स्पर्धेसाठी
लेख / निबंध
विषय - माझा गांव
मी , माझं, माझ्याकडे हे शब्द आपल्याला खूप प्रिय असतात कारण यामध्ये आपलेपणा जाणवतो.आत्मीयता वाढीस लागते.माझ्या गावाबद्दल माझ्या मनात खूप प्रेम आहे.
माझ्या गावाचे नांव कुरुंदवाड. संस्थानकालीन गांव.कृष्णा व पंचगंगेच्या पावन संगमाजवळ वसलेलं हे कुरुंदवाड गांव.माझ्या गावाभोवती गवताची कुरणे होती.त्यामुळे कुरणवाडी असं म्हणत म्हणत अपभ्रंशाने त्याचे कुरुंदवाड असे नामकरण झाले. आजही नदीकाठी गवताची कुरणे दिसून येतात.गावालगतच दोन्ही नद्या असल्यामुळे बारमाही पाणी असते,त्यामुळे ईथली भूमी सुजलाम् ,सुफलाम् आहे. ईथली वांगी व भाजीपाला यांच्या चवीला तोड नाही.तसेच इथली बासुंदी, खवा खूप प्रसिद्ध आहे.
आशियातील पहिल्या सर्कशीचे जनक पं.विष्णूपंत मोरेश्वर छत्रे हे कुरुंदवाडचेच.त्याचप्रमाणे शास्त्रीय संगीताची जाण असणारे पं.विष्णू दिगंबर पलूसकर यांचाही जन्म कुरुंदवाडमधेच झाला होता. पटवर्धन सरकार यांनी कुरुंदवाडचा विकास केला.येथे प्राचीन राजवाडा होता.त्यांनी कुरुंदवाड मधे कोरीवकामाचा उत्तम नमुना असलेले विष्णू मंदिर बांधले. तसेच कृष्णा नदीवर सुंदर घाट बांधला. या घाटावर गणेशाचे, कार्तीकेयचे कोरीव बांधकामातील मंदिरे बांधली.याच घाटावर पूर्ण शहराला होणाऱ्या पाण्याचे शुद्धीकरण होते.घाटावर ऐतिहासिक संताजी घोरपडे यांची समाधी आहे.याच घाटावर महात्मा गांधी यांच्या रक्षेचे विसर्जन ही झाले आहे. त्याचप्रमाणे परमपूज्य साने गुरुजी यांनीही येथे सभा घेतली होती.एवढेच नव्हे तर या घाटावर मंगल पांडे नावाच्या चित्रपटाचे व इतर अनेक चित्रपटांचे चित्रीकरण , व दूरदर्शन मालीकांचे चित्रीकरण सुद्धा झालेले आहे.गावपाटील मा.श्री.रावसाहेब उर्फ दा.आ.पाटील यांच्या वाड्यावरही चित्रीकरण झाले आहे.
या नगरीला सांस्कृतिक, सामाजिक व राजकीय वरदहस्त लाभला आहे. इथले कलाकार पूर्ण भारतात प्रसिद्ध आहेत.येथे शैक्षणिक संस्था ही प्रसिद्ध आहेत. बाजारपेठ नेहमी सर्व वस्तूंनी भरलेली असते.दुधदुभत्याचा नेहमी राबता असतो.क्रीडाक्षेत्रातही इथले खेळाडू जागतिक पातळीवर चमकले आहेत.माझ्या गावात कशाचीच कमतरता नाही. सर्वसुख येथे मिळते. सर्व धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात.येथे गणपती व पीर/ ताबूत मशिदीत बसवले जातात.ही कौतुकास्पद व अभिमानास्पद गोष्ट आहे.
नगरपालिकेच्या माध्यमातून विकासकामे राबवली जातात.येथे राजकारण ही तितक्याच अटीतटीने खेळले जाते.राजकारणातील सर्व खेळी इथेच पहायला मिळतात.सर्व दृष्टीने माझा गांव समृद्ध असल्यामुळे या गावात मुली द्यायला सर्वजण उत्सुक असतात.
असा माझा कुरुंदवाड गांव मला खूप आवडतो.मला माझ्या गावाचा सार्थ अभिमान आहे.
लेखिका
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर.
No comments:
Post a Comment