लॉकडाऊन चा सकारात्मक परिणाम
कधी वाटले नव्हते की हे जीव तोडून धावणारे जग असे अचानक थांबेल.लाखो करोडोंची रक्कम देऊनही कुणी राजी झाले नसते.सारे पर्यावरणवादी, सरकार ओरडून सांगत होते की,ग्लोबल वार्मिंग ,ओझोनच्या थराला पडत असलेले छिद्र, वाढते हवा,ध्वनी,जल प्रदूषण, नद्यांची झालेली गटारगंगा, पिवळा पडत चाललेला ताजमहाल, शहरीकरणामुळे, रस्तारुंदीकरणामुळे होत चाललेली वृक्षतोड. दिल्लीतील पसरलेले धुलीकण,अशा कीतीतरी प्रश्न आ वासून उभे होते.पण या सगळ्यांकडे जाणूनबुजून सारे दुर्लक्ष करत होते.म्हणतात ना निसर्ग आपला समतोल आपणच राखतो.तेंव्हा मात्र हा विज्ञानवादी मानव अगदी हतबल होऊन जातो.लाचार होतो.हे आपण 2019 च्या प्रलयंकारी महापुरात पाहिले आहे. त्यातून अजून सावरत नाही तोपर्यंत हा कोरोना विषाणू आज आपली झोप उडवत आहे.चीनमध्ये हा विषाणू पसरला आहे,असे म्हणता म्हणता तो साऱ्या विश्वात पोहचलासुद्धा....मी मी म्हणणारे सुद्धा काहीही करु न शकता असहाय्यपणे पाहण्यापलीकडे काहीच करु शकत नाहीत. कोरोना विषाणू एक जागतिक महामारी ठरला आहे.हा संसर्गामुळे वाढत असल्यामुळे शोशल डीस्टन्सिंगला पर्याय नसल्यामुळे शासनाने नाईलाजाने लॉकडाऊन हा पर्याय निवडला.
कोरोना या रोगाची महाभयंकर परीस्थिती पाहता शासनाने लाॅकडाऊन तीन दिवस म्हणत तीस एप्रिल पर्यंत तर आता तीन मे पर्यंत वाढवली आहे.जनजीवन विस्कळीत झाले.त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले.या लॉकडाऊनचे सकारात्मक व नकारात्मक दोन्ही परीणाम झाले.वाहतूक, दळणवळण बंद केले त्यामुळे रस्त्यावरची वाहनांची रहदारी कमी झाली. वाहनांच्या मधून बाहेर पडणारा कार्बनडाय ऑक्साईड बंद झाला.परीणामी वातावरणात शांतता पसरली. वायू प्रदूषण,ध्वनी प्रदूषण यात भरपूर फरक पडला आहे.कारण प्रदूषणाला सर्वात जास्त कोण कारणीभूत असेल तर तो मानव आहे.मानवाने जिथे जिथे पाऊल ठेवले आहे तिथे तिथे प्रदूषण केले आहे.मग ते वाहणांच्या अतिवापरामुळे त्यातून बाहेर पडणारा कार्बनडाय ऑक्साईड चे वातावरणात मिसळणे असो वा सणसमारंभात लावलेला डीजेचा कर्णकर्कश आवाज असूदे. रोजचा गोंधळ,गजबजाट असूदे .मानवच या सर्वाला कारणीभूत आहे.पण आता हे सर्व थांबल्यामुळे प्रदूषण अजिबात होत नाही. त्यामुळे वातावरण अतिशय स्वच्छ असल्याने आकाश निरभ्र दिसत आहे.कोणताही गोंगाट नसल्यामुळे कमालीची शांतता अनुभवायला मिळत आहे.पक्ष्यांचा कीलबिलाट जो गायबच झाला होता,भूतकाळात जमा झाला होता तो आता स्पष्टपणे व मोठ्या आवाजात ऐकू येत आहे.सकाळच्या प्रसन्न वातावरणात पक्ष्यांच्या कीलबिलाटाने जाग येते.त्यावेळी आमचे लहानपण आठवू लागते.अनेक ठिकाणी पशूपक्षी निवांतपणे नागरी वस्तीत फीरत आहेत.आकाशात पक्षी मुक्तपणे संचार करताना दिसतात.समुद्रकिनारी हरणांसारखे पशू निवांतपणे उड्या मारताना तर मुंबईतील सतत गजबजलेल्या समुद्र कीनारी डॉल्फीन माशांच दर्शन होत आहे.हे सर्व सकारात्मक परिणाम आहेत.
या संकटातून बाहेर पडायचे असेल तर सर्वांना घरातच थांबून रहावे लागणार आहे.सर्व लांब नोकरीस असणारी मुले,सुना आईवडिलांच्याकडे परतले आहेत.शहरीकरणामुळे गावातील जीवन अनुभवण्यास नाकारणाऱ्या लोकांना आता दुसरा पर्यायच नाही.अवास्तव गरजांशिवाय आपण जिवंतच राहू शकणार नाही हा खोटा गैरसमज आता दूर झाला आहे. मानवाच्या गरजाही कीती कमी आहेत याचाही अनुभव लोकांना येत आहे.हे जरी असले तरी याचा नाते संबंधांवरचा परिणाम चांगला व वाईट दोन्हीही होत आहेत.नोकरी व कामामुळे घरातील प्रत्येक व्यक्ती ही सतत धावत होती.अभियांत्रिकी, वैद्यकीय क्षेत्रातील मुले घरच्या लोकांपासून लांब होती.कुणाला एकमेकांची विचारपूस करायला वेळ नव्हता. पण आता सगळे एकाच छताखाली आले आहेत.एकमेकांना समजून घ्यायला भरपूर वेळ मिळाला आहे. चंगळवादी, भोगवादी संस्कृती ला आळा बसला आहे.जुनं ते सोनं या उक्तीप्रमाणे पूर्वीच्या दिवसांची आठवण व महत्त्व अधोरेखित झाले आहे.
सदर कालावधीत पैसा व माणुसकी याकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगवेगळा झालाआहे.आज पैशापेक्षा माणुसकीला महत्त्व आले आहे.कारण अशा या भयंकर परिस्थितीत एकमेकांना आधार देणे,मदत करणे गरजेचे आहे.आज पैसा असला तरी वस्तू सहजासहजी उपलब्ध होत नाहीत. गरीब व श्रीमंत एका रेषेत आहेत.मी मोठा हा अहंभाव बऱ्यापैकी नष्ट होताना दिसत आहे.आज प्रत्येकाला एकमेकांना स्नेह, प्रेम ,आपुलकी ची गरज आहे.
या सगळ्या वातावरणात भटक्या जनावरांचे हाल मात्र अतिशय वाईट झाले आहेत. कारण मानवच घरात स्वतःला कोंडून घेतल्यामुळे सर्व हॉटेल, रेस्टारंट बंद असल्याने भटक्या जनावरांना खायला कुठुन मिळणार ?ती अन्नाच्या शोधार्थ इकडेतिकडे भटकत आहेत. त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या परीने जेवढी मदत करता येईल तेवढी करुन कींवा खायला देता येतील तेवढे दिले पाहिजे.
पोलीस आणि वैद्यकीय कर्मचारी यांचे सेवेसाठी असलेल्या समर्पणाबद्दलतर बोलायला शब्दच नाहीत. कारण समाजातील काही आडदांड, विकृत लोकांच्या बेबंदशाही मुळे कोरोना हा रोग पसरत जात असल्यामुळे यांना अटकाव करण्यासाठी पोलीस यंत्रणा दिवसरात्र झटत आहेत.तसेच वैद्यकीय कर्मचारी, अधिकारी हेही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रोग्यांना रोगमुक्त करण्यासाठी अहोरात्र झटत आहेत.पण काही ठिकाणी जनता त्यांना सहकार्य करत नसलेलं दिसून येते.डॉ. नर्स व पोलीसांच्यावर दगड फेकणे,त्यांना मारहाण करणे अशा मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटना घडत आहेत.ही अतिशय खेदाची बाब आहे.हे सर्व थांबले पाहिजे.या सर्व निस्वार्थीपणे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आभार आम्ही कोणत्याही शब्दात प्रकट करु शकत नाही.
फक्त आपण एवढेच करु शकतो,नव्हे जबाबदारीने केलेच पाहिजे. ते म्हणजे या रोगाला हरवण्यासाठी सर्वजण घरीच राहू व ही साखळी तोडून टाकून सशक्त व सक्षम समाज बनवण्यासाठी कटिबद्ध होऊ या.लॉकडाऊनचे नकारात्मक परीणाम समोर येण्याआधी हा काळ शक्य तितक्या लवकरच संपवण्यासाठी प्रयत्न करु.
लेखिका
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
9881862530
No comments:
Post a Comment