Saturday, 29 June 2019

लेख (आई होताना )

             आई होताना....

सण 17 ऑगस्ट 1991 हा दिवस उजाडला माझ्या मातृत्वाला आकार आला. गोंडस परीने माझ्या घरी जन्म घेतला. तिच्या बाललीला पहात तिला मोठं करण्यात माझा वेळ कसा गेला समजले नाही. 12 जुलै 1996 ला  मातृत्वाला परिपूर्णता मिळाली.  माझ्या घरी माझ्या मुलाच्या आगमन झाले. सर्वजण आनंदात होतो. वर्षे कशी गेली कळलंच नाही.  अतिशय लाडाकोडात  व संस्कारात वाढलेली माझी मुले  अभ्यासातही हुशार होती. म्हणतात ना चांगल्या गोष्टीला नजर लवकर लागते. अगदी तसेच झाले.  माझ्या पतींचे एका रस्ते अपघातात आकस्मिक निधन झाले. माझी मुले लहान वयातच पोरकी झाली. माझ्यावर आकाशच कोसळले. काय करावे काही कळत नव्हते. दिशाहीन तारू सारखी माझी जीवननौका हेलकावे खात होती.  सर्वांनी मला धीर दिला.  आई, वडील, भाऊ ,भावजय,दीर जाऊ  सर्वांनी मला आधार दिला,  परिस्थितीची  जाणीव करून दिली. माझ्या दोन मुलांना समोर पाहिल्यानंतर मी भानावर आले. पती गेल्याच दुःख तर होतच पण या मुलांना वाढवण्याचा आव्हान माझ्यासमोर होतं. ते तर आता मलाच पेलायचं होतं. मी थोडी सावरले. पण त्यामध्ये एक वर्ष निघून गेले. हळूहळू मी सर्वांच्या मदतीने दैनंदिन कामकाज करु लागले. मुले अगदीच लहान होती. त्यांच्याकडे पूर्ण लक्ष दिलं. बापा पाठीमागे मुलांचं कसं व्हायचं हा एक प्रश्न माझ्यासमोर उभा होता. कारण आईबाप असताना सुद्धा अनेक मुलं वाया गेलेली मी पाहिली होती. माझी मुलं जरी लहान असली तरी सुद्धा घरातील परिस्थिती पाहिल्यानंतर त्यांना अकाली शहाणपण आलेलं होतं, एक जमेची बाजू होती. मुलाची चौथी परीक्षा झाल्यानंतर त्याच्याच मर्जीने आम्ही त्याला वारणा येथील तात्यासाहेब कोरे मिलिटरी ऍकॅडमी मध्ये भरती केले. पण आजपर्यंत कधीही त्याला बाहेर ठेवलेले नव्हते त्यामुळे खूपच द्विधा अवस्था झाली होती. भावनातिरेकाने डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते. तसंच हृदयावर दगड ठेवून ती वर्ष मी कशी काढली याचं वर्णन मी कोणत्याही शब्दात करू शकत नाही. तो तिकडे कसा राहत असेल याच विचाराने मन नेहमी बेचैन होत असे. महिन्यातून एकदा पालक भेट असे.  जाताना मन फुलपाखरू सारखं हलके होऊन वेगात पुढे जायचं पण परत येताना मात्र मन एवढे जड झालेलं असायचं की पाऊल उचललं जायचं नाही.  मुलगी माझ्याजवळ होती. तिचं शिक्षण चालू होतं.   ती समंजसअसल्यामुळे तिच्या शिक्षणामध्ये कोणतीही अडचण आली तरी तिने अत्यंत धाडसाने त्याला तोंड दिले. व आपले शिक्षण पूर्ण केले. तिने इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या क्षेत्रातून तिने  एम. ई. पदवी  प्रथम क्रमांकाने प्राप्त केली. इंजिनिअरिंग कॉलेज वर तिला नोकरी करायची होती पण  कुठेही नोकरीची शक्यता नव्हती, किंवा वशिला नव्हता असे आपण म्हणू शकतो. आता पुढे काय करायचे? मग तिने निर्णय घेतला कि पुण्याला जाऊन सी-डॅक करायचे. मीही तिला मोठ्या मनाने जाऊ दिलं. तिथे तिने चांगल्या पद्धतीने तो कोर्स पूर्ण केला व  व त्यांच्या मार्फतच चांगल्या कंपनीमध्ये नोकरीला सुद्धा लागली. तिकडे मुलानेही होस्टेलवर राहून ही पदवी मिळवली. इंजिनीयर झाला. त्याने स्वतः प्रयत्न करून मुलाखत दिली एका चांगल्या कंपनीमध्ये तोही नोकरीला लागला. ही त्यांच्या त्यांच्या कंपनीमध्ये चांगल्या पद्धतीने कार्यरत आहेत. याचा मला सार्थ अभिमान आहे. वडिलांचे छत्र नसतानाही कोणत्याही प्रकारचे अवगुन माझ्या मुलांच्या मध्ये नाहीत. खरंच मी स्वतःला खूप भाग्यवान समजते. पैसा तर मिळतच राहतो, पण संस्कार सर्वात महत्त्वाचे आहेत. आज मी तिला मी खरोखरच सुखी आहे ,समाधानी आहे. मला माझ्या मातृत्वाचा गौरव आहे, अभिमान आहे.

लेखिका
  श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा ,कोल्हापूर

No comments:

Post a Comment