Sunday, 30 June 2019

लेख ( जागतिक योगदिन )

   जागतिक योग दिन

आजच्या युगात ताण-तणाव एवढा वाढलेला आहे की  तणावरहित वातावरण मिळवण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करीत आहेत. प्राचीन काळापासून योग ओळखला जातो. योगाच्या सहाय्याने लोक  मन:शांती मिळवत होते. आज योगाचे महत्त्व वाढलेले आहे. योगाचा अर्थ जोडणे असा होतो. शारीरिक आणि मानसिक आरोग्य एकदुसऱ्याशी व्यवस्थित ठेवण्याचे  महत्त्वपूर्ण काम योगासन करते. प्राणायाममुळे आपल्या मनाची,शरीराची शुद्धी होउन मन निर्मळ होते व प्रतिकारशक्ती वाढते.मनाची एकाग्रता वाढते.योग ही वैज्ञानिक जीवनशैली आहे. योगामुळे मनाची नकारात्मकता जाउन सकारात्मकता वाढते.सकारात्मक वृत्तीमुळे मनाची उदासीनता निघून जाते.  उलट आलेल्या तणावांतून, संकटातून मुक्ती मिळवण्याचा रस्ता आपोआपच शोधला जातो.

संस्कृत मध्ये असे म्हणतात, "  शरीर माध्यम खलु धर्मसाधनम् " म्हणजेच चांगलं काम जर आपल्याला करायचे असेल तर त्यासाठी प्रथम आपणाला आपले शरीर निरोगी आणि चांगले ठेवले पाहिजे. कारण कोणतेही काम करत असताना जर आपले मानसिक आरोग्य चांगले असेल तर आपण ते काम चांगल्या पद्धतीने करु शकतो. दररोज ठराविक वेळेला जर आपण योगासने केली तर शरीरामध्ये चैतन्य प्राप्त होते व आपण एक चैतन्यदायी व आनंददायी अशा प्रकारचे शांतीचे जीवन जगु शकतो.स्वास्थ्य जर चांगले असेल तर कोणतेही काम आपण पूर्ण शक्तीनिशी करू शकतो.

योगामुळे शारीरिक तंदुरुस्ती मिळते, काम करायला चांगले वाटते. दररोज जर आपण सूर्यनमस्कार, कपालभाती, प्राणायाम नियमित केले तर आपले वजन सुद्धा कमी होण्यास फायदेशीर आहे. पण त्यासाठी संतुलित आहाराची सुद्धा गरज आहे. दररोजच्या आपल्या जीवनात अनेक  प्रसंग येतात की त्यावेळेला आपले मन अशांत होते, तणावपूर्ण वातावरण निर्माण होते. योगामुळे शरीरामध्ये तणाव निर्माण करणारे जी काही विषद्रव्ये आहेत ती बाहेर फेकून दिली जातात. मनाची शांती मिळवण्यासाठी एकांत मिळवण्याचा आपण नेहमीच प्रयत्न करत असतो. योगासन जर आपण केले तर आपल्या बाह्य मनाबरोबर आंतर्मनाचीही शुद्धी होते व आपले मन आपोआपच शांत होते. आपले मन व शरीर योग केल्याने बलशाली बनते व आपल्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढते. आपण नेहमी कोणत्या ना कोणत्या कामामध्ये व्यस्त असतो. आपल्या मनामध्ये खूप विचार एकत्र येत असतात ,त्यामुळे आपण आपले मन एकाग्र करू शकत नाही. अशावेळी योग आपल्याला फायदेशीर होते. ज्यामुळे आपण भूतकाळातील एखाद्या घटनेची प्रेरणा घेऊन वर्तमान काळामध्ये ती अगदी सजतापूर्वक  करून आपण आपला भविष्यकाळ चांगला बनवू शकतो. घरामध्ये अनेक व्यक्ती असतात प्रत्येकाचा स्वभाव हा वेगवेगळा असतो. त्यामुळे बऱ्याच वेळा कलह निर्माण होण्याची शक्यता असते. योगामुळे आपले मन संवेदनशील बनते. एक दुसर्‍याच्या प्रती आपल्या मनामध्ये चांगले संबंध निर्माण होतात. आजच्या युगामध्ये काम करण्यासाठी आपणा सर्वांनाच बाहेर जावे लागते. बाहेरची गर्दी, वाहतुकीची कोंडी यामुळे शरीर थकून जाते. मन उदास होते. अशा वेळी जर आपण नियमितपणे योगा जर करत असू तर आपले शरीर आणि मन दोन्हीही नेहमी उत्साही राहते. आपल्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते. त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये सौंदर्य, लवचिकता आणि चेहऱ्यावर, शरीरावर तेज दिसू लागते. योगा मध्ये सर्वात महत्त्वाचे आहे ते म्हणजे ध्यानधारणा. ध्यानधारणा केल्यामुळे आपण कोणत्याही गोष्टीचा कधीही तणाव घेत नाही व कोणताही निर्णय कधी, कसा घेतला पाहिजे याची प्रेरणा मिळते.

योग ही सतत चालणारी प्रक्रिया आहे .त्यामुळे जर आपण योगासन,प्राणायाम नियमितपणे केला तर आपले जीवन हे कायमचे उत्साहपूर्ण व आनंददायी होते आणि ते तसे आनंददायी बनवण्याचे  आपले कर्तव्य आहे.चला तर मग आपल्या आरोग्याची गुरुकिल्ली आपल्याच हातात आहे.तीचा योग्य वापर करुया.

लेखिका
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड,
9881862530.

No comments:

Post a Comment