आजोबांची माया
आज एक आजोबा शाळेत आले होते. आपल्या नातीला भेटण्याकरता. मी पाहिलं तिथे आपल्या नातीच्या डोक्यावरून, पाठीवरून मायेने हात फिरवत आहेत. माहीत होते की, त्या मुलीच्या आई-वडिलांच्या वादविवाद झाले असल्यामुळे तिची आई त्या मुलीला घेऊन आपल्या माहेरी राहत होती. ती मुलगी रोज सतरा ते अठरा किलोमीटर अंतर पार करून एसटी बसने शाळेला येत होती. अभ्यासात हुशार असल्यामुळे तिची चाललेली ही परवड पाहून मनाला दुःख होत होते. मी दोन-तीन वेळा तिची चौकशी केली. पण अजून आई-वडिलांच्यातील वाद मिटला नव्हता. पण आज आजोबा शाळेत आल्यामुळे, त्या विषयाला परत तोंड फुटले. मी त्या दोघांच्या जवळ जाऊन चौकशी केली असता ते तिचे आजोबा आहेत असे कळले. मी त्यांना विचारले," अहो, आजोबा, काय चालवलय तुम्ही ?, तुम्हाला तुमच्या मुलग्याला समजावून सांगता येत नाही का? अशानं हुशार मुलीचं तुम्ही नुकसान करत आहात. हे बरोबर नाही." माझे हे बोलणे ऐकल्यावर ते आजोबा म्हणाले,' तुम्ही कोण? याच शाळेत शिकवता का?" मी म्हणाले, " हो " त्यांनी मला माझे नाव विचारले व आपल्या घरातील परिस्थिती सांगायला सुरुवात केली. मी चौकशी केली, " काय करतो तुमचा मुलगा ? " ते म्हणाले," छोटी मोठी काय पडेल ते कामं किंवा सेंट्रींग ची कामं करतो." मग मी विचारले, " नेमके भांडणाचे कारण काय? " ते म्हणाले," विशेष काही नाही हो मॅडम, नेहमीचच नवरा बायकोचे भांडण!! " माझा पुढचा प्रश्न असा होता की," या भांडणात नेमकी कोणाची चूक आहे असं तुम्हाला वाटतं ? मी त्यांना समजावून सांगेन. मी पोलीस स्टेशनमध्ये महिला दक्षता समिती मध्ये काम करते. तुम्ही म्हणत असाल तर मी दोघांनाही समजावून सांगेन." मी असे म्हणताच त्यांना खूप बरे वाटले. ते म्हणाले," मॅडम, चूक तशी माझ्या मुलाचीच आहे." ऐकून मला आश्चर्य वाटले. कारण प्रत्येक आशा घटनेमध्ये सर्वजण आपल्या सुनेलाच दोष देतात. आणि इथे तर आजोबा आपल्या मुलाचे दोष न झाकता स्पष्ट शब्दात बोलत होते. असे दृश्य दुर्मिळच असते. ते आपल्या नातीला भेटायला आले होते. ते सांगत होते," मॅडम, माझी नात खूप हुशार आहे, तिच्याकडे लक्ष द्या. गल्लीतील सगळी लोकं या मुलीसाठी हळहळत आहेत." मी त्यांना म्हटलं," हे बघा आजोबा, एकदा तुम्ही प्रत्यक्ष या दोघांना एकत्र आणून समजावून सांगण्याचा प्रयत्न करा. या पातळीवर ते मी मिटले नाही तर मग मी माझ्या परीने प्रयत्न करीन." माझे हे बोलणे ऐकल्याबरोबर त्या आजोबांना खूप आनंद झाला. ते म्हणाले," मॅडम, एकदा जाऊन समजावून सांगितलेलं आहे. माझ्या मुलाला त्याची चूक कळून आलेली आहे. तो आपल्या बायकोला परत आणायला तयार आहे. परत मी त्याला समजावून सांगतो नाहीतर त्याला तुमच्याकडे घेऊन येतो." मी म्हटलं," हो नक्की घेऊन या आजोबा." आजोबांनी परत हात जोडले. त्यांच्या डोळ्यात मला एक अगतिकता, असहाय्यता व आपल्या नाती बद्दलचे प्रेम दिसून आले. पुन्हा पुन्हा सांगत होते, "मॅडम माझ्या नातिकडे तिकडे लक्ष द्या." मी त्यांना आश्वासन दिलं," आजोबा, तुम्ही निर्धास्त रहा, आमचं लक्ष आहे हिच्यावर. तुम्ही फक्त दोघांना समजावून सांगण्याचे काम करा' ते परत हात जोडून म्हणाले, " मॅडम, मी त्याला नक्की सांगतो, नाहीतर तुमच्या कडे घेऊन येतो." मी ,"ठीक आहे " असे म्हणून तिथून निघाले. स्टाफरूमच्या दरवाजाजवळ येऊन मी परत पाठीमागे पाहिले आणि माझं मन भरून आलं. कारण ते आजोबा आपल्या नातीची अतिशय आस्थेवाईकपणे चौकशी करत होते. त्यांचं मन आपल्या नातीसाठी तीळ तीळ तुटत होतं. ते तिला डोळे भरून पाहत होते. त्यांच्या नजरेला तो मायेचा ओलावा, प्रेम पाहून मलाही भरून आलं. आणि मनातील विचार आला की, आज-काल सहनशीलता संपत चाललेली आहे. लग्न, संसार हा सगळा खेळच वाटत आहे. छोट्या छोट्या कारणावरून नवरा-बायकोत होत आहेत. संसाराच्या रहाटगाडग्यात कोणीही मागे सरायला तयार नाही. पण या सगळ्यात ससेहोलपट होते ती मुलांची. त्यांचा विचार कधी कोण करणार आहे का? हा मला पडलेला मोठा प्रश्न आहे. संसार म्हटलं की भांडण, वाद-विवाद हे होणारच. पण ते किती ताणायचं, कोणत्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचं हे प्रत्येकाने ठरवले पाहिजे. पण हे शिकवून होत नाही. कारण संस्कार हे अनुकरणातून, अनुभवातून व्यक्तीमध्ये भिनत असतात. त्यासाठी घरातील मोठ्या व्यक्तींनी व्यवस्थित वागले तर येणारी पिढी त्यांचेच अनुकरण करून यशस्वी जीवनाची वाटचाल पूर्ण करू शकतील अशी मला खात्री आहे. लवकरच त्यांच्यातील भांडण मिटो ही सदिच्छा मनात धरून मी माझ्या तासावर निघून गेले.
No comments:
Post a Comment