शासकीय स्तरावर महिलांच्या विकासासाठी प्रयत्न होणे गरजेचे
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात खचून न जाता सर्व निराशाजनक परीस्थितींना बाजूला सारून येणाऱ्या दुःखांना हसतखेळत सामोरे जाण्यासाठी एकविसाव्या शतकातील महिलांना सक्षम करण्याची गरज निर्माण झाली आहे.लोकसंख्येमध्ये जवळपास निम्म्या संख्येने असणारा स्त्रीवर्ग हा देशाच्या विकासाचा कणा म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
गतकाळातील स्त्रीयांची महती गाऊन फक्त चालणार नाही तर त्यासाठी आजच्या स्त्रीवर्गाच्या विकासासाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे.ग्रामीण भागातील समस्या आजही पूर्णपणे संपुष्टात आल्या नाहीत.सुखसुविधांचा , शिक्षणाचा अभाव व असुरक्षित सामाजिक परिस्थिती , समाजातील बदलती मानसिकता यामुळे खेड्यातील सातवी पर्यंतच्या शिक्षणानंतर पुढील शिक्षणासाठी बाहेरगावी पाठवण्याची मानसिकता पालकांच्या मनात जोर धरू लागली आहे.जेव्हा पटसंख्येसाठी आजूबाजूच्या खेडेगावात आम्ही फीरतो तेव्हा हे विदारक चित्र आम्ही पाहतो.त्यांना खूप समजावून सांगावे लागते.तेव्हा दहावी पर्यंत शिक्षण कसेबसे पूर्ण करतात . पुढे लग्न लावून दिले जाते.आजवर जे चर्या पहात आलेल्या आहेत ,सोसत आलेल्या आहेत त्यामुळे स्वविकास व आरोग्य याकडे दुर्लक्ष केले जाते.
सर्वात महत्त्वाचा प्रश्न येतो तो तिच्या आरोग्याचा .कर्ता पुरुष सकाळी लवकर उठून शेतावर कींवा इतर व्यवसायासाठी बाहेर जातो , तेव्हा जर तिला काही समस्या निर्माण झाल्या तर तिला त्यांची घरी येईपर्यंत वाट पहावी लागते.त्रास सोसावा लागतो.कुणीतरी सांगीतलेले घरगुती उपचार केले जातात.पण काहीवेळा हे उपाय जीविवरही बेतू शकतात.यासाठी शासनाने ग्रामीण भागात आरोग्य केंद्र उभारण्यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे.आरोग्यसेविकांची नेमणूक करून गावातील महिलांना वरचेवर भेटी देऊन प्रत्येक महिलेची आरोग्याची माहिती घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन केले पाहिजे.प्रत्येक महिलेच्या आरोग्यासंबंधीची माहिती जर नोंदवली गेली तर शासकीय स्तरावरून त्याचे निराकरण करणे सोपे जाईल.घराघरामध्ये संडास असलेच पाहिजेत याची सक्ती करायला हवी. ब-याचवेळा संडास बाथरूम नसल्यामुळे महिलांना सकाळी लवकर उठून कींवा संध्याकाळी अंधार पडल्यावर बाहेर जावे लागते. तोपर्यंत तिला त्रास करावा लागल्यामुळे पोटदुखी कींवा पोटासंबधी आजारांना तोंड द्यावे लागते.हल्ली शासकीय योजनांच्या मुळे ब-याच प्रमाणात संडास बांधलेले आहेत पण शंभर टक्के यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. मासिक पाळी संदर्भात सुद्धा अनेक गैरसमज ग्रामीण भागात आहेत.त्यासाठी शासकीय स्तरावर महिलांच्या सुरक्षेसाठी व आरोग्यासाठी महिला कर्मचारी नेमण्यात आले पाहिजेत व जागृती निर्माण केली पाहिजे.कारण या काळात ग्रामीण महिलांना शारीरिक कष्टाची कामे करावी लागतात.याबद्दलही जागरूकता शास्त्रीय माहिती देऊन मासिक पाळी संदर्भात माहिती सांगितली जावी व याबद्दल चे गैरसमज दुर करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.कारण तिच्यावर सर्व कुटुंबाची जबाबदारी असते.ती जर तंदुरुस्त असेल तर ती आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांकडे , मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देउन भावी नागरिक सक्षम बनवू शकेल.परिणामी भारत देश संकर्षण बनेल व योग्य पिढीद्वारे विकास करु शकेल.
विविध सरकारी योजनांची माहिती देऊन त्यांना कोणत्या प्रकारचे मार्गदर्शन हवं आहे हे पाहून त्यांचा पाठपुरावा करण्यासाठी स्थानिक पातळीवर बचत गट व महिला मंडळे स्थापन करून त्यांना योग्य मार्गदर्शन केले पाहिजे.यासाठी सतत प्रयत्नशील राहून पाठपुरावा करणे गरजेचे आहे,कारण सातत्य हे गरजेचे आहे.यासाठी शासनाने ठोस पावले उचलणे गरजेचे आहे.महिला काहिही करु शकते गरज आहे ती फक्त तिला जागृत करण्याची , प्रेरणा देण्याची , जबाबदारी सोपविण्याची.सर्वात महत्त्वाचे तिला आदर देण्याची. आदर द्या,आदर घ्या. घडला सशक्त भारत.
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ९८८१८६२५३०
No comments:
Post a Comment