Tuesday, 7 April 2020

समीक्षण ( मनुदांच्या कथा)

लेखक मनोहर भोसले यांच्या मनुदांच्या कथा या पुस्तकाचे केलेले परीक्षण

दैनंदिन जीवनात आपल्याला अनेक सुखदुःखाच्या प्रसंगांना सामोरे जावे लागते. कालांतराने आपण ते विसरूनही जातो. काही घटना अशा असतात की त्या आपल्या कायम स्मरणात राहतात. ज्यांचा पिंडच साहित्यिकाचा असतो ते आपले प्रसंग शब्दरुप करुन चिरंतन ठेवतात. असाच विचार करून लेखक मनोहर भोसले यांनी त्यांच्या "मनुदांच्या कथा" या पुस्तकात त्याच्या आयुष्यात आलेल्या प्रसंगाचे अतिशय सुंदर शब्दात वर्णन केलेले आहे. सर्वांना समजेल अशा ओघवत्या भाषेमध्ये त्यांनी लेखन केले आहे. पात्रानुरुप भाषा,  त्यांचे आपापसातील  संवाद, गोष्टीतील वर्णनात्मक भाषा वाचताना ते प्रसंग डोळ्यासमोर उभे राहतात.व ती गोष्ट अनुभवतो आहोत असा भास होतो.एकुण पंधरा कथा या पुस्तकात आहेत.आयुष्यभर निस्वार्थी सेवा करणाऱ्या शिक्षकाची शेवटी कशी वाईट परीस्थिती होते हे "चहा आणि बिस्किटे" या कथेतून मांडत असतानाच संधी ही चहात बुडवलेल्या बिस्किटासारखी असते हा मोलाचा संदेश देणाऱ्या मास्तरीणबाईंना छान शब्दबद्ध केले आहे.शेवट मनाला चटका लावून जातो.कारण लेखक शेवटी लिहतात की मी प्रत्येकवेळी बिस्कीट पुडा घेऊन जातो पण आता मला चहा मिळत नाही.

व्यक्ती तितक्या प्रकृती असतात.कुणाच्या जीवनात कधी कलाटणी मिळेल सांगता येत नाही. मनात ठरवले की कोणतीही गोष्ट साध्य होते हे "गणपती बाप्पा" या कथेतून छान मांडल आहे. "मेजर साहेब "कथेतून सहनशीलतेचा अंत बघू नये हे मेजरसाहेबांच्या उदाहरणावरून त्यांनी छान व्यक्त केले आहे. आजही तृतीयपंथीयांच्याकडे एका विचित्र नजरेने पाहिलं जातं. त्यांची हेटाळणी केली जाते.  पण या लोकांच्यातही एक संवेदनशील मन असते व तेही एखादं चांगलं काम करू शकतात हे "होय, मी देव पाहिलाय"  या कथेतून आपल्याला पाहायला मिळते. सीमेवर रात्रंदिवस लढणाऱ्या जवानांची मनस्थिती व त्यांच्या कुटुंबीयांच्या मनस्थितीचे वर्णन व जवानांच्या पत्नींना आयुष्यभर वाट पाहणेच कसे नशिबी येते याचे सुंदर वर्णन " अविस्मरणीय दिवाळी" या कथेमध्ये केले आहे. लहान मुलांची मने किती निरागस असतात. योग्य त्या पद्धतीने पटवून सांगितले तर त्यांच्या बालमनाला ते किती सहज पटते व आपल्या हातून एखादे चांगले कार्य सहज घडून जाते याचे वर्णन" अजब आहे ना...?" या कथेतून केले आहे.समाजामध्ये काही असे लोक असतात की जे फक्त देवाचे नाव घेतात पण त्यांची कृती मात्र त्याच्या विरोधी असते. माळकऱ्यांच्या पंक्तीत बसलेल्या माणसाला तिथून उठवले जाते. उठल्यानंतर त्याचा अपमान होतो. त्याचा स्वाभिमान जागा होतो. तो रागाने न जेवताच निघून जातो हे जेव्हा कीर्तनकारांना समजते याबद्दल ते लोकांना खडे बोल सुनावतात. फक्त भजन कीर्तन करून काहीच उपयोग नाही. देव हा भावाचा भुकेलेला आहे हे लोकांना पटवून सांगतात." हरी मुखे म्हणा...."  या कथेतून हाच विचार लेखकाने मांडला आहे.तसेच"माळकरी झाला धन्या" या कथेत मानवी मनाच्या निग्रहाचे उदाहरण खूप छान पद्धतीने रेखाटले आहे.दारु पिणारा धन्या जेंव्हा मनोनिग्रहाने दारु सोडतो,तेंव्हा लोकं त्याची खूप चेष्टा करतात.त्याला अमिष दाखवले जाते ,पण निग्रह कसा तडीस जातो याचे प्रत्यंतर या कथेतून येते."महापूर" या  कथेतून जेव्हा नैसर्गिक आपत्ती येते त्यावेळी जे खरे गरजू असतात अशा लोकांना मदत मिळत नाही.पण ते लोक आपले जीवन विनातक्रार जगत असतात. वर्तमान पत्रकातील बातम्यांचे कात्रण लेखकांनी ठेवलेले आहे व महापुरानंतर जेव्हा ते त्या व्यक्तींना भेटतात त्यांचे फोटो त्यांना दाखवतात तेंव्हा लोकांना किती आनंद होतो याची मोजदादच नसते. समाजात चांगले आणि वाईट असे दोन्ही लोक राहत असतात. पण गरिबीतही सुख शोधणारे कमीच असतात. स्वतः गरीब असून सुद्धा हरवलेले पैशाचे पाकीट जेव्हा एखादी व्यक्ती परत देते व मी फार सुखी आहे असे म्हणते.तेंव्हा माणुसकी आपल्याला जवळून पाहायला मिळते. अशा एका घटनेचे वर्णन" माणुसकीच्या जातीचा" या कथेत लेखकाने केले आहे. झाडांच्या पासून आपल्याला ऑक्सिजन मिळते. म्हणून झाडांचे जतन करणे हे आपले कर्तव्य आहे. पण हे जतन करताना लोकांना कोणत्या पद्धतीने समजावून सांगितले पाहिजे म्हणजे लोकांना पटेल हे सखाराम वॉचमन, फुकट  ऑक्सिजनसाठी प्रयत्न करणारा माणूस या कथेत लेखकाने सांगितले आहे. शिक्षकांचे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातले स्थान नेहमीच प्रेरणादायी ठरत असते. जेव्हा आपला एखादा विद्यार्थी मोठ्या पदावर पोहचतो, तेव्हा शिक्षकांना खूप आनंद होत असतो. जेव्हा एखादा विद्यार्थी आपल्या शिक्षकांना भेटायला जातो तेव्हा त्या शिक्षकाच्या घरची परिस्थिती पाहिल्यानंतर शिक्षक किती निस्वार्थीपणे काम करत होते हे लक्षात येते. पण गुरुजींचा अंत झाल्यामुळे त्याला त्यांचा आशीर्वाद मिळत नाही. याचे त्याला खूप दुःख होते. पण जाताजाता उतराई म्हणून चेक त्यांच्या घरी देऊन येतो. पण बाहेर आल्यानंतर त्याला आपल्या भावनांचा बांध आवरता येत नाही.मानवजातीचे भाव भावनिक शब्दांमध्ये लेखकाने व्यक्त केले आहे. समाजात अनेक प्रकारची माणसे आपल्याला भेटत असतात." पश्चाताप आणि माफी"  या कथेत लेखकाने एका गरीब पालकाचे वर्णन केलेले आहे. आपल्या मुलाच्या वाचनाची आवड लक्षात घेऊन, परिस्थिती नाही हे लक्षात आल्यामुळे आपल्या मुलाच्या वाचनाची आवड पूर्ण करण्याकरता दुकानाच्या मालकाने लेखकाच्या बॅगेतील पुस्तक न सांगता घेतले. पण शेवटी त्याला पश्चाताप होतो व तो माफी मागतो,  तेव्हा लेखकाने त्याला मोठ्या मनाने त्याला माफ केले.हा प्रसंग ही छान रेखाटला आहे . भ्रष्ट आचरण करनारे लोक लाच घेऊन काम करतात.फण ते त्यांना ते सुफळ जात नाही.  अतिशय काटकसरीने व कष्टाने जो जीवन व्यतीत करतो, त्याला जीवनामध्ये पैसा जरी कमी मिळत असला तरी त्याला आत्मिक समाधान मिळते. हे   "पिसाळसाहेब  " या कथेतून लेखकाने वाचकांना सांगण्याचा प्रयत्न केला आहे."मला कृतज्ञ व्हायचं आहे"  या कथेतून आपल्या मुलीच्या ऑपरेशन साठी एक आई  आपली किडनी विकायला निघते. व ही बातमी जेव्हा पेपरमध्ये येते त्यावेळी संवेदनशील मनाचे लेखक यांना काहीतरी करावेसे वाटते, त्या मुलीला मदत करावीशी वाटते. म्हणून ते त्यांच्या एका ओळखीच्या गृहस्थाकडे जातात,ऑपरेशन बद्दल सांगतात. ते गृहस्थ तातडीने मदत द्यायला तयार होतात. दवाखान्यात गेल्यानंतर जेव्हा लेखक त्या मुलीला विचारतात की शाळा शिकून तू कोण होणार आहेस?तेंव्हा त्या मुलीने दिलेले उत्तर अतिशय मार्मिक आहे.ती मुलगी म्हणते,मला कृतज्ञ व्हायचे आहे. हे वाचून नकळत डोळ्याच्या कडा ओलावतात. त्या मुलीचे ऑपरेशन होते.ऑपरेशन झाल्यानंतर त्या मुलीने लेखकाला कृतज्ञता व्यक्त करण्याकरता पत्र लिहिते व आपल्या भावना व्यक्त करते. हा प्रसंग मनाला खूप भावला.खरंच अजून अशी माणसे समाजामध्ये आहेत म्हणून तर हा समाज आपला समतोल टिकवून आहे.

एकुणच लेखकाने समाजातील भावभावनांचे प्रतिबिंब आपल्या कथासंग्रहात दाखवले आहे.रोजच्याच घटना असल्या तरी आपण त्याकडे आपण कशा पद्धतीने पाहतो याला महत्त्व आहे.एक साहित्यिकच हे करु शकतो.एका बैठकीत हे पुस्तक वाचून होते.मुखपृष्ठावर लेखकाचे त्यांच्या पुस्तकसंग्रहाबरोबरचा फोटो लेखकाचे साहित्य प्रेम दाखवून जातो.मलपृष्ठावर  प्राचार्य डॉक्टर राजेंद्र कुंभार यांचे या कथासंग्रहबद्दलचे मत वाचता लेखकाची उंची आपल्याला समजून येते.

  प्रकाशक माननीय दादासाहेब जगदाळे, तेजश्री प्रकाशन यांनी हे पुस्तक  मजबूत बायडींग व छपाई व कागदाचा चांगला दर्जा वापरून पुस्तकाला देखणे केले आहे.वाचकांना हे पुस्तक नक्कीच आवडेल,अशी आशा बाळगून  लेखकाच्या भावी लेखन कार्यास, साहित्य प्रवासास मनःपूर्वक शुभेच्छा देते.

समिक्षक
श्रीमती माणिक नागावे
साहित्यिक, समिक्षक,शिक्षिका
सुपरवायजर,साने गुरुजी विद्यालय,
कुरुंदवाड. जिल्हा. कोल्हापूर.
9881862530

No comments:

Post a Comment