Tuesday, 26 March 2019

पत्रलेखन ( निसर्गाचे मानवास पत्र )

स्पर्धेसाठी

पत्रलेखन

निसर्गाचे मानवास पत्र

                 निसर्ग कृपा,
                 शांतीसागर रोड,
                 वातावरण.
                  26/3/2019.

      प्रिय मानवा,

पत्र लिहण्यास कारण की, कालपासून उकाडा खूप वाढल्यामुळे तुम्ही सर्वजण मला म्हणजे निसर्गाला खूप नांवे ठेवत आहात.ते ऐकून मला खूप वाईट वाटले.म्हणून हा पत्रप्रपंच करतोय.

निट लक्ष देऊन वाच माझे म्हणने.मी निसर्ग म्हणजेच पर्यावरण. तुझ्या अवतीभवती असेलेले सर्वकाही म्हणजे मी...निसर्ग. अरे मानवा माझ्याशिवाय तुझे अस्तित्व तरी आहे का रे ? कधी विचार केलायस का याबाबत ? तुला जीवन जगण्यासाठी, जिवंत राहण्यासाठी मी तुला लहानपणापासून तू या जगातून  जाईपर्यंत मी तुझ्या सोबतच असतो.शेवटी तू माझ्या पंचतत्वातच विलीन होतोस.मग आहे ना आपले अतूट नाते ? विचार कर जरा.

पण तुला माझे महत्वच नाही कारण तू तुझ्या सुखासाठी माझ्या अंगावरील कपडे म्हणजेच हिरवीगार हिरवाई नष्ट केलीस व स्वतःला हवे तसे वागलास.पर्यायाने पाऊस कमी झाला. पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागले. पाणी म्हणजे जीवन आहे. याशिवाय कुणीही जगू शकत नाही. आहे ते पाणी तू प्रदुषित करुन टाकलास.अगोदरच शुद्ध पाण्याचा साठा कमघ आहे. त्यात तू आहे ते जपून वापरायचे सोडून त्यातच प्रदूषण करत आहेस.तू शेखचिल्ली झालायस.स्वतःच्या पायावर स्वतःच कु-हाड मारुन घेत आहेस.जंगले नष्ट केलास,त्यामुळे जंगली प्राणी मानवी वस्तीत येत आहेत. हत्ती, गवा,रानडुकरे शेतकऱ्यांच्या पिकांत घुसून नासधूस करत आहेत. मानवी जीवाला धोका आहेच. आता तापमान पण यामुळे वाढत आहे.ओझोन च्या थरालाही धोका उत्पन्न झाला आहे. त्यामुळे रोगराई वाढत आहे,पिकांवर भरमसाठ रासायनिक औषधे मारल्यामुळे कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे.रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमीनीचा सामू घटला आहे,जमीन नापीक बनत आहे, मीठ फुटत आहे. हे सर्व तुझ्या चुकीच्या वागणुकीमुळे होत आहे.

या सर्वावर उपाययोजना करायचे सोडून तू आत्महत्या करतो आहेस.हे बरोबर आहे का ? याला दुसरा उपाय नाही का? अरे...विचार तर कर आधी !!! हे असे का घडले? तुझे वागणे च याला कारणीभूत आहे.अजूनही वेळ गेला नाही. आवर स्वतःला. बांध घाल तुझ्या अफाट ईच्छाशक्तीला. आहे त्यात समाधान मान व माझे रक्षण कर.मीपण तुझे रक्षण करतो.गरजा कमीतकमी ठेव.समाधानी रहा.प्रेमाने वाग. निसर्गाच्या सानिध्यात आहे त्यात सुख मान. माझेही रक्षण कर व तुझेही कर.

मग काय समजले ना ? ऐकणार ना माझे ? ऐकायलाच पाहिजे. अन्यथा तू व तुझे भविष्य अंध:कारमय होईल ना ? लाग मग माझ्या संरक्षणाच्या कामाला.

तुझा कृपाभिलाशी

    निसर्ग

पत्रलेखिका ©®
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर.

No comments:

Post a Comment