Monday, 29 October 2018

लेख ( मीटू... )

साहित्य स्पंदन समूह

लेख स्पर्धा 28/10/2018

विषय - मी टू ..ची मोहीम

आज सगळ्या प्रसारमाध्यमांमध्ये हमखास दिसणारा शब्द म्हणजे मी टू... होय.मी टू... चा शब्दशः अर्थ होतो मी सुध्दा . आज ज्या विषयासंदर्भात जोरदार चर्चा चालू आहे त्यावरून असे लक्षात येते की हे सर्व प्रकरण स्री व स्रीत्वासंबंधी आहे. ही चळवळ सुरू करण्यापाठीमागे एक चांगला व उदात्त हेतू दिसून येतो.9 डीसेंबर 2013 ला कायदा संमत झाला असला तरी ऑक्टोबर 17 ला हॉलीवूड मध्ये कामाच्या ठिकाणी होत असलेल्या यौन शोषणाविरुद्ध आवाज ऊठवण्याकरीता अमेरिकन अभिनेत्री एलिसा मिलानो ने महिलांना प्रोत्साहित केले. या कायद्यात महिला तिच्यावर झालेल्या अत्याचारासंदर्भात नव्वद दिवसात तक्रार करायची आहे. नंतर परत नव्वद दिवसासाठी कारणे सांगून वेळ परत नव्वद दिवसांचा कालावधी मागून घेता येतो.त्याचप्रमाणे घटनेनंतर एक ते तीन वर्षापर्यंत तक्रार करता येते.

   अशाप्रकारे मीटू... महिलांना एक आधार मिळाला. ही एक चांगली सुरवात आहे. पण मध्ये एवढी वर्षे निघून गेली व अचानकपणे हा विषय चर्चेत आला. प्रत्येकजण यावर आपली मते मांडू लागले. तनुश्री दत्ता व नाना पाटेकर सारख्या दिग्गज कलाकाराचे नांव पुढे आल्यावर सगळ्यांचे लक्ष वेधले गेले.या गोष्टी मनात न पटणाऱ्या आहेत. कारण नाना पाटेकर चे कार्य पाहता सर्वांना ते अनाकलनीय होते.हळूहळू एकेक प्रतिष्ठित व्यक्तींची नांवे पुढे येऊ लागली.मनात मग शंकेची पाल चुकचुकली. हे सर्व आत्ता असे अचानक कसे काय.घटना पाहता ती वीस पंचवीस वर्षापूर्वी ची असल्याचे बोबले जाते. मग ईतके दिवस या गप्प का होत्या. तेव्हाच का विरोध दर्शवला नाही ? तेव्हा तुम्ही समायोजन केलंत . चित्रपटात काम व नांव ,पैसा प्रसिद्धी मिळवली.व आज यातलं काही राहीलं नाही म्हणून की काय ही ऊपरती आली ? तेव्हा तुम्हाला नको होते ना मग पुढे पाऊल का टाकायचे ? तिथूनच माघार घ्यायची होती? तेव्हा हे का सुचले नाही. तुम्हाला कुणी जबरदस्ती केली होती का की नाही तुम्हाला हेच काम करायचे आहे म्हणून? त्यावेळी तूम्ही ते नाकारायचे व दुसरा मार्ग निवडायचा. हे सर्व प्रश्न मनात आले व मन विचार करु लागले. यातलं खरं कीतपत व खोटं कीतपत आहे.

महिलांच्या दृष्टीने हे अत्यंत चांगले व सुरक्षा देणारे व स्त्रीची हीम्मत वाढवणारे आहे. याचा फायदा महिलांनी जरूर घ्यावा पण योग्य कारणांसाठी. याचा गैरवापर न करता आपल्या हक्कासाठी करावा.गैरसमजुतीमुळे व एखाद्याबद्दलचा आकस मनात धरुन गैरवापर करु नये.यामध्ये आपली अब्रू तर जातेच जाते व ज्या व्यक्तीवर आपण शिंतोडे उडवतो त्याचीही बदनामी होते.दोघांनाही ते नुकसानीचेच आहे.एवढ्या वर्षाच्या कालावधीनंतर आता हे परत कुठल्याही पुराव्याशिवाय आरोप लावणे हे बिनबुडाच्या घागरीसारखे होईल.एवढ्या वर्षांचा पुरावा कीतपत खरा असेल? त्यात फेरफार केला नसेल कशावरून ? अशा नाना शंका मनात येतात.याची सर्व ऊत्तरे ठामपणे देता येत असतील तरच एक पाऊल पुढे टाकलेले बरे.अन्यथा आपला आरोपीचा व न्यायालयाचा अमूल्य वेळ वाया घालवल्यासारखे होणार आहे. तेंव्हा आता सद्यस्थितीत महिलांच्या वर होणाऱ्या अनेक मनाला चीड आणणाऱ्या घटना घडत आहेत.काही विकृत मनोवृत्तीच्या लोकांमुळे सर्वांच्याच कडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो.या मनोवृत्तीला पायबंद हा बसलाच पाहिजे. सर्व महिलांनी याचा योग्य वापर करुन आपले मत मांडायला निर्भयपणे पुढे यावं हीच सदिच्छा.

लेखिका
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा कोल्हापूर
9881862530

Sunday, 28 October 2018

कविता विद्रोही ( राजनीती )

स्पर्धेसाठी

कविता  ( विद्रोही )

विषय - राजनीती

गेला जमाना सत्ययुगाचा ,
कलियुगाचेच राज्य पसरले.
ज्याची त्याची ठरली राजनीती,
कुणी कधी वचना जागले ?

पाचवर्षातून एकदाच फीरतात,
जत्थेच ईथे राजकारण्यांचे.
बाकी नसते सवड कुणाला ,
वेड फक्त खुर्ची टिकवण्याचे.

काय म्हणून जनता भोळी,
पडती बळी आश्वासनांसाठी.
लाचार होऊन पैसे खाती,
आत्मसन्मान गहाण मतांसाठी.

कोणत्या तोंडी जाब विचारणार ?
ऊत्तरे ठरलेलीच दिली जातात.
असल्या जगण्यापेक्षा मतदारा,
नोटाचं शस्त्र घे हाती मतदानात.

ऊतरवला पाहिजे माज यांचा,
सत्तेची चढलीय खूप नशा.
गरीबांची कींमत नाही केली तर,
सहजच पाडतील आता फडशा.

जागा हो मानवा तूच तूझा त्राता,
बदलून टाक समाजव्यवस्था.
सगळेच झालेत संधीसाधू चोर,
हो तय्यार बदलण्या ही अवस्था.

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

कविता ( साखरपुडा )

स्पर्धेसाठी

विषय - साखरपुडा

आयुष्यातील गोड आठवण ,
सुखावून जातेय मनाला .
लग्नगाठ बांधायच्या आधी ,
समजून घेऊया एकमेकाला .

वाड:निश्चय आनंदी सोहळा ,
साखरपुडा असे पर्यायी नांव .
मनोमिलनाच्या सुंदर समयी ,
जमले सगेसोयरे अन् सारा गाव.

साखरसाडी शोभून दिसते ,
तेज वदनी नियोजित वधूच्या.
पाहून लकाकी वदनावरची ,
खुलते कळी अंतरी मुलाच्या .

तर्जनीतली अंगठी खुलते ,
दोघांच्याही साक्षीने आज .
भरजरी वसने शोभती अंगी ,
याचा तर वेगळाच असतो बाज.

स्वप्न सोनेरी उरात घेऊन ,
रंगणार मनी महाल सोनेरी .
नाही चालणार विसरून दोघे,
कष्टाचीच लागेल गोड भाकरी.

यादी करती जेष्ठ मंडळी,
देती एकमेका पानसुपारी .
साखरपुडा सुरवात आहे,
वैवाहिक जीवनाची पायरी.

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Saturday, 27 October 2018

चारोळी ( आईची माया )

स्पर्धेसाठी

चारोळी

विषय - आईची माया

स्वर्गसुखापुढे फीकी पडते
निस्वार्थी ही आईची माया
झिजवू तीच्यासाठी आपण
आपली ही कृतज्ञ काया

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा कोल्हापूर

Friday, 26 October 2018

चारोळी ( यशोगाथा )

स्पर्धेसाठी

चारोळी

विषय - यशोगाथा

अशीच बहरु दे तुझी यशोगाथा
अक्षय,अनंत भविष्यासाठी
शब्दसुमने ऊधळीत येतील सारे
हर्षाने तुमच्या अभिष्टचिंतनासाठी

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर.

Sunday, 21 October 2018

कथा ( रुप पावसाचे...)

पावसाळ्याचे दिवस होते.सप्टेंबर महिना.संध्याकाळी आकाशात अचानक ढग जमू लागले. दिवसभर सगळ्यांच्या अंगातून घामाच्या धारा ओसंडून वहात होत्या. त्या धारांत पावसाच्या धारा मिसळाव्यात ही प्रत्येकाची ईच्छा.ती सफल होण्याची चिन्हे दिसू लागली.सर्वांच्या चेहऱ्यावर समाधान दिसू लागले. प्रत्येकाच्या तोंडातून समाधानाचे उद्गगार बाहेर पडू लागले," आता आला तर भरपूर पडू दे." एकजण म्हणाली," जीवाची तगमग दूर होईल बघ बाई ! " दुसरा म्हणाला , " अरे शान्या,खुळा का काय तू ? आता पाऊस येतो म्हणतोय आणि तू त्या बिनछपराच्या तंबूत शिनिमा बघून येतू म्हणतूस व्हय ? गप्प बस की घरात आणि मजा बघ मजा पावसाची." अशाप्रकारे प्रत्येकजण आपापली मते व्यक्त करत होता. पण अशीही कांही लोकं होती की जी या पावसामुळे हिरमुसली झाली होती. कोण ओळखलात का? हां अगदी बरोबर!!! आपले झोपडपट्टीवाले हो !!! त्यांचपण बरोबरच की ,कारण जरा कुठं पाऊस झाला तरी यांना पायावरच बसावे लागते व डोक्यावर पावसाचे थेंब झेलावे लागतात.अशाप्रकारे पाऊस पडणार म्हटल्यावर सुख व दु:ख अशा संमिश्र प्रतिक्रिया ऐकायला येत होत्या. लोकं वर तोंड करुन पावसाची वाट पहात बसले.पूर्वसूचना दिल्याप्रमाणे वातावरणात बदल झाला. संध्याकाळीच रात्र झाल्याचा भास होऊ लागला.ऊकाडा खूपच वाढला. आणि अचानक सगळ्यांच्या काळजात धस्स झालं. आकाशात अचानक धडाडधूम... असा मोठा आवाज झाला.आपापली घरे शाबूत आहेत का ? हे सर्वजण पाहू लागले.आपले घर शाबूत आहे म्हटल्यावर दुसऱ्याची घरे बाहेर येऊन पाहछ लागले.तेवढ्यात पुन्हा एकदा मोठा आवाज झाला. प्रत्येकजण आपापल्या घरात पळाले. पावसाच्या थेंबानी ताशा वाजवायला सुरवात केली.हवेत मातीचा मंद मंद सुगंध दरवळू लागला. सर्वांचा मनाला एक धुंद आनंद देऊन गेला.अंगाला गार वारा स्पर्शू लागला. पावसानेही आता ठेक्यासहीत सूर धरला.मन सुखाऊन गेले.पण हळूहळू पावसाचा जोर वाढू लागला. थोड्या वेळाने मुसळधार पाऊस असा कोसळू लागला की बस्स.... घरांची छपरे पार धुऊन निघाली व पन्हाळीतून सरळ रस्त्यावर ऊड्या मारु लागला. गटारी भरुन महापूर आलेल्या नदीसारख्या वाहू लागल्या. रस्ता कुठे दिसेनासा झाला. सगळीकडे पाणीच पाणी... ज्यांच्या घरांचे ऊंबरठे थोडे ऊंच होते ते अगदी थोडक्यात बचावले.पण ज्यांचे ऊंबरठे जमिनीला समांतर राहून आपल्या समानतेच्या गप्पा मारत होते त्यांची खरी पंचायत झाली. पावसाचे पाणी त्या ऊंबरठ्यांना ओलांडून सहज घरात शिरले.ईकडेतिकडे पहात थेट आतल्या खोलीचा रस्ता धरले ते स्वयंपाकघरात जाऊन स्थिरावले कारण पुढे जायला वाटचं नव्हती ना !!! चुलीजवळ जाताना अगदी दाराजवळ ठेवलेले एक जाडजूड चप्पल ते आपल्याबरोबर न्यायला विसरले नाही. कारण जाताना वाटेत येणाऱ्या गोष्टी आपल्या बरोबर नेण्याची सवय पाण्याची असते ती त्याने प्रामाणिकपणे पार पाडली होती. चुलीजवळील जळण व भांडी त्या पाण्यात अगदी मनसोक्त पोहू लागली. काही शिवाशिवीचा खेळ खेळू लागली.हनीफचाचा बायकोला म्हणाले," देख , देख ये कैसे पानी में खेल रहे हैं।" ते ऐकून भाभी चिडली व नवऱ्याला म्हणाली," देखते बैठो तुमेच,घर का हाल क्या हुवा है ये देखने के बजाय तुम मुझे क्या दिखा रहे हो जी ? "चाचाला हसावे का रडावे तेच कळेना.तो कधी न आलेल्या पाहुण्याला बाहेर काढायचे सोडून बघतच राहिला.तेवढ्यात एक वाटी तरंगत येऊन त्याच्या पायाभोवतीच गोल गोल फीरु लागली.चुलीजवळील चप्पल मात्र काही केल्या हलेना, तेंव्हा हे काय बरोबर दिसणार नाही म्हणून चाचा ते चप्पल हातात उचलून बाहेर जायला निघाला पण हाय रे दुर्दैव!!!! त्याचा पाय घरातील ऊखळात अलगत उतरला व चाचा तेवढ्याच वेगात साष्टांग नमस्कार घालण्यासाठी जमीनीवर पडला.त्याच्या त्या कृतीमुळे पाणी जागचे हलले व भिंतीवर टांगलेल्या कपड्यांवर नक्षी काढण्याचे काम चोखपणे बजावले. चप्पल परत पाण्यात विराजमान झाली. चाचा मात्र ऊखळातून उठून जात्यावर बसला. पाऊस काही थांबण्याची चिन्हे दिसेनात.ऊंचीला कमी असणाऱ्या घरातील ही अवस्था थोड्या ऊंचावर असणाऱ्या घरातील व्यक्ती बघत होत्या.त्यांना थोडा आनंद व थोडे वाईट वाटत होते.थोडा गर्वही वाटला की आपले घर ऊंचावर आहे. पण तो जास्त काळ टिकला नाही. कारण पाऊस आडवातिडवा कोसळू लागला होता. दारां-खिडक्यातून तो थेंबाथेंबाने आत येऊ लागला. पाटील काका त्या थेंबांकडे पहात तुच्छतेने म्हणाले," येऊ दे त्याला ,कीती येतोय तेवढा येऊ दे,असा या फरशीवरुन ढकलून देतो."जणू पावसाने त्यांचे बोलणे ऐकले की काय,तो आणखीन जोरात ताडताड आवाज करत कोसळू लागला. दारातून , खिडकीतून जरी बंद असले तरी जोरात आत येऊ लागला.कौलांतून खाली येऊ लागला व घरांत टपकू लागला.घरातील मुलाच्या डोक्यावर थेंब पडलेले पाहिल्यावर त्याने आपल्या डोक्याच्या ठीकाणी एक पातेले ठेवून बाजूला झाला. त्या पातेल्यात आता पाऊस टण...टण.. असा आवाज काढत पडू लागला.सुरवातीला पातेल्यात पडलेले पाणी मोकळे असल्यामुळे परत ऊडून बाहेरच पडत होते.एवढ्यात घरातील मुलगी माणिक ओरडली, " ये हे बघा हे खिडकीत कीती पाणी आलयं." तिच्या त्या वाक्याने सर्वांच्या अंगात वारं भरल्यासारखे झाले. खिडकीतून सामान बाजूला काढून ठेवण्यासाठी सर्व धावले .तेवढ्यात पुष्पा काकूंचे लक्ष दरवाजाकडे गेले. त्या ओरडल्या," अरे संजू , राजू अरे पळा " सगळे तिकडे धावले दाराजवळच सूताचे एक भलेमोठे बाचके होते.त्याला भिजवण्याचे काम पावसाच्या पाण्याने चोखपणे बजावले होते. गडबडीत पळण्याच्या नादात एकजण फरशीवरुन घसरला व खाली पडला.त्याच्या डोक्याने भिंतीला भेट दिली व येताना सुपारी कपाळावर भेट म्हणून आणली.मग सुताकडे दुसराच कुणीतरी धावला व बाचके आत नेण्यात आले.भरीस भर म्हणून की काय अचानक लाईट गेल्या.अंधारात सगळेजण स्तब्ध राहिले. आंधळ्याची स्टाईल मारत पुष्पाकाकू आत चाचपडत गेल्या व मेणबत्ती व काडेपेटी शोधून आणली व उजेड केला.आता सर्वजण, हुश्श... करत खुर्च्यांवर विराजमान झाले व पावसाच्या पाण्याकडे बघू लागले.आता सर्वांचे गर्वहरण केल्यामुळे व नैसर्गिक शक्तीपुढे मानव कीती हतबल होतो हे पटवून सांगण्याचे काम पावसाने अगदी यथासांग पार पाडले होते.त्याचा हेतू साध्य झाला.तोही आता पृथ्वीशी काटकोनात सावकाश पडू लागला.थोड्या वेळाने लाईट आली.आता बसलेले सर्व सावकाश उठले." आलीया भोगाशी असावे सादर " म्हणत कामाला लागले.ओल्या फरशीवरील पाणी पुसून स्वच्छ करण्यात आले. अनायसेच घर धुवूनपुसून निघाले. अशाप्रकारे पाऊस जसा अचानक आला तसा सावकाश निघून गेला. सर्वत्र गारवा पसरवून व मनाला समाधान देऊन गेला.सर्वजण आपापल्या घरांतून बाहेर पडले व स्वच्छ मनाने फिरु लागले. सर्वांच्या चेहऱ्यावर एकच समाधान होते. शेती व शेतकरी दोघेही तृप्त झाले. फक्त वाईट वाटले ते झोपडपट्टीवाल्यांचे.त्यांचे हाल न बघण्यापलीकडचे होते.पण त्याला ईलाज नव्हता.ही त्यांची स्थिती कधी व कशी सुधरायची हा मोठा प्रश्न मनात आला.पण ऊन्हाची धग सर्वांनाच त्रास देत होती.त्यामुळे ," आ..हा आत्मा शांत झाला " असे ऊदगार सर्वांच्या तोंडी ऐकून पाऊससुद्धा ऐटीत दुसरीकडे निघून गेला.

लेखिका
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर.
9881862530

लेख ( माझा गांव )

स्पर्धेसाठी

लेख / निबंध

विषय - माझा गांव

मी , माझं, माझ्याकडे हे शब्द आपल्याला खूप प्रिय असतात कारण यामध्ये आपलेपणा जाणवतो.आत्मीयता वाढीस लागते.माझ्या गावाबद्दल माझ्या मनात खूप प्रेम आहे.

माझ्या गावाचे नांव कुरुंदवाड. संस्थानकालीन गांव.कृष्णा व पंचगंगेच्या पावन संगमाजवळ वसलेलं हे कुरुंदवाड गांव.माझ्या गावाभोवती गवताची कुरणे होती.त्यामुळे कुरणवाडी असं म्हणत म्हणत अपभ्रंशाने त्याचे कुरुंदवाड असे नामकरण झाले. आजही नदीकाठी गवताची कुरणे दिसून येतात.गावालगतच दोन्ही नद्या असल्यामुळे बारमाही पाणी असते,त्यामुळे ईथली भूमी सुजलाम् ,सुफलाम् आहे. ईथली वांगी व भाजीपाला यांच्या चवीला तोड नाही.तसेच इथली बासुंदी, खवा खूप प्रसिद्ध आहे.

आशियातील पहिल्या सर्कशीचे जनक पं.विष्णूपंत मोरेश्वर छत्रे हे कुरुंदवाडचेच.त्याचप्रमाणे शास्त्रीय संगीताची जाण असणारे पं.विष्णू दिगंबर पलूसकर यांचाही जन्म कुरुंदवाडमधेच झाला होता. पटवर्धन सरकार यांनी कुरुंदवाडचा विकास केला.येथे प्राचीन राजवाडा होता.त्यांनी कुरुंदवाड मधे कोरीवकामाचा उत्तम नमुना असलेले विष्णू मंदिर बांधले. तसेच कृष्णा नदीवर सुंदर घाट बांधला. या घाटावर गणेशाचे, कार्तीकेयचे कोरीव बांधकामातील मंदिरे बांधली.याच घाटावर पूर्ण शहराला होणाऱ्या पाण्याचे शुद्धीकरण होते.घाटावर ऐतिहासिक संताजी घोरपडे यांची समाधी आहे.याच घाटावर महात्मा गांधी यांच्या रक्षेचे विसर्जन ही झाले आहे. त्याचप्रमाणे परमपूज्य साने गुरुजी यांनीही येथे सभा घेतली होती.एवढेच नव्हे तर या घाटावर मंगल पांडे नावाच्या चित्रपटाचे व इतर अनेक चित्रपटांचे चित्रीकरण , व दूरदर्शन मालीकांचे चित्रीकरण सुद्धा झालेले आहे.गावपाटील मा.श्री.रावसाहेब उर्फ दा.आ.पाटील यांच्या वाड्यावरही चित्रीकरण झाले आहे.

या नगरीला सांस्कृतिक, सामाजिक व राजकीय वरदहस्त लाभला आहे. इथले कलाकार पूर्ण भारतात प्रसिद्ध आहेत.येथे शैक्षणिक संस्था ही प्रसिद्ध आहेत. बाजारपेठ नेहमी सर्व वस्तूंनी भरलेली असते.दुधदुभत्याचा नेहमी राबता असतो.क्रीडाक्षेत्रातही इथले खेळाडू  जागतिक पातळीवर चमकले आहेत.माझ्या गावात कशाचीच कमतरता नाही. सर्वसुख येथे मिळते. सर्व धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात.येथे गणपती व पीर/ ताबूत मशिदीत बसवले जातात.ही कौतुकास्पद व अभिमानास्पद गोष्ट आहे.

नगरपालिकेच्या माध्यमातून विकासकामे राबवली जातात.येथे राजकारण ही तितक्याच अटीतटीने खेळले जाते.राजकारणातील सर्व खेळी इथेच पहायला मिळतात.सर्व दृष्टीने माझा गांव समृद्ध असल्यामुळे या गावात मुली द्यायला सर्वजण उत्सुक असतात.

असा माझा कुरुंदवाड गांव मला खूप आवडतो.मला माझ्या गावाचा सार्थ अभिमान आहे.

लेखिका
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर.

चारोळी ( अभिमान )

अभिमान

फेटा दिसे शोभून शिरावरी
हाती कर्तृत्वाचा सन्मान
आनंद दाटला आमच्या ऊरी
तुमचा आम्हा अभिमान .

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड

Saturday, 20 October 2018

चारोळी ( शेवटचा श्वास )

झटपट चारोळी स्पर्धेसाठी

चारोळी

विषय- शेवटचा श्वास

क्रीयाशिल व कार्यतत्पर राहूनच
प्रत्येकाने घ्यावा शेवटचा श्वास
तरच राहील जगी या आठवण
आठवेल आपल्या कामाचा ध्यास

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Friday, 19 October 2018

अष्टाक्षरी ( विद्याधन )

स्पर्धेसाठी

अष्टाक्षरी

विषय - विद्याधन

विद्याधन मानवाचे
अबाधित नेहमीच
नाही कधी लागणार
बाधा याला कुणाचीच

विद्याधन श्रेष्ठ जगी
राही विचारप्रवण
भेद ओळखी सत्वर
कोण सज्जन, रावण

सारासार विचारांचे
फुलतील येथे मळे
नाही कापणार कोणी
येथे कोणाचेच गळे

हेच खरे विद्याधन
ओळखावे जगी आता
नाही दुसरा कोणीही
जगी या दुसरा त्राता

विद्याधन देते ज्ञान
वैचारिक पातळीचे
नाही सुचणार आता
बोल हीन पातळीचे

प्राप्त करा विद्याधन
वाढे उंची जीवनाची
खरी योग्यता आपली
आपणच जाणायाची

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

दर्पणरचना ( वर्धापनदिन )

स्पर्धेसाठी

दर्पण काव्यरचना

विषय-- वर्धापनदिन

वर्धापनदिन
दर्पण ग्रुपचा
वर्धापनदिन
कन्हैयाच्या सम विषम रचनेचा
वर्धापनदिन
मुक्तपणे व्यक्त केलेल्या मनातील भावनांच्या संधीचा
वर्धापनदिन
आरसा आपले भाव दाखवतो तसे भाव दाखवणाऱ्या दर्पणचा
वर्धापनदिन
समविचारी साहित्यिकांना एकत्र आणणाऱ्या एका अनोख्या पद्धतीने मांडलेल्या सुंदर काव्यरचनेचा
वर्धापनदिन

रचना
श्रीमती माणिक नागावे.
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
9881862530

Thursday, 18 October 2018

कविता- रौद्ररस ( स्त्री म्हणजे खेळणं नव्हे )

स्पर्धेसाठी

रौद्ररस

विषय- स्री म्हणजे खेळणं नव्हे

खेळत आईच्या मांडीवर
वाढले मी लाडात राणी
लागले चालू दुडुदुडु अंगणी
तेव्हा झाले होते मी खेळणं
फक्त माझ्याच आईबाबांसाठी....

टाकले पाऊल समाजात सहजच
दिसत होते बाहुलीसारखी छान
वाटलं नव्हतं खरंच खेळणं बनेन 
शंका मनातली सत्यात ऊतरली
संतापाची लकेर मस्तकात घुसली

सांगावे वाटले ओरडून जगाला
अरे!! स्त्री म्हणजे खेळणं नव्हे
आहेत तिलाही भावना अन्..
आहे सुंदर हळवं मनसुद्धा
विचार करा रे त्याचाही तुम्ही
बंद करा तुमच्या वासनांध नजरा..

नाही व्हायचं मला खेळणं कुणाचं
शिकायचयं प्रतिकार करायला ...
अकारण होणाऱ्या अन्यायाविरुद्ध
मिळणाऱ्या दुय्यम वागणुकीविरुद्ध.
बनवायचयं सक्षम मला करण्या
उद्धार स्वतःचाच..
पाडण्या मुडदे अत्याचाऱ्यांचे

जागे व्हा षंढानो , या सामना करायला. वारसा आमचा झाँसीचा अन् पराक्रमी अहिल्येचा
जिजाऊ अन् सावित्री च्या त्यागाचा.नारीशक्ती उठली पेटून तर खैर तुमची नसे या जगी.

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर.

कथा-- अखेर तिने करुन दाखविले

अखेर तीने करुन दाखवले.....

जीवनात अशक्य असे काहीच नसते.जर आपण प्रयत्नांची पराकाष्ठा केलीकी ते सहजसाध्य होते.समाजात वावरताना अनेक अडचणींशी सामना करणाऱ्या व्यक्ती आपणास दिसतात.अशातच अध्ययन अक्षम विद्यार्थीही येतात. त्यांना बोललेलं सर्व समजतं पण कृती करताना अडथळा येतो.श्रुती अशीच एक अध्ययन अक्षम विद्यार्थीनी. प्रथम दर्शनीच ते लक्षात यायचं . जेंव्हा प्रथम ती शाळेत आली,तेंव्हा ती थोडी बुजलेलीच वाटत होती. ती आधी ज्या शाळेत शिकत होती त्या शाळेतील काही मुली तिच्याबरोबर होत्या. त्यामुळे तिला एकदम नवीन वाटतं नव्हतं.पण इतर गावातील मुलीही होत्या.त्यांना श्रुतीचे वागणं ,बोलणं वेगळं वाटायचं.त्या तिला हसायच्या ,तेंव्हा आम्ही सगळ्या शिक्षिकांनी सर्व विद्यार्थीनींना सूचना दिल्या.

का कुणास ठाऊक ,पण माझे तिच्याकडे लक्ष असायचं.तिसुद्धा सारखं माझ्या भोवतालीच फीरायची. एकदा तिला जवळ घेऊन विचारले, " श्रुती काय चाललयं तुझं ?" ती माझ्याकडे पाहिले व व माझ्या डोळ्यातील आश्वासक भाव बघत अडखळत म्हणाली," ताय नाही." तिला क चा उच्चार करता येत नव्हता.मी समजून घेतलं.हळूहळू तीच्यात व माझ्यात जवळीकता वाढू लागली.तिची भीती मोडली. ती सरळ आता स्टाफरुममध्ये येऊ लागली.मुलींच्या पेक्षा ती शिक्षकांच्या केबिनमध्ये च जात रहायची. तालव्य स्वर तिला नीट उच्चारता येत नव्हते.मी आले की,मॅलम ,मॅलम करत पळत यायची. आपल्या मनातील सगळ्या गोष्टी ती माझ्याशी बोलत असे.

अशातच शाळेतील विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम जवळ आला होता.सांस्कृतिक विभाग माझ्याकडे असल्यामुळे गाणी निवडणे,सराव घेणे चालू झाले. श्रुती नेहमी आजूबाजूला असायचीच.एकदा तिच्या मनात काय आले काय माहित , ती माझ्याजवळ आली आणि म्हणाली," मॅलम मीपण दान्स कलणाल." क्षणभर मला काही सुचेना. मनात प्रश्न निर्माण झाला की ही कशी नाचणार? हीला सरळ चालता येत नाही, चालताना दोन्ही गुडघे एकत्र येतात.नाचायचा तर प्रश्नच नव्हता.सुरवातीला मी दुर्लक्ष केलं पण ती मला पुन्हा पुन्हा विचारु लागली. मग मला खात्री झाली की हीला नक्कीच नाचायचं आहे. मी म्हटलं," खरचं तू नाचणार ? कुठल्या गाण्यावर नाचणार ?" तीने मलाच प्रश्न विचारला ," तुतलं घेऊ ?" आता परत मलाच प्रश्न पडला की हीला कोणता नाच द्यायचा.हीच्याबरोबर कोण नाचणार..... माझ्या डोळ्यासमोर बालगीतं आली पण तिने ती,"हे नतो,ते नतो " करत नाकारली.

तीच्या वर्गातील मुलींनी कठपुतली नाच बसवला होता. त्यामध्ये जास्त हालचाली नव्हत्या.मी ठरवलं की हीला या नाचामध्ये घ्यायचं.श्रुतीला विचारले,"श्रुती तू नाचात जातेस का ?" तीने लगेच ," हो" म्हटलं.आता प्रश्न होता त्या मुलींना तयार करायचं...मी त्या मुलींना बोलावले व विचारले, " तुम्ही श्रुतीला तुमच्या नाचामध्ये घेता का ?" असं विचारल्यावर सगळ्या एकदम ओरडल्या ," काय ? श्रुती!!! आणि आमच्या नाचात ? अहो मॅडम ,तिला कुठे नाचायला येतयं ?" त्यांची प्रतिक्रिया साहजिकच होती.मी त्यातल्या प्रमुख मुलीला समजावलं, " हे बघ वृषाली,अगं तिला नाचायची ईच्छा आहे,तूमच्या नाचात जास्त हालचाली नाहीत,फीरायचं नाही. तेंव्हा तिला ते सहज जमेल." ती म्हणाली, "तरीपण मॅडम ,आमचा नाच पडणार मग " मी म्हटलं," अगं तस काही होत नाही, उलट श्रुतीमुळे तुमचा नाच एक वेगळा नाच होईल." शेवटी एकदा त्या तयार झाल्या.सरावाला सुरवात झाली. सुरवातीला नाराज असणाऱ्या मुली आता श्रुतीचा प्रतिसाद बघून तीला समजावून घेऊ लागल्या.त्यांच्या सरावाला ,श्रुतीच्या नाचाला पहायला मुली गर्दी करच लागल्या.सगळ्यांना ते एक आकर्षणच निर्माण झाले होते. मला वाटले होते सुरवातीला थोडा सराव करुन ती सोडून देईल,पण तसे काय झाले नाही.

   अखेरीस तो दिवस ऊगवला.....मला अजूनी विश्वास वाटत नव्हता. सूत्रसंचलन माझ्याकडे होतं.मी टेबलाजवळ बसून माईक हातात घेऊन बोलत होते. तेवढ्यात श्रुती पांढरा टि-शर्ट,काळी पँन्ट व डोळ्याला गॉगल लावून आली.माझ्याजवळ येऊन ऊभी राहीली.मी तीची मानसिकता तयार करत होते.खात्री करून घेण्यासाठी मी मी म्हटलं," मग काय श्रुती? नाचणार म्हणआज तू ?" ती म्हणाली," मग नातायला नतो ताय? गँदलींग हाय आणि?" तिचा तो आत्मविश्वास पाहून मला खूप आनंद झाला. तिला विचारले," श्रुती,तूला कुणी तयार केलं ?" ती म्हणाली," मम्मीनं." मी पाहिले प्रेक्षकांत तीची आई व बहीण बसले होते.

  शेवटी एकदा त्यांच्या नाचाचे नांव व कलाकार यांची नांवे मी घेतली.त्यावेळी माझ्या मनात एक वेगळेच भाव व शरीरात एक वेगळीच लहर जाणवली.श्रुतीचे नांव ऐकताच सर्व मुलीं उत्साहाने टाळ्या वाजवू लागल्या. मला वाटले आता श्रुती घाबरणार. मी तिला स्टेजवर नेलं.बाकीच्या मुलींना सांगितलं की," हे बघा, श्रुती जरी चुकली तरी तिच्याकडे दुर्लक्ष करुन तुम्ही तुमचा नाच चालूच ठेवा,तिला काय सांगू नका ." सर्वांना आमच्यातलं नातं माहिती होतं.मुली म्हणाल्या," मॅडम , तुमची श्रुती आता नाच करणार की !!!" नाचाला सुरवात झाली आणि सगळ्या मुली मोठ्याने " श्रुती..... श्रुती... श्रुती...." असं ओरडायला लागल्या. वातावरणात एक प्रकारचे वेगळेपण व ऊत्साह जाणवू लागला.मला फोटो काढायचा मोह आवरता आला नाही. दोनचार फोटो काढले.श्रुती बाकीच्या मुलींच्या कडे बघून नाचू लागली.

मी परत माझ्या जागेवर आले.मला माझ्या भावना आवरता आल्या नाहीत. माझ्या डोळ्यातून आसवं गळू लागली.त्या अश्रूधारा मी थोपवू शकत नव्हते.त्या आसवांतून माझा आनंदच वहात होता....शेवटपर्यंत टाळयांचा गजर थांबला नाही. अशारितीने नाच पार पडला. श्रुतीने अखेर करुन दाखवलचं....

लेखिका
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर