स्पर्धेसाठी
लेख
विषय- सरत्या वर्षाला निरोप
आज तूझा या वर्षातला शेवटचा दिवस म्हणजे ३१ डिसेंबर २०१८.गेलेले वर्ष म्हणजे तू आणि तूझ्याबद्दलच्या माझ्या भावना मी व्यक्त करत आहे. गतवर्ष म्हणजेच सरते वर्ष माझ्यासाठी खूप छान गेले. सरत्या वर्षात माझ्या साहित्यिक प्रवासाला चांगलीच गती मिळाली आहे. विविध प्रकारच्या स्पर्धांत मी भाग घेतला.विविध साहित्यिक समुहात सामिल झाले. त्यांनी अनेक प्रकारच्या स्पर्धा घेतल्या .त्या स्पर्धेत मी हिरिरीने सहभाग नोंदवला. अनेक स्पर्धेत मी यशस्वी झाले. मनाला खूप आनंद झाला. लिखाणाला गती व विविध विषय मिळाले. विविध वृत्तपत्रांत विविध विषयांवर माझे लेख छापून आले.वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला. मी खूप खूष झाले.
विविध सामाजिक प्रश्नांवर बोलता आले. मार्गदर्शन करता आले. साहित्य संमेलनामध्ये सहभाग नोंदवता आला.मनापासून मनातले विचार प्रकट करण्याची संधी मिळाली. खरचं हे वर्षा तू माझ्यासाठी चांगला गेलास.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझी तब्येत छान राहिली. मी स्वतःसाठी वेळ काढला.रोज पंचेचाळीस मिनीटे मी. चालणे चालू केले.त्यामुळे तब्येतीला थोडे बरे वाटले.मी तरतरीत राहिले. माझ्यामुळे कुणाला त्रास होईल असे मी वागले नाही. कींवा कुणीही माझ्यासोबत वाईट वागले नाही ही एक जमेची बाजू आहे. "एकमेकां सहाय्य करु अवघे धरु सुपंथ " या ऊक्तीप्रमाणे आपण जर दुसऱ्याला वेळोवेळी मदत केली तर तेही वेळप्रसंगी आपल्याला मदत करतात हे खरेच आहे. शेजारधर्म पाळल्यामुळे एकमेकांना समजावून घेतल्यामुळे वाद निर्माण न होता सुसंवाद घडला. एकमेकांच्या सुखद:खात सामील झाले.
आज आपण पहात आहोत की चांगल्याबरोबर वाईट गोष्टीही घडतात.पण जसे सुख व दु:ख , अंधार व प्रकाश , जय व पराजय या सर्वांना एकमेकांशिवाय शोभा नाही तसेच वाईट गोष्टी घडल्याशिवाय चांगल्या गोष्टींची कींमत कळत नाही. तसेच आयुष्यातील चढ ऊतार हे गेले वर्षभर होत गेले , पण यातून नवीन काहीतरी शिकत गेले.अनुभव हा मोठा गुरु असतो. अनुभवाने मानव शहाणा बनतो. " पुढच्यास ठेच मागचा शहाणा " याप्रमाणे सारासार विचार करुन जीवनात पावले टाकली.बरीचशी योग्य पडली .काही चुकली पण लगेच दुरुस्ती ही केली .त्यामुळे पूर्वानुभव पुढच्या गोष्टीत महत्त्वाचा ठरला. अधिकार वाणीने दुसऱ्यांना सांगता येऊ लागले. कारण कोणतीही गोष्ट स्वतः अनुभवतो तेंव्हाच ती पूर्णपणे समजते,ऊमगते.
कौटुंबिक स्वास्थ ही ऊत्तम असल्यामुळे निराश,नाराज अशी परिस्थिती उत्पन्न झाली नाही. नाही म्हणण्यापेक्षा जेंव्हा असा प्रसंग आला त्याला धीराने, सकारात्मकतेने स्विकारले त्यामुळे त्याचा बाऊ झाला नाही. जीवनात हे असे प्रसंग येतच राहणार, अशी मनाची धारणा करुन घेतली होती.
कोणत्याही गोष्टींचा गवगवा केला अकारण त्याला अवास्तव महत्त्व दिले तर त्यापासून अपेक्षा पूर्ती झाली नाही तर मनाला दु:ख होते म्हणून जे आहे ते स्विकारत गेले. जेवढे जमेल तेवढे करत गेले. जे बरोबर आले ते माझे,नाही आले ते माझे नव्हतेच ही भावना ठेवली व मी निवांत आहे.
हे सरत्या ,गतवर्षा तू मला खूप अनुभव दिलास. मी खूप खुष आहे.येणाऱ्या वर्षात तुझ्या अनुभवाची जी शिदोरी मला मिळाली त्याच्या आधारावर मी माझी स्वप्ने, आशा-आकांक्षा, ईच्छा पुर्ण करण्याचा प्रयत्न करणार.मला यामध्ये तुझी खूप चांगली मदत मिळणार आहे.तूला निरोप देताना मन जडावतं.कारण मागील,सरत्या वर्षातील अनेक अनुभव हे मनाला सुखावणारे होते.त्यामुळे मन नेहमी प्रफुल्लीत रहात होते.पण काळ कोणासाठी थांबत नाही. गेलेला वेळही परत येत नाही. म्हणून वेळ ही संपत्ती मानून तीचा योग्य वापर केला पाहिजे. कोणत्या वेळी कोणता निर्णय घ्यावा हे मागील अनुभवांवरून लक्षात येत असते.येणाऱ्या भविष्यात तुझ्यामुळे मी योग्य पावले टाकीन.तूझा अनुभव खासच आहे.तुझे मनापासून धन्यवाद. तूला मी आनंदाने निरोप देते.
लेखिका
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर.