स्पर्धेसाठी
लेख
शिक्षण क्षेत्रातील शिक्षकांची परवड
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा,
गुरु साक्षात परब्रम्हं तस्मै श्री गुरवे नमः।
असे शिक्षकांच्या बद्दल पूर्वीपासूनच म्हटले जाते. गुरूमध्ये साक्षात परब्रम्हां ला पाहिलं जायचं. पूर्वी विज्ञान युगाचा, तंत्रज्ञानाचा एवढा विस्फोट झालेला नव्हता. त्यामुळे ज्ञान मिळवण्याचे एकमेव साधन गुरुच होते. शिकलेले लोकही जास्त नव्हते, त्यामुळे सर्व गाव शिक्षकांच्या सल्ल्याने मार्गदर्शनाने, चालायचा. पण आजचे युग हे संगणकाचे विज्ञानाचे युग असल्यामुळे आज आपणाला एका क्लिकवर सर्व माहिती सहजरीत्या मिळू शकते लोकही आता शिकून शहाणे विचार करणारे झालेले आहेत. त्यामुळे त्यांना छोट्या-मोठ्या गोष्टीसाठी शिक्षकांच्यावर, गुरूंच्या वरच अवलंबून राहण्याची गरज भासत नाही.परंतु त्या ज्ञानापर्यंत कसे पोहोचायचे हे ज्ञान घेण्यासाठी गुरुची आवश्यकता ही कायम राहणारच. कारण गुरू हा भावनाशील, संवेदनशील मनाचा असतो. तशा भावना कोणत्याही यांत्रिक उपकरणात आपल्याला पाहायला मिळत नाहीत.
आज-काल शिक्षण क्षेत्रामध्ये बरेच बदल झालेले आहेत. आज भरपूर संदर्भ साधने उपलब्ध असल्यामुळे विद्यार्थ्यांचा बुद्ध्यांक हा सहजच वाढलेला आहे. शाळा ही डिजिटल झालेली आहे. ऑनलाइन शिक्षणाची सुरुवात झालेली आहे.शिक्षकांना ऑनलाईन ट्रेनिंग दिले जात आहे. हा बदल तरी चांगला असला तरी बरेच पूर्वीचे शिक्षक ज्यांना याबद्दल काहीच माहिती नसते त्यांना हे फार अवघड जाते. पण यांना दुसरा मार्गच नसतो. नाईलाजास्तव कसे तरी त्यांना ट्रेनिंग पूर्ण करावे लागते. शिक्षणाचे पवित्र काम करत असताना आज शिक्षकांना पूर्णवेळ लक्ष देऊन शिकवण्यासाठी वेळ मिळेनासा झालेला आहे. त्यातच शालाबाह्य उपक्रमांची , परीक्षांची , विविध स्पर्धांची संख्याही खूप वाढत असल्यामुळे व शिक्षकांना इतर अशैक्षणिक कामांचा बोजा वाढत असल्यामुळे त्यांना पूर्णवेळ वर्गामध्ये लक्ष देऊन शिकवण्यास मिळत नाही. आता जरी तो कायदा अमलात आणण्याचा विचार जरी चालू असला तरी आतापर्यंत पर्यंत नापास न करण्याच्या धोरणामुळे विद्यार्थी चिंतामुक्त होऊन निवांत राहिला.पण शिक्षकाला मात्र अध्यापनाचे मिळेनासे झाले. हल्ली शाळांचे प्रमाण इतके वाढलेले आहे की एका गावात चार चार शाळा निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची ओढाओढ सुरू आहे. शिक्षकांना आमच्या शाळेत विद्यार्थ्यांना घाला असे लाचार पणे सांगत विद्यार्थ्यांच्या, पालकांच्या दरवाजात जावे लागत आहे. त्यामुळे शिक्षकांच्या बद्दलची आदराची भावना कमी झालेली आहे. आपोआपच शिक्षकांची शाळेत व समाजात ही परवड होत आहे. अनेक कायम विनाअनुदानित शिक्षकांची कथा तर विचारायलाच नको. पंधरा ते वीस वर्ष कमी पगारावर अध्यापनाचे कार्य करीत आहेत. त्याची मानसिक स्थिती कशी असेल याचा विचारच न केलेला बरा.मी एक असा शिक्षकांचा नेता पाहिलेला आहे त्यांच्या मागण्या मान्य होण्यासाठी गेली अडीच वर्ष चप्पल न घालता उन्हातानात ते फिरत आहेत, प्रचंड त्रास सहन करत आहेत. तरी पण त्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत. त्यांनी हे किती सोसायचं ? कुठवर त्यांची परवड होणार आहे ? आहे उत्तर याचं कुणाकडे ? संगणक, टीव्ही, मोबाइल यांचा वाढता वापर व त्यामुळे विद्यार्थ्यांचे अभ्यासाकडे होणारे दुर्लक्ष व त्यातच पालकांची उदासीनता किंवा आपल्या पाल्याकडे वेळ द्यायला पालकांच्याकडे वेळच नसणे. या सर्व कारणांमुळे शिक्षण क्षेत्रात होणारे अधोगती व याला सर्वस्वी जबाबदार धरला जातो तो म्हणजे शिक्षक. पण एकट्या शिक्षकाला दोष देऊन चालणार नाही. यासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन त्याच्यावर विचारविनिमय केला पाहिजे. व शिक्षकांची होणारी परवड कमी करण्याचा प्रयत्न करून त्यांना शिक्षणासाठी जास्त वेळ कसा देण्यात येईल याकडे लक्ष दिले पाहिजे. असे जर झाले तरच येणारी भावी पिढी सुसंस्काराने, शिक्षणाने, विचाराने प्रगल्भ होईल. व माजी राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या स्वप्नातील भारताचे रुप पहायला मिळेल.
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
No comments:
Post a Comment