23 एप्रिल जागतिक पुस्तक दिनानिमित्त
लेख
पुस्तक माझ्या जीवनाचा सखा
पुस्तकेच आहेत खरे मित्र
एकाकीपणा आपला घालवतात.
दु:खातसुद्धा सुखाच्या,
राजमार्गाचा रस्ता दाखवतात.
खरे आहे हे.कारण पुस्तके आपल्याला योग्य रस्ता दाखवतात.माझ्या आयुष्यात पुस्तकांना फार महत्त्व आहे. थोर साहित्यिक, मातृह्रदयी ,कवीमनाचा स्वतःच्या आईला साऱ्या जगात पोहचवणारे साने गुरुजींच्या शामची आई या पुस्तकाने माझ्या मनावर अधिराज्य केले आहे.मी कीतीतरी वेळा हे मातृप्रेमाचे महंन्मगल स्त्रोत असलेले पुस्तक वाचून काढले आहे.प्रत्येकवेळी डोळ्यात आसवांचा महापूर आलेला आहे.भावनेचा बांध फुटला आहे.या पुस्तकामुळेच माझ्या मनात गरीबांच्या बद्दल,प्राणीमात्रांबद्दल आपुलकी, सहानुभूती निर्माण झाली आहे. मीही लिहण्यास उद्युक्त झाले आहे. म्हणून पुस्तके आयुष्यात फार महत्वाची कामगिरी पार पाडतात.
माणूस हा एक सामाजिक प्राणी आहे.तो समाजात राहतो. समाजातील चालीरिती पाळतो. त्याला आई वडिलांच्या , पूर्वीच्या बर्याच प्रथा आहेत ज्या पुस्तकांद्वारे मिळतात.पुस्तक हा समाजाचा आरसा आहे.पुस्तक साहित्याच्या एकत्रिकरणाचा एक मार्ग आहे.भारतात व भारताबाहेर अनेक साहित्य तज्ज्ञ आहेत. इंग्रजी साहित्यात शेक्सपिअर चे मोठे योगदान आहे. या जगप्रसिद्ध साहित्यिकांचा जन्म आणि मृत्यू एकाच दिवशी झाला आहे, म्हणजे 23 एप्रिलला. 23 एप्रिल हा जागतिक पुस्तक दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. पुस्तके आपल्याला त्यात्यावेळच्या युगाचे ज्ञान देतात.पुस्तकामुळेच आपल्याला भूतकाळाचे ज्ञान प्राप्त होते.
गद्य, श्लोक,पद्य,बखर,कथा, कविता, कादंबरी इत्यादी अनेक प्रकारची पुस्तके आज आपल्याला पहायला मिळतात.या सर्व प्रकारच्या पुस्तकांची आज सर्वांनाच आवश्यकता आहे.पुस्तकाशिवाय आपल्याला कशाचेही ज्ञान कसे मिळणार?अज्ञानाच्या अंध:कारामध्ये गटांगळ्या खाणारी व्यक्ती ज्ञानाच्या प्रकाशात येण्यासाठी पुस्तकाचा आधार घेते.जर आपण आपल्या आयुष्यात स्वतःचे ज्ञान वाढववायचे असेल तर,आयुष्य समृद्ध करायचे असेल, आपले जीवन विकासाच्या वाटेकडे न्यायचे असेल तर आपल्याला पुस्तके नेहमीच मार्गदर्शन करण्यासाठी आवश्यक असतात.जेव्हा आपण पुस्तके वाचतो त्यावेळी आपल्या मतांमध्ये फरक पडतो.सकारात्मक वा नकारात्मक विचारसरणी मनात आणण्यापूर्वी आपले मन रिकामे असते. पण पुस्तक वाचणानंतर आपला विचार बदलतो. पुस्तके वाचल्यास आपल्याला योग्य तो मार्ग मिळतो.पुस्तके आपल्या मेंदूला ज्ञानाचे भांडार उपलब्ध करुन देतात.आपण आयुष्य जगताना पुस्तक आपल्याला काय चांगले आणि काय वाईट आहे याबद्दल माहिती देतात पुस्तकप्रेमी नेहमीच पुस्तकावर बोलतात.आपले जीवन एक संघर्षमय जीवन आहे.पुढे काय होईल?हे आपल्यालामाहित नसते पण जेंव्हा आपल्याला या संघर्षपूर्ण जीवनात कोणत्याही समस्येचा सामना करावा लागतो, तेंव्हा त्या समस्येचपासून बचाव करण्यासाठी पुस्तके आपल्याला यशस्वी जीवनाचा मार्ग दाखवतात. पुस्तके आपले खरे मित्र आहेत. कारण जेव्हा आपण आनंदी असतो किंवा दु: खी असतो तेव्हा.सर्वप्रथम आपण आपल्या मित्रांना सांगतो. आणि आपल्या मनावरचे दडपण कमी करतो.त्याच प्रकारे पुस्तके देखील आपल्याला आनंद देतात.जेंव्हा आपण दुःखात असतो तेंव्हा आपले मन खूप उदास असते. अशा वेळी आपल्या हातात एखादे चांगले पुस्तक सापडले तर ते वाचल्यानंतर आपले मन हलके होते. एखाद्या व्यक्तीच्या मनात असणाऱ्या उदासी भावना बाहेर येतात.तो विचार करु लागतो.सारासार विचार केल्यानंतर त्याला योग्य दिशा सापडते.त्याच्या मनातील वाईट विचार बाहेर येतात. त्याच प्रकारे जेव्हा आपण दु:खी असतो तेव्हा आपण प्रसिद्ध यशस्वी लोकांच्या जीवनकथा वाचाव्यात.कारण तेंव्हाच आपल्याला कल्पना येते की या लोकांच्या जीवनात किती समस्या आल्या होत्या तरीही त्यांनी त्यांचा सतत सामना केला आणि शेवटी त्यांना यश, कीर्ती मिळाली.अशाचप्रकारे जेंव्हा जेंव्हा आपल्या मनात उदासीनता येते आणि आपण दु:खी असतो , तेंव्हा आपल्या मनात एक नवीन आशा पुस्तकांच्यामुळेच जन्माला येते आणि आपल्याला नवीन कार्य करण्यास भाग पाडते. त्याचप्रमाणे पुस्तकांच्यामुळे नेहमीच गौरवशाली जीवनाच्या महामार्गाचे दरवाजे उघडत असतात.
पुस्तके नेहमीच योग्य मार्गदर्शन करतात. ते चांगले मार्गदर्शक आहेत.कारण आपली विवेकबुद्धी जागृत ठेवण्याचे काम पुस्तक करतात. समाजात चांगले काय आहे, काय वाईट आहे, नैतिक काय आहे, अनैतिक काय आहे हे आपल्याला पुस्तकातूनच समजू शकते. आपल्या मनात चांगल्या, वाईट भावना कधी येतात हेदेखील आपल्याला ठाऊक नसते.पुस्तके समाजभावनांचे सामाजिक आरसे असतात.जेंव्हा जेंव्हा साहित्यिक, कवी त्यांचे लेखन करतात,तेंव्हा त्यांच्या वेळेस समाजात ज्या घटना घडतात त्या सर्वांचा त्यांच्या मनावर परिणाम होत असतो.तेच त्यांच्या लेखनात येत असते. कधीकधी ते परमानंदी असतात, तर कधी विचलित होतात ते त्यांच्या मनातील विचार त्यांच्या लेखनातून प्रकट करतात.दररोज जे काही घडते ते त्यांच्या लेखनातून पुस्तकात येते. त्याच बरोबर साहित्यिकांच्या मनाचे प्रतिबिंबही पुस्तकात दिसते.जेंव्हा एखादा साहित्यिक उदास मनाने बसलेला असतो आणि त्याची प्रतिभा जागृत होते, तेव्हा दु:खद भाव त्याच्या लिखाणात येतात. आणि उदास मनाची व्यक्ती जेंव्हा ते वाचते तेंव्हा त्याला ते स्वतःचेच दु:ख वाटते,आणि त्याला ते आवडते.त्याच्या मनाच्या भावनांचे प्रतिबिंब त्याला त्या पुस्तकात दिसते.आणि त्याला वाटते की माझेच दु:ख येथे व्यक्त केले गेले आहे.
आयुष्यातील बर्याच समस्या आपल्याला त्रास देतात. जर आपणास काही सुचत नसेल तर अशावेळी जर आपण पुस्तक वाचले तर आपले मन त्या पुस्तकांच्या विचारांमध्ये भटकत राहते. खरोखरच हा योग्य मार्ग आहे.कारण यामुळे तर आपले चंचल मन स्थिर होते आणि चांगले विचार करण्यास सुरवात करते.पुस्तक वाचणे फार महत्वाचे आहे. कारण पुस्तके शेवटपर्यंत आपल्याला साथ देतात,आपल्या विचारांचे समर्थन करतात.म्हणून, प्रत्येक घरात ग्रंथालय व पुस्तकसंपत्ती असली पाहिजे.जर एखाद्यास एखाद्या गोष्टीबद्दल जाणून घ्यायचे असेल किंवा मनातील भावभावनांची आंदोलने चालली आहेत. अशावेळी पुस्तकांद्वारे आपला त्रास कमी करू शकतो. आपण बर्याच महान लोकांचे चरित्र पाहतो तेव्हा हे समजते की या लोकांना जीवनात पुस्तके वाचणे नेहमीच आवडत होते.त्यांनी खूप वाचनही केले आहे.अशा पुस्तकांमधून प्रेरित होऊन त्यांनी चांगले काम केले आहे. त्यांनी स्वतःच त्यांचे जीवन एका पुस्तकात बंद केले जेणेकरुन ते वाचणाऱ्यांना,अनेक पिढ्यांमधील लोकांना प्रेरणा मिळेल.जेव्हा घरातील मोठी माणसे पुस्तके वाचतात, तेव्हा घरी असणारी छोटी मुलंही पुस्तके वाचण्यास सुरवात करतात.आजकालच्या मुलांचा बराचसा वेळ टीव्ही पाहण्यात किंवा मोबाइलवर गेम खेळण्यात घालवला जातो.त्यामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष होते.संवेदनशीलता नष्ट होत आहे.ही सवय त्यांना भविष्यात त्रास देणारी आहे.शाळेत शिक्षकांना व घरात पालकांनाहीया मुलांचा त्रास होत आहे. यावर वेळीच उपाययोजना करायला हवी.पण जर मुलांना पुस्तके वाचण्याची आवड निर्माण केली तर हे सर्व हळूहळू थांबेल.कारण पुस्तके मुलांना योग्य मार्ग दाखवतात.मुलांना त्यांच्या प्रतिभेची जाणीव करुन देतात.आणि मुले अभ्यासामध्ये रस घेऊ लागतील.जेंव्हा आपण आपला,मुलांचा, घरच्यांचा वाढदिवस साजरा करतो,त्यावेळी आम्ही चॉकलेट व इतर वस्तू गिफ्ट म्हणून देतो.पण अशांवेळी जर आपण एखादे चांगले पुस्तक भेट दिले तर ती भेट नेहमीच आपल्याबरोबर राहते आणि चांगली माहिती देखील देते.माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांनाही पुस्तकांची आवड होती.ते नेहमी पुस्तके वाचत असत.पुस्तकांवरील त्यांचे प्रेम पाहून सरकारने त्यांचा वाढदिवस " वाचन प्रेरणा दिन" म्हणून साजरा करण्याची घोषणा केली.ही चांगली गोष्ट आहे.त्यादिवशी मुलांना सर्व शाळांमध्ये वाचायला सांगितले जाते, पुस्तकांविषयी माहिती दिली जाते, लोकांना पुस्तकांचे महत्त्व सांगितले जाते. ही सर्वांसाठी प्रेरणा आहे.जेंव्हा जेंव्हा आम्हाला मोकळा वेळ मिळेल तेंव्हा आपण त्या वेळेचा उपयोग केला पाहिजे, पुस्तके वाचली पाहिजेत, आपले ज्ञान वाढविले पाहिजे.
जागतिक पुस्तक दिनानिमित्त संपूर्ण जग हा दिवस आनंदाने साजरे करते मला आशा आहे की या पुस्तकाविषयी आपुलकी सर्वांच्या मनात रुजावी. आणि त्यांनी आपला मोकळा वेळ वाचनात घालवावा. जेणेकरून त्यांच्या मनात जे काही दुःख आहे,ते दूर होईल.हा आपला सखा नेहमी आपल्या बरोबर राहतो.सदैव प्रेरणा देत राहतो.
लेखिका
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जि. कोल्हापूर
9881862530
No comments:
Post a Comment