्ये अनेक नाती आली. आई-वडील,भाऊ बहीण, आजी आजोबा,नातवंडं, नातेवाईक इत्यादी. हे सर्व जण एकाच छताखाली गुण्यागोविंदाने राहात असतील तर ते कुटुंब सुखी-समाधानी आहे असे समजले जाते. आज " हम दो हमारे दो,"  "छोटे कुटुंब सुखी कुटुंब " ही संकल्पना वाढीस लागली आहे. त्यामुळे उतारवयात गेलेले आपले आई-वडील नकोसे झालेले आहेत. त्यामुळे काही मुले निर्लज्जपणे आपल्या आई-वडिलांना वृद्धाश्रमांमध्ये आणून सोडतात. आपल्या आई वडिलांच्या भावनांचा ते थोडाही विचार करत नाहीत.पण या कुटुंबाला काहीही अर्थ राहत नाही. यावेळेला त्यांची लहान मुले  हे सर्व पहात असतात व त्यांच्या मनावर ही तसेच संस्कार होतात. व आईवडील मोठे झाल्यावर ते ही आपल्या आई-वडिलांना वृद्धाश्रमाची वाट दाखवतात. हे चक्र मग चालूच राहते.
 त्यामुळे मोडत चाललेली ही कुटुंब व्यवस्था वृद्धाश्रमासारख्या संस्थेमध्ये रुजू पाहत आहे. त्या ठिकाणी त्यांचा यथायोग्य सांभाळ जरी होत असला तरी त्यांची मनं आपल्या कुटुंबातील व्यक्तींच्या कडेच ओढत असतात. त्यामुळे वृद्धाश्रम ही संकल्पना बंदच पडायला हवी. हे मला एकटीला वाटून चालणार नाही तर समाजातील प्रत्येक मुलाला असे वाटले पाहिजे. सून म्हणून येणारी मुलगी कोणाची तरी मुलगी असते.त्यामुळे तिलाही याचा विचार करणे गरजेचे आहे.जर तिला आपल्या आई-बाबांना आपल्या भावाने बघावे असे वाटत असेल तर तिनेही तिच्या सासु-सासर्‍यांना आईवडिलांच्या प्रमाणेच प्रेम देऊन सांभाळले पाहिजे. त्यांना वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवू नये.

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Thursday, 14 May 2020

मराठी लेख ( मोबाईल )

मोबाईल

मोबाईल आजच्या युगाची एक जीवनावश्यक वस्तू बनून राहिली आहे.आजचे युग हे विज्ञान व तंत्रज्ञानाचे आहे.संगणकाचे युग आहे.मोबाईल चे खूप प्रकार आहेत.साधा फोन,स्मार्ट फोन,टॅब,इ.प्रत्येक कंपनीप्रमाणे मोबाईल ची वैशिष्ट्ये बदलत असतात.आपल्या कंपनीचाच मोबाईल ग्राहकांनी विकत घ्यावा यासाठी प्रत्येक कंपनी विविध योजना,सोयी,सवलती देत असते.त्याचप्रमाणे आजचा युवक जो मोबाईल चा चाहता व मोठा वापर करणारा वर्ग आहे. त्यांना अशा वेगवेगळ्या प्रकारची आव्हाने आवडत असतात.
मोबाईल आज जिवनावश्यक वस्तू बनली आहे.आज मोबाईल शिवाय जगणे ही आश्चर्यकारक गोष्ट बनली आहे. कारण मोबाईल शिवाय आज कुणाचाही दिवस उगवत नि कींवा मावळत नाही. मोबाईल चा वापर इतके अंगवळणी पडले आहे की आज बाकी काही नसले तर चालेल पण मोबाईल पाहीजेच अशी अवस्था आहे.एक छणभरही मोबाईल बाजूला ठेवायचे म्हटले तर आज युवावर्गाला अडचणीचे जात आहे.
आच जन्मलेल्या बाळांपासून ते वयस्कर लोकांच्या पर्यंत हे मोबाईल प्रेम कीती आहे यावर अनेक जोक्स, व्हिडीओ येत आहेत ते  पाहून आपली हसता हसता पुरेवाट होते.पण तेवढेच वैषम्यपण वाटते.कारण आजचघ पिढी कुठल्या दिशेला चालली आहे हे कळायला मार्ग नाही. आजची आधुनिक आई मुलांच्या त्रासापासून स्वतःची सुटका करुन घेण्यासाठी मुलांच्या हातात मोबाईल देतात.मग हे खेळण त्या मुलांच्या जीवनाचे अविभाज्य घटक कधी बणून जातो कळतचं नाही. मग ही मुले मोबाईल च्या व्यसनाच्या आहारी जातात की मोबाईल त्यांच्यापासून बाजूला काढणारा वाईट ठरतो.कीतीतरी अशा घटना घडल्या आहेत की मोबाईल वापराला बंदी घातल्यामुळे काही मुलांनी आत्महत्या केल्या आहेत तर काहींनी आपल्या घरच्या लोकांचे खून केले आहेत.मुले,मुली अभ्यासाचा महत्त्वाचा वेळ मोबाईल वरील गेम खेळण्यामधेच व्यतीत करतात.
सतत मोबाईल ची स्क्रीन डोळ्यासमोर असल्यामुळे डोळ्यांवर वाईट परिणाम होत आहेत. अंशतः कींवा कायमचे अंधत्व येणे,डोळ्यांचे बाकी विकार उद्भवणे,डोळे चुरचुरणे,दृष्टीपटलावर परिणाम होणे.अशा अनेक प्रकारच्या व्याधी निर्माण होतात.हे विद्यार्थी व लहान मुलांच्या बाबतीत झाले. त्याचबरोबर घरातील स्त्रीयांच्याबाबतीतही अशाच घटना घडतात. जास्तीत जास्त वेळ मोबाईल वर घालवल्यामुळे घरांतील कामांवर परिणाम होऊन घरात कलह निर्माण होत आहेत.काही ठिकाणी तर घटस्फोट देखील झाले आहेत.त्यामुळे याचा वापर जपूनच केला पाहिजे.
मोबाईल वाईट आहे असे नाही. मोबाईल मुळे ,त्यातील इंटरनेट सेवामुळे आज जग आपल्या मुठीत आले आहे. कीतीही लांब असलेल्या व्यक्तीशी आपण प्रत्यक्ष बोलू शकतो,व्हिडीओ द्वारे पाहू शकतो.महत्वाची कागदपत्रे एका क्षणात या देशातून त्या देशात पाठवू शकतो.आपला कीतीतरी वेळ व पैसा या मोबाईल मुळे वाचला आहे.
आजतर या लॉकडाऊनच्या काळात या मोबाईल मुळे कीतीतरी लोकांची सोय झाली आहे. कामधाम नाही, घराबाहेर पडायचं नाही, कुणाला भेटायचं नाही अशा अनेक निर्बंधामुळे सगळे घरीच आहेत.अशावेळी सर्वांच्याकडे मोबाईल असल्यामुळे सर्वजण सुस्थितीत दिसतात. नाहीतर मानसिक संतुलन बिघडून कोण कायकाय केले असते याची कल्पनाच न केलेली बरी.
त्यामुळे मोबाईल हा योग्य कारणासाठी, योग्य वेळेपुरता,जर वापरला तर आपल्याला खूप फायदेशीर आहे. आपले जीवन कसे बनवायचे आहे ते आपल्या हातात आहे..

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Wednesday, 13 May 2020

कविता सहाक्षरी (नाते तुझे माझे )

उपक्रम

सहाक्षरी

विषय- नाते तुझे माझे

नाते तुझे माझे
गोड भावनांचे
प्रित फुलणाऱ्या 
सुंदर फुलांचे 

मनाच्या कप्प्यात
खोल दडलेले
हळुवार वर
सहज आलेले

नाते हे प्रेमाचे
नाही तुटायचे
घट्ट हृदयात
असे बसायचे

नात्यात आपल्या
नेहमी गोडवा
आलेल्या समस्या
हसत सोडवा

हे बंध रेशमी
जसे मलमल
स्पर्शिता भासते
कलिका कोमल 

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चारोळी ( सहज सुचतं काहीतरी )

चारोळी

विषय- सहज सुचतं काहीतरी

आळसावलेल्या संध्याकाळी
सहज सुचतं काहीतरी वेगळं
सुस्तावलेल्या तनामनानेच 
होतं निष्क्रियतेचं काम आगळं

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Tuesday, 12 May 2020

चारोळी (निसर्ग )

उपक्रम

चारोळी

निसर्गराजा अन् निसर्गराणी
पर्णसंभाराच्या छायेत चालले 
दोस्ती हवेशी पानापानंची 
कर दोघांचे एकमेकात गुंतले

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चारोळी (शब्दांचे नाते )

चारोळी

शब्दांचे नाते

भावनांशी जुळले शब्दांचे नाते
प्रसवली विचारांची शृंखला 
गुंफत गेल्या शब्दकळ्या 
काव्यपुष्पांचा मधुगंध पसरला

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Monday, 11 May 2020

हायकू ( कोरफड )

हायकू

कोरफड

हिरवे गार
कोरफड दिसली
मनी ठसली

शितल गर 
बहुगुणी मलम
तार तलम

औषधी आहे
गुणधर्म यातील
या गऱ्यातील

काटेरी पाने
रक्षणास तयार
नाही माघार

उगवे भारी
विविध आकारात
रानावनात

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चारोळी (लढणे तू थांबवू नकोस )

उपक्रम

चारोळी

लढणे थांबवू नकोस

गाठायचा आहे दूरचा पल्ला 
धीर तू अजिबात सोडू नकोस
आहेत सारे सोबतीला तुझ्या
लढणे तू आता थांबवू नकोस

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

शायरी (जख्म )

उपक्रम

शायरी

जख्म

जख्म तेरी बेदिली का ये दोस्त
दिलको रुला गया,
सोचा था दिलको लगा लूँगी,
पर तू तो दिल ही ले गया ।

शायरा
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चारोळी (हृदयाच्या अंतरंगात)

चारोळी

हृदयाच्या अंतरंगात

अंतरंगी हृदयाच्या छेडल्या 
सहवेदनांच्या गोड तरल तारा
जागी झाली मानवता मानवात
वाहू लागला प्रेमाचा धुंद वारा

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Sunday, 10 May 2020

लेख मराठी ( जन्म मृत्यू )

जन्म आणि मृत्यू

 जन्माला आलेली प्रत्येक व्यक्ती कधीही अजरामर नसते. मृत्यू अटळ आहे. त्यामुळे जन्म आणि मृत्यू ची साखळी अखंड चालत असते. मानव जन्म मिळणे म्हणजे भाग्य होय. पृथ्वीवर मानव हा एकमेव असा प्राणी आहे की ज्याच्या कडे बुद्धी आहे. बुद्धीचा वापर करून तो या जगावर राज्य करत आहे.
 जन्म म्हणजे आपण या भुतलावर शरीर रूपाने येत असतो. जन्म झाला की घरातील व्यक्ति आनंद व्यक्त करतात. सर्वसाधारणपणे व्यक्तीच्या जन्माच्या वेळेला आनंदोत्सव साजरा केला जातो.काही समाजामध्ये व्यक्तीच्या जन्माच्या वेळेला रडण्याचा कार्यक्रम सुद्धा होतो. व्यक्ती जन्माला आल्यानंतर हळूहळू मोठा होतो, आईवडिलांचा हात सोडून समाजामध्ये वावरायला सुरू करतो. शिक्षण घेऊन नोकरी करतो. व पैसा मिळवून स्वतःला सिद्ध करतो. ज्याच्या-त्याच्या कर्तृत्वा प्रमाणे समाजामध्ये व्यक्तीला महत्त्व, श्रेष्ठत्व प्राप्त होत असते. श्रीमंताच्या घरी जन्माला आलेली व्यक्ती व गरिबांच्या घरात जन्माला आलेली व्यक्ती या दोघांच्या जीवनामध्ये भरपूर फरक असतो.जन्माने श्रीमंत व्यक्ती यशस्वी होतेच असे नाही किंवा गरीब घराण्यात जन्माला आलेली व्यक्ती ही आयुष्यभर गरिबीत खितपत पडते असेही नाही. कारण पैशाबरोबर काम करण्याची वृत्ती, सहनशीलता, श्रमाला महत्व देण्याची मानसिकता हे ही महत्त्वाचे आहे. अशा अनेक व्यक्ती आहेत की त्या जन्मल्या जरूर पण आयुष्यभर कोणतेच भरीव कार्य न करता निष्क्रिय पणे  जीवन जगून  स्वतःचे स्थान निर्माण न करताच   मृत्यूने त्यांना कवटाळलेले असते.
 जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला मृत्यू यायच्या आधी व मृत्युनंतरही आपले नांव निघावे असे वाटत असेल तर त्या पद्धतीचे काम आपण जिवंत असताना केले पाहिजे. ज्या पद्धतीने जन्माला येणे आपल्या हातात नाही तसे मृत्यूला नाकारणे हे ही आपल्या हातात नाही. जन्ममृत्यूच्या फेर्‍यात अडकलेला हा मानव सतत पैशाच्या, सुखाच्या मागे लागलेला असतो. बराच वेळा पैसा मिळवत असताना तो अनेक मानसांना जोडतो तर काही माणसे तोडतोही. पैशाबरोबर माणसांचा संग्रह करणारी माणसे सतत लोकांच्या लक्षामध्ये राहतात. त्याचबरोबर मरणोत्तर देहदान करणाऱ्या,अवयव दान करणाऱ्या व्यक्ती मृत्युनंतरही या जगामध्ये विविध रूपाने जिवंत असतात." मरावे परी कीर्तिरूपे उरावे." या उक्तीप्रमाणे मानव आपल्या कर्तव्याने ,कर्तृत्वाने समाजामध्ये अमर राहतो. ज्या व्यक्ती मरणोत्तरही प्रशंसनीय असतात, या व्यक्तींचे जीवन हे सतत प्रेरणादायी असते. जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंतच आपण कोणतेही चांगले कार्य करू शकतो. मरणानंतर कुणीही काहीही करू शकत नाही कारण हे शरीर आपल्याजवळ नसते ते केव्हाच नष्ट झालेली असते. मृत्यूनंतर या देहाची विल्हेवाट  प्रत्येकजण आपापल्या धर्मानुसार करत असतात. कोण दहन करतात, तर कुणी दफन करतात. शरीर हे नश्वर आहे. मृत्यूनंतर शरीराचे कार्य थांबते. जन्मावेळी मिळालेले सुंदर, गुटगुटीत शरीर मरताना कृश,जरारर्जर झालेले असते. अपघातात मरण पावलेल्या व्यक्तीच्या शरीराची चिरफाड केली जाते. दुर्धर आजाराला सामोरे जाणाऱ्या व्यक्ती सतत मृत्यूची आळवणी करत असतात. जीवाला इतके वैतागलेले असतात की त्यांना त्यांच्या आजारापासून मिळणारा क्लेश, वेदना असहनीय असतात. जर आपल्याला मृत्यू चांगला , वेदनारहित यायचा असेल तर जीवनामध्ये आहार, व्यायाम यांची साथ कायम धरली पाहिजे. काही ध्येयाने प्रेरित झालेल्या व्यक्ती इतक्या निडर असतात की त्यांना मरणाची अजिबात भीती वाटत नाही. जसे की स्वातंत्र्यवीर,स्वातंत्र्यसैनिक, आपल्या देशाचे जवान ते आपल्या देशासाठी नेहमी मरणाला कवटाळायला तयार असतात. देशासाठी लढता लढता त्यांचा मृत्यू होतो. त्यांना आदयानज "शहीद" झाले असे म्हणतात. देशासाठी लढता लढता शहीद झालेल्या लोकांना त्यांच्या मृत्यूनंतर मानवंदना दिली जाते. त्यांच्या मृत्यूचा उत्सव केला जातो.
 जोपर्यंत व्यक्ती जिवंत आहे तोपर्यंत त्या व्यक्तीची जेवढी आपल्याला सेवा करता येईल तेवढे आपण सेवा केली पाहिजे. मरणानंतर मी अशा प्रकारे सेवा केली असती मी असं केलं असतं मी तसं केलं असतं या म्हणण्याला काडीचाही अर्थ उरत नाही. त्यामुळे जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत चांगल्या पद्धतीने वागून सर्वांशी प्रेमाने व्यवहार करत राहिलो तर मरणानंतरही आपण जिवंतच राहणार आहोत. तेव्हा विचार करा मरणानंतरही जिवंत राहायचे आहे की जिवंत असतानाच मेल्यासारखे जगायचे आहे...

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चारोळी ( आई तुझं लेकरु )

चारोळी

आई तुझं लेकरु

शुभाशीर्वादा व्याकुळ सर्वदा
आई तुझं लेकरु साद घालते 
असतेस तू पाठीशी नेहमीच 
निर्धास्त संकटांना ते भिडते

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Saturday, 9 May 2020

लेख मराठी (पापपुण्य )

पाप व पुण्य

 मानवाच्या जीवनात जसे सुख व दुःख येतच असते, त्याप्रमाणे मानव हा पाप व पुण्य यांची गोळाबेरीज आपल्या आयुष्यामध्ये सतत करत असतो. पाप म्हणजे वाईट काम. जी गोष्ट केल्याने स्वतःलाही त्याचा काही उपयोग नसतो व दुसऱ्यालाही त्यापासून त्रास होतो. व पुण्य म्हणजे चांगले काम, चांगले वागणे चांगले बोलणे, लोकांच्या मनात स्वताबद्दल आदराचे स्थान निर्माण करणे होय. थोडक्यात पाप म्हणजे हिंसा व पुण्य म्हणजे अहिंसा होय.
 जेव्हा एखादी वाईट पद्धतीने, क्रूरपणे वागत असते तेव्हा लोकांच्या व्यक्तीला सहजच म्हणतात, "  आता तुझ्या पापाचा घडा भरला आहे."  म्हणजे वाईट वागणे यालाही काही मर्यादा आहेत.पण पुण्य आपण कितीही करू शकतो. पुण्य करण्याला मर्यादा नाहीत. कारण जेवढे पुण्य आपण करू म्हणजे चांगले काम करू तेवढे आपल्याला समाधान मिळते. व आपला लोकसंचय वाढतो. हे सर्वांना माहीत असते. पण ते कुणाच्या अंगवळणी पडत नाही. त्यासाठीच याला देवा धर्माची जोड दिली तर मानव  थोड्या प्रमाणात का होईना कमी प्रमाणात पाप व पुण्य जास्त करण्याचा प्रयत्न करतो. मानव हा पापभिरू प्राणी आहे. आपण पाप केले की देव आपल्याला त्रास देईल एक भावना त्याच्या मनामध्ये रुजलेली असते. पण प्रत्यक्षात तसे काहीही नसते.
  जी व्यक्ती पुण्याने वागते ती व्यक्ती सतत समाधाने, आनंदी राहते. कारण त्या व्यक्तीने कधी पापच म्हणजेच वाईट काम केलेले नसते त्यामुळे त्याच्या मनामध्ये अपराधीपणाची भावना कधी येणे शक्य नसते.तो नेहमी तणावरहित राहतो व समाधानी जातो. जीवनामध्ये शक्य होईल तेवढे आपण चांगले काम करावे ,गरजू लोकांना मदत करावी. दुसऱ्याच्या प्रती कधीही मनामध्ये वाईट भावना आणली नाही तर आपला पुण्यसंचय वाढत जातो. पाप व पुण्य हे नेहमी निराकार असते. ते आपल्या उघड्या डोळ्यांना दिसत नाही.ती एक अनुभवायची गोष्ट आहे.
 म्हणून नेहमी सत्कर्म करा. दुसऱ्याच्या उपयोगी पडले म्हणजे आपलाही अनुभव वाढतो. आपल्यामध्ये एक आत्मविश्वास येतो, सकारात्मकता अंगी वाढते.

हिंदी कविता ( माँ )

माँ

माँ मेरी जिंदगी सदासे ही,
माँ मेरी बंदगी सदासे ही ।

कोखसे जन्मी हूँ,तेरा अंग हूँ,
रगरग में बस तेरा ही खून है ।
दिखाई दुनिया मुझे तुने ,
शुक्रगुजार हूँ ,न लगाया तुने मेरे शरीर को नाखून रे।

तेरे ही करम से देखी दुनिया,
आँचल में तेरी पली बढ़ी हूँ।
तुझपरही थी मैं निर्भर हे माँ,
सहारा दिया तुने हमेशासे ही।
संस्कारोंसे सिंचाया मुझे हे माँ,
पढालिखाकर काबिल बनाया।

आज तेरी ही छत्रछाया में,
जीवन मेरा दुश्वार हो गया है।
तेरी ही परछाया हूँ मैं हे माँ,
याद हमेशा आती है ।
बिन तेरे एकपल भी गँवारा नहीं,
सदासेही यादों में संजोया है।

अनंत उपकार तेरे मुझपर,
उऋण ना कभी हो पाऊँ मैं।
प्रेरणादायी जीवनदायीनी तू,
देखकर तुझको आगे चलूँ मैं।
सारी समस्यांएँ सामने गर आई,
याद ही तेरी सिर्फ काफी है पार जाने।

खुश रहो सदासेही जिंदगी में,
रखेंगे हम हमेशा ये वादा है।
चेहरा सदा दमकता रहे तुम्हारा,
मेरे दिल की ये आरजूँ हो पूरी हमेशा।

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
9881862530

Friday, 8 May 2020

चारोळी (राग )

चारोळी

राग

नको बघूस अशी रागाने सखे 
पाहून राग होतो गायब माझा
लटका राग अन् तुझी ती अदा 
नाही म्हणत कधीच झालो तुझा

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चारोळी (देशप्रेम )

सा.का.चारोळी स्पर्धेसाठी

विषय- देशभक्ती

दर्शन देशभक्तीचे सर्वत्र होते
वाचवताना देशवासीयांना 
बाजी लावून प्राणांची लढती
सलाम करु त्या शूरवीरांना

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Thursday, 7 May 2020

चारोळी (वैशाख )

स्पर्धेसाठी

चारोळी

विषय- वैशाख

वैशाख वणवा जाळतो जीवाला
गारव्याची हाव वाटे मनाला
फुललेले तरुवर मोहवती सर्वा
मंद झुळुक मोहरवते तनाला

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चारोळी ( भावना )

उपक्रम
चारोळी

भावना

भावसागरात भावनांची नौका
जीवनप्रवासास निघते दररोज
संवेदनांच्या वल्ह्याने वल्हवत 
माणुसकीचा फुलवते सरोज 

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

लेख (आनंद )

लेख

आनंद

आनंदी आनंद गडे,
ईकडे तिकडे चोहीकडे.

ही कविता आजही आठवते व मन हलके होऊन बालपणात जाऊन रमते.आनंदाने नाचायला, बागडायला लागते. बालमैत्रीणींचा हसरा घोळका सभोवार असल्याचा भास होतो.आनंद शब्दातूनच आनंदाची बरसात होते.जीवनात हा आनंद मिळवण्यासाठी प्रत्येकजण आटापिटा करत असतो.पण निखळ आनंद सर्वांनाच मिळतो असंही नाही.

आनंद म्हणजे मनाला मिळालेले समाधान होय.आनंद मनाला प्रफुल्लित करतो.मन ताजेतवाने होते.पण हा आनंद कुणाला कशात मिळेल हे सांगता येत नाही. कुणाला घरात,, शाळेत,समाजात, कामात, दुसऱ्याला मदत करण्यात, दुसऱ्याला सुखी करण्यात मिळतो. समाधान म्हणजेच आनंद मिळणे होय.त्यातल्या त्यात सकारात्मक आनंद कायमस्वरूपी टिकतो. काहीजणांना दुसऱ्यांना दुःख देण्यामध्ये आनंद वाटत असतो. दुसऱ्याला त्रास देणे, चिडवणे ,त्यांचे वाईट चिंतने व त्यांचे नुकसान झाले की या लोकांना आनंद होणे. ही सर्व नकारात्मक आनंदाची उदाहरणे आहेत. पण अशा व्यक्ती कधीही आयुष्यामध्ये आनंदी असल्याचं दिसत नाहीत  कारण त्यांचा नकारात्मक आनंद नेहमीच त्यांना सतावत असतो. त्यातून मिळणारा आनंद हा अल्प काळ टिकतो. जो आनंद दुसऱ्याला सुख देऊन आपल्याला मिळतो, ज्याला आपण सकारात्मक आनंद म्हणू.त्या आनंदातून आपल्याला सुख समाधान आनंद तर मिळतेच. पण दुसरेही आनंदी होतात. व हा आनंद चिरकाल टिकतो. अशा वेळी मनाला झालेल्या आनंदाची तुलना आपण कशाशीही करू शकत नाही.
 
मानवाने नेहमी आनंदी असावे. जी व्यक्ती आनंदाने आपले जीवन व्यतीत करते ती व्यक्ती स्वतःला आनंदी करते व समाजालाही आनंदी करत असते. आनंद मिळवण्याकरता प्रथम आपले मन हे निस्वार्थी भावनेने भरलेले असावे लागते. ज्या वेळेला आपण एखाद्या लहान मुलाकडे पाहतो,ते अत्यंत निरागस असते. त्यावेळी त्या मुलांच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची स्वार्थी भावना नसते. त्यामुळे जेव्हा आपण लहान मुलांच्या हसण्याकडे पाहतो त्यावेळेला आपलं मन आनंदानं भरून येतं. पटकन त्या मुलाला उचलून घेऊन त्याचे पाप घ्यावे वाटतात.  हे सर्व आनंदाच्या अनुभूतीतून घडत असतं. त्याच बरोबर ज्या वेळेला आपण एखादे कार्य हाती घेतो व ते कार्य  प्रामाणिकपणे पार  पाडतो , त्या कार्यामध्ये यश मिळवतो. त्यावेळेला आपल्याला झालेला आनंद अवर्णनीय असतो. तसेच बागेतील फुलांच्या कडे पाहिल्यानंतर सुद्धा आपल्या मनाला समाधान मिळते म्हणजे आपण आनंदी होतो. अशा या आनंदामुळे आपण ताजेतवाने होतो व आपला उत्साह दुणावतो. गौतम बुद्धांच्या, महावीर भगवान च्या जीवनामध्ये सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचे दुःख येऊ नये यासाठी त्यांना राजमहालातच ठेवले.त्यांना सर्वप्रकारचा आनंदच नेहमी देण्याचा प्रयत्न केला जात होता. पण  कालांतराने का होईना ,समाजातील दुःख त्यांना दिसले, आणि त्यांनी राज वैभवाचा त्याग करून ते गौतम बुद्ध ,भगवान महावीर बनले. व त्यांनी आपले सारे आयुष्य लोकांना आनंद ,सुख देण्याकरता व्यतीत केले. संत महात्म्यांनी सुद्धा लोकांना आनंद देण्याकरिता प्रयत्न केले.
 आपण आनंद कशात मानायचा हे आपल्या स्वभावावर अवलंबून असते. कारण एकाच गोष्टीचा आनंद एका व्यक्तीला मिळेल तर त्याच गोष्टीचा आनंद  दुसऱ्या व्यक्तीला मिळणार नाही. त्यामुळे आनंदाची व्याख्या प्रत्येक व्यक्तिगणिक बदलत असते. पण जीवनामध्ये सकारात्मक आनंदच चिरकाल टिकत असतो. आपण आनंदी असतो त्यावेळेला आपल्या सभोवती असणारे लोक सुद्धा आनंदी असतात. व कोणत्याही प्रकारचा ताण-तणाव आपल्यावर असत नाही. तणावरहित जीवन जगण्याकरता आपण नेहमी आनंदी असले पाहिजे. त्यासाठी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण आनंद मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चारोळी ( प्रतिबिंब )

प्रतिबिंब

पाहिले प्रतिबिंब जलदर्पणात
कुंतलभारही स्पर्शितो अलवार
साक्षीदार निसर्ग सभोवतालचा
भाव लोचनातील बोले हळुवार

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड

चारोळी (शब्द )

उपक्रम
चारोळी

शब्द

शब्दच संपत्ती साहित्यिकांची
भावभावनांच्या हिंदोळ्यावरची
अलवारपणे व्यक्त होण्याची
विचारांच्या झुल्यावरची

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चारोळी (गुलमोहर )

उपक्रम
चारोळी
विषय -गुलमोहर

केसरी शाल पांघरली वृक्षाने
डवरलेल्या पुष्पांची शानदार
हिरवाईवर शोभे मनमोहक
स्वागताला उभा हा भालदार

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

हायकू(वळणवाट )

उपक्रम
हायकू

विषय- वळणवाट

वळणवाट
नागमोडी वळते
अशी छळते

डोंगरातून
झाडीतून जाताना
वेग घेताना

दोन्ही बाजूला
कडा व खोल दरी 
धडकी उरी

वळवताना
भासे दरीत जाते
डोळे झाकते

गावात जाता
वळणवाटा आल्या
ओळखी झाल्या

प्रशांत नदी
वळणांची भासते
मन हासते

ओळखा नक्की
आयुष्याची वळणे
नाती जुळणे

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Wednesday, 6 May 2020

भक्तीगीत (माय माऊली )

महास्पर्धा फेरी क्रमांक 7

काव्यप्रकार- भक्तीगीत

विषय- हरी रुपे तुझी

शिर्षक- माय माऊली

वर्णसंख्या- 12

माय माऊली तू ,कृपाळू लाभली । 
पूर्ण झाली आस,दर्शने पावली ।। धृ ।।

म्हणती विठ्ठल,रुक्मिणीचा पती ।
भक्त सारे गोळा,तुझ्या दारी येती।।
वारकरी आले।प्रसन्न जाहली।
पूर्ण झाली आस,दर्शने पावली ।। 1।।

पंढरीत राजा,होतो गाजावाजा।
तुजसम नाही, कोण येथे दुजा।।
चरणी तुझीया,पुष्पे वाहिली।
पूर्ण झाली आस,दर्शने पावली ।।2।।

चंद्रभागे तीरी,संत झाले गोळा।
घालती गळ्यात,तुळशीच्या माळा ।।
टाळ चिपळ्यांची,साद ऐकू आली ।
पूर्ण झाली आस,दर्शने पावली ।।3।।

टिळा शोभतसे।बुक्याचा कपाळी।
कर कटेवर,शोभे वनमाळी।।
मूर्ती ही साजरी।मनाला भावली ।। 4 ।।

कोड नंबर-KSMS 42

चारोळी ( इंद्रधनुष्य )

उपक्रम
चारोळी
इंद्रधनुष्य

हिरवाईवर वृक्ष उभा नेटाने
न्हाऊन इंद्रधनुच्या रंगात
सप्तरंगी बरसात किरणांची 
शोभे धरतीच्या अंगाअंगात

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

हायकू (कलिंगड )

हायकू

कलिंगड

लाल रंगाचे
काळ्या काळ्या बियांचे
छान कापांचे

काप त्रिकोणी
मोहवतात मना
महत्त्व जाना

काठ हिरवे
गोलाकार आकार
खूप प्रकार

तहान भागे
भरपूर रसाने
गाती तराने

रानात वेल
कलिंगड रसाळ
असे मधाळ

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Tuesday, 5 May 2020

चारोळी ( मन )

चारोळी

मन

लागला ना कधी थांगपत्ता 
ना कधीच कुणा हे कळले
असे मन चंचल वेडे ठरले
सुर जीवनाचे मात्र जुळले

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चित्रचारोळी (उपकार )

चित्रचारोळी

उपकार

जणू गवसला स्वर्गच मजला
सेवा मातेची करायला मिळाली
बालपण उलटे पाहिले मी
मातेची कूस समाधान पावली

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चारोळी ( साधना )

साधना

यशाच्या मुळाशी असते 
साधना खडतर आयुष्याची
सहजसाध्य न मिळे काही
परीक्षा हीच असते जीवनाची

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

लेख (मित्र )

लेख

मित्र

सोन्यासारखी मैत्री आपली ,
अशीच नेहमी राहूदे .
मैत्रीच्या या नात्यात ,
गोडवा असाच टिकु दे.

आधार आपण एकमेकांना ,
संघर्षाच्या या दुनियेत .
संवेदना आपल्या जागृत ठेऊ ,
बोथट झालेल्या माणुसकीत.

 प्रत्येकाच्या जीवनात मित्र-मैत्रिणी असतातच. कारण मैत्री शिवाय आपलं जीवन हे भकास निराशमय होऊन जातं. अगदी सुरुवातीचे बालमित्र,वर्गमित्र, समाज मित्र, कामाच्या ठिकाणी असलेले मित्र. व आयुष्याच्या संध्याकाळी भेटलेले निवांत गप्पा मारण्यास मिळालेले मित्र. या सगळ्या मित्रांमध्ये महत्त्वाची म्हणजे नवरा बायकोची मैत्री होय. कारण बाकीचे मित्र तरी आपणाला कधी ना कधीतरी सोडून जाऊ शकतात. पण नवरा-बायकोचं नातं,त्यांच्यातली मैत्री ही शेवटपर्यंत त्यांच्याबरोबर राहते.
 बालपणीची मैत्री अत्यंत निरागस असते. प्रकारचा स्वार्थ, द्वेष,वैरत्वाची भावना नसते. या मैत्रीला जात,धर्म,पंथ याचे कशाचेच बंधन नसते. याला निखळ मैत्री असे म्हणतात. हायस्कूल व कॉलेजमध्ये असणारी मैत्री आयुष्याच्या एका वळणावर आपल्या जीवनाला एक कलाटणी देणारी ठरते. यावेळचे मित्र-मैत्रीण आपल्याला आपल्या शिक्षकांच्या पेक्षा आई-वडिलांच्या पेक्षा जवळचे वाटत असतात. आपले मित्र आणि मैत्रिणी हेच आपले सर्वस्व आहे, असे या वयात वाटत असते. आपल्याला गटातून बाहेर काढतील या एका भितीने सर्व मित्र मैत्रिणी आपल्या ग्रुप मध्ये जे काही नियम ठरतील ते आटोकाट पाळण्याचा प्रयत्न करत असतात. अशावेळी जर काही गोष्टी त्यांना पटत नसतील, किंवा घरच्या लोकांना पटत नसतील तरीही त्यांना त्यांच्या मनाविरुद्ध करणे भाग पडते व मग अशावेळी त्यांना ताण तणावाला सामोरे जावे लागते. हा आयुष्याचा विषय महत्त्वाचा टप्पा असतो की यावेळेला जे मित्र भेटतील, त्यांची पक्की दोस्ती होईल त्या व्यक्तीचे पुढचे जीवन सुद्धा या मैत्री वरच अवलंबून असते. जीवन चरितार्थ चालवण्यासाठी आपण ज्या ठिकाणी नोकरी करत असतो त्या ठिकाणी काम करत असणारे सहकारी यांच्यामध्येही सहकार्याचे नाते हे मित्रत्वाच्या नात्यांमध्ये हळूहळू परिवर्तित होत जाते व आपल्याला मित्रत्वाचा हात देऊन जाते. ही मैत्री आपली नोकरी संपेपर्यंत आपल्याबरोबर राहते. आपल्या सुखात दु:खात सहभागी होते.आयुष्याची संध्याकाळ म्हणजे वृद्धावस्था होय. यावेळची मैत्री हे समवयस्क समदु:खी अशा लोकांच्या बरोबर होते. मुलं-मुली हे त्यांच्या नोकरी संसारात रमलेले असतात. अशावेळी सहाजिकच या वृद्ध व्यक्तींच्या कडे  दुर्लक्ष होत जाते.अशावेळी सहाजिकच प्रथम आपल्या जीवनाचा जोडीदार मग तो पती किंवा पत्नी असू देत ते एकमेकाचे चांगले सहकारी मित्र बनतात. एकमेकांची काळजी घेतात.
 आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येकाला आपले जीवन सुसह्य करण्या करता मैत्रीची आवश्यकता भासतेच भासते. कृष्ण व सुदामा, अकबर ,बिरबल, तेनालीरामन व राजा कृष्णदेवराय यांचे मित्र प्रेम सर्वांना माहीतच आहे. खऱ्या मित्रांमध्ये असे निस्वार्थी प्रेम असते. प्रियकर व प्रेयसी यांच्यामधील मैत्री ही प्रेमाची मैत्री असते. या मैत्रीला जबाबदारीची, कर्तव्याची जाण नसते. म्हणून तर अशा ह्या प्रेमवीरांच्या कडून आततायीपणाचा निर्णय घेतला जातो. व बऱ्याच वेळा त्यांना आयुष्यभर पस्तावत बसावे लागते. मग अशा वेळेला सुरवातीची मैत्री हळूहळू कमी होत जाते. प्राण्यांच्या बरोबर ही आपली मैत्री होऊ शकते. प्राण्यांच्या बरोबर केलेली मैत्री कदाचित आपण विसरू शकू पण ते प्राणी कधीही विसरत नाहीत. आयुष्याच्या वळणावर जेव्हा तुम्ही त्यांना भेटतात तेव्हा ते आपली मैत्री दाखवतात, प्रकट करतात व आपल्याला प्रेमाने  बिलगतात.
मैत्री ही विश्वासाच्या पायावर टिकते.दोन मित्रांच्यामधे असलेला एकमेंकांबद्दलचा विश्वास हा मैत्री चा भक्कम पाया आहे.मैत्री म्हणजे असा परीस आहे की ज्याच्या जीवनात या मैत्रीरुपी परीसाने स्पर्श केला आहे त्याचे जीवन सोन्यासारखे मौल्यवान होते.
स्त्री व पुरुषाची निखळ मैत्री असू शकते . समाजात एक मानसिकता झाली आहे की स्त्री व पुरुष कोणत्याही नात्याशिवाय मैत्री करु शकत नाही.पण हे खरे नाही.माझ्या मते स्त्री व पुरुष हे एकमेकांचे चांगले मित्र बनू शकतात. मैत्रीला लिंगभेदाचे बंधन नसते.मैत्रीत एकमेकांना समजून घेणं महत्त्वाचं असतं.

एक स्त्री व पुरुष जर विचारांच्या पातळीवर एकत्र आले तर त्यांच्यात वैचारिक नाते निर्माण होते .विचारांची देवाणघेवाण एकमेकांना समजून घेणे , भावनांची कदर करणे , संकटसमयी मदत करणे हे सर्व ओघाने येतेच .

  पण समाजातील मानसिकता हे मान्य करत नाही.जे या वैचारिक पातळीवर पोहोचले आहेत त्यांना यावर आक्षेप मुळीच नसतो .समाजाने बदलत्या काळानुसार बदलले पाहिजे .सर्व नात्यांना एकाच मापात तोलून चालणार नाही .महत्त्वाचे म्हणजे स्त्री व पुरुष या दोघांनीही एकमेकांना पूर्ण ओळखले पाहिजे.मैत्रीत अंधविश्वास कामी येत नसतो . सुज्ञास सांगणे न लगे .

  बदलत्या समाजव्यवस्थेत बदलत्या काळानुसार आपणही सामाजिक व वैचारिक पातळीवर बदलले पाहिजे.स्त्री व पुरुष यांची निखळ मैत्री असू शकते हे आपल्या वागण्यातून व व्यक्तिमत्वातून दाखवून दिले पाहिजे.

हाक हवीय विवेकाची ,
बुद्धी जागृत करायला .
मैत्रीचा परीसच ऊजळेल ,
तावून सुलाखून विश्वासाला.

विश्वासच मैत्रीचा परीस,
नाही तुटायची कधीही .
जपूया नाते अखंड ,
संकटे आली तरीही .

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड ,ता.शिरोळ
जि. कोल्हापूर

Monday, 4 May 2020

चारोळी (ओळख )

चारोळी

ओळख

ओळख आज नव्याने झाली
गर्भित मतितार्थ जाणवला
सल हृदयात नकळत विरली
नात्यांचा नवा अर्थ पाणावला

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चारोळी (वळण )

चारोळी
वळण

कधी कुठे कसे वळण येईल
सांगता येत नाही जीवनात
असेही होऊ शकते सहजच
शंकाही कधी आली नव्हती मनात

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चारोळी ( आनंद )

उपक्रम

चारोळी

विषय- आनंद

आनंदात बेभान झाले
मद्यविक्री चालू म्हणून
काय म्हणावे आता याला
पैसे आणतील याला कुठुन 

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

लेख ( क्रोध )

लेख

राग

क्रोधाने अविवेकी होतो मानव
सारासार विचार पडतात गहाण
सोडून टाकू संहारक शत्रूला
आपसूकच बनणार जगी या महान.


 मानवी जीवन सफल असफल होण्या पाठीमागे त्याचा स्वतः चाच स्वभाव कारणीभूत ठरतो.समाधानी व शांत व्यक्ती आपल्या जीवनाचा प्रवास सातत्याने व समाधानाने करून यश मिळवू शकतो. पण अशांत व्यक्ती कोणतेही काम करत असताना आतताईपणा दाखवतो. त्यामुळे तो कामामध्ये अयशस्वी होतो किंवा काम लवकर होत नाही,लवकर यश मिळत नाही. यशस्वी व्यक्ती  नेहमी आपल्या षड्रीपूंवर विजय मिळवून असतो.काम,क्रोध,लोभ,मोह, मद,मत्सर  हे मानवाचे षड्रीपूं आहेत. म्हणूनच क्रोध हा मानवाचा शत्रू आहे. क्रोधाने आपली विवेकबुद्धी काम करेनाशी होते. आपल्या हातून चुका होतात. एखाद्या गोष्टी विरुद्ध मनात आलेल्या अनिर्बंध व आवेशयुक्त भावना उत्पन्न होणे म्हणजेच क्रोध होय. एकदा का माणसाला राग आला की त्याला कोणतीही गोष्ट सहन होत नाही. त्याच्या मनात बदल्याची भावना निर्माण होते. व हे अतिशय वाईट आहे.  नेहमीच क्रोध विवेकावर भारी पडतो. त्यामुळे राग आलेली व्यक्ती आपली विवेकबुद्धी गहाण ठेवते व वाईट कृत्य तिच्या हातून घडून येते.
 क्रोध सर्वप्रथम त्या व्यक्तीला स्वतःला जाळत असतो. काही लोकांना असं वाटत असतं की आपल्याला राग आला तर रागाच्या भरात आपण एखादे कृत्य केले तर ते धाडसी कृत्य होते असा गैरसमज त्यांच्या मनामध्ये निर्माण होतो. क्रोधामुळे नेहमी अहितच होत असते.
ज्या महान व मोठ्या व्यक्ती होऊन गेल्या त्यांनी नेहमी आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवले होते. त्यांच्या मते.....
 क्रोध हा मानवाचा मोठा शत्रू आहे. क्रोधाने फक्त वैरत्वाचीच भावनाच निर्माण होते.क्रोधाने कधीही सुख व शांती मिळत नाही.होरेसने तर ,"क्रोध म्हणजे शुद्ध वेडेपणा आहे".तर महात्मा गांधींनी  असे म्हटले आहे की," रागामुळे मानवाची सहिष्णूता संपते.त्यामुळे ते मानवाचे मोठे शत्रू आहेत."अल्बर्ट आईन्स्टाईन ने असे म्हटले आहे की ", राग ज्या व्यक्तींच्या हृदयात असतो ते लोक मूर्ख असतात." मार्क ट्वेन असे म्हणतात की," क्रोध हे असे विष आहे की ते ज्याच्यावर टाकले जाते त्यालाही जाळते व ज्या पात्रातून टाकले आहे त्या पात्रालाही जाळते." भगवान बुद्ध असे म्हणतात की," क्रोधाला बाळगणे म्हणजे दुसऱ्यावर टाकण्याकरता गरम कोळसा स्वतःच्या हातात घेण्यासारखे आहे, कारण तो कोळसा दुसऱ्याला तर जाळतोच पण स्वतःच्या हाताला प्रथम जाळतो." बायबल मध्ये असे म्हटले आहे की,"  मूर्ख मनुष्य राग आला कि तो आपला राग जोरजोराने आरडाओरडा करून व्यक्त करतो पण एखाद्या बुद्धिमान व्यक्ती ला आला तर तो आपला राग अतिशय शांततेने आणि संयमाने प्रकट करतो."  हिंदी साहित्यिक प्रेमचंद असे म्हणतात," राग येतो त्यावेळेला तो दुसऱ्याला दुःख देतोच,शिवाय त्याच्याबद्दलची वाईट भावना सर्वांच्या समोर प्रकट करतो."
म्हणून जेव्हा जेव्हा आपल्याला राग येतो त्यावेळेला प्रथम त्याचा परिणाम काय होणार आहे याचा आपण विचार केला पाहिजे."  ज्यावेळी पाणी उकळत असते त्यावेळी त्या पाण्यामध्ये आपला चेहरा दिसत नाही. त्याचप्रमाणे जेव्हा आपल्याला राग येतो त्या वेळेला आपल्याला बाकीचे काहीही समजत नाही.ज्याच्या मनात नेहमी क्रोध असतो तो कधीही सुख व समाधानाने राहू शकत नाही. त्याला स्वतःलाही कधीही आत्मसंतुष्टपणा मिळत नाही. त्याच्याशी बाकीचे लोकही फटकून वागतात,प्रेमाने, स्नेहाने कोणीही वागत नाही. बाकीचे लोक त्याच्यापासून लांब लांब जायला लागतात. व असा माणूस एकाकी बनतो. एकाकीपणा मुळे वैफल्यग्रस्त होतो. वारंवार राग यायला लागतो. ते सतत दुसऱ्यावर चिडत असतात. अशा लोकांना शीघ्रकोपी म्हटले जाते.
यावर काही उपाय आहे का?  हो आहे.जरूर आहे. ज्या वेळेला आपल्याला एखाद्या गोष्टीचा राग येतो, त्यावेळेला आपला राग लगेच प्रकट न करता आपण दोन सेकंद शांत रहावे. किंवा आकडे मोजावेत. म्हणजे आपला राग शांत होतो, व आपल्या हातून होणारे वाईट कृत्य टळते. त्याचबरोबर दुसरा उपाय म्हणजे शांती व क्षमा करणे होय. कारण क्षमा केल्यामुळे  क्रोधाचा पेटलेला अग्नि आपोआप शांत होतो. व आपणाकडून दुसऱ्या कुणालाही दुखावले जात नाही. त्यामुळे दुसऱ्यांचे आपल्याबद्दल मत चांगले होते. ज्या वेळेला आपल्याला राग येतो आपण रागाने एखादी गोष्ट बोलून जातो व नंतर वाटते की आपण असे बोलायला नको होते.पण वेळ निघून गेलेली असते. व आपल्याला आपण बोललेला शब्द परत घेता येत नाही. त्यामुळे बोलून शब्दांचे गुलाम होण्यापेक्षा न  बोलता आपण शब्दांचे मालक होणे केव्हाही चांगले असते.
जीवनात आपल्याला यशस्वी व्हायचे असेल तर जो क्रोध आपला शत्रू आहे त्याला टाळून आपण सर्वांशी प्रेमाने वागले पाहिजे. जिथे क्रोध असतो तिथे प्रेम, समाधान कायम टिकलेले पहायला मिळत नाही. जीवनात जर यशस्वी व्हायचे असेल तर आपल्यामधील षड्रीपूंवर ,खासकरून क्रोधावर आपणाला ताबा मिळवता आला पाहिजे.संयमी बना,क्षमा करा,क्रोधाला जिंका.

जीवन आहे सुंदर गाणे गायचे
नको थारा क्रोधाला मनात 
प्रेम,स्नेह,विवेकाने वागून 
यशस्वी पाऊल टाकू जीवनात.

लेखिका
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Sunday, 3 May 2020

चारोळी ( सहवास )

उपक्रम 

 चारोळी

विषय -- सहवास

सहवास लाभला साहित्यिकांचा
स्वकीयांचा मेळा भरला छान
सारेच आप्तस्वकीय वाटले
दिला जाईल प्रत्येकाला मान

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

हायकू ( माळरान )

स्पर्धेसाठी

हायकू

विषय -माळरान

गावाबाहेर
सुंदर माळरान
कोकीळ तान

गवत फुले
आनंदाने डुलती
रोज फुलती

गुरे चरती
वासरांसह माता
निसर्ग त्राता

छान देऊळ
मनाचीच शांतता
सुख नांदता

वृक्षांची छाया
सानथोरांची माया
हर्षित काया

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

हायकू (वळीव )

हायकू

वळीव

काहिली झाली
परीसर तापला 
लिंबू कापला

सुटला वारा
घोंघावत सुटला
श्वास तुटला

टपोरे थेंब
टपटपती धरा
भरतो करा

गारवा आला
तृप्त धरणीमाता
शांत विधाता 

क्लांत होऊन
निसर्गाच्या दारात
शांती घरात 

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Friday, 1 May 2020

कविता (महाराष्ट्र )

उपक्रम

कविता

विषय- महाराष्ट्र माझा

शिर्षक - महाराष्ट्र

निर्माण करण्या महाराष्ट्रभूला,
लढले थोर धुरंदर युगप्रेमी.
हवी मुंबई महाराष्ट्रात ही,
मागणी केली ते राष्ट्रप्रेमी.

रक्ताळले ते फ्लोराफांऊटन,
हुतात्म्यांनी देह ठेवला धरेवर.
कामी आले बलिदान तयांचे,
कलश महाराष्ट्राच्या शिरावर.

स्मारक हुतात्म्यांचे स्थापिले,
राजधानी मुंबईला गौरवले.
स्वप्न संयुक्त महाराष्ट्राचे,
पहा इथे हे साकारले.

भाषा मराठी ही मायबोली,
संतमहंत,साहित्यिकांनी गौरवलेली
कला संस्कृतीचा बाज येथे,
लावणीच्या ठसक्याने बहरलेली

शूरविरांच्या पराक्रमाचा वारसा
हिंदवी स्वराज्य स्थापिले शिवरायांनी
कष्ट यातना अतोनात साहिल्या
नरवीर, निस्वार्थी स्वातंत्रविरांनी

धन्य जाहलो आजमितीला,
पाहून राष्ट्राची उत्तुंग भरारी.
जपूया वैभवशाली इतिहास,
बाणा आमचा सदैव करारी.

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

कविता अष्टाक्षरी ( माझी मराठी माणसं )

स्पर्धेसाठी

कविता

अष्टाक्षरी

विषय- माझी मराठी माणसे

शिर्षक- माझा महाराष्ट्र


माझा महाराष्ट्र शोभे
भारताच्या नकाशात
माझी मराठी माणसे
संस्काराच्या प्रकाशात

नांदतात सर्व धर्म
समाधान अंगी वसे
धर्म,जात,पंथ,वेष
सर्वत्रच शांती असे

थोर आहे परंपरा 
शूरवीर शिवाजींची
पराक्रमी इतिहास
सांगे तानाजी बाजींची

सह्याद्रीच्या कपारीत
नाद घुमे मावळ्यांचा
स्वराज्याची शोर्यगाथा
जोश आहे सगळ्यांचा

लावणीची लोककला
टाळ मृदंगाचा मेळा
भजनात रंगताना
भक्तगण झाले गोळा

माय मराठी भाषा ही
मायबोली वाटे गोड 
प्रेम करती सर्वच
जगी याला नाही तोड

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

कविता (व्यथा कामगारांच्या )

स्पर्धेसाठी

कविता

विषय- व्यथा कामगारांच्या

शिर्षक- कामगार

खळगी पोटाची भरण्यासाठी,
दिवसरात्र राबतात कामगार.
श्रमामुळेच त्यांच्या होतात,
मालकांचे दिवस यादगार.

सोडून येतात गांव दुरवर,
वाली ना त्यांचा कुणी येथे.
गरजवंतासारखी खितपत,
पडती घरातील मंडळी तेथे.

जरी आल्या अनंत अडचणी,
तमा न कुणा नसे मालकाला.
बसले फक्त करण्या शोषण,
नाही किंमत इथे याचकाला.

ढोरासारखे घेती राबवून,
मोबदला मागता डळमळती.
भागवताना मागण्या मुलांच्या
मने बापांची सदैव तळमळती

वंचना साहताना वेदना उरी,
नशिबाला दोष फक्त हाती.
कर्जातच आयुष्य खपले,
व्हायचे काय दुसरे फक्त माती

व्यथा कामगारांची ऐकण्या,
उभा महाराष्ट्र आहे जागा.
नको पडू विवंचनेत बांधवा,
नको करु आता कधीही त्रागा.

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर


सदर कविता स्वरचित व स्वलिखित असून संपूर्ण/ अंशता अनुदानित किंवा चौर्य नाही.