Tuesday, 19 February 2019

पुस्तक परीक्षण ( ज्ञानपंढरीचा वारकरी )

स्पर्धेसाठी

पुस्तक परीक्षण

आत्मचरीत्र
ज्ञानपंढरीचा वारकरी

पंढरीच्या पांडूरंगाचे दर्शन घेऊन वारकरी, भाविक कृतकृत्य होतात. तशाच प्रकारची भावना प्राचार्य उ.स.नाईकनवरे यांचे आत्मचरीत्र "ज्ञानपंढरीचा वारकरी " हे पुस्तक वाचताना मनात निर्माण होते. एखादे अबोध लहान मूल आपल्या आजोबांना नवीन गोष्टींची माहिती विचारते व आजोबा त्याचे बोट धरून प्रेमाने प्रत्येक गोष्ट समजावून सांगतात.अगदी तसेच वर्णन लेखकाने केले आहे. प्रत्येक गोष्टीचे असे काही अचूक व सविस्तर वर्णन केले आहे की ते चित्र हुबेहूब डोळ्यासमोर उभे राहते.अगदी तसेच हे आत्मचरीत्र वाचताना मनाची अवस्था होते.सर्व प्रसंग व घटना डोळ्यासमोर फक्त उभ्याच राहत नाहीत तर प्रत्यक्ष त्या ठिकाणी आपण उभे आहोत ही भावना होते.इतका जिवंतपणा त्यांच्या लिखाणात जाणवतो.१९२ पानांचे आय.एस.बी. एन. कोड प्राप्त हे पुस्तक राज्य शासन पुरस्कार साहित्यिक, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक डॉ. श्रीकांत पाटील यांची प्रस्तावना लाभलेले हे पुस्तक बरेच काही सांगून जाते. मनोगतातून लेखकाने थोडक्यात लेखनप्रपंचाचा आढावा घेऊन आभार मानले आहेत,यातून त्यांचा नम्रपणा दिसून येतो.सुरुवातीलाच  "रेणुका देवीच्या रमणीयेत " पासून सुरुवात करुन निवृत्तीनंतर च्या प्रवासापर्यंत अखंडपणे केलेले लिखाण त्यांचा संघर्षमय जीवनपट अलवारपणे उलगडत जाताना दिसतो.मन आपसूकच वाचनात दंग होते. पुढे काय ही उत्सुकता वाढीस लावते.मातृ-पितृ देवो भव म्हणत ते आईवडीलांच्या चरणी वेळोवेळी लीन होताना दिसतात. श्रमप्रतिष्ठा व अतिथींची,आचार्यांची सेवा हे आपले कर्तव्य मानून करतात. काळाच्या ओघात गावाचे स्वरूप कसे बदलत गेले याचे वर्णन छान पद्धतीने केले आहे." पांडुरंगाच्या प्रांगणात " प्रकरणात स्वत:चे घर,गांव सोडून आल्यानंतर आपली दिनचर्या लिहून त्याप्रमाणे कसे वागले हे सांगितले आहे.पुढील शिक्षणासाठी महाराष्ट्र विद्यालय,गुरुजन,गंमतीचे काही प्रसंग, घरची गंमत,अभ्यास याबद्दल सविस्तर वर्णन केले आहे. बेवारसपणे संडासात पडलेल्या बालकाला अनाथ आश्रमात पोहचवण्यापर्यंत त्यांनी केलेले समाजकार्य  त्यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या निवडीमध्ये कसे फायदेशीर झाले हे सांगून समाजसेवेचा वसा सर्वांना घेणेस प्रवृत्त करतात. त्यांचे गुरुजी काणे सर यांच्यामुळेच त्यांना संस्कृत, इंग्रजी व मराठी या भाषा चांगल्या प्रकारे अवगत झाल्या हे ते नम्रपणे कबूल करतात व पुढे आपल्या गुरुजनांची शिकवण्याची लकब अंगी बाणवून कसे विद्यार्थीप्रिय व लोकप्रिय झाले हेही ते सांगतात. राष्ट्रसेवादलातील सेवाभाव त्यांच्या अंगी भिनला होता.ज्यावेळी परमपूज्य साने गुरुजी हरिजनांना विठ्ठल मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून पंढरपूरात उपोषणला बसले होते तेव्हा स्वयंसेवक म्हणून कार्य करताना त्यांना साने गुरुजींचा सहवास लाभला व आपणही त्यांच्यासम व्हावे ही उदात्त भावना मनात उत्पन्न झाली ही विशेष कौतुकास्पद बाब आहे.याचाच परीपाक म्हणून जेव्हा पैलवान खाशाबा जाधव यांची हेलसिंकीला कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली त्यावेळी " खारीचा वाटा " म्हणून त्याकाळी त्यांनी अकरा रुपये वर्गणी देऊन आर्थिक मदत केली होती. "पहिला विद्यार्थी शिक्षक दिन" साजरा करताना आलेले अनुभव छान पद्धतीने मांडले आहेत.आजच्या मुलांना ते खरोखरच उपयोगी आहेत. आपल्या मित्रांच्याबद्दल लिहीताना ते हळुवार होतात व त्यांच्याबद्दल कृतज्ञता बाळगतात. पण " खरी मैत्री" या प्रकरणातून मैत्री कशी असावी याचे उत्तम उदाहरण देउन आपल्याला अशी अभिन्न मैत्री लाभली नाही याचे दु:खही ते व्यक्त करतात." कोल्हापूरच्या कुशीत " प्रकरणात त्यांच्यापुढे तीन यक्ष प्रश्न उभे राहिले , पण पाठक गुरुजींच्या सहकार्यामुळे ते प्रश्न कसे मिटले हे सांगताना ते पाठक गुरुजींच्याबद्दल कृतज्ञतेचा भाव प्रकट करायला विसरत नाहीत.
"प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग " प्रकरणात बोर्डिंगमध्ये प्रवेश मिळत नाही असे वाटल्यावर त्यांना रडू कोसळले असे लिहतात यावरून त्यांची शिक्षणाप्रतीची आस्था, तळमळ दिसून येते. राजाराम कॉलेजमध्ये असताना अनेक नामवंत प्राध्यापक त्यांना लाभले हे सांगत असतानाच इंग्रजी भाषेची आवड असूनसुद्धा आर्थिक टंचाई व वेळेचा अभाव यामुळे त्यांनी विज्ञान शाखा सोडून दिली व कलाशाखेकडे वळले. कॉलेजमध्ये  असताना मिश्री लावायची सवय कशी लागली हेही गंमतीने सांगतात. पुढे ते "कमल मंडळ" मध्ये सहभागी होऊन साहित्यिक अनुभूती मिळवू लागले. ग्रंथालयाचा वापरही त्यांनी पुरेपूर केला हे सांगून त्याचा फायदा स्व-विकासासाठी , हिंदी शिक्षक सनद व आपली शैक्षणिक योग्यता वाढवण्यासाठी कसा झाला हे सांगून "वाचाल तर वाचाल " याची प्रचिती दिली आहे. आपल्या विद्वत्तेच्या जोरावर वशिल्याशिवाय नोकरी कशी मिळते हे " महांकालीचे ममत्व " या प्रकरणात सांगितले आहे. स्वावलंबन, श्रम यावर त्यांची श्रद्धा होती त्यामुळे " स्वयंपाकाचे शिक्षण " ही त्यांनी घेतले.याचा उपयोग हायस्कूल ची पहिली तुकडी एस.एस.सी.ला बसणार होती त्यावेळी सर्वांना त्यांनी पुरणपोळीचे भोजन दिले तेंव्हा झाला.वर्गावर जाताना पाठाची तयारी कशी करत हे ही अतिशय मार्गदर्शनपर भाषेत सांगितले आहे. त्याचा उपयोग आजच्या अध्यापकांनी करायला काहीच हरकत नाही. अध्यापनाबरोबर वसतिगृहाचे व्यवस्थापनही चांगल्या प्रकारे पार पाडले आहे. प्रकरण पाच "बी.टी.चे प्रशिक्षण पर्व " मध्ये अभ्यास, सरावपाठ,  शिबीरातील सहभाग, वार्षिक परीक्षेपर्यंतचा कालावधी हे सर्व अतिशय तर्कसुसंगत पद्धतीने वर्णन केले आहे.प्रकरण
"विठ्ठलाच्या वस्तीत " मध्ये मुलाखत चांगली होऊनसुद्धा त्यांना निवडीचे पत्र न आल्यामुळे ते सरळ परिचारकांच्या घरी गेले व खरी परिस्थिती सांगितली तसेच नोकरी देणार नसाल तर मला दुसरीकडे बोलावणे आले आहे असे धिटाईने सांगितले. त्याचा परिणाम त्यांना लोकमान्य मध्ये नोकरी मिळाली. यावरून लेखकाचा बाणेदारपणा दिसून येतो.त्यांच्या आगळ्यावेगळ्या अध्यापन पद्धतीमुळे ते लवकरच विद्यार्थीप्रिय ठरले.उच्च शिक्षणाच्या ध्यासाने त्यांनी एम.ए.व एम.एड. पूर्ण केले ही प्रेरणादायी गोष्ट आहे. आजच्या युवकांच्या समोर हा आदर्श आहे.सतत काहीतरी करत राहिले पाहिजे हा संदेश यातून मिळतो. " शासकीय सेवा " प्रकरणात लेखकाच्या स्वाभिमानी मनाची उंची दिसून येते. मानसिक कुचंबणा होत असल्यामुळे त्यांनी कायमची नोकरी सोडून शासकीय सेवेत दाखल झाले व आपल्या आवडीचे क्षेत्र निवडले. नोकरीतील तारेवरची कसरत करत , उर्वरीत शिक्षण पूर्ण करून भावांचे शिक्षणही त्यांनी पूर्ण केले ही कौतुकास्पद गोष्ट आहे. यामध्ये लेखकाला त्यांच्या अर्धांगिनीचे धाडस व तिची किती मोलाची साथ लाभली हे " सौ. शकुंतलाची सोशिकता  " "विंचवाचे बिऱ्हाड " यातून व्यक्त होते. कुपमंडुकी वृत्ती न बाळगता आपल्या मुलांच्या बरोबर भावांच्या मुलांचे शिक्षण व लग्नकार्येही निरलसपणे केली यांचे वर्णनही लेखकाने सुंदर केले आहे." अंबपच्या आमराईत " प्रकरणातील नवोपक्रम खूपच उपयोगी व मार्गदर्शक आहेत.ज्यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले व लौकिक वाढला.
" कौटुंबिक कर्तव्ये " प्रकरणात निवृत्तीनंतर कौटुंबिक साऱ्या जबाबदाऱ्या कशा लिलया पार पाडल्या याचे वर्णनही खूप मौलिक आहे. आजच्या पिढीला मार्गदर्शक आहे."हात ओला तर जावई भला " व
"कट्ट्यावरील काथ्याकूट" या शिर्षकाखाली विनोदी पद्धतीने परंपरागत चालत आलेल्या रुढी सांगून त्याला विधायक गती कशी दिली हे प्रभावीपणे मांडले आहे.
" साठवणीतील सह्रदयी " या प्रकरणात लेखकाने त्यांच्या आयुष्यात आलेल्या अनेक व्यक्ती ज्यांनी त्यांच्या जीवनाला आकार दिला अशा व्यक्तींची शब्दचित्रणे रंगवली आहेत व त्या व्यक्तींना त्यांनी उच्चपदावर  नेऊन ठेवले आहे. कृतज्ञता व्यक्त करण्याची ही पद्धत मनाला खूप भावते.
" समाज सेवा " या प्रकरणात लेखकाने लहानपणापासून दुसऱ्यासाठी काहीतरी करावे असे वाटत होते असे सांगून नोकरी सांभाळून कशाप्रकारे समाज सेवा करता येते याची उत्तम उदाहरणे दिली आहेत जी आजच्या पिढीला प्रेरणादायी आहेत." परिचय प्रवाह " या प्रकरणात लेखकाने स्वतःच्या जन्मापासून आजतागायतचा जीवनप्रवास तारखांसह स्पष्ट केला आहे. त्यामुळे त्यामध्ये काहीच खोटेपणा नाही हे सहजसिद्ध होते.शैक्षणिक जीवनातील कृतीसत्रांनी कर्तव्य निष्ठा, लेखनाने बौद्धिक पूर्णता व अर्थार्जनासाठी केलेल्या प्रवासातून कसे पांडित्य मिळाले याची माहिती दिली आहे." विशेष बाबी " या शेवटच्या प्रकरणात लेखकाने आपली शैक्षणिक योग्यता वाढवल्यामुळे शिक्षकी पेशाबरोबर अनेक उच्च पदांवर कुठे कुठे कार्यरत होते याचा आढावा घेतला आहे. त्याचप्रमाणे मान्यवरांची शिफारस पत्रे ही त्यांच्या जीवनातील उमेद देणारी होती हे सांगून अभिनंदन पत्रे ही कशी प्राणवायूसारखी उपयुक्त ठरली याचा उहापोह केला आहे.लेखकाचे जीवन म्हणजे एक आदर्शवत उदाहरण आहे. सर्व गोष्टी प्रांजळपणे व ओघवत्या शैलीत मांडल्यामुळे वाचकाला कंटाळा तर येतच नाही उलट पुढे काय ? ही उत्सुकता लागून राहते.पुस्तकातील फोटो लेखकाच्या कार्याचा पुरावा देतात.मुखपृष्ठावरील अनुस्वारात दाखवलेला पंढरीचा विठ्ठल मनाला सुखावून जातो.लेखकाचा तरूणपणीचा फोटो करारी व ध्येयनिष्ठता दर्शवतो.तर उघडलेले पुस्तक व पिसाची लेखणी हे लेखकाचे पारदर्शी जीवन हे या उघडलेल्या पुस्तकाप्रमाणे स्पष्ट आहे हे दाखवते. मलपृष्ठावरील लेखकाची माहिती त्यांच्या व्यक्तिमत्वाची उंची वाढवते.कवितासागर चे प्रकाशक मा. श्री.सुनील पाटील यांनी पुस्तकाची बांधणी सुरेख केली आहे. त्यांचेही कौतुक केलेच पाहिजे. विद्यार्थी, शिक्षक, पालक,तरुण-तरुणींना व बाकी सर्वांनीच वाचले पाहिजे असे हे आत्मचरीत्र आहे. लेखकाचे वय पाहता आजही ते तरुणांना लाजवेल अशी शरीरसंपदा टिकवून आहेत व या वयातही लेखन प्रपंच करतात हे उल्लेखनीय आहे.त्यांच्या जीवनापासून  प्रेरणा घेऊन त्यांना उर्वरीत आयुष्य सुखाचे व समाधानाचे जावो हीच सदिच्छा देऊन मी थांबते.

परीक्षण
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे.
कुरुंदवाड, ता.शिरोळ,
जिल्हा. कोल्हापूर, 416106
मोबा.नं.9881862530

No comments:

Post a Comment