Sunday, 13 October 2019

परीक्षेच्या कालावधीत विद्यार्थ्यांच्यातील ताणतणाव

चर्चेसाठी मुद्दे

*१)परीक्षाकाळातील विद्यार्थ्यांच्या मुख्य समस्या कोणत्या?*

परीक्षाकाळातील विद्यार्थ्यांची मुख्य समस्या असते ती म्हणजे परीक्षेचे घेतलेले टेन्शन होय.

*२)विद्यार्थ्यांची ताणतणावाची कारणे कोणती?*

तणावाची कारणे

1) सुरवातीपासून अभ्यासाकडे केलेले दुर्लक्ष
2) वर्गामध्ये शिक्षकांच्या शिकवण्याकडे लक्ष न देता टिवल्याबावल्या करत बसणे.
3) शिकवलेल्या भागाची उजळणी न करणे.
4) अभ्यासात सातत्य न ठेवणे.
5) परीक्षेची अकारण घेतलेली धास्ती
6) लिखाणाचा सराव नसणे

*३)पालक नात्याने आपण विद्यार्थ्यांना कसे मार्गदर्शन करू शकता?*

पालक या नात्याने मी स्वतः त्यांना अभ्यासाला घेऊन बसेन.त्यांना वेळ देईन. त्यांच्या शंकांचे निरसन करेन.योग्य ठिकाणी मार्गदर्शन करेन.परीक्षा म्हणजे काहीतरी भयंकर आहे ही त्यांच्या मनातील भावना काढून टाकण्याचा प्रयत्न करेन.

*४)परीक्षेपूर्वी पालकांची जबाबदारी कोणती असावी?*

सतत मुलांच्या सोबत राहून त्यांना तणाव न देता त्यांचे मनोबल वाढवणे,आधाराचे शब्द ऐकवणे.महत्त्वाचे म्हणजे आपल्या अपेक्षा न लादणे.आरोग्याची काळजी घेणे.सकस आहार देणे
ही सर्व काळजी घेणे पालकांची जबाबदारी आहे.

*५)विद्यार्थ्यांनी परीक्षा काळात कोणत्या गोष्टी कराव्यात/कोणत्या गोष्टी टाळाव्यात?*

विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या काळात तणावरहित असले पाहिजे.योग्य पद्धतीने अभ्यास करावा.योग्य व सकस आहार घ्यावा. तब्येतीची काळजी घ्यावी. या गोष्टी कराव्यात
तर दुसऱ्या बरोबर आपली तुलना करु नये.खूप जागरण करु नये.बाहेरचे पदार्थ व तेलकट, तुपकट ,स्वास्थ्य बिघडवणारे पदार्थ खाऊ नयेत.अभ्यासाकडे दुर्लक्ष करु नये.व सर्व मला पाठ झालेच पाहिजे असा आग्रह धरु नये.या गोष्टी टाळाव्यात

*६)सुजाण पालक म्हणून विद्यार्थ्याप्रति आपली जबाबदारी काय असावी?*

सुजाण पालक म्हणून आपली भूमिका अशी असावी की सुरवातीपासूनच विद्यार्थ्यांच्या अभ्यासाकडे लक्ष दिले पाहिजे. शिक्षकांना वरचेवर भेट देऊन पाल्याची चौकशी, अभ्यासासंबधी चौकशी करणे.वेळच्यावेळी पाल्यात सुधारणा करवून घेणे. आपल्या अपेक्षा त्यांच्यावर न लादता त्यांच्या बुद्धीची झेप,आवाका पाहून त्यांना त्यांच्या कलाने जाऊ देणे.

*७)परीक्षा काळातील ताण तणाव कमी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी काय खबरदारी घ्यावी?*

परीक्षाकाळातील ताणतणाव कमी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी योगासने , प्राणायाम व ओंकारासारखे व्यायाम करावेत.मन शांत ठेवून अभ्यास करावा.आरोग्याची काळजी घ्यावी.

*८)विद्यार्थ्यांच्या ताणतणावासाठी पालकांनी कशी खबरदारी घ्यावी?*

विद्यार्थ्यांचा ताणतणाव घालवण्यासाठी पालकांनी स्वत:चे आचरण सुधारले पाहिजे. घरात शांतता ठेवली पाहिजे. घरात कोणत्याही प्रकारचा कलह करता कामा नये.पाल्याजवळ बसून धीर द्यावा,चांगली उदाहरणे द्यावीत

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

No comments:

Post a Comment