Tuesday, 25 December 2018

कविता अष्टाक्षरी ( उघड्यावरचं जीणं )

स्पर्धेसाठी

चित्रकाव्य

अष्टाक्षरी

शीर्षक - उघड्यावरचं जीणं

मांडलाय संसार मी
असा हा उघड्यावर
नाही तमा नाही चिंता
चाललय पूर्वापार

रानी घेतला आसरा
आकाशाचं पांघरुन
संसाराच्या गोधडीला
घेतलयं आंथरुन

सर्जा-राजा बैलजोडी
देते साथ जन्मभर
घेती विश्रांती रानात
कापायचं ते अंतर

बाळ माझा मांडीवर
पितो पाणी मायहाती
खुशी पाहून दोघांची
आसमंत साथ देती

विखुरली भांडीकुंडी
आग पोटाची शमली
तान्हा झाला समाधानी
लेक ऊभी ती सानुली

बाजेवर विसावला
संसाराचा अर्धा भार
तिकोट्याने हो पेलला
पांघरुन नी चादर

उघड्यावरचं जीणं
नशिबाचा असा भोग
समाधानी तरी जगी
नाही मिळाला तो योग

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

No comments:

Post a Comment