Wednesday, 27 February 2019

लेख ( लेखिकांचे प्रमाण कमी का ? )

लेखिकांचे प्रमाण कमी का ?

    जर भारताचा इतिहास पाहायला गेला तर पूर्वीच्या काळी भारतामध्ये गार्गी, मैत्रेयी, लोपामुद्रा यासारख्या  ब्रह्मवादिनी स्त्रिया होऊन गेल्या. त्या इतक्या ज्ञानी होत्या की राज्यसभेत या वादविवादांमध्ये काळच्या विद्वान पुरुषांनाही हरवत होत्या. यावरून असे दिसते की स्त्री शिक्षणाचे महत्त्व पूर्वीही होते. जसा मध्ययुगीन काळ आला. हळूहळू स्त्री ही बंधनात अडकत गेली. सर्वच दृष्टीने ती गुलाम झाली. तिचे सर्व स्वातंत्र्य हरवले गेले. कालांतराने तिच्या हे अंगवळणी पडले. राजघराण्यातील स्त्रिया सोडल्या की बाकी सर्व  शिक्षणापासून दूर गेल्या. त्यामुळे आपले मत प्रकट करणे, दूरच राहिले. स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक समाजसुधारकांनी स्त्री उद्धाराचा प्रयत्न केला.   राजाराम मोहन राय, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले  यांच्यामुळे  स्त्री शिक्षणाचा पाया रोवला गेला. त्या काळात स्त्री शिकणे म्हणजे महापाप समजले जायचे. त्यामुळे शिक्षण नसल्यामुळे लिहू शकत नव्हत्या. कालांतराने स्त्री शिक्षणाची बीजे रोवली गेली. हळूहळू स्त्रिया शिकू लागल्या. स्वतःची मते मांडू लागल्या. पण हे प्रमाण खूपच कमी होते. आज स्त्रिया सुशिक्षित झालेल्या आहेत. बऱ्याच अंशी बंधमुक्त ही आहेत,पण लिखाणाच्या संदर्भात पाहायला गेले तर ही संख्या बरीच कमी आहे,  हे असे का?  सुशिक्षित  स्त्रियांचे प्रमाण पाहता लेखिका ,कवयित्री ,साहित्यिका यांचे प्रमाण फारच कमी आहे. या पाठीमागचा विचार करत असताना माझ्या मनात असा विचार आला की, स्त्रीला व्यक्त होण्याची गरज आहे. लहानपणापासूनच स्त्रीला असे सांगितले जाते , तिच्या मनावर बिंबवले जाते की स्त्री जन्म हा  स्वतःसाठी नसून दुसऱ्यासाठी,  दुसऱ्याची सेवा करण्यासाठी आहे. परंपरागत रूढीनुसार स्त्रीच्या मनात हे एवढे बिंबले  की  ती कामात एवढे मग्न झाली की तिला आपले विचार प्रकट करण्यासाठी, किंवा ते विचार कागदावर उतरवण्यासाठी वेळच मिळत नव्हता. त्यादृष्टीने कधी विचारच केली नाही. घरच्या कामामध्ये ती एवढी मग्न झाली की, तिने स्वतःचा विचार कधी केलाच नाही. चारचौघात जाणे,  समारंभात ,कार्यक्रमात जाऊन बोलणे म्हणजे तिने मर्यादा ओलांडल्या असे समजत. तिने फक्त शोभेची बाहुली म्हणून राहावे अशा प्रकारची रचना केली गेली होती. ते  स्त्रीच्या इतके अंगवळणी पडले होते की, तिला या आपल्या दास्यातून कधी बाहेर पडण्याची गरज भासली नाही. अजून सुद्धा आपण पाहतो की बऱ्याच सुशिक्षित स्त्रिया ज्यांच्या घरात सर्व सुख सोयी आहेत त्याही स्त्रिया आपला  मिळालेला मोकळा वेळ लिखाणात घालविण्याचा कधीच विचार करत नाहीत. त्याच्या पैशावर मजा मारणे, पार्ट्या करत राहणे, सजून-धजून एकमेकीला कमी लेखणे,  यातच  त्या धन्यता मानतात. आपल्या मनातले दुःख , सुख त्या जर  कागदावर  मांडू लागल्या तर यांच्या भावनांचाही निचरा होईल व त्या तणावमुक्त जीवन जगू शकतील पण हा विचार त्या करू शकत नाही कारण त्यांनी त्या दृष्टीने कधी विचारच केलेला नसतो. कोशामध्ये त्या इतक्या गुंग असतात की हे सगळं करण्याचे त्यांच्या मनातच नसतं. लहानपणी आई वडिलांच्या घरी, लग्नानंतर नवऱ्याच्या घरी, म्हातारपणी मुलांच्या सानिध्यात सुरक्षित राहणे, यातच त्यांना धन्यता वाटते.  मुलांच्या संगोपनात, त्यांना वाढवण्यात, कुटुंबाच्या सर्व जबाबदाऱ्या हसत खेळत पार पाडण्यात त्यांचा वेळ इतका जातो की त्यांना स्वतःसाठी वेळ देण्यासाठी वेळच नसतो. वाचाल तर वाचाल विचारानुसार जर त्यांनी आपला वेळ वाचनामध्ये खर्च केला तर त्या विचारप्रवण होतील व लिहू लागतील. अनेक कर्तृत्ववान स्त्रियांची चरित्रे जर त्यांनी वाचले तर खरोखरच त्यांना प्रेरणा मिळेल लिहायला लागतील व आपले जीवन हे किती सहजतेने आपण घालवतोय हे त्यांच्या लक्षात येईल. याला सामाजिक परंपरा ही कारणीभूत आहे. कारण स्त्रीने जर मनाविरुद्ध ,समाजाविरुद्ध, कुटुंबाविरुद्ध लिखाण केले तर तिच्यावर टीकेचा भडीमार होतो. तिला जीवन नकोसे करून सोडतात. त्यामुळेही काही स्त्रिया या मनात असून सुद्धा लिहू शकत नाहीत. ज्या काही स्त्रिया पुढे येऊन असे धाडसाने लिहितात रोषाला सामोरे जावे लागते हे आपण पाहतोच. पण आपली सामाजिकता अजून एवढी झालेली नाही . सर्वप्रथम घरच्यांचा तिला विरोध होतो. काही लिहिणार असलीस तर हलकेफुलके लिहित जा, नाहीतर लिहू नको असे तिला बजावले जाते. या सर्वामुळे व्यक्त होणाऱ्या भावना या अव्यक्तच राहतात. आज आपण पाहतो की काही स्त्रिया या सर्वांचा विचार न करता. विरोधाला न जुमानता लेखन करत आहेत, आपले विचार मांडत आहेत ही एक सकारात्मक बाजू आहे.  आपण आशा ठेवू या की या लिहित्या हातांच्या स्त्रियांना पाहून अनेक स्त्रिया आपले मत प्रकट करण्यासाठी पुढे येतील व लिहू लागतील. सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की त्यांना आपले मत व्यक्त करण्यासाठी एक व्यासपीठ निर्माण करून देणे आवश्यक आहे. आज आम्ही लेखिका या समूहाच्या माध्यमातून माननीय श्री मोहन कुलकर्णी यांनी स्त्रियांना हे एक हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले आहे आणि खरोखरच कधीही न लिहिणार्‍या स्त्रिया या हळूहळू व्यक्त होत आहेत ,आपली मते मांडत आहेत. हे  एक आशावादी चित्र आहे. चला तर मग या मांडा आपल्या मनातील विचार अगदी  निर्धास्तपणे   आपल्या या  मंचावर.

लेखिका
  श्रीमती  माणिक नागावे
कुरुंदवाड,  जिल्हा.कोल्हापूर

Tuesday, 26 February 2019

कविता ( वसंतऋतू )

स्पर्धेसाठी

विषय - वसंत ऋतू

हिरवाईचा नेसून शालू,
धरणीमाता सुंदर सजली.
रंगबिरंगी फुलनक्षींच्या,
वसने अनुपम ल्याली.

फुटली पालवी पानापानातून,
नवतरुणी जशी नटली.
रुप पाहूनी जलाशयात,
आपसूकच ती अशी लाजली. 

फुलला ताटवा सुमनांचा,
सुगंध आसमंती दरवळला.
भ्रमर घालतो पिंगा भवती,
मधुरस प्राशन्या दंग झाला.

फुलपाखरे भिरभिरु लागली,
विविधरंगी छटा मिरवत.
पाहून त्यांना बालचमू हा,
पकडण्या लागे मागे धावत.

आनंदाने ,उत्साहाने सारे,
करती वसंतऋतू साजरा.
जिकडेतिकडे निसर्गराजा,
फुलवितो आपला पिसारा.

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Friday, 22 February 2019

हायकू ( चैत्रमास )

स्पर्धेसाठी

हायकू

विषय-- चैत्रमास

प्रथम मास
आनंदाने वागूया
खेळ खेळूया

सूर्य येतसे
मकर राशीतच
आनंदातच

फळे व फुले
सभोवती फुलली
धुंदच झाली

हिरव्या गाली
समाधान दिसले
धरती ओली

करु स्वागत
हर्षित मनानेच
या प्रेमानेच

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चित्रचारोळी ( प्रार्थना )

उपक्रम

चारोळी

प्रार्थना

करीतो देवा तुझी प्रार्थना
कृपा करी आम्हा बालकांवरी
तोंडचा घास नको खिशात
निवांतपणा दे एवढा तरी

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Thursday, 21 February 2019

कविता ( गूज प्रितीचे )

स्पर्धेसाठी

कविता

गूज प्रितीचे

निष्पर्ण फांदीवर बसून,
गूज प्रितीचे गाऊया.
संध्याकाळ च्या सुंदर समयी,
सुखदुःख आपले सांगूया.

सूर्याचा तो सोनेरी गोळा,
साक्षीला आपल्या आहे.
पिवळसर प्रकाशात त्याच्या,
जोडी उठून दिसते आहे.

जरी निष्पर्ण वृक्षराज हा,
बहरेल पुन्हा जोमाने.
तशीच आपली प्रितही,
वाढेल बघ आनंदाने.

आशावादी असावे नेहमी,
जीवनातील या मेळ्यात.
संघर्षमय प्रसंगातही,
राहू आपण प्रेमाच्या जाळ्यात.

लाल केसरी सूर्यकडा ,
लोभवती सर्वांच्या मनाला.
सुंदर दृश्य पाहून आपले,
कविता सूचली कवीला.

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा कोल्हापूर

अष्टाक्षरी ( पुलवामा भ्याड हल्ला )

स्पर्धेसाठी

अष्टाक्षरी

पुलवामा भ्याड हल्ला

ताफा निघाला जोशात,
एकापाठोपाठ एक.
देशप्रेम ठासून भरले,
होता ह्रदयी प्रत्येक.

अचानक झाला हल्ला,
भ्याड त्या नराधमाचा.
होता तो आत्मघातकी,
होता साठा शस्त्रास्तांचा.

क्षणभर अंध:कार,
डोळ्यापुढे पसरला.
स्फोटकाच्या आवाजाने,
आसमंत शहारला.

देशप्रेमी जवान ते,
धारातीर्थी कोसळले.
शरीराच्या चिंधड्याच,
झाल्या सर्वच संपले.

हाहाकार चोहीकडे,
कींकाळ्यांनी जागे सारे.
रस्त्यावर पसरले,
देह जवानांचे खरे.

भ्याड हल्ला पुलवामा,
प्रदर्शन कायरांचे.
हींमतीने लढण्याचे,
ध्येय कधी नाही त्यांचे.

अस्ताव्यस्त पसरले,
अवशेष वाहनांचे.
नकळत अश्रू आले,
भाव हे श्रद्धांजलीचे.

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Tuesday, 19 February 2019

पुस्तक परीक्षण ( ज्ञानपंढरीचा वारकरी )

स्पर्धेसाठी

पुस्तक परीक्षण

आत्मचरीत्र
ज्ञानपंढरीचा वारकरी

पंढरीच्या पांडूरंगाचे दर्शन घेऊन वारकरी, भाविक कृतकृत्य होतात. तशाच प्रकारची भावना प्राचार्य उ.स.नाईकनवरे यांचे आत्मचरीत्र "ज्ञानपंढरीचा वारकरी " हे पुस्तक वाचताना मनात निर्माण होते. एखादे अबोध लहान मूल आपल्या आजोबांना नवीन गोष्टींची माहिती विचारते व आजोबा त्याचे बोट धरून प्रेमाने प्रत्येक गोष्ट समजावून सांगतात.अगदी तसेच वर्णन लेखकाने केले आहे. प्रत्येक गोष्टीचे असे काही अचूक व सविस्तर वर्णन केले आहे की ते चित्र हुबेहूब डोळ्यासमोर उभे राहते.अगदी तसेच हे आत्मचरीत्र वाचताना मनाची अवस्था होते.सर्व प्रसंग व घटना डोळ्यासमोर फक्त उभ्याच राहत नाहीत तर प्रत्यक्ष त्या ठिकाणी आपण उभे आहोत ही भावना होते.इतका जिवंतपणा त्यांच्या लिखाणात जाणवतो.१९२ पानांचे आय.एस.बी. एन. कोड प्राप्त हे पुस्तक राज्य शासन पुरस्कार साहित्यिक, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक डॉ. श्रीकांत पाटील यांची प्रस्तावना लाभलेले हे पुस्तक बरेच काही सांगून जाते. मनोगतातून लेखकाने थोडक्यात लेखनप्रपंचाचा आढावा घेऊन आभार मानले आहेत,यातून त्यांचा नम्रपणा दिसून येतो.सुरुवातीलाच  "रेणुका देवीच्या रमणीयेत " पासून सुरुवात करुन निवृत्तीनंतर च्या प्रवासापर्यंत अखंडपणे केलेले लिखाण त्यांचा संघर्षमय जीवनपट अलवारपणे उलगडत जाताना दिसतो.मन आपसूकच वाचनात दंग होते. पुढे काय ही उत्सुकता वाढीस लावते.मातृ-पितृ देवो भव म्हणत ते आईवडीलांच्या चरणी वेळोवेळी लीन होताना दिसतात. श्रमप्रतिष्ठा व अतिथींची,आचार्यांची सेवा हे आपले कर्तव्य मानून करतात. काळाच्या ओघात गावाचे स्वरूप कसे बदलत गेले याचे वर्णन छान पद्धतीने केले आहे." पांडुरंगाच्या प्रांगणात " प्रकरणात स्वत:चे घर,गांव सोडून आल्यानंतर आपली दिनचर्या लिहून त्याप्रमाणे कसे वागले हे सांगितले आहे.पुढील शिक्षणासाठी महाराष्ट्र विद्यालय,गुरुजन,गंमतीचे काही प्रसंग, घरची गंमत,अभ्यास याबद्दल सविस्तर वर्णन केले आहे. बेवारसपणे संडासात पडलेल्या बालकाला अनाथ आश्रमात पोहचवण्यापर्यंत त्यांनी केलेले समाजकार्य  त्यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या निवडीमध्ये कसे फायदेशीर झाले हे सांगून समाजसेवेचा वसा सर्वांना घेणेस प्रवृत्त करतात. त्यांचे गुरुजी काणे सर यांच्यामुळेच त्यांना संस्कृत, इंग्रजी व मराठी या भाषा चांगल्या प्रकारे अवगत झाल्या हे ते नम्रपणे कबूल करतात व पुढे आपल्या गुरुजनांची शिकवण्याची लकब अंगी बाणवून कसे विद्यार्थीप्रिय व लोकप्रिय झाले हेही ते सांगतात. राष्ट्रसेवादलातील सेवाभाव त्यांच्या अंगी भिनला होता.ज्यावेळी परमपूज्य साने गुरुजी हरिजनांना विठ्ठल मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून पंढरपूरात उपोषणला बसले होते तेव्हा स्वयंसेवक म्हणून कार्य करताना त्यांना साने गुरुजींचा सहवास लाभला व आपणही त्यांच्यासम व्हावे ही उदात्त भावना मनात उत्पन्न झाली ही विशेष कौतुकास्पद बाब आहे.याचाच परीपाक म्हणून जेव्हा पैलवान खाशाबा जाधव यांची हेलसिंकीला कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली त्यावेळी " खारीचा वाटा " म्हणून त्याकाळी त्यांनी अकरा रुपये वर्गणी देऊन आर्थिक मदत केली होती. "पहिला विद्यार्थी शिक्षक दिन" साजरा करताना आलेले अनुभव छान पद्धतीने मांडले आहेत.आजच्या मुलांना ते खरोखरच उपयोगी आहेत. आपल्या मित्रांच्याबद्दल लिहीताना ते हळुवार होतात व त्यांच्याबद्दल कृतज्ञता बाळगतात. पण " खरी मैत्री" या प्रकरणातून मैत्री कशी असावी याचे उत्तम उदाहरण देउन आपल्याला अशी अभिन्न मैत्री लाभली नाही याचे दु:खही ते व्यक्त करतात." कोल्हापूरच्या कुशीत " प्रकरणात त्यांच्यापुढे तीन यक्ष प्रश्न उभे राहिले , पण पाठक गुरुजींच्या सहकार्यामुळे ते प्रश्न कसे मिटले हे सांगताना ते पाठक गुरुजींच्याबद्दल कृतज्ञतेचा भाव प्रकट करायला विसरत नाहीत.
"प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग " प्रकरणात बोर्डिंगमध्ये प्रवेश मिळत नाही असे वाटल्यावर त्यांना रडू कोसळले असे लिहतात यावरून त्यांची शिक्षणाप्रतीची आस्था, तळमळ दिसून येते. राजाराम कॉलेजमध्ये असताना अनेक नामवंत प्राध्यापक त्यांना लाभले हे सांगत असतानाच इंग्रजी भाषेची आवड असूनसुद्धा आर्थिक टंचाई व वेळेचा अभाव यामुळे त्यांनी विज्ञान शाखा सोडून दिली व कलाशाखेकडे वळले. कॉलेजमध्ये  असताना मिश्री लावायची सवय कशी लागली हेही गंमतीने सांगतात. पुढे ते "कमल मंडळ" मध्ये सहभागी होऊन साहित्यिक अनुभूती मिळवू लागले. ग्रंथालयाचा वापरही त्यांनी पुरेपूर केला हे सांगून त्याचा फायदा स्व-विकासासाठी , हिंदी शिक्षक सनद व आपली शैक्षणिक योग्यता वाढवण्यासाठी कसा झाला हे सांगून "वाचाल तर वाचाल " याची प्रचिती दिली आहे. आपल्या विद्वत्तेच्या जोरावर वशिल्याशिवाय नोकरी कशी मिळते हे " महांकालीचे ममत्व " या प्रकरणात सांगितले आहे. स्वावलंबन, श्रम यावर त्यांची श्रद्धा होती त्यामुळे " स्वयंपाकाचे शिक्षण " ही त्यांनी घेतले.याचा उपयोग हायस्कूल ची पहिली तुकडी एस.एस.सी.ला बसणार होती त्यावेळी सर्वांना त्यांनी पुरणपोळीचे भोजन दिले तेंव्हा झाला.वर्गावर जाताना पाठाची तयारी कशी करत हे ही अतिशय मार्गदर्शनपर भाषेत सांगितले आहे. त्याचा उपयोग आजच्या अध्यापकांनी करायला काहीच हरकत नाही. अध्यापनाबरोबर वसतिगृहाचे व्यवस्थापनही चांगल्या प्रकारे पार पाडले आहे. प्रकरण पाच "बी.टी.चे प्रशिक्षण पर्व " मध्ये अभ्यास, सरावपाठ,  शिबीरातील सहभाग, वार्षिक परीक्षेपर्यंतचा कालावधी हे सर्व अतिशय तर्कसुसंगत पद्धतीने वर्णन केले आहे.प्रकरण
"विठ्ठलाच्या वस्तीत " मध्ये मुलाखत चांगली होऊनसुद्धा त्यांना निवडीचे पत्र न आल्यामुळे ते सरळ परिचारकांच्या घरी गेले व खरी परिस्थिती सांगितली तसेच नोकरी देणार नसाल तर मला दुसरीकडे बोलावणे आले आहे असे धिटाईने सांगितले. त्याचा परिणाम त्यांना लोकमान्य मध्ये नोकरी मिळाली. यावरून लेखकाचा बाणेदारपणा दिसून येतो.त्यांच्या आगळ्यावेगळ्या अध्यापन पद्धतीमुळे ते लवकरच विद्यार्थीप्रिय ठरले.उच्च शिक्षणाच्या ध्यासाने त्यांनी एम.ए.व एम.एड. पूर्ण केले ही प्रेरणादायी गोष्ट आहे. आजच्या युवकांच्या समोर हा आदर्श आहे.सतत काहीतरी करत राहिले पाहिजे हा संदेश यातून मिळतो. " शासकीय सेवा " प्रकरणात लेखकाच्या स्वाभिमानी मनाची उंची दिसून येते. मानसिक कुचंबणा होत असल्यामुळे त्यांनी कायमची नोकरी सोडून शासकीय सेवेत दाखल झाले व आपल्या आवडीचे क्षेत्र निवडले. नोकरीतील तारेवरची कसरत करत , उर्वरीत शिक्षण पूर्ण करून भावांचे शिक्षणही त्यांनी पूर्ण केले ही कौतुकास्पद गोष्ट आहे. यामध्ये लेखकाला त्यांच्या अर्धांगिनीचे धाडस व तिची किती मोलाची साथ लाभली हे " सौ. शकुंतलाची सोशिकता  " "विंचवाचे बिऱ्हाड " यातून व्यक्त होते. कुपमंडुकी वृत्ती न बाळगता आपल्या मुलांच्या बरोबर भावांच्या मुलांचे शिक्षण व लग्नकार्येही निरलसपणे केली यांचे वर्णनही लेखकाने सुंदर केले आहे." अंबपच्या आमराईत " प्रकरणातील नवोपक्रम खूपच उपयोगी व मार्गदर्शक आहेत.ज्यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले व लौकिक वाढला.
" कौटुंबिक कर्तव्ये " प्रकरणात निवृत्तीनंतर कौटुंबिक साऱ्या जबाबदाऱ्या कशा लिलया पार पाडल्या याचे वर्णनही खूप मौलिक आहे. आजच्या पिढीला मार्गदर्शक आहे."हात ओला तर जावई भला " व
"कट्ट्यावरील काथ्याकूट" या शिर्षकाखाली विनोदी पद्धतीने परंपरागत चालत आलेल्या रुढी सांगून त्याला विधायक गती कशी दिली हे प्रभावीपणे मांडले आहे.
" साठवणीतील सह्रदयी " या प्रकरणात लेखकाने त्यांच्या आयुष्यात आलेल्या अनेक व्यक्ती ज्यांनी त्यांच्या जीवनाला आकार दिला अशा व्यक्तींची शब्दचित्रणे रंगवली आहेत व त्या व्यक्तींना त्यांनी उच्चपदावर  नेऊन ठेवले आहे. कृतज्ञता व्यक्त करण्याची ही पद्धत मनाला खूप भावते.
" समाज सेवा " या प्रकरणात लेखकाने लहानपणापासून दुसऱ्यासाठी काहीतरी करावे असे वाटत होते असे सांगून नोकरी सांभाळून कशाप्रकारे समाज सेवा करता येते याची उत्तम उदाहरणे दिली आहेत जी आजच्या पिढीला प्रेरणादायी आहेत." परिचय प्रवाह " या प्रकरणात लेखकाने स्वतःच्या जन्मापासून आजतागायतचा जीवनप्रवास तारखांसह स्पष्ट केला आहे. त्यामुळे त्यामध्ये काहीच खोटेपणा नाही हे सहजसिद्ध होते.शैक्षणिक जीवनातील कृतीसत्रांनी कर्तव्य निष्ठा, लेखनाने बौद्धिक पूर्णता व अर्थार्जनासाठी केलेल्या प्रवासातून कसे पांडित्य मिळाले याची माहिती दिली आहे." विशेष बाबी " या शेवटच्या प्रकरणात लेखकाने आपली शैक्षणिक योग्यता वाढवल्यामुळे शिक्षकी पेशाबरोबर अनेक उच्च पदांवर कुठे कुठे कार्यरत होते याचा आढावा घेतला आहे. त्याचप्रमाणे मान्यवरांची शिफारस पत्रे ही त्यांच्या जीवनातील उमेद देणारी होती हे सांगून अभिनंदन पत्रे ही कशी प्राणवायूसारखी उपयुक्त ठरली याचा उहापोह केला आहे.लेखकाचे जीवन म्हणजे एक आदर्शवत उदाहरण आहे. सर्व गोष्टी प्रांजळपणे व ओघवत्या शैलीत मांडल्यामुळे वाचकाला कंटाळा तर येतच नाही उलट पुढे काय ? ही उत्सुकता लागून राहते.पुस्तकातील फोटो लेखकाच्या कार्याचा पुरावा देतात.मुखपृष्ठावरील अनुस्वारात दाखवलेला पंढरीचा विठ्ठल मनाला सुखावून जातो.लेखकाचा तरूणपणीचा फोटो करारी व ध्येयनिष्ठता दर्शवतो.तर उघडलेले पुस्तक व पिसाची लेखणी हे लेखकाचे पारदर्शी जीवन हे या उघडलेल्या पुस्तकाप्रमाणे स्पष्ट आहे हे दाखवते. मलपृष्ठावरील लेखकाची माहिती त्यांच्या व्यक्तिमत्वाची उंची वाढवते.कवितासागर चे प्रकाशक मा. श्री.सुनील पाटील यांनी पुस्तकाची बांधणी सुरेख केली आहे. त्यांचेही कौतुक केलेच पाहिजे. विद्यार्थी, शिक्षक, पालक,तरुण-तरुणींना व बाकी सर्वांनीच वाचले पाहिजे असे हे आत्मचरीत्र आहे. लेखकाचे वय पाहता आजही ते तरुणांना लाजवेल अशी शरीरसंपदा टिकवून आहेत व या वयातही लेखन प्रपंच करतात हे उल्लेखनीय आहे.त्यांच्या जीवनापासून  प्रेरणा घेऊन त्यांना उर्वरीत आयुष्य सुखाचे व समाधानाचे जावो हीच सदिच्छा देऊन मी थांबते.

परीक्षण
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे.
कुरुंदवाड, ता.शिरोळ,
जिल्हा. कोल्हापूर, 416106
मोबा.नं.9881862530

चित्रचारोळी ( शिवाजी )

स्पर्धेसाठी

चित्रचारोळी

चौखूर उधळला होउन स्वार
अश्वावरती थोर शिवाजी खास
घेऊन हाती तलवार तळपती
निघाला निर्दालण्या दुष्मनास

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड जिल्हा. कोल्हापूर

कविता ( राजे मनामनातले )

स्पर्धेसाठी

शिवकाव्य

विषय- राजे मनामनातले

शिवनेरीगड पावन झाला,
पाहून बाळ शिवबाला.
कौतुकाने निरखत राहिला,
शिवबांच्या गोड बाळलीला.

माता जिजाऊ थोर माउली,
खाणच जणू संस्काराची .
दिले बाळकडू रणनीतीचे,
पेटवली मशाल स्वातंत्र्याची.

जमवून मावळे सोबतीला,
शपथ रायरेश्वरी घेतली.
स्वराज्याचा रचला पाया,
चिंगारी मनी अशी पेटली.

तंत्र गनिमी काव्याचे ,
दुष्मन कापे थरथर.
सर करतच निघाले पुढे,
काबीज गड कील्ले भरभर.

गरीबांचा वाली छत्रपती,
मानली परस्त्री मातेसमान.
आधार ठरला शेतकऱ्यांना,
वाटती सर्वां देवासमान.

राजे मनामनातले खास,
प्रेरणास्थान भावी भारताचे.
घातले अंजन जनतेला,
जातपात विरहित समाजाचे

छत्रपती शिवाजी महाराज.
दैवत ठरले सकलजनांचे,
अंगी बाणवून शूरवीरता,
करुया मनोभावे नमन तयांचे.

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
9881862530

चारोळी ( दैवत छत्रपती )

स्पर्धेसाठी

चारोळी

विषय - दैवत छत्रपती

हिंदवी स्वराज्य संस्थापक
ठरला कर्दनकाळ परकीयांचा
दैवत छत्रपती,साऱ्या रयतेचा
अभयस्थान दिले स्त्रीजातीला

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
9881862530

हिंदी लेख ( शिवाजी महाराज )

शिवाजी महाराज- धर्मनिरपेक्ष महान सेनानी

अपनी राजनीती , पराक्रम के कारण पूरे विश्व में वंदनीय राजा छत्रपती शिवाजी महाराज का जन्मदिवस 19 फरवरी 1630 को शिवनेरी दुर्गपर हुआ। बचपनसेही शिवाजी महाराज को उनकी माता माँ जिजाऊ ने बडे संस्कारोंमें पाला। रामायण, महाभारत और नीतीकथाएँ सुनाई और अनेक नितीपरक बातें भी बताई।साथ ही साथ दादोजी कोंडदेव की सहायतासे युद्धनीती , तलवार चलाना,भाला फेंकना, तीर चलाना, घुडस्वारी करना,इ. करतब भी अच्छी तरहसे सिखाया। एक सच्चा वीर बनाया। शिवाजी महाराज के सामने उनके माता-पिता का आदर्श था।बचपन में जब उन्होंने देखा की  शासकवर्ग सामान्य जनतापर हुकुमत जताते हैं और उनपर जुल्म करते हैं। यह देखकर उनका मन दुखी होता,छटपटाता था। यह सब देखकर उनका बालमन स्वाधीनता के लिए रो उठता और उनका मन इसतरह स्वाधीनता के लिए बचपनसेही तैयार हो गया था। उन्होंने अपने साथीयोंको इकठ्ठा किया और अपनी एक फौज तैयार की, संगठन बनाया , जिसे " मावला " कहते थे। रायरेश्वर के मंदिर में उन्होंने स्वराज्य की शपथ ली। प्रतिकूल परीस्थिती , संघर्षमय जीवन के कारण सब कुशल योद्धा बन गये। शिवाजी महाराज के संगठन में हर जाती के लोग शामिल थे।उन्होंने कभी भी जातीयता नहीं दिखाई या नहीं जताई। सोलह साल के खेलने के उमर में वे स्वराज्य के काम में लग गए। दुर्गोंपर आक्रमण करना शुरु किया। सबसे पहले तोरणा दुर्ग जीता जिसका उन्होंने स्वराज्य का तोरण के तौरपर तोरणा यह नाम दिया। स्वराज्य की नींव डाली. इसके बाद उन्होंने एक के बाद एक दुर्ग जीतना शुरु किया।उनके मावल सेना में तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, जैसे वीर मराठा तो इब्राहिम खान,दौलतखान, मदारी मेहतर,जैसे वफादार मुस्लिम सैनिक भी थे।शिवाजी महाराज के वकील काजी हैदर थे। महाराज धर्मनिरपेक्ष थे।सभी धर्मोंका वे आदर करते थे।वे जातिभेद से परे थे।सभी धर्मोंके लोग हँसी-खुशी से,मिलजुलकर रहें ऐसा वह चाहते थे। अपने प्रजा,जनता के प्रती वे सजग रहते थे।सबको समान मानते थे।राष्ट्रीय एकात्मता का वे अच्छी मिसाल थे।तभी तो वे सबके चहेते बन गये।

शिवाजी महाराज एक धुरंधर सेनानायक, कुटनितीज्ञ होने के कारण और मनुष्यबल की कमी के कारण उन्होंने भौगोलिक परिस्थिती का फायदा उठाया और गनिमी कावा की युद्धनीती का अवलंब करके दुश्मनोंको नामोहरम किया,नेस्तनाबूत किया।वे दुश्मन पर अचानक हमला बोल देते थे। सह्याद्री का पूरा इलाका वे और उनके साथी बखुबी जानते थे। इसकारण वे कभी परास्त नहीं हुए।इसके लिए उनके वफादार साथीयोंका हमेंशा उन्हें साथ मिला। अपने साथियोंके दिलों में शिवाजी महाराज ने स्वराज्य की ऐसी लौ पैदा की थी के वे उसके लिए मरमिटने को भी तैयार थे।उनकी चमकती तलवार की धार से दुश्मन भयभीत हो उठतते।वे प्रजाहितदक्ष राजा होने कारण अपनी जनता के प्रती राजा होने के नाते आदरभाव रखते थे। उनका खयाल रखते थे।दिनदलित लोगोंके साथ औरत/स्त्रीके प्रती उनकी भावना वंदनीय थी। वे दुसरे स्त्री को अपनी मातासमान मानते थे। जब आबाजी सोनदेव ने कल्याण का खजाना लूटा तो उसके हाथ कल्याण के सुबेदार की बहू लग गयी।शिवाजी महाराज खूष होंगे यह सोचकर उसने उस रुपवान, बहू को शिवाजी महाराज के सामने लाकर खडा कीया। जैसे ही शिवाजी महाराज ने उस रुपवती युवती को सामने पाया तो उन्होंने अपनी नजरें नीचे की और कहा की , "अगर हमारी माँ इतनी सुंदर होती तो हम भी इतने सुंदर होते " सुनकर दिल आदर से भर आता है। उन्होंने सोनदेव को ऐसा करने के लिए फटकारा और बडे सम्मान के साथ उस स्त्री को उसके घर छोड आने को कहा। वो स्त्री शिवाजी महाराज की तरफ आश्चर्यचकित नजरोंसे, आदरसे देखने लगी और निश्चिंत भी हो गयी। उनके राज्य में बहन-बेटीयाँ सुरक्षित थी। अगर गलतीसे भी कीसी स्त्रीपर कोई अन्याय-अत्याचार करता तो उसकी खैर नहीं थी। जो अत्याचार करता उसके दोनों हाथ-पैर तोड दिए जाते थे।इस सजा को " चौरंगा " कहा जाता था। वह आदमी न जी सकता था न मर सकता था। सिर्फ पछतावा करते हुए मौत की राह देखता और उसे देखकर बाकी लोगोंके दिलोंमें दहशत बैठती की ऐसा काम न करें। आजकल की परीस्थीतीमें शिवाजी महाराज की याद तो बहुत आती है।क्योंकी आजकल का माहौल बहु-बेटीयोंके लीए जरा भी सुरक्षित नहीं है। ऐसे थे न्यायी शिवाजी महाराज।वे एक अच्छे अर्थतज्ज्ञ भी थे।जब अपने हाथोंमें कारोबार ले लिया तब उन्होंने सबसे पहला यह काम कीया की जो वतनदार लोग थे, जो जनता को त्रस्त करते थे,उनकी वतनदारी बंद कर दी। हर एक खेती में काम करनेवाले मजदूरोंको खेती बाँट दि।साथ ही साथ उन्हें बीज,खाद,बैल,औजार भी दिये ताकी वह सम्मान की जिंदगी बसर करें । वह जितना उगाता सिर्फ उसपर ही लगान लगाते थे और कभी फसल नहीं होती तो लगान माफ कर देते थे। इसतरह कृषी और किसानोंकी हालत अच्छी हुइ और ,वह संभल गए और आर्थिक स्थिती भी सुधर गयी।

ऐसे थे शिवाजी महाराज एक महान सेनानी, राजा, छत्रपती , कुलभूषण, प्रजाहितदक्ष, महिलाओंके मसिहा। उन्हें मेरा शतशत नमन .

प्रजाहितदक्ष राजा शिवाजी
माँ जिजाऊ का प्यारा दुलारा
कर्तव्यनिष्ठ, स्त्रीप्रतीपालक
हिंदवी स्वराज्य संस्थापक न्यारा।

लेखिका
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
9881862530