Tuesday, 30 July 2019

चारोळी ( पावसाळ्यातील खवय्येगिरी)

उपक्रम

चारोळी
विषय - पावसाळ्यातील खवय्येगिरी

बरसता पावसाच्या धारा
खमंग लयलूट पदार्थांची
खवय्येगिरीला आले भरते
चंगळ झाली लहानथोरांची

रचना ©®
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चित्रचारोळी ( सुंदरी )

उपक्रम

चित्रचारोळी

सुंदरी

पीतगुलाबी वस्त्रातील सुंदरी
बैसली कीनारी जलाशयाच्या
हाती धरुनी पुष्पडहाळी छान
शोभे मधुर हास्य कोमलांगीच्या

रचना ©®
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Monday, 29 July 2019

चित्रचारोळी ( मी सबला )

उपक्रम

चित्रचारोळी

मी सबला

अवकाशापर्यंत मजल माझी
वीजेशीही मी सहज खेळते
नाही अबला ,मी हो सबला
कीतीही अवघड काम करते

रचना ©®
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Sunday, 28 July 2019

कविता ( लोट पाण्याचे )

लोट पाण्याचे
 
डोंगरमाथ्यावरुन खाली
झेपावती लोट पाण्याचे
दरीखोऱ्यातून फुलले वृक्ष
झेलती तुषार आनंदाचे

गर्द हिरवी झाडी लुभावते
रुप त्यांचे टवटवीत छान
आपसूकच लवती खाली
उंच वृक्षांची उंच मान

खळाळती ओहळ पाण्याचे
जणू करती प्रक्षालन रस्त्याचे
स्वच्छ सुंदर होउन निसर्ग
समाधानाचे तुषार पसरवतो

मेघांनीही केली दाटी
जणू आसुसली भेटीला
तप्त, तृषार्त धरणीला
जल प्रेमाचे पाजायला

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड. जिल्हा. कोल्हापूर

आठोळी ( शोध भाकरीचा )

स्पर्धेसाठी

आठोळी

शोध भाकरीचा

सर्वांनाच शोध भाकरीचा
असो मानव वा पशू ,पक्षी
मिळाली योग्य वेळेवर तरच
घेतली जाईल वामकुक्षी

शोधात भाकरीच्या फीरती
भरण्या खळगी पोटाची
चाले सतत लढाई त्यासाठी
हाताची अन् कामाची

रचना ©®
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड जिल्हा. कोल्हापूर

Wednesday, 24 July 2019

चित्रचारोळी ( सांज )

चित्रचारोळी

सांज

सांज झाली परतली पाखरे
मावळत्या सूर्याच्या साक्षीने
वृक्ष पाहतो वाट बाहू पसरुन
आसमंत उजळे सुवर्णछायेने

रचना ©®
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड,जिल्हा.कोल्हापूर

हायकू ( निसर्ग )

स्पर्धेसाठी

हायकू

विषय - शब्दगुंफण
शब्द - हिरवळ,गंध,गारवा,व्यस्त, हर्ष

शिर्षक- निसर्ग

गंध फुलांचा
मनी दरवळला
स्नेह जुळला

सखी बोलली
छानच हिरवळ
मने प्रांजळ

गारवा अंगा
खूपच झोंबला
असा वाहिला

व्यस्त सगळे
आपल्याच कामात
घ्यावे ध्यानात

हर्ष मनाला
निसर्गच साक्षीला
सर्व जगाला

रचना ©®
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Tuesday, 23 July 2019

पंचाक्षरी कविता( वृक्षारोपण )

स्पर्धेसाठी

पंचाक्षरी

वृक्षारोपण

वृक्षारोपण
करुया दारी
आनंद आहे
जगात भारी

पाऊस हवा
सर्व  सृष्टीला
मिळे दिलासा
मग डोळ्याला

वृक्ष सोबती
जीवनातील
सगे सोयरे
धरेवरील

छाया देउन
भव जीवाला
तृप्त करती
सर्व अंगाला

हिरवाईने
मोहरवते
प्राणवायूच
पसरवते

रचना ©®
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Monday, 22 July 2019

चित्रचारोळी ( बंदिशाळा )

चित्रचारोळी

बंदिशाळा

बंदिस्त या बंदिशाळेत
गुदमरतोय जीव अंधारात
हात ठेवून गजावरी घट्ट
बाहेर पडण्या मुक्त जगात

रचना ©®
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Sunday, 21 July 2019

लेख ( आधुनिक तंत्रज्ञान लहान मुलांसाठी योग्य का अयोग्य )

स्पर्धेसाठी

आधुनिक तंत्रज्ञान  लहान मुलांसाठी योग्य की अयोग्य

आधुनिक तंत्रज्ञानाची धरु कास,
  उजळूया भविष्य आमचे खास.

आजच्या संगणक युगात आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून जर आपण पुढे गेले तर नक्कीच आपण आपले भविष्य उजळवून टाकण्यास समर्थ होतो. आज ज्याला संगणक हाताळता येत नाही, स्मार्टफोन, अँड्रॉइड फोन वापरता येत नाही तो अडाणी व निरक्षर ठरत आहे. आजच्या युगात चाळीस पन्नास वर्षाच्या वयाच्या ज्या व्यक्ती आहेत त्यांना यातले ज्ञान लवकर समजत नाही. यासाठी त्यांना आपल्या मुलांच्या वर व नातवंडांच्या वर अवलंबून राहावे लागते. काहीजणांना तर किती वेळा सांगितले तरी लक्षातही राहत नाही. अशावेळी या प्रौढ व्यक्ती या  आपल्या घरातील लहान मुलांच्या कडून सर्व गोष्टी करून घेतात. आजची मुले ही स्मार्ट युगातील स्मार्ट मुले आहेत. आजच्या शाळा या डिजिटल झालेल्या आहेत. आजचे शैक्षणिक धोरण हे ज्ञानरचनावादी मूल्यावर अवलंबून आहे.यामध्ये मुलांच्या स्व विकासावर, स्व ज्ञानावर भर दिलेला आहे. आजचे विद्यार्थी इंटरनेटच्या सहाय्याने त्यांना न कळलेल्या गोष्टी, किंवा हवी असलेली माहिती सहजगत्या मिळवू शकतात. आजच्या शैक्षणिक धोरणात उपक्रम व प्रकल्प याला प्राधान्य दिले गेले आहे. जेणेकरून विद्यार्थी पाठाला अनुसरून असलेली माहिती मिळवून आपल्या ज्ञानात भर घालेल.ई-लर्निंगच्या माध्यमातून व ई- क्लास च्या माध्यमातून  शाळेमध्ये किंवा घरात असून सुद्धा विद्यार्थी आता शिकू शकतो. कारण ज्ञानाच्या कक्षा आता खूप रुंदावलेल्या आहेत. शाळेत सुद्धा प्रोजेक्टरच्या सहाय्याने,  अँड्रॉइड टीव्ही च्या साह्याने शिक्षण दिले जात आहे. त्यावेळी मुलांना शिक्षणासाठी मोबाईल संगणक फार उपयोगी पडतो. इंजिनिअरिंग मेडिकल या सारखे शिक्षण घेताना, विद्यार्थ्यांना संगणक व लॅपटॉपची आवश्यकता असते. त्यावेळी त्यांना जे आवश्यक आहे ते दिलेच पाहिजे. पण त्याचा उपयोग विद्यार्थी व मुले कशा प्रमाणात उपयोग करतात यावर बरेच अवलंबून आहे. पालकांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. तुझ्यावर लक्ष दिले पाहिजे. व त्यांना जाणून घेतले पाहिजे.आजकाल जवळ जवळ सर्व पालकांच्या कडे अँड्रॉइड फोन आहेत. व्हाट्स,फेसबुक, ट्विटर सारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून पालक वर्ग आपला बराचसा वेळ घालवत असतात. याचेच अनुकरण त्यांची मुले करत असतात. बऱ्याच वेळा असे पाहिले जाते की, आपल्या कामामध्ये मुलांचा व्यत्यय नको यासाठी कितीतरी माता व पालक आपल्या मुलांच्या हाती हा स्मार्टफोन देतात. यामध्ये गेम खेळणे, गाणी ऐकणे, चित्रे पाहणे,यासारख्या मनोरंजक गोष्टी असतात. पाहण्यामध्ये ते गुंगून जातात. मग त्यांना कशाचेही भान राहत नाही. एकदा सवय झाली की ती लवकर सुटणेही अशक्य असते. मग ही मुले या अँड्रॉईड फोनच्या सवयीचे गुलाम होतात. त्यांना फोन दिला नाही तर ते रडतात ,ओरडतात, त्रागा करून घेतात. अशा वेळेला पालक वर्ग मनात नसताना सुद्धा मुलांच्या फाजील लाडासाठी त्यांना स्मार्टफोन देतात. सुरुवातीला जरी ते चांगले वाटत असले तरीसुद्धा याचे दूरगामी परिणाम अतिशय वाईट आहेत. कारण परिणाम मुलांच्या मेंदूवर नसांवर होत असतो. जेवायला या मुलांच्या मेंदूवर परिणाम झाल्यामुळे त्यांना स्वतःचा तोल सावरणेही कठीण होते. अशावेळी त्या मुलाचे आयुष्य धोक्यात आपण घालतो. या वेळी पालकांची भूमिका महत्त्वाची असते. कारण आपला मुलगा ,मुलगी वापर किती व कशासाठी करते, करतो यावर लक्ष ठेवले पाहिजे. व फाजील लाड यांना करता. योग्य त्या वेळी कठोर ही वागले पाहिजे.  आधुनिक तंत्रज्ञान हे लहान मुलांसाठी जेवढे चांगले आहे त्याच्यापेक्षा जर त्याची वाईट सवय लावून घेतली तर ते खूपच वाईट आहे. त्यामुळे योग्य सवयी लावण्याकरता त्यांना आपण लहानपणापासूनच या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कोणत्याही वेळी व कितपत करायला हवा याची जाण ठेवून त्यांना तशी सवय लावली पाहिजे.  नाहीतर मोठेपणी ते अशक्य होऊन बसते.आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर योग्य प्रमाणात केल्यास ते चांगले आहे.

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
9881862530

चित्रचारोळी ( बालिश भावना )

स्पर्धेसाठी

चित्रचारोळी

हिरव्या रानी भावंडे सुंदर
टाकती दाणे कोंबडीपिलांना
हास्य शोभे रंगीत कपड्यात
तोड नाही बालिश भावनांना

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चारोळी ( लोभ )

उपक्रम

चारोळी

लोभ

पैशाचे गाजर लुभावते मना
पुढे खाई आहे जाण जरा
वेळीच सावध हो मानवा
लोभ सोडून जगी जग खरा

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Saturday, 20 July 2019

हायकू ( चैत्र चाहूल )

स्पर्धेसाठी

हायकू

चैत्र चाहूल

चैत्र चाहूल
निसर्गाला लागली
शुष्कता गेली

प्रथम मास
मराठी महिन्याचा
मोद सणांचा

गळली पाने
चाहूल वसंताची
नव फुलांची

कोकीळ गाते
सूर झंकारते
मुक्त नाचते

नव सृष्टी
परिवर्तन झाले
चैत्र फुलले

रचना ©®
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Friday, 19 July 2019

कविता ( झेप )

स्पर्धेसाठी

कविता

झेप

घेऊन झेप लांबवर,
हरीण ही निघाली.
नाही चिंता जगाची,
बाळासाठी झेपावली.

नसे भान काट्याकुट्यांचे,
नजरेसमोर दिसे लक्ष्य.
नाही व्हायचे तीला,
कुणा सावजाचे भक्ष्य .

निघाली आकांताने,
काटेरी झुडुपे साथीला.
नाही तोड जगी कुठेही,
आईच्या या प्रितीला.

अंतराळी पाय चारही,
नसे तमा अंतराची.
काळीज लकलकतयं,
होण्या पूर्ती ध्येयाची.

सोनेरी मऊशार काया,
उभे कान अन् लांब मान.
खूर काळे हवेत उधळून,
निघाली हरीण छान.

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Thursday, 18 July 2019

चारोळी ( निवांत )

उपक्रम

निवांत

शांत निवांत समयी आकाशी
उजळून निघाल्या दाहीदिशा
समजून घेऊ सजना आपण
आपल्या सहवासाचीच भाषा

रचना ©®

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Wednesday, 17 July 2019

चारोळी ( सलोखा )

स्पर्धेसाठी

चारोळी

विषय - सलोखा

यशोशिखरी वाजती चौघडे
घोडदौड यशस्वी एस.के. समुहाची
कामी आला सलोखा सर्वांच्या
फडके पताका विजयाची

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Monday, 15 July 2019

हायकू ( पक्ष्यांची शीळ )

उपक्रम

हायकू

पक्ष्यांची शीळ

पक्ष्यांची शीळ
रिझवते कानाला
मोद मनाला

रानात आली
वृक्षांवरुन गेली
मनी विरली

भाषा खगांची
समजेल कोणाला
मोद मनाला

कानी भरला
कलरव पक्ष्यांचा
अर्थ भाषेचा

गोड आवाज
हळुवार कळते
रुंजी घालते

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

हायकू ( बेंदूर )

उपक्रम

हायकू

बेंदूर

आला बेंदूर
खास सण बैलांचा
समाधानाचा

सजली बैलं
बेंदराच्या सणाला
पोळीतुपाला

सण बेंदूर
निघे मिरवणूक
दिसे चुणूक

बेंदूर सण
प्रेमात मालकाच्या
चिंब न्हायच्या

साजरा झाला
सण बेंदूर छान
ठेवले भान

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Friday, 12 July 2019

लेख ( आजोबांची माया )

                आजोबांची माया

आज एक आजोबा शाळेत आले होते. आपल्या नातीला भेटण्याकरता. मी पाहिलं तिथे आपल्या नातीच्या डोक्यावरून, पाठीवरून मायेने हात फिरवत  आहेत. माहीत होते की, त्या मुलीच्या आई-वडिलांच्या वादविवाद झाले असल्यामुळे  तिची आई त्या मुलीला घेऊन आपल्या माहेरी राहत होती. ती मुलगी रोज सतरा ते अठरा किलोमीटर अंतर पार करून एसटी बसने शाळेला येत होती. अभ्यासात हुशार असल्यामुळे  तिची चाललेली ही परवड पाहून मनाला दुःख होत होते. मी दोन-तीन वेळा तिची चौकशी केली. पण अजून आई-वडिलांच्यातील वाद मिटला नव्हता. पण आज आजोबा शाळेत आल्यामुळे, त्या विषयाला परत तोंड फुटले. मी त्या दोघांच्या जवळ जाऊन चौकशी केली असता ते तिचे आजोबा आहेत असे कळले. मी त्यांना विचारले," अहो, आजोबा, काय चालवलय तुम्ही ?,  तुम्हाला तुमच्या मुलग्याला समजावून सांगता येत नाही का?  अशानं हुशार मुलीचं  तुम्ही नुकसान करत आहात. हे बरोबर नाही." माझे हे बोलणे ऐकल्यावर ते आजोबा म्हणाले,' तुम्ही कोण? याच शाळेत शिकवता का?"  मी म्हणाले, " हो "  त्यांनी मला माझे नाव विचारले व आपल्या घरातील परिस्थिती सांगायला सुरुवात केली.  मी चौकशी केली, "  काय करतो तुमचा मुलगा ? "  ते म्हणाले,"  छोटी मोठी काय पडेल ते कामं किंवा सेंट्रींग ची कामं करतो."  मग मी विचारले, "  नेमके भांडणाचे कारण काय? "  ते म्हणाले,"   विशेष काही नाही हो मॅडम, नेहमीचच नवरा बायकोचे भांडण!! "  माझा पुढचा प्रश्न असा होता की," या भांडणात नेमकी कोणाची चूक आहे असं तुम्हाला वाटतं ?  मी त्यांना समजावून सांगेन. मी पोलीस स्टेशनमध्ये महिला दक्षता समिती मध्ये काम करते. तुम्ही म्हणत असाल  तर मी दोघांनाही समजावून सांगेन." मी असे म्हणताच त्यांना खूप बरे वाटले. ते म्हणाले," मॅडम,  चूक तशी माझ्या मुलाचीच आहे." ऐकून मला आश्चर्य वाटले. कारण प्रत्येक आशा घटनेमध्ये सर्वजण आपल्या सुनेलाच दोष देतात. आणि इथे तर आजोबा आपल्या मुलाचे दोष न  झाकता स्पष्ट शब्दात बोलत होते. असे दृश्य  दुर्मिळच असते. ते आपल्या नातीला भेटायला आले होते. ते सांगत होते,"  मॅडम, माझी नात खूप हुशार आहे, तिच्याकडे लक्ष द्या. गल्लीतील सगळी लोकं  या मुलीसाठी हळहळत आहेत." मी त्यांना म्हटलं,"  हे बघा आजोबा, एकदा तुम्ही प्रत्यक्ष या दोघांना एकत्र आणून समजावून सांगण्याचा प्रयत्न करा. या पातळीवर ते मी  मिटले नाही तर मग मी माझ्या परीने प्रयत्न करीन." माझे हे बोलणे ऐकल्याबरोबर त्या आजोबांना खूप आनंद झाला. ते म्हणाले," मॅडम, एकदा जाऊन समजावून सांगितलेलं आहे. माझ्या मुलाला त्याची चूक कळून आलेली आहे. तो आपल्या बायकोला परत आणायला तयार आहे. परत मी त्याला  समजावून सांगतो नाहीतर त्याला तुमच्याकडे घेऊन येतो."   मी म्हटलं,"  हो नक्की घेऊन या आजोबा." आजोबांनी परत हात जोडले. त्यांच्या डोळ्यात मला एक अगतिकता, असहाय्यता व आपल्या नाती बद्दलचे प्रेम दिसून आले. पुन्हा पुन्हा सांगत होते, "मॅडम माझ्या नातिकडे तिकडे लक्ष द्या."  मी त्यांना आश्वासन दिलं,"  आजोबा, तुम्ही निर्धास्त रहा, आमचं लक्ष आहे हिच्यावर. तुम्ही फक्त दोघांना समजावून सांगण्याचे काम करा'  ते परत हात जोडून म्हणाले, "  मॅडम,  मी त्याला नक्की सांगतो, नाहीतर तुमच्या कडे घेऊन येतो."   मी ,"ठीक आहे " असे म्हणून तिथून निघाले. स्टाफरूमच्या दरवाजाजवळ येऊन मी परत पाठीमागे पाहिले आणि माझं मन भरून आलं. कारण ते आजोबा आपल्या नातीची अतिशय आस्थेवाईकपणे चौकशी करत होते. त्यांचं मन आपल्या नातीसाठी तीळ तीळ तुटत होतं. ते तिला डोळे भरून पाहत होते. त्यांच्या नजरेला तो मायेचा ओलावा, प्रेम पाहून मलाही भरून आलं. आणि मनातील विचार आला  की, आज-काल सहनशीलता संपत चाललेली आहे. लग्न, संसार हा सगळा खेळच वाटत आहे.  छोट्या छोट्या कारणावरून नवरा-बायकोत होत आहेत. संसाराच्या रहाटगाडग्यात कोणीही मागे सरायला तयार नाही. पण या सगळ्यात ससेहोलपट होते  ती मुलांची. त्यांचा विचार कधी कोण करणार आहे का?  हा मला पडलेला मोठा प्रश्न आहे. संसार म्हटलं की भांडण, वाद-विवाद हे होणारच. पण ते किती ताणायचं, कोणत्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचं  हे प्रत्येकाने ठरवले पाहिजे. पण हे शिकवून होत नाही. कारण संस्कार हे अनुकरणातून, अनुभवातून व्यक्तीमध्ये भिनत असतात. त्यासाठी घरातील मोठ्या व्यक्तींनी व्यवस्थित वागले तर येणारी पिढी त्यांचेच अनुकरण करून यशस्वी जीवनाची वाटचाल पूर्ण करू शकतील अशी मला खात्री आहे.  लवकरच त्यांच्यातील भांडण मिटो  ही सदिच्छा मनात धरून मी माझ्या तासावर निघून गेले.

चारोळी ( आस दर्शनाची )

स्पर्धेसाठी

चारोळी

विषय - आस दर्शनाची

विठ्ठल दारी वैष्णवांची वारी
घेऊन मनी आस दर्शनाची
टाळ,मृदुंग, चिपळ्या,पताका
शोभते गळा माळ तुळशीची

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Monday, 8 July 2019

बालकाव्य ( पाऊस )

बालकाव्य स्पर्धेसाठी

विषय - पाऊस

आला आला पाऊस आला,
आनंदाने नाचू गाऊ चला.

पिंकी,चिंकी,बबली सारे या रे,
पावसात सगळे भिजू या रे.

धडाडधुम धडाडधुम गरजले,
ढग एकमेकांवर आपटले.

लख लख विजा चमकल्या ,
लहान मुली साऱ्या घाबरल्या.

पाऊसधारा पडती खाली,
जमीन झाली ओली ओली.

पाण्याचे साचले मोठे तळे,
पाहून पोटात आले गोळे.

चिखलाचा राडा सगळीकडे,
पळाली पोरे अंगणाकडे.

नावा केल्या कागदाच्या,
मधेच सोडल्या डबक्याच्या

पाहता पाण्यात तरंगताना,
लहान नाव पोहताना.

एकच गिल्ला पोरासोरांचा,
घेतला आनंद पावसाचा.

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड ,जिल्हा. कोल्हापूर

Sunday, 7 July 2019

बालकाव्य ( गोगलगाय )

बालकाव्य

गोगलगाय

लांबुळकी दोन शिंगांची ,
हळूहळू सरकते पुढेपुढे.
लागते हाताला बुळबुळीत,
भिंतीवर सावकाश चढे.

जातेस निवांतपणे सर्वत्र,
अंदाज घेत सावधपणे.
काय सोडतेस पाठीमागे?
चमकदार रेषा नियमितपणे.

पाठीवर असते शंख कधी,
कुठुन आणतेस सांग बाई?
गवतात का मातीत राहतेस ?
असते कुठे तुझी आई ?

कधी येतेस कधी जातेस,
कळतच नाही तुझं जगणं.
अल्पायुषी असलीस तरी,
सोडत नाहीस सरपटणं.

गोगलगायीची चाल म्हणून,
संथगतीला लोकं हिणवती.
पण सतत चालून चालून,
नक्कीच योग्य जागी पोहचती

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Wednesday, 3 July 2019

कविता ( मातृछाया )

स्पर्धेसाठी

चित्रकाव्य

मातृछाया

शांत,निवांत पहुडले,
कुशीत आईच्या झोपले.
नाही चिंता,काळजी कसली,
मातृछायेचे वरदान लाभले.

भाग्यवान ही पिले पाहता,
माता आठवे लहानपणीची.
घेऊन जवळी प्रेम देतसे,
उपमा न कसली या उबेची.

कोनाड्यात भिंतीच्या,
विविधरंगी पिले पहुडली.
अंगावरती मातेच्या निर्धास्त,
काया सुकोमल चिकटली.

छोट्या छोट्या फरशीवरती,
पोते बाजूला पडले खुशाल.
कुशी आईच्या मायेची देते,
फीका पडतो इथे महाल.

उब मातृत्वाची जयास मिळे,
नसे अपेक्षा स्वर्गसुखाची.
ममतेचे ही अपूर्व संधी,
वाटे मनी हवी कायमची.

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Tuesday, 2 July 2019

अभंग ( सखा पांडुरंग )

स्पर्धेसाठी

अभंग लेखन

विषय - सखा पांडुरंग

सखा पांडुरंग ।
चंद्रभागे तीरी।
आलो तुझ्या दारी।।
भक्तीभावे ।। १ ।।

सावळ्या विठ्ठला ।
गीत तुझे गातो ।।
मनात हर्षितो ।।
दास तुझा ।। २ ।।

आले दिंडीतून ।
वारकरी सारे ।।
उघड तू दारे ।
मनाचिया ।।३ ।।

भजन कीर्तन ।
टाळ मृदुंगात ।।
तल्लीन ध्यानात ।
गीत गाती ।। ४ ।।

आस दर्शनाची ।
पूरी झाली देवा ।।
नको दूजा मेवा।
पामराला ।। ५ ।।

तुळस मंजिऱ्या ।
घेई डोईवर ।।
हार गळाभर ।
रुळतसे ।। ६।।

तूच चक्रपाणी।
त्राता वैष्णवांचा।।
गुरु जीवनाचा।
भक्तराज ।।७।।

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
मोबाईल नंबर 9881862530

Monday, 1 July 2019

कविता ( शब्दवेलीचे जनक )

स्पर्धेसाठी

कविता

विषय-- शब्दवेलीचे जनक

शब्दांच्या गर्भातून हुंकारला,
शब्दवेलीचा जनक रोहिदास.
शब्दप्रपंचानेच उजळला खरा
शब्दांचीच सतत असे आस.

शब्दांनीच उघडली कवाडे,
साहित्यिकांच्या मनाची.
दारे सुरेख बनवली यांनी,
नवीन बांधलेल्या वास्तूची.

जागवली प्रतिभा सर्वांची,
कल्पनाशक्ती फुलवली.
सकस कवी ,साहित्यिक,
हरएक स्पर्धा गाजवली.

प्रकटदिनाच्या दिनी जमला,
मेळा शुभाशीर्वाद देण्यास.
आशिष सदैव राहील माझे,
प्रेरीत तू व्हावे साहित्यास.

भावी आयुष्यात तुझ्या यावे,
सुख समृध्दीचे सदैव भरते.
आयुरारोग्य लाभो तुजला,
मनिषा ईश्वरचरणी करते.

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

कविता ( पहिला पाऊस )

स्पर्धेसाठी

कविता

आठ अक्षरी

विषय - पहिला पाऊस

झाली उन्हानं काहिली,
धारा घामाच्या वाहील्या.
अंग भिजूनच गेले ,
शिव्याशाप खूप दिल्या.

आस पावसाची आता,
भिजू दे अंग पाण्याने .
आला पहिला पाऊस ,
नाचू गाऊ आनंदाने.

सरी बरसल्या खूप ,
शांत झाले तन मन .
धरा हासली पिऊन,
जल आहेच जीवन.

फूलवेली फळपाने,
रानोमाळ बहरले .
हिरवाई पसरली,
चहूबाजू पाणी आले.

आस पाण्याची भागली,
नदी भरुन वाहीली.
शेतकरी खूष झाला,
पिके डोलाया लागली.

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर