कविता
कृष्णामाई
संथ वाहणारी कृष्णामाई,
अशी कशी कोपलीस ?
काय चुकले आमचे माते,
जरा थांबून सांगशील ?
नको कोपू अशी आमच्यावर,
सगळीच तुझी गं लेकरे.
जातील कुठे,कशी सारी ?
सारीच तुझी अजाण पोरे.
गल्लीबोळातून ,घराघरातून,
सानथोरांच्या झोपडी महालातून
नाही सोडलीस कुठलीच जागा
अशी का चिडलीस मनातून ?
थांब आता ,विचार कर जरा,
बाळगोपाळांच्या मनाचा.
नको कालवू माती आता,
विचार कर त्यांच्या आनंदाचा.
कीती गेले बळी निरपराध,
दोष त्यांचा सांगशील का ?
कृष्णामाता लेकरांची तू ,
आतातरी थांबशील का ?
काय हवे तूला सांग मला,
चूक आमची मान्य आहे.
पर्यावरण रक्षणासाठी आता,
सदैव दक्ष राहणार आहे.
कवयित्री ©®
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
No comments:
Post a Comment