Thursday, 10 January 2019

अष्टाक्षरी ( वृक्षछाया मोहवते )

स्पर्धेसाठी

अष्टाक्षरी

चित्रकाव्य

वृक्षछाया मोहवते

आज माझ्या दारी मला
वृक्षछाया मोहवते
सहजच पसरली
शिरावर मोद देते

शांत निवांत समयी
आरामात विसावली
माय अंगणी आनंदी
प्रेमभरे सुखावली

घनगर्द तरुराज
माथ्यावर विसावला
सावलीने झोपडीला
आधारच गवसला

संसाराच्या आसऱ्याला
चंद्रमौळी ही सजली
पर्णसंभाराच्या खाली
अलवार आनंदली

पडे फीका महाल ही
मिळे न सौख्य असले
निसर्गाच्या सानिध्यात
दु:ख येई ना कसले

किमयाच निसर्गाची
तंत्रज्ञान कमी पडे
बांधू म्हटले आजही
बुद्धी तोकडी ही पडे

डेरेदार पर्णछाया
सुखावते लोचनांला
ऐट भारी वाकन्याची
प्रेमभावे बिलगला

सुख हेच भारी आहे
नको मजला संपत्ती
ऑक्सिजन भरपूर
नाही कुठली आपत्ती

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

No comments:

Post a Comment