उंदीरमामा
सरसर पळतो घरभर,
इटुकला,पिटुकला उंदीरमामा
क्षणात इथे तर क्षणात तिथे,
लावतो सर्वांना कामा .
लुकलुक डोळे इवले इवले,
टुकटुक पाही सगळीकडे.
मान हालवत भरभर,
नजर टाकतो माझ्याकडे.
तुरुतुरु पळतो पायातून,
सापडता सापडत नाही.
मनीमाऊ आली की मग,
बिळातून बाहेर येत नाही.
कुरतडत बसतो माळ्यावर,
चिंध्या पसरती घरभर.
धान्याचीपण वाट लावतो,
उसंत नाही घेत क्षणभर.
पाहून तुला पळती सारे,
काठी घेऊन मारायला.
पळून पळून मागे तुझ्या,
होते मग दमायला.
काय तुझा उपयोग सांग,
निरुपद्रवी तू सगळ्यांना.
नाश करणे,उपद्रव करणे,
नको नको करी सर्वांना.
गणपती बाप्पाच्या पायी,
मान कसा रे मिळवलास?
हाती घेऊन लाडू मोठा,
कायमचा तू बसून राहिलास.
कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
No comments:
Post a Comment