Wednesday, 27 February 2019

लेख ( लेखिकांचे प्रमाण कमी का ? )

लेखिकांचे प्रमाण कमी का ?

    जर भारताचा इतिहास पाहायला गेला तर पूर्वीच्या काळी भारतामध्ये गार्गी, मैत्रेयी, लोपामुद्रा यासारख्या  ब्रह्मवादिनी स्त्रिया होऊन गेल्या. त्या इतक्या ज्ञानी होत्या की राज्यसभेत या वादविवादांमध्ये काळच्या विद्वान पुरुषांनाही हरवत होत्या. यावरून असे दिसते की स्त्री शिक्षणाचे महत्त्व पूर्वीही होते. जसा मध्ययुगीन काळ आला. हळूहळू स्त्री ही बंधनात अडकत गेली. सर्वच दृष्टीने ती गुलाम झाली. तिचे सर्व स्वातंत्र्य हरवले गेले. कालांतराने तिच्या हे अंगवळणी पडले. राजघराण्यातील स्त्रिया सोडल्या की बाकी सर्व  शिक्षणापासून दूर गेल्या. त्यामुळे आपले मत प्रकट करणे, दूरच राहिले. स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक समाजसुधारकांनी स्त्री उद्धाराचा प्रयत्न केला.   राजाराम मोहन राय, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले  यांच्यामुळे  स्त्री शिक्षणाचा पाया रोवला गेला. त्या काळात स्त्री शिकणे म्हणजे महापाप समजले जायचे. त्यामुळे शिक्षण नसल्यामुळे लिहू शकत नव्हत्या. कालांतराने स्त्री शिक्षणाची बीजे रोवली गेली. हळूहळू स्त्रिया शिकू लागल्या. स्वतःची मते मांडू लागल्या. पण हे प्रमाण खूपच कमी होते. आज स्त्रिया सुशिक्षित झालेल्या आहेत. बऱ्याच अंशी बंधमुक्त ही आहेत,पण लिखाणाच्या संदर्भात पाहायला गेले तर ही संख्या बरीच कमी आहे,  हे असे का?  सुशिक्षित  स्त्रियांचे प्रमाण पाहता लेखिका ,कवयित्री ,साहित्यिका यांचे प्रमाण फारच कमी आहे. या पाठीमागचा विचार करत असताना माझ्या मनात असा विचार आला की, स्त्रीला व्यक्त होण्याची गरज आहे. लहानपणापासूनच स्त्रीला असे सांगितले जाते , तिच्या मनावर बिंबवले जाते की स्त्री जन्म हा  स्वतःसाठी नसून दुसऱ्यासाठी,  दुसऱ्याची सेवा करण्यासाठी आहे. परंपरागत रूढीनुसार स्त्रीच्या मनात हे एवढे बिंबले  की  ती कामात एवढे मग्न झाली की तिला आपले विचार प्रकट करण्यासाठी, किंवा ते विचार कागदावर उतरवण्यासाठी वेळच मिळत नव्हता. त्यादृष्टीने कधी विचारच केली नाही. घरच्या कामामध्ये ती एवढी मग्न झाली की, तिने स्वतःचा विचार कधी केलाच नाही. चारचौघात जाणे,  समारंभात ,कार्यक्रमात जाऊन बोलणे म्हणजे तिने मर्यादा ओलांडल्या असे समजत. तिने फक्त शोभेची बाहुली म्हणून राहावे अशा प्रकारची रचना केली गेली होती. ते  स्त्रीच्या इतके अंगवळणी पडले होते की, तिला या आपल्या दास्यातून कधी बाहेर पडण्याची गरज भासली नाही. अजून सुद्धा आपण पाहतो की बऱ्याच सुशिक्षित स्त्रिया ज्यांच्या घरात सर्व सुख सोयी आहेत त्याही स्त्रिया आपला  मिळालेला मोकळा वेळ लिखाणात घालविण्याचा कधीच विचार करत नाहीत. त्याच्या पैशावर मजा मारणे, पार्ट्या करत राहणे, सजून-धजून एकमेकीला कमी लेखणे,  यातच  त्या धन्यता मानतात. आपल्या मनातले दुःख , सुख त्या जर  कागदावर  मांडू लागल्या तर यांच्या भावनांचाही निचरा होईल व त्या तणावमुक्त जीवन जगू शकतील पण हा विचार त्या करू शकत नाही कारण त्यांनी त्या दृष्टीने कधी विचारच केलेला नसतो. कोशामध्ये त्या इतक्या गुंग असतात की हे सगळं करण्याचे त्यांच्या मनातच नसतं. लहानपणी आई वडिलांच्या घरी, लग्नानंतर नवऱ्याच्या घरी, म्हातारपणी मुलांच्या सानिध्यात सुरक्षित राहणे, यातच त्यांना धन्यता वाटते.  मुलांच्या संगोपनात, त्यांना वाढवण्यात, कुटुंबाच्या सर्व जबाबदाऱ्या हसत खेळत पार पाडण्यात त्यांचा वेळ इतका जातो की त्यांना स्वतःसाठी वेळ देण्यासाठी वेळच नसतो. वाचाल तर वाचाल विचारानुसार जर त्यांनी आपला वेळ वाचनामध्ये खर्च केला तर त्या विचारप्रवण होतील व लिहू लागतील. अनेक कर्तृत्ववान स्त्रियांची चरित्रे जर त्यांनी वाचले तर खरोखरच त्यांना प्रेरणा मिळेल लिहायला लागतील व आपले जीवन हे किती सहजतेने आपण घालवतोय हे त्यांच्या लक्षात येईल. याला सामाजिक परंपरा ही कारणीभूत आहे. कारण स्त्रीने जर मनाविरुद्ध ,समाजाविरुद्ध, कुटुंबाविरुद्ध लिखाण केले तर तिच्यावर टीकेचा भडीमार होतो. तिला जीवन नकोसे करून सोडतात. त्यामुळेही काही स्त्रिया या मनात असून सुद्धा लिहू शकत नाहीत. ज्या काही स्त्रिया पुढे येऊन असे धाडसाने लिहितात रोषाला सामोरे जावे लागते हे आपण पाहतोच. पण आपली सामाजिकता अजून एवढी झालेली नाही . सर्वप्रथम घरच्यांचा तिला विरोध होतो. काही लिहिणार असलीस तर हलकेफुलके लिहित जा, नाहीतर लिहू नको असे तिला बजावले जाते. या सर्वामुळे व्यक्त होणाऱ्या भावना या अव्यक्तच राहतात. आज आपण पाहतो की काही स्त्रिया या सर्वांचा विचार न करता. विरोधाला न जुमानता लेखन करत आहेत, आपले विचार मांडत आहेत ही एक सकारात्मक बाजू आहे.  आपण आशा ठेवू या की या लिहित्या हातांच्या स्त्रियांना पाहून अनेक स्त्रिया आपले मत प्रकट करण्यासाठी पुढे येतील व लिहू लागतील. सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की त्यांना आपले मत व्यक्त करण्यासाठी एक व्यासपीठ निर्माण करून देणे आवश्यक आहे. आज आम्ही लेखिका या समूहाच्या माध्यमातून माननीय श्री मोहन कुलकर्णी यांनी स्त्रियांना हे एक हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले आहे आणि खरोखरच कधीही न लिहिणार्‍या स्त्रिया या हळूहळू व्यक्त होत आहेत ,आपली मते मांडत आहेत. हे  एक आशावादी चित्र आहे. चला तर मग या मांडा आपल्या मनातील विचार अगदी  निर्धास्तपणे   आपल्या या  मंचावर.

लेखिका
  श्रीमती  माणिक नागावे
कुरुंदवाड,  जिल्हा.कोल्हापूर

No comments:

Post a Comment