Saturday, 16 March 2019

पुस्तक परीक्षण " स्पंदन "

पुस्तक परीक्षण

        स्पंदन

जोपर्यंत हृदयाची स्पंदने चालू आहेत तोपर्यंतच मानवी देहाला किंमत असते. अन्यथा हे शरीर पार्थिव, निर्जीव ठरते. त्याचप्रमाणे जोपर्यंत आपल्या मनात विचारांची स्पंदने  रुंजी घालत नाहीत, मन पेटून उठत नाही, बेचैन होत नाही तोपर्यंत ते निर्ढावलेलं,संवेदनारहीत,"षंढ "  ठरते. लेखिका प्राजक्ता पाटील  यांच्या स्पंदन या पुस्तकात ही स्पंदने दिसून येतात. वाचताना लेखिकेच्या हळव्या, विचारी  तर कधी समाजातील परीस्थिती विरुद्ध बंडखोरी करणारं,तर कधी यातून मार्ग सुचविणारं अशा मनाची कल्पना येते. आपल्या वडिलांनी दिलेलं स्वाभिमानाचं बीज  मनात पेरून विद्यार्थी घडवत असताना, समाजात वावरताना दिसलेल्या  अनेक सामाजिक प्रश्नांनी  त्यांचं मन वेदनेनं विव्हळताना दिसतं , तर कधी जाब विचारत उपाययोजनाही सुचवतं. माजी अतिरिक्त कार्यकारी अधिकारी कोल्हापूर, माननीय इंद्रजीत देशमुख यांची प्रस्तावना लाभलेले " स्पंदन " हे पुस्तक नक्कीच विचार प्रवण करतं. अनेक समाजिक ज्वलंत प्रश्न ज्यामधे  " स्त्री भ्रूण हत्या ", " लव मॅरेज ", " ब्लू व्हेल गेम " ," निर्भया ", " वधू मिळेना बळीराजाला "  " एकतर्फी प्रेम - एक चिंतन ",  " संस्कृतीची ऐशी की तैशी ", " औषधी गोळ्यांच्या ओझ्याखाली जगणं मुश्किल झालंय ' या प्रकरणांच्या माध्यमातून प्रकाश टाकलाय.  त्याचप्रमाणे " गुरुमहिमा ", " महाराष्ट्र माझा ", " हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या ", " भारतीय संस्कृती ", "राष्ट्रातील युवकांचे स्थान ",   " अस्तित्वाच्या लढाईत ",  " तणाव झुगारून दीर्घायुषी व्हा ", " मुलातील मुलपण हरवले ",      "मराठीअसे आमची मायबोली '," शिक्षकांची बदलती भूमिका -काळाची गरज ", " तीर्थक्षेत्रांचे वास्तव, पवित्र आणि स्वच्छता ",  "वृक्षवल्ली आम्हा सोयरे ", ' ग्रंथ हेच गुरु ", "वाचन संस्कृती " अशा प्रकरणातून लेखिकेचे सामाजिक भान व आंतरिक तळमळ दिसून येते. अशा प्रश्नातून आणि समाजातील अनेक समस्यांवर प्रकाश टाकलाय . महत्त्वाचं म्हणजे उपायही सुचवले आहेत.विज्ञान शिक्षिका असल्यामुळे रक्तदानाचे महत्त्व त्या जाणतात. "कायक रक्त -रक्त दासोह "  यातून ते व्यक्त होतयं. " रसायनशास्त्र आणि मानवी जीवन ", 'चंद्रयान अपेक्षा आणि परिणाम वेध ", 'जलसहयोग मुद्दे आणि आव्हाने ", "अणु उर्जा सामर्थ्य आणि धोका " अशा प्रकरणातून  त्यांनी सखोल वैज्ञानिक माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे .लेखिकेची लेखनशैलीही प्रभावी , प्रवाही आहे.मनात आलेले विचार सहजपणे त्यांनी मांडले आहेत. " स्पंदन "  च्या माध्यमातून अतिशय प्रभावीपणे आपले विचार मांडले आहेत . मुखपृष्ठावरील बंदिस्त ,वैचारिक फुलपाखरे बाहेर पडून आपले विचाररूपी पंख फडफडवत बाहेर येत ,आपल्या विचारांना व्यक्त करताना अतिशय समर्थपणे व समर्पकपणे दाखवले आहे. लेखिकेच्या मनाचेच ते प्रतिबिंब पुस्तक रूपाने प्रकट झाले आहे. समाजासाठी कार्य करणाऱ्या, समाजाचा विचार करणाऱ्या, प्रोढांबरोबरच युवा वर्गाला ही विचार करण्यास भाग पाडणारे हे पुस्तक आहे. महाराष्ट्र शासनाचे अनुदान प्राप्त हे पुस्तक कविता सागर प्रकाशन जयसिंपूरचे प्रकाशक डॉक्टर सुनील दादा पाटील यांनी "स्पंदन " हा लेख संग्रह अतिशय आकर्षक रूपात प्रकाशित केला आहे. त्यांचेही कौतुक केले पाहिजे.असेच मार्गदर्शनपर लिखाण पुढील काळातही लेखिकेकडून होत राहो हीच सदिच्छा . त्यांची लेखणी अशीच बहरत जावो.

समिक्षण / परीक्षण
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
मोबा.नं. 9881862530

No comments:

Post a Comment