पावसाळ्याचे दिवस होते.सप्टेंबर महिना.संध्याकाळी आकाशात अचानक ढग जमू लागले. दिवसभर सगळ्यांच्या अंगातून घामाच्या धारा ओसंडून वहात होत्या. त्या धारांत पावसाच्या धारा मिसळाव्यात ही प्रत्येकाची ईच्छा.ती सफल होण्याची चिन्हे दिसू लागली.सर्वांच्या चेहऱ्यावर समाधान दिसू लागले. प्रत्येकाच्या तोंडातून समाधानाचे उद्गगार बाहेर पडू लागले," आता आला तर भरपूर पडू दे." एकजण म्हणाली," जीवाची तगमग दूर होईल बघ बाई ! " दुसरा म्हणाला , " अरे शान्या,खुळा का काय तू ? आता पाऊस येतो म्हणतोय आणि तू त्या बिनछपराच्या तंबूत शिनिमा बघून येतू म्हणतूस व्हय ? गप्प बस की घरात आणि मजा बघ मजा पावसाची." अशाप्रकारे प्रत्येकजण आपापली मते व्यक्त करत होता. पण अशीही कांही लोकं होती की जी या पावसामुळे हिरमुसली झाली होती. कोण ओळखलात का? हां अगदी बरोबर!!! आपले झोपडपट्टीवाले हो !!! त्यांचपण बरोबरच की ,कारण जरा कुठं पाऊस झाला तरी यांना पायावरच बसावे लागते व डोक्यावर पावसाचे थेंब झेलावे लागतात.अशाप्रकारे पाऊस पडणार म्हटल्यावर सुख व दु:ख अशा संमिश्र प्रतिक्रिया ऐकायला येत होत्या. लोकं वर तोंड करुन पावसाची वाट पहात बसले.पूर्वसूचना दिल्याप्रमाणे वातावरणात बदल झाला. संध्याकाळीच रात्र झाल्याचा भास होऊ लागला.ऊकाडा खूपच वाढला. आणि अचानक सगळ्यांच्या काळजात धस्स झालं. आकाशात अचानक धडाडधूम... असा मोठा आवाज झाला.आपापली घरे शाबूत आहेत का ? हे सर्वजण पाहू लागले.आपले घर शाबूत आहे म्हटल्यावर दुसऱ्याची घरे बाहेर येऊन पाहछ लागले.तेवढ्यात पुन्हा एकदा मोठा आवाज झाला. प्रत्येकजण आपापल्या घरात पळाले. पावसाच्या थेंबानी ताशा वाजवायला सुरवात केली.हवेत मातीचा मंद मंद सुगंध दरवळू लागला. सर्वांचा मनाला एक धुंद आनंद देऊन गेला.अंगाला गार वारा स्पर्शू लागला. पावसानेही आता ठेक्यासहीत सूर धरला.मन सुखाऊन गेले.पण हळूहळू पावसाचा जोर वाढू लागला. थोड्या वेळाने मुसळधार पाऊस असा कोसळू लागला की बस्स.... घरांची छपरे पार धुऊन निघाली व पन्हाळीतून सरळ रस्त्यावर ऊड्या मारु लागला. गटारी भरुन महापूर आलेल्या नदीसारख्या वाहू लागल्या. रस्ता कुठे दिसेनासा झाला. सगळीकडे पाणीच पाणी... ज्यांच्या घरांचे ऊंबरठे थोडे ऊंच होते ते अगदी थोडक्यात बचावले.पण ज्यांचे ऊंबरठे जमिनीला समांतर राहून आपल्या समानतेच्या गप्पा मारत होते त्यांची खरी पंचायत झाली. पावसाचे पाणी त्या ऊंबरठ्यांना ओलांडून सहज घरात शिरले.ईकडेतिकडे पहात थेट आतल्या खोलीचा रस्ता धरले ते स्वयंपाकघरात जाऊन स्थिरावले कारण पुढे जायला वाटचं नव्हती ना !!! चुलीजवळ जाताना अगदी दाराजवळ ठेवलेले एक जाडजूड चप्पल ते आपल्याबरोबर न्यायला विसरले नाही. कारण जाताना वाटेत येणाऱ्या गोष्टी आपल्या बरोबर नेण्याची सवय पाण्याची असते ती त्याने प्रामाणिकपणे पार पाडली होती. चुलीजवळील जळण व भांडी त्या पाण्यात अगदी मनसोक्त पोहू लागली. काही शिवाशिवीचा खेळ खेळू लागली.हनीफचाचा बायकोला म्हणाले," देख , देख ये कैसे पानी में खेल रहे हैं।" ते ऐकून भाभी चिडली व नवऱ्याला म्हणाली," देखते बैठो तुमेच,घर का हाल क्या हुवा है ये देखने के बजाय तुम मुझे क्या दिखा रहे हो जी ? "चाचाला हसावे का रडावे तेच कळेना.तो कधी न आलेल्या पाहुण्याला बाहेर काढायचे सोडून बघतच राहिला.तेवढ्यात एक वाटी तरंगत येऊन त्याच्या पायाभोवतीच गोल गोल फीरु लागली.चुलीजवळील चप्पल मात्र काही केल्या हलेना, तेंव्हा हे काय बरोबर दिसणार नाही म्हणून चाचा ते चप्पल हातात उचलून बाहेर जायला निघाला पण हाय रे दुर्दैव!!!! त्याचा पाय घरातील ऊखळात अलगत उतरला व चाचा तेवढ्याच वेगात साष्टांग नमस्कार घालण्यासाठी जमीनीवर पडला.त्याच्या त्या कृतीमुळे पाणी जागचे हलले व भिंतीवर टांगलेल्या कपड्यांवर नक्षी काढण्याचे काम चोखपणे बजावले. चप्पल परत पाण्यात विराजमान झाली. चाचा मात्र ऊखळातून उठून जात्यावर बसला. पाऊस काही थांबण्याची चिन्हे दिसेनात.ऊंचीला कमी असणाऱ्या घरातील ही अवस्था थोड्या ऊंचावर असणाऱ्या घरातील व्यक्ती बघत होत्या.त्यांना थोडा आनंद व थोडे वाईट वाटत होते.थोडा गर्वही वाटला की आपले घर ऊंचावर आहे. पण तो जास्त काळ टिकला नाही. कारण पाऊस आडवातिडवा कोसळू लागला होता. दारां-खिडक्यातून तो थेंबाथेंबाने आत येऊ लागला. पाटील काका त्या थेंबांकडे पहात तुच्छतेने म्हणाले," येऊ दे त्याला ,कीती येतोय तेवढा येऊ दे,असा या फरशीवरुन ढकलून देतो."जणू पावसाने त्यांचे बोलणे ऐकले की काय,तो आणखीन जोरात ताडताड आवाज करत कोसळू लागला. दारातून , खिडकीतून जरी बंद असले तरी जोरात आत येऊ लागला.कौलांतून खाली येऊ लागला व घरांत टपकू लागला.घरातील मुलाच्या डोक्यावर थेंब पडलेले पाहिल्यावर त्याने आपल्या डोक्याच्या ठीकाणी एक पातेले ठेवून बाजूला झाला. त्या पातेल्यात आता पाऊस टण...टण.. असा आवाज काढत पडू लागला.सुरवातीला पातेल्यात पडलेले पाणी मोकळे असल्यामुळे परत ऊडून बाहेरच पडत होते.एवढ्यात घरातील मुलगी माणिक ओरडली, " ये हे बघा हे खिडकीत कीती पाणी आलयं." तिच्या त्या वाक्याने सर्वांच्या अंगात वारं भरल्यासारखे झाले. खिडकीतून सामान बाजूला काढून ठेवण्यासाठी सर्व धावले .तेवढ्यात पुष्पा काकूंचे लक्ष दरवाजाकडे गेले. त्या ओरडल्या," अरे संजू , राजू अरे पळा " सगळे तिकडे धावले दाराजवळच सूताचे एक भलेमोठे बाचके होते.त्याला भिजवण्याचे काम पावसाच्या पाण्याने चोखपणे बजावले होते. गडबडीत पळण्याच्या नादात एकजण फरशीवरुन घसरला व खाली पडला.त्याच्या डोक्याने भिंतीला भेट दिली व येताना सुपारी कपाळावर भेट म्हणून आणली.मग सुताकडे दुसराच कुणीतरी धावला व बाचके आत नेण्यात आले.भरीस भर म्हणून की काय अचानक लाईट गेल्या.अंधारात सगळेजण स्तब्ध राहिले. आंधळ्याची स्टाईल मारत पुष्पाकाकू आत चाचपडत गेल्या व मेणबत्ती व काडेपेटी शोधून आणली व उजेड केला.आता सर्वजण, हुश्श... करत खुर्च्यांवर विराजमान झाले व पावसाच्या पाण्याकडे बघू लागले.आता सर्वांचे गर्वहरण केल्यामुळे व नैसर्गिक शक्तीपुढे मानव कीती हतबल होतो हे पटवून सांगण्याचे काम पावसाने अगदी यथासांग पार पाडले होते.त्याचा हेतू साध्य झाला.तोही आता पृथ्वीशी काटकोनात सावकाश पडू लागला.थोड्या वेळाने लाईट आली.आता बसलेले सर्व सावकाश उठले." आलीया भोगाशी असावे सादर " म्हणत कामाला लागले.ओल्या फरशीवरील पाणी पुसून स्वच्छ करण्यात आले. अनायसेच घर धुवूनपुसून निघाले. अशाप्रकारे पाऊस जसा अचानक आला तसा सावकाश निघून गेला. सर्वत्र गारवा पसरवून व मनाला समाधान देऊन गेला.सर्वजण आपापल्या घरांतून बाहेर पडले व स्वच्छ मनाने फिरु लागले. सर्वांच्या चेहऱ्यावर एकच समाधान होते. शेती व शेतकरी दोघेही तृप्त झाले. फक्त वाईट वाटले ते झोपडपट्टीवाल्यांचे.त्यांचे हाल न बघण्यापलीकडचे होते.पण त्याला ईलाज नव्हता.ही त्यांची स्थिती कधी व कशी सुधरायची हा मोठा प्रश्न मनात आला.पण ऊन्हाची धग सर्वांनाच त्रास देत होती.त्यामुळे ," आ..हा आत्मा शांत झाला " असे ऊदगार सर्वांच्या तोंडी ऐकून पाऊससुद्धा ऐटीत दुसरीकडे निघून गेला.
लेखिका
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर.
9881862530
No comments:
Post a Comment