वाचन प्रेरणा दिन
ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्यासाठी विविध मार्ग आहेत.त्यामधील सर्वात महत्वाचा मार्ग म्हणजे वाचन होय.ऊगीचच नाही म्हटले " वाचाल तर वाचाल " म्हणून.वाचनाचे एवढे महत्त्व आहे की आपले लाडके ,अभ्यासू माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे.अब्दुल कलाम यांच्या वाचनाची आवड लक्षात घेऊन त्यांचा जन्मदिन " वाचन प्रेरणा दिन " म्हणून साजरा केला जातो.
वाचन केल्याने आपल्या मेंदुला एकप्रकारची चालना मिळते.मानव विचारी बनतो.काय चांगले काय वाईट याचा सारासार विचार करु लागतो.त्याची विवेकबुद्धी सतत जागृत राहते. अनेक थोर विचारवंत, प्रसिद्ध व्यक्ती यांनीही वाचनाचे महत्त्व जाणले होते. आपला बराचसा वेळ ते वाचनात घालवत.वाचनाने आपल्या शब्दसंपत्तीत भर पडते.प्रत्येक वेळी जेंव्हा आपण नवीन काहीतरी वाचतो तेंव्हा त्यामधील नवीन शब्द आपल्याला माहिती होतात.
विविध प्रकारची माहिती पुस्तक वाचनाने प्राप्त होते.आपले ज्ञान अद्ययावत होते.नेहमी आपण आपले म्हणणे दुसऱ्यावर लादत असतो.दुसऱ्याने आपलेच ऐकावे असे वाटत असते,पण वाचनाने आपल्याला दुसऱ्याचे ऐकण्याची व समजून घेण्याची सवय लागते.त्यामुळे दुसऱ्या च्या मताचा आदर करणे , त्यांना समजून घेणे हे अंगी बाणते.त्यामुळे माणसे समजून घेण्याची कला विकसित होते.वाचन संयम राखायला शिकवतो.सामान्यज्ञान वाढते.एखाद्या विषयावर बोलताना आपल्याला जर त्याबद्दल आधीच माहिती असेल तर त्याविषयी आपण स्पष्टपणे व परखडपणे आपले विचार मांडू शकतो.
काहीजण म्हणतात की मला वाचनाची आवडच नाही.तो आपला वेळ दूरदर्शनवर कार्यक्रम पाहण्यासाठी खर्च करतात.ती त्यांची आवड असते.मी असे म्हणेन की वाचनाची आवड आपण निर्माण करु शकतो. आपल्याला आवडणाऱ्या गोष्टींची माहिती असणारी पुस्तके जर आपण रिकाम्या वेळी चाळू लागलो तर हळूहळू आपल्याला वाचनाची आवड वाढू शकते. वाचनाने व्यक्तीमत्वाचा विकास होतो.जीवनातील अनेक ताणतणावाच्या प्रसंगी सकारात्मक विचारांची पुस्तके वाचली तर आपण ताणविरहित होतो.
वाचनाने आपली कल्पनाशक्ती वाढीस लागते.आपल्या मनातील भावभावनांचे प्रकटीकरण होते. लेखनाला चालना मिळते. आपल्या सृजनशिलतेला वाव मिळतो.बुद्धी ची मशागत होते.
विद्यार्थी जीवनात तर वाचनाशिवाय पर्यायच नाही. झालेला अभ्यासक्रम समजून घ्यायचा असेल तर प्रथम त्याचे वाचन आवश्यक आहे. वाचले तरच ते विचारातून लेखणीतून प्रकटणार अन्यथा नाही.
आजचे युग हे संगणकाचे विज्ञान तंत्रज्ञानाचे युग आहे. आधुनिकीकरणाच्या रेट्यात वाचनाबद्दलची अनास्था वाढीस लागत आहे. परंतू या डीजीटल युगात आता ऑनलाईन पुस्तके, वाचनाची ईतर साधने उपलब्ध आहेत.त्यामुळे आपण केव्हाही, कुठेही वाचन करु शकतो. हेही नसे थोडके.फक्त त्याचा योग्य वापर आपण करुन घ्यायला हवा. ईथे पुस्तके मोफत वाचायला मिळतात. ग्रंथालय चळवळ जरी मंदावत चालली असली तरी वाचन चळवळ वेगळ्या रुपात समोर येत आहे. हे सर्वांनी लक्षात घ्यायला हवे.वाचणाने माणूस घडतोही व बिघडतोही.कारण तो काय वाचतो यालाही महत्त्व आहे. त्यामुळे आपली सदसद्विवेकबुद्धी जागृत ठेऊनच वाचले पाहिजे. एक चांगला माणूस,आदर्श नागरिक वाचनाने तयार होतो. डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी आपण कटिबद्ध होऊ या.चला वाचू या व वाचवूया.
No comments:
Post a Comment