Friday, 29 March 2019

कविता ( बदलती ऋतू क्षणाक्षणाला )

स्पर्धेसाठी

बदलती ऋतू क्षणाक्षणाला

निसर्गचक्र गरगरले क्षणात,
बदलून सृष्टी दाखवायला.
बदलून काळवेळ आपसूकच,
बदलती ऋतू क्षणाक्षणाला

कधी वारा तर कधी पाऊस,
कधी थंडीने होतं गारठायला.
झाली अंगाची काहीली उन्हानं,
बदलती ऋतू क्षणाक्षणाला.

कधी फुलला वसंत बागेत,
लागली फुलं ही बहरायला.
कधी शरद तर कधी सावन,
बदलती ऋतू क्षणाक्षणाला

भूल पाडती जीवनात,
लागलेत सारे बदलायला.
अवचित सारे घडते आहे,
बदलती ऋतू क्षणाक्षणाला

यालाच जीवन ऐसे नांव,
लागलयं आता समजायला.
एकच कारण आहे याचे,
बदलती ऋतू क्षणाक्षणाला

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

बालकविता ( उन्हाळी सुट्टी )

स्पर्धेसाठी

बालकविता

विषय - उन्हाळी सुट्टी

शाळा सुटली मज्जा झाली,
परीक्षेतून सुटलो आम्ही.
लागली आता उन्हाळी सुट्टी,
बागडू आनंदाने आम्ही तुम्ही.

नको अभ्यास अन् उठणे लवकर,
गोड स्वप्ने आता बघायची.
नको ओरडणे सगळ्यांचे,
सुट्टी मजेत आता घालवायची

मामाच्या गावाला जाऊया,
चिंचा बोरे, आंबे खाऊया.
सकाळ संध्याकाळ आता,
खेळच खेळ खेळूया.

नाही तमा आम्हा उन्हाची,
नाही तगमग होत जीवाची.
मैदानावर मांडून डाव ,
कास धरुया व्यायामाची.

गप्पा गोष्टी पाराखाली,
दुपारच्या वेळी करुया.
आईबाबांच्या आठवणीने,
डोळे हळूच हसत पुसूया.

क्रिकेट, खो-खो,कबड्डी,
लगोरी,विटीदांडूत रमूया.
बाह्यखेळाबरोबर घरी बसून,
बुद्धीबळ,कॅरमचा डाव मांडूया.

विहिरीत, नदीत पोहुया,
सुरपारंब्यावर लोंबकळूया.
रानात फीरुन रानमेवा खाऊ,
औषधांची माहिती घेऊया.

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चित्रकाव्य (कलरव )

स्पर्धेसाठी

चित्रकाव्य

कलरव

शांत निरव अंधारात,
वृक्षराज हा उभा असे.
काळोखाच्या पार्श्वभूमीवर,
पक्षीगण मनी मोहवत असे.

जणू भासे कापूस फुलला,
कधी वाटे जणू तारका .
लक्ष वेधते आपसूकच,
घाबरु नका तुम्ही बरंका!!

डीश शोभे छतावरती ,
पत्र्याची शेडही शोभे सुंदर.
प्रकाशातून उजळून गेली,
ना तमा आता तमेची.

साक्षीदार वृक्ष उभे बाजूला,
थवा पक्ष्यांचा हा विसावला.
अलवार झोका देई पवन,
फांदीबरोबर बागडला .

प्रतिक्षा आता भास्कराची,
तमोहर करणाऱ्या दिनकराची
जीवनातल्या सुखदु:खाची,
करण्या अधिक वजाबाकिची.

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Thursday, 28 March 2019

हायकू ( ब्रम्हकमळ )

हायकू

ब्रम्हकमळ

रात्री विलसे
सुवास पसरवते
आनंद देते

पूजा करती
सर्व भक्तीभावाने
सुहास्य मने

आवाज येतो
फूल उमलताना
सुखवी कर्णा

शुभ्र धवल
भरपूर पाकळ्या
सर्व मोकळ्या

अल्प आयुष्य
मनाला मोहवते
दाद मिळते

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Tuesday, 26 March 2019

पत्रलेखन ( निसर्गाचे मानवास पत्र )

स्पर्धेसाठी

पत्रलेखन

निसर्गाचे मानवास पत्र

                 निसर्ग कृपा,
                 शांतीसागर रोड,
                 वातावरण.
                  26/3/2019.

      प्रिय मानवा,

पत्र लिहण्यास कारण की, कालपासून उकाडा खूप वाढल्यामुळे तुम्ही सर्वजण मला म्हणजे निसर्गाला खूप नांवे ठेवत आहात.ते ऐकून मला खूप वाईट वाटले.म्हणून हा पत्रप्रपंच करतोय.

निट लक्ष देऊन वाच माझे म्हणने.मी निसर्ग म्हणजेच पर्यावरण. तुझ्या अवतीभवती असेलेले सर्वकाही म्हणजे मी...निसर्ग. अरे मानवा माझ्याशिवाय तुझे अस्तित्व तरी आहे का रे ? कधी विचार केलायस का याबाबत ? तुला जीवन जगण्यासाठी, जिवंत राहण्यासाठी मी तुला लहानपणापासून तू या जगातून  जाईपर्यंत मी तुझ्या सोबतच असतो.शेवटी तू माझ्या पंचतत्वातच विलीन होतोस.मग आहे ना आपले अतूट नाते ? विचार कर जरा.

पण तुला माझे महत्वच नाही कारण तू तुझ्या सुखासाठी माझ्या अंगावरील कपडे म्हणजेच हिरवीगार हिरवाई नष्ट केलीस व स्वतःला हवे तसे वागलास.पर्यायाने पाऊस कमी झाला. पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागले. पाणी म्हणजे जीवन आहे. याशिवाय कुणीही जगू शकत नाही. आहे ते पाणी तू प्रदुषित करुन टाकलास.अगोदरच शुद्ध पाण्याचा साठा कमघ आहे. त्यात तू आहे ते जपून वापरायचे सोडून त्यातच प्रदूषण करत आहेस.तू शेखचिल्ली झालायस.स्वतःच्या पायावर स्वतःच कु-हाड मारुन घेत आहेस.जंगले नष्ट केलास,त्यामुळे जंगली प्राणी मानवी वस्तीत येत आहेत. हत्ती, गवा,रानडुकरे शेतकऱ्यांच्या पिकांत घुसून नासधूस करत आहेत. मानवी जीवाला धोका आहेच. आता तापमान पण यामुळे वाढत आहे.ओझोन च्या थरालाही धोका उत्पन्न झाला आहे. त्यामुळे रोगराई वाढत आहे,पिकांवर भरमसाठ रासायनिक औषधे मारल्यामुळे कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे.रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमीनीचा सामू घटला आहे,जमीन नापीक बनत आहे, मीठ फुटत आहे. हे सर्व तुझ्या चुकीच्या वागणुकीमुळे होत आहे.

या सर्वावर उपाययोजना करायचे सोडून तू आत्महत्या करतो आहेस.हे बरोबर आहे का ? याला दुसरा उपाय नाही का? अरे...विचार तर कर आधी !!! हे असे का घडले? तुझे वागणे च याला कारणीभूत आहे.अजूनही वेळ गेला नाही. आवर स्वतःला. बांध घाल तुझ्या अफाट ईच्छाशक्तीला. आहे त्यात समाधान मान व माझे रक्षण कर.मीपण तुझे रक्षण करतो.गरजा कमीतकमी ठेव.समाधानी रहा.प्रेमाने वाग. निसर्गाच्या सानिध्यात आहे त्यात सुख मान. माझेही रक्षण कर व तुझेही कर.

मग काय समजले ना ? ऐकणार ना माझे ? ऐकायलाच पाहिजे. अन्यथा तू व तुझे भविष्य अंध:कारमय होईल ना ? लाग मग माझ्या संरक्षणाच्या कामाला.

तुझा कृपाभिलाशी

    निसर्ग

पत्रलेखिका ©®
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर.

हायकू ( प्राजक्त )

हायकू

प्राजक्त

केसरी देठ
शुभ्रधवल फूल
मनास भूल

प्राजक्त छान
बहरला अंगणी
आनंद मनी

पडला सडा
पहाटे अंगणात
गंध नाकात

नश्वर जीव
जीवनास प्रेरणा
मनोकामना

आनंदी रहा
जना संदेश देतो
मग्न राहतो

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

हायकू ( सदाफुली )

स्पर्धेसाठी

हायकू

सदाफुली

अंगणी माझ्या
सदाफुली फुलते
छान दिसते

पांढरी फुले
औषधी गुणधर्म
सामावे मर्म

जांभळे रुप
मोहवते मनाला
स्पर्श तनाला

सदा फुलते
शोभिवंत दिसते
मन डोलते

शेंगात बिया
अलगद विसावे
रोपे लावावे

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Sunday, 24 March 2019

चारोळी ( विरुध्द अर्थी )

उपक्रम

विरुद्ध अर्थी शब्द चारोळी

संपूदे सारा *अंधार* म्हणून
दिवाबत्ती केली दारी त्वरेने
लागलीच *प्रकाश*पडला
नमस्कार केला भक्तीभावाने

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Friday, 22 March 2019

हायकू ( कमळ )

हायकू

कमळ

सुंदर फूल
गुलाबी कमळाचे
प्रिय देवीचे

विविधरंगी
सरोवरी फुलते
मना मोहते

राष्ट्रीय फूल
स्थान मिळे मानाचे
आहे देशाचे

कमलदल
हळू उमलतात
मोद देतात

भ्रमर येतो
मकरंद चाखतो
बंदिस्त होतो

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Tuesday, 19 March 2019

हायकू ( रंगांची उधळण )

हायकू

रंगांची उधळण

लाल तांबडा
जास्वंद आठवतो
गणेश येतो

केसरी रंग
शोभतो पळसाला
मनी भरला

पिवळा झेंडू
डवरला शेतात
शांती मनात

शुभ्रधवल
जुई अन मोगरा
मोद साजरा

सोनेरी चाफा
मोद तनामनाला
हर्षित झाला

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

आठोळी ( माहेरचं आंगण )

माहेरचं आंगण

माहेरचं आंगण माझ्या
सामावून घेतयं सर्वानाच
नाही कुणी परके इथे
वाटे आपलेपणा इतरांना

माहेरच्या अंगणात आहे
प्रेम अन् सहानुभूती सदा
पाहून लेकीच्या बाळलीला
सुखावतो बाप पाहून अदा

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

कविता मुक्तछंद ( मोबाईल )

स्पर्धेसाठी

मुक्तछंद

मोबाईल

आधुनिकीकरण झाले आता
मोबाईल हाती दिसू लागला.
प्रणाहूनही प्रिय तो झाला
सोडवेना कधी कुणाकडूनही
त्याच्याविना सकलजनांचा
जीव कासावीस असा झाला.

नाही सापडणार शोधूनही
मोबाईल शिवाय आज व्यक्ती
राव असो वा रंक असो
बालक असो वा वृद्ध
जमलय नातं छान सर्वांच
आहेत सारे यातच व्यस्त.

नाती विसरली प्रेम आटले
संवेदना आता बोथट झाल्या
जवळ असुनी लांब झाले
टाइपिंग मधेच गुंग झाले
आपुलकीचा सुकलाय मळा
मोबाईल ज्याच्यात्याच्या गळा

वापर करुन विचारपूर्वक
कुणी वापरला हितासाठी
अविचाराने वापरुन कुणी
समाजविघातक कृत्य केले
तरुणांबरोबर बालकवर्गही
आता मोबाईलवेडे झाले.

प्रेमवीर खूषीत आहेत
नाही गरज मध्यस्ताची
जोडले जातात आता सहज वेळ ठिकाण त्वरीत ठरते
आवाजाबरोबर फोटोही येतो
चलबिचल मनाची वाढवतो

आईवडीलांच्या प्रेमाची किंमत
समजावून घ्यायला वेळ नाही
एकमेकांबरोबर गप्पा मारण्यात
वेळ कसा जातो समजत नाही

कीती सांगू महती याची
लांबचे जवळ झाले
जवळ असूनही घरचे
परक्यातच जमा झाले
वेळ आहे सावरायला
समजून महत्त्व वापरायला
माणुसकी हरवलेल्यांना
माणसांत आणायला.

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Monday, 18 March 2019

हायकू ( जाई-जुई )

हायकू

जाई-जुई

पांढरी फुले
जाई-जुईची छान
पण लहान

शोभे कमान
अंगणात सुंगधी
वाटे बेधुंदी

सहा पाकळ्या
नाजूक भासतात
सुखी होतात

हिरवा देठ
साजूक अलवार
शोभे अपार

शोभून दिसे
नक्षत्र आसमंती
फुलुन दिसती

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

हायकू ( निशिगंध )

हायकू

निशिगंध

कीती सुंदर
निशिगंधाचे फूल
पडते भूल

लांबच देठ
शुभ्रधवल रंग
खुलवी अंग

छान पाकळ्या
शेंड्याला टोकदार
देवाला हार

शेवटी वक्र
वळणदार दिसे
मनात ठसे

मंद सुगंध
मोहवतो मनाला
प्रसन्न झाला

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Saturday, 16 March 2019

चारोळी ( उनाड वारा )

स्पर्धेसाठी

चारोळी

विषय - उनाड वारा

जरी असला उनाड वारा
फुलवली प्रतिभा सर्वांची
यशस्वीतेचे वर्ष सरले
आशिष लाभो साहित्यिकांचे

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

पुस्तक परीक्षण " स्पंदन "

पुस्तक परीक्षण

        स्पंदन

जोपर्यंत हृदयाची स्पंदने चालू आहेत तोपर्यंतच मानवी देहाला किंमत असते. अन्यथा हे शरीर पार्थिव, निर्जीव ठरते. त्याचप्रमाणे जोपर्यंत आपल्या मनात विचारांची स्पंदने  रुंजी घालत नाहीत, मन पेटून उठत नाही, बेचैन होत नाही तोपर्यंत ते निर्ढावलेलं,संवेदनारहीत,"षंढ "  ठरते. लेखिका प्राजक्ता पाटील  यांच्या स्पंदन या पुस्तकात ही स्पंदने दिसून येतात. वाचताना लेखिकेच्या हळव्या, विचारी  तर कधी समाजातील परीस्थिती विरुद्ध बंडखोरी करणारं,तर कधी यातून मार्ग सुचविणारं अशा मनाची कल्पना येते. आपल्या वडिलांनी दिलेलं स्वाभिमानाचं बीज  मनात पेरून विद्यार्थी घडवत असताना, समाजात वावरताना दिसलेल्या  अनेक सामाजिक प्रश्नांनी  त्यांचं मन वेदनेनं विव्हळताना दिसतं , तर कधी जाब विचारत उपाययोजनाही सुचवतं. माजी अतिरिक्त कार्यकारी अधिकारी कोल्हापूर, माननीय इंद्रजीत देशमुख यांची प्रस्तावना लाभलेले " स्पंदन " हे पुस्तक नक्कीच विचार प्रवण करतं. अनेक समाजिक ज्वलंत प्रश्न ज्यामधे  " स्त्री भ्रूण हत्या ", " लव मॅरेज ", " ब्लू व्हेल गेम " ," निर्भया ", " वधू मिळेना बळीराजाला "  " एकतर्फी प्रेम - एक चिंतन ",  " संस्कृतीची ऐशी की तैशी ", " औषधी गोळ्यांच्या ओझ्याखाली जगणं मुश्किल झालंय ' या प्रकरणांच्या माध्यमातून प्रकाश टाकलाय.  त्याचप्रमाणे " गुरुमहिमा ", " महाराष्ट्र माझा ", " हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या ", " भारतीय संस्कृती ", "राष्ट्रातील युवकांचे स्थान ",   " अस्तित्वाच्या लढाईत ",  " तणाव झुगारून दीर्घायुषी व्हा ", " मुलातील मुलपण हरवले ",      "मराठीअसे आमची मायबोली '," शिक्षकांची बदलती भूमिका -काळाची गरज ", " तीर्थक्षेत्रांचे वास्तव, पवित्र आणि स्वच्छता ",  "वृक्षवल्ली आम्हा सोयरे ", ' ग्रंथ हेच गुरु ", "वाचन संस्कृती " अशा प्रकरणातून लेखिकेचे सामाजिक भान व आंतरिक तळमळ दिसून येते. अशा प्रश्नातून आणि समाजातील अनेक समस्यांवर प्रकाश टाकलाय . महत्त्वाचं म्हणजे उपायही सुचवले आहेत.विज्ञान शिक्षिका असल्यामुळे रक्तदानाचे महत्त्व त्या जाणतात. "कायक रक्त -रक्त दासोह "  यातून ते व्यक्त होतयं. " रसायनशास्त्र आणि मानवी जीवन ", 'चंद्रयान अपेक्षा आणि परिणाम वेध ", 'जलसहयोग मुद्दे आणि आव्हाने ", "अणु उर्जा सामर्थ्य आणि धोका " अशा प्रकरणातून  त्यांनी सखोल वैज्ञानिक माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे .लेखिकेची लेखनशैलीही प्रभावी , प्रवाही आहे.मनात आलेले विचार सहजपणे त्यांनी मांडले आहेत. " स्पंदन "  च्या माध्यमातून अतिशय प्रभावीपणे आपले विचार मांडले आहेत . मुखपृष्ठावरील बंदिस्त ,वैचारिक फुलपाखरे बाहेर पडून आपले विचाररूपी पंख फडफडवत बाहेर येत ,आपल्या विचारांना व्यक्त करताना अतिशय समर्थपणे व समर्पकपणे दाखवले आहे. लेखिकेच्या मनाचेच ते प्रतिबिंब पुस्तक रूपाने प्रकट झाले आहे. समाजासाठी कार्य करणाऱ्या, समाजाचा विचार करणाऱ्या, प्रोढांबरोबरच युवा वर्गाला ही विचार करण्यास भाग पाडणारे हे पुस्तक आहे. महाराष्ट्र शासनाचे अनुदान प्राप्त हे पुस्तक कविता सागर प्रकाशन जयसिंपूरचे प्रकाशक डॉक्टर सुनील दादा पाटील यांनी "स्पंदन " हा लेख संग्रह अतिशय आकर्षक रूपात प्रकाशित केला आहे. त्यांचेही कौतुक केले पाहिजे.असेच मार्गदर्शनपर लिखाण पुढील काळातही लेखिकेकडून होत राहो हीच सदिच्छा . त्यांची लेखणी अशीच बहरत जावो.

समिक्षण / परीक्षण
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
मोबा.नं. 9881862530

हायकू ( गुलाब )

हायकू

गुलाब

गुलाब फूल
खूप सुंदर आहे
सुवास वाहे

विविध रंग
आकर्षक रचना
नव कल्पना

काटेरी देठ
संरक्षण करतो
हाती टोचतो

आहे सर्वत्र
परिमळ भरला
मनी स्त्रवला

भ्रमर आला
मधुगंध प्राशिला
तृप्तच झाला

मधुर मध
उपयोगी पडतो
रोग हरतो

मनपाखरु
गुलाबा भोवतीच
घे गिरकीच

राहे आनंदी
मनाला सुखावते
प्रेरणा देते

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा .कोल्हापूर

Friday, 15 March 2019

हिंदी रुबाई ( शुक्रीया )

शुक्रीया आपका दिलसे,
दिखाया खुबसूरत नजारा।
भेजा है पैगाम हवाके साथ,
खुश हुआ दिल हमारा।

जागे है,तैयार हो गए है,
आ गए है अब स्कूलमें ।
हमेशा खुशी से झुम उठते है,
प्यार दोस्ती का हमारे दिलमें।

माणिक नागावे

कविता ( आनंद कचऱ्यातला )

स्पर्धेसाठी

चित्रकाव्य

  आनंद  कचऱ्यातला

एका दिवसाच्या आनंदाचा,
शेवट असा कचऱ्यात झाला.
झाली मौज क्षणापुरती,
प्रत्यय याचा पहा आला.

मिळवती निरागस बालिका,
आनंद कचऱ्यात ही सहजच.
कागदी टोपी ही मग भासे,
जणू शिरी शोभे मुकुटचं.

वाहते कचराकुंडी भरून,
बालिकांना भान न याचे.
नाही आड येते इथे गरिबी, 
प्रतिबिंब समाधानी मनाचे.

निखळ आनंद फुलला,
चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर.
चला आपण साजरा करु,
  वाढदिवस कचऱ्यावर.

ना  तमा घाणीची मनी,
ना तमा पसार्‍याची.
अस्ताव्यस्त पसरल्या वस्तू,
ना किंमत या हास्याची.

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड,जिल्हा. कोल्हापूर

चारोळी ( हळवे क्षण )

स्पर्धेसाठी

चारोळी

विषय - हळवे क्षण

हळवे क्षण जीवनातील  माझ्या
आठवता वाहतो पूर अश्रूंचा
बदलून गेले अवघे आयुष्य
कस लागला मग धैर्याचा

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Sunday, 10 March 2019

माझा परीचय

* नाव : श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे

* पत्ता :कुरुंदवाड, ता.शिरोळ, जिल्हा. कोल्हापूर
416106

* शिक्षण : एम.ए.बीएड.

* जन्मदिनांक : 21/ 12/ 1968

* नोकरी किंवा व्यवसाय :

सहा.शिक्षिका-- न्यू इंग्लिश स्कूल फॉर गर्ल्स् , कुरुंदवाड

* आपल्या विषयी थोडक्यात माहिती :
माझे बालपण कुरुंदवाड मध्ये अतिशय आनंदात व्यतीत झाले. माझे आई वडील दोघेही शिक्षक असल्यामुळे आमच्या शिक्षणाबरोबरच आमच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे आम्ही भावंडे सुसंस्कृत व सुसंस्कारित झालो. राष्ट्र सेवादलाच्या मुशीतून घडलेले आमचे वडील असल्यामुळे नकळतपणे आमच्यावरही तोच पगडा होता.मी लहानपणापासून राष्ट्र सेवादलाच्या शिबिरात जात होते.त्यावेळी मला जेष्ठ समाजवादी विचारवंत मा.श्री.ना.ग.गोरे,मा.श्री.यदुनाथ थत्ते, मा.श्री. एस.एम.जोशी. मा.श्री.निळू फुले,डॉ. श्रीराम लागू,मा.श्री.भाई वैद्य मा.श्री.गजानन केळकर, श्रीमती इंदुमती केळकर,श्री शाम पटवर्धन इ.अनेक मान्यवरांच्या सानिध्यात रहायला मिळाले. थोर स्वातंत्र्य सैनिक साथी सुरेंद्र आलासे यांच्या मार्गदर्शनाने व प्रोत्साहनामुळे मी वाचन, लेखन,भाषण,समाजसेवा इ. मधे सक्रीय सहभाग घेउ लागले.पुढे संपूर्ण इंग्रजी घेऊन महाविद्यालयीन शिक्षण बी.ए.बीएड पूर्ण करुन न्यू इंग्लिश स्कूल फॉर गर्ल्स् , कुरुंदवाड येथे सहा.शिक्षिका म्हणून कार्यरत झाले. हिंदी विषयाची आवड होती म्हणून हिंदी विषय घेऊन परत बी.ए. झाले.इंग्रजी विषयातून एम.ए.ची पदवी घेतली. शाळेत अध्यापनाबरोबर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत राहिले व एक विद्यार्थीप्रिय शिक्षिका म्हणून लोकप्रिय झाले. समाजवादी महिला सभा, राष्ट्र सेवादल,व लायनेस क्लब ऑफ कुरुंदवाड , महिला दक्षता समिती सदस्य, कुरुंदवाड पोलीस ठाणे, सकाळ- तनिष्का - ग्रुप लिडर ते समन्वयक अशा माध्यमातून समाजसेवा केली. आनंदवन व हेमलकसा या ठिकाणी जाऊन कपडे दान देऊन भेट देऊन आले.खूप समाधान वाटले व समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून गेला.व एक नवी दिशा मिळाली. समाजप्रबोधन करण्यासाठी मी विविध विषयांवर मार्गदर्शनपर भाषणे देते.विविध विषयांवर मासिके व वृत्तपत्रातून लेखन करते.माझा  " भावतरंग " हा कवितासंग्रह व " समतेचे पुजारी एस.एम.जोशी " अशी दोन पुस्तके प्रकाशित केली.अजून काही पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. सांगली आकाशवाणी केंद्रामार्फत विविध विषयांवर माहिती चे प्रसारण झाले आहे. तसेच " साम " टीव्ही वर तनिष्का समन्वयक या नात्याने मुलाखत प्रसारित झाली आहे. विविध राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाला आहे. तसेच साहित्यिक योगदानासाठी " आम्ही कवयित्री "                 " राज्यस्तरीय काव्यप्रेमी आदर्श पुरस्कार " प्राप्त झाले आहेत. या सगळ्या आनंदी घटना.सुखाला दु:खाची झालर असते.त्याप्रमाणे ऐन तारुण्यात वयाच्या पस्तीसाव्या वर्षी मिस्टरांचे रस्ते अपघातात निधन झाले. खूप मोठा मानसिक धक्का बसला.समोर दोन लहान चिमुकली मुले पाहून धाय मोकलून रडले. घरच्यांनी समजावून सांगितले. पण सावरायला वर्ष गेले.मनावर दगड ठेवून पुन्हा मुलांच्या साठी ऊभी राहिले. आई व वडील या दोन्ही भूमिका बजावत निर्धाराने दोन्ही मुलांना संस्कारात वाढवले. मुलही समजूतदार निघाली हीच जमेची बाजू आहे.शिक्षणातपण हुशार आहेत. एकटीच्या जीवावर काटकसर करुन त्यांना उच्च शिक्षण दिले . मुलगी एम.ई.ENTC झाली  व मुलगा बी.ई.मेकॅनिकल झाला. दोघेही आता बेंगलोर या ठिकाणी चांगल्या कंपनीत नोकरीला आहेत.आता थोडा विसावा मिळाला आहे. मी आता माझ्या जीवनात सुखी व समाधानी आहे.

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
9881862530

चित्रचारोळी ( आधार )

स्पर्धेसाठी

चित्रचारोळी

          आधार

सुरुकुतलेले हात आजोबांचे
आधार देती बालकाच्या हाताला
अनुभवाच्या शिदोरीवर देती
थोर संदेशाचे बोल नातवाला

जराजर्जर भक्कम हात देती
सदा कोमल,सकवार हाताला
जीवनातील पाऊल टाकताना
नाही आता तमा कसली बाळाला

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Tuesday, 5 March 2019

चित्रचारोळी ( शालीनता )

चित्रचारोळी

शालीनता

सलज्ज नेत्रांनी पाहते
नवतरुणी सजून अलंकारात
गुलाबी वसने अंगी शोभती
गजरा शोभे काळ्या कुंतलात

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

कविता ( निष्पर्ण वृक्ष )

स्पर्धेसाठी

चित्रकाव्य

निष्पर्ण वृक्ष

कवेत घेउन भास्कराला,
निष्पर्ण वृक्ष जलाशयाकाठी.
दृश्य मनोहर भासे नयना,
अवतरले काव्य मग ओठी.

जल पसरले क्षितीजाकाठी,
विस्तीर्णता नजरेत भरते.
सांजछायेत रंग वृक्षाचा ,
कालवृक्षापरी मज भासते.

सोनेरी गोळा भास्कराचा,
डोकावून हलकेच पाहतो.
भासतो जणू कुंकुमतिलक,
भाळी सौभाग्याचा ठसतो.

देतो संदेश निर्धाराचा ,
संघर्षातही तग धरण्याचा.
वठली जरी आज पाने,
फुलतील उद्या ध्यास आशेचा.

दिसती विविध आकार ,
शुष्कतेतही जिवंतपणा.
पसरुन बाहू चहूदिशांना,
शोधतसे जगण्याचा बहाणा.

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Monday, 4 March 2019

हिंदी कविता ( नवनिर्माण की जननी )

नवनिर्माण की जननी

आदिमाया आदिशक्ती तू,
तू है नवनिर्माण की जननी ।
  कोख से तेरे जनमे हैं,
  परमवीर और महाग्यानी।

संभालती है तू खुशियों से,
तुझे प्यारी इज्जत दोनों घरों की।
वार देती है तु अपनी खुशियाँ,
संवारती है जिंदगी अपने पुत्रों की।

   पढलिखकर बनाया अपना जीवन,
पढाया बच्चों को महत्व जानकर।
   खुद सहकर सारी जिल्लतें,
दूसरों को हँसाया अपना मानकर।

  किया पदार्पण हर क्षेत्र में,
चढकर कामयाबी की सिडियाँ।
नही अब कोई क्षेत्र दुजा अलग,
छोड दी है तुने सारी पाबंदीयाँ।

  धरती से लेकर आकाश तक,
बढाया तुने विश्वास से कदम।
  तोडकर गुलामी की शृंखलाएँ,
बढ रही है आगे तू हरदम ।

नौकरानी से लेकर भगवान तक,
  सफर तुम्हारा अनोखा है ।
बडी मुद्दत से तूने पाया है,
   प्यार और  स्नेह का सलीका है।

गजगामिनी से रणरागिनी तक,
सफर तुम्हारा है मनोरंजक।
लेकर तलवार हात मे अपने,
बचाई है अपनी इज्जत की संदूक।

  न तू अबला , है सबला,
  तेरी हिम्मत तेरी ताकत है।
पहचानना तुझे अपनी उर्जा है,
बलबूते पर अपने खड़े रहना है।

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
9881862530