स्पर्धेसाठी
सांस्कृतिक कार्यक्रम आणि विद्यार्थी
शाळा संस्कारांचे , शिक्षणाचे , ज्ञानाचे अविरत चालणारे एक केंद्र आहे . यामध्ये विद्यार्थी हा केंद्रबिंदू असतो . विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हे ध्येय समोर ठेऊनच सर्वांची वाटचाल चालू असते .
शिकत असताना विद्यार्थी हा नेहमी ताजातवाना असला पाहिजे . कारण शिकताना जर तो उत्साही असेल तरच अध्ययन व्यवस्थीत होईल . त्यासाठी रोजच्या दैनंदिन अध्ययन अध्यापन प्रक्रियेत सतत बदल घडवून आणण्यासाठी सहशालेय उपक्रम राबवले जातात . त्यातीलच एक उपक्रम म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम होय .
सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे विद्यार्थ्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देणे होय . सांस्कृतिक कार्यक्रम म्हटले की विद्यार्थी एकदम उत्साही होतात. जे विद्यार्थी वर्गात एकदम शांत , एकटे बसलेले असतात तेही खूष होतात व सगळ्यात मिसळतात . आपणही एखादि कला सादर करावी कींवा एखाद्या नृत्य प्रकारात सहभागी व्हावे असे वाटते , मग ते इतरांशी स्वत:हून बोलू लागतात , त्यांच्यांत मिसळतात. ही एक चांगली गोष्ट आहे .
मी तर असे कीतीवेळा पाहिलंय की या सांस्कृतिक कार्यक्रमामुळे अनेक विद्यार्थ्यांचे आयुष्यच बदलून गेले आहे , कारण इथेच त्यांना गती मिळते व आपण काहीतरी करू शकतो हा आत्मविश्वास वाढीस लागतो .मग ते क्रियाशील होतात. आपणांस माहिती आहेच की अपयश ही यशाची पहिली पायरी आहे.
आमच्या विद्यालयात एक गतीमंद विद्यार्थिनी आहे . तिच्या सर्वच क्रीया अतिशय मंद आहेत . कुणालाही असे वाटले नाही की ती सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेईल व नृत्य करेल पण सांस्कृतिक विभाग प्रमुख म्हणून काम करत असताना ती सतत बघत असे . मी एकदा तीला तू नृत्य करणार का ? असे विचारले तर ती हो म्हणाली.मला आश्च़र्य वाटले . आणि तीने माझा पिच्छाच पुरवला . मग मी इतर विद्यार्थ्यांनींना विनंती करून तिला त्यांच्या नाचात घ्यायला लावले . मला सांगायला अभिमान वाटतो तीने सांस्कृतिक कार्यक्रमात नृत्य केले व सर्व मुलींनीही तिला दिलं दिली.आपसूकच माझे डोळे पाणावले . तीही खूप खुश झाली.
त्यामुळे मी असे म्हणते की शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रम हे विद्यार्थ्यांच्यासाठी अतीशय आवश्यक आहे .कारण विद्यार्थी परत जोमाने कार्यरत होतात .अभ्यासही करतात व ताजेतवाने होतात .
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड,ता.शिरोळ ,
जि. कोल्हापूर.