Sunday, 17 February 2019

लेख ( शेतकरी व जवान )

दोन दिवस झाले मन सुन्न झाले आहे. पुलवामा येथे आपल्या जवानांच्यावर जो आत्मघातकी हल्ला केला गेला,स्फोट घडवून आणला गेला.यामध्ये आपले नरवीर शहिद झाले. काय दोष होता यांचा ? आपल्या देशवासियांसाठीच तर ते कार्यरत होते ना ? काय बोलावे कळत नाही. शब्द थिजून गेलेत,भावना संवेदनाशून्य झाल्यात. काय चाललयं कळत नाही.आपला भारत देश कृषीप्रधान देश आहे. हे साऱ्या जगाला माहिती आहे. शेतकऱ्यांचे महत्त्व कुणीही नाकारु शकत नाही. याचे महत्त्व माजी पंतप्रधान मा.लालबहादूर शास्त्री यांनी जाणले होते. म्हणूनच 1965  ला जेंव्हा भारत-पाकिस्तान युद्ध झाले त्यावेळी त्यांनी एक राष्ट्रीय एकतेचा मूलमंत्र,म्हणजेच विजयाचा नारा दिला. तो म्हणजे जय जवान- जय किसान चा नारा दिला. आज आपण चार घास आनंदाने, सुखाने खातो ते या शेतकऱ्यांमुळेच. जो शेतकरी दिवसरात्र शेतात काबाडकष्ट करतो,प्रसंगी ऊपाशी राहतो,पण काळ्या आईची सेवा करतो,धान्योत्पादन करतो व देशाला अन्नपुरवठा करतो .दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे सिमेवर लढणारे जवान होय. या सैनिकांच्यामुळेच आपण निवांतपणे झोपू शकतो. हे सैनिक आपल्या देशवासीयांसाठी आपले प्राण,आपले सुख,कौटुंबिक जीवन बाजूला ठेऊन ,डोळ्यात तेल घालून, प्राणपणाने लढत असतात. जरा विचार करा या दोघांच्याशिवाय आपले अस्तित्व काय असते ?

आज शेतकरी व सैनिक दोघेही असुरक्षित आहेत. दोघांच्या जीवनातील स्थैर्य हरवत चालले आहे.शेतकरी आत्महत्या करतो आहे. जवान युद्धात, हल्ल्यात मारला जात आहे. ज्यांच्या जीवनात देशवासीयांच्या शिवाय दुसरा कोणताही विचार नसतो , त्यांचा विचार हे देशवासीय कीती करतात ? आज आपण वाचलयं काहघ जवान जे शहिद झालेत त्यांच्यापैकी काहींची अजून लग्न व्हायचे होते.वडील मुलाची लग्नपत्रिका वाटत असताना त्यांना त्यांच्या मुलाची शहिद झालेली बातमी ऐकावी लागते. काही जनांची नुकताच लग्ने झालेली आहेत.काहींच्या घरी मुलांचा जन्म नुकताच झालाय,कुणाची बायको गरोदर आहे.संसाराच्या आनंदमेळाव्यात रममाण व्हायचे भाग्यही यांच्या नशिबात नसते.याचा आपण विचार केला पाहिजे. कीतीतरी शेतकरी कुटुंबातील तरुण मुले आज देशसेवा करण्यासाठी सैन्यात दाखल आहेत. पुलवामा सारख्या अनेक घटना घडत असल्या तरी आपला तरुण मुलगा देशाच्या कामी आला याचा अभिमान ते बाळगतात व कणखर मनाने आपला दुसरख मुलगाही सैन्यात दाखल करतात यासारखे देशप्रेमाचे दुसरे उदाहरण कुठे नसेल.याचा पुरावा कोल्हापूर जिल्ह्यातील सैनिक टाकळी हे गांव आहे. या घरातील शेतकरी हा आपल्या कुटुंबातील तरुणांना देशासाठी अर्पण करतो. कीती ही आत्मसमर्पणाची, आत्मसन्मानाची गोष्ट आहे. त्यांचे हे योगदान खरेच अतुलनीय व वंदनीय आहे.

म्हणून सरकारने या सगळ्यांना मानाचे स्थान दिले पाहिजे व यांच्यावर जास्त लक्ष दिले पाहिजे व यांना योग्य सन्मान दिला पाहिजे. अशा कुटुंबातील मागे राहिलेल्या विधवांना, त्यांच्या मुलांना व मातापित्यांना योग्य जीवनचरितार्थाचे साधन उपलब्ध करुन दिले पाहिजे. जो हल्ला झाला त्याविरुद्ध मन पेटून उठते व मला म्हणावेसे वाटते.

कीती करावा निषेध तुमचा
भ्याड हल्ला कायरासारखा
हिम्मत असेल तर समोर या
लढतो बघा वीर शूरासारखा

शब्द गोठले,नयन थिजले
कानही झाले बधीर आपसूक
भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्या
भारतीय ह्रदयही झाले भावूक

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
9881862530

No comments:

Post a Comment